Wednesday, 6 January 2016

आनंदी लोकांचा देश ' अर्जेन्टिना '



आनंदी लोकांचा देश   ' अर्जेन्टिना  '

(पूर्व प्रसिध्दी : महाराष्ट्र टाईम्स २८-०८-२०१५)

International Youth Exchange या रोटरीच्या कार्यक्रमांतर्गत आम्ही जेव्हा आमच्या सोळा वर्षाच्या मुलाला 'हर्षवर्धन' ला एका वर्षासाठी परदेशात पाठवायचे ठरवले, तेव्हा या कार्यक्रमाच्या निवड प्रक्रियेतून त्याला 'अर्जेन्टिना' हा देश मिळाला. मी आणि माझी बायको  दोघेही गोंधळलो. या देशाचे नाव ऐकले होते. 'माराडोना' हा अतिशय लढवय्या असा  प्रसिध्द फुटबॉल चा खेळाडू या देशाचा आहे हे माहिती होते. हर्षवर्धन ने विचारले " बाबा हा देश कुठे आहे?" मी आठवून म्हणालो "दक्षिण अमेरिकेत कुठेतरी असावा.” आणि लक्षात आले कि खरच, आपल्याला या देशाबद्दल काहीच माहिती नाही. या अनोळखी देशात सोळा वर्षाच्या छोट्या मुलाला कसे पाठवायचे? आम्ही काळजीत पडलो. हर्षवर्धन मात्र आनंदात होता. हर्षवर्धन आनंदात आणि आम्ही काळजीत बाहेर पडलो.
घरी आल्यावर ताबडतोप संगणक चालू केला, इंटरनेट वरून 'अर्जेन्टिना' बद्दल माहिती काढण्याचा सपाटा सुरु केला. आप्पा बळवंत चौकात जाउन 'अर्जेन्टिना' बद्दल काही पुस्तके मिळतात का ते पाहिले. काही मिळालीही ! जशी जशी माहिती घेत गेलो, तसे तसे या देशाचे वेगळेपण लक्षात येत गेले.

दक्षिण अमेरिका खंडातील पूर्व किनाऱ्यावर 'अर्जेन्टिना' हा लांबट आकाराचा देश उत्तर दक्षिण असा पसरला आहे. पश्चिमेला 'अन्डीज' पर्वतांची रांग, पूर्वेला अटलांटिक महासागर या मध्ये अर्जेन्टिना हा देश विसावला आहे.  हा देश भौगोलिक दृष्ट्या हि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा आहे. 'अर्जेन्टिना' च्या उत्तरेला बोलिव्हिया व पराग्वे हे देश आहेत, तर दक्षिणेला व पश्चिमेला 'चिले' (किंवा चिली) हा देश आहे. (याच चिली मध्ये आपल्या रामायणाच्या वेळचे काही संदर्भ व अवशेष सापडतात). भारतात जशी परस्पर विरोधी भूवैशिष्ठ्ये आढळतात तसेच 'अर्जेन्टिना' देखील परस्परविरोधी (Contrasting) भूवैशिष्ठ्ये आढळतात.  म्हणजे उत्तर 'अर्जेन्टिना' अतिउष्ण हवामान असते तर दक्षिण 'अर्जेन्टिना' मध्ये तीव्र हिवाळा असतो. 'अर्जेन्टिना'च्या दक्षिण टोकावरून अंटार्टिका अक्षरशः दिसतो.  प्रामुख्याने या देशाचे हवामान समशीतोष्ण असले तरी,  भूभागातील उंच-सखलतेनुसार हवामानातील विविधता अनुभवता येते.  उत्तरेकडील भागात उन्हाळा तीव्र व दमट असतो, तर हिवाळा हिवाळा सौम्य व कोरडा ! देशाच्या दक्षिणेकडील उन्हाळे उबदार असतात, तर हिवाळ्यात जोरदार बर्फवृष्टी होते. दक्षिण अमेरिका या खंडातील तापमानाचा उच्चांक व नीचांक 'अर्जेन्टिना'तच नोंदवला गेला आहे.


'अर्जेन्टिना'तील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे 'फुटबाल' अर्थात  सॉकर ! ‘फिफा’ वर्ल्डकप अनेकदा जिंकून 'अर्जेन्टिना'ने या खेळावरचे आपले प्रभुत्व सिध्द  केले आहे. त्याचप्रमाणे ऑलीम्पिक मधेही फुटबॉलचे सुवर्णपदक जिंकले आहे. फुटबॉल खालोखाल येथे व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल चा प्रसार झालेला दिसतो. याखेरीज ‘फिल्डहॉकी’ मध्ये महिलांनी बाजी मारली आहे.  टेनिसची हि लोकप्रियता येथे वेगाने वाढते आहे. उच्चभ्रू लोकांमध्ये ‘पोलो’ हा खेळ विशेष लोकप्रिय आहे. पोलो या खेळाचे विश्वविजेते पद 'अर्जेन्टिना'च्या राष्ट्रीय संघाने १९४९ पासून सातत्याने राखले आहे.

सोळाव्या शतकात स्पॅनिश लोक येथील भूगर्भातील चांदीच्या साठ्याकडे आकर्षित होऊन या देशात आले. चांदीला लँटिन भाषेत 'अर्जेन्टन' म्हणतात. त्यावरून अभूभागाला ‘अर्जेन्टिना' असे नाव पडले. कॅनडा, यु. एस. ए., ऑस्ट्रेलिया या देशांप्रमाणे 'अर्जेन्टिना' हा देश स्थलांतरीतांचा देश मानला जातो. एकोणिसाव्या शतकात युरोपातून स्थलांतर करून आलेल्या व स्थाईक झालेल्या लोकांचे प्रमाण येथे ९० टक्के आहे.  त्यातही इटली, फ्रान्स, स्पेन मधून आलेल्या लोकांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. या सर्वांचा प्रभाव पडल्यामुळे अर्जेन्टिना मधील नागरिकांचे वर्णन " स्वतःला ब्रिटीश समजणारा, फ्रेंचमन सारखा वागणारा, स्पॅनिश भाषिक इटालियन " असे केले जाते. अर्जेन्टीनाची अधिकृत भाषा स्पनिश आहे. तेथे इंग्रजी भाषा फारशी बोलली जात नाही. नव्या पिढीची तरुणाईच काय ते थोडेफार तोडके मोडके इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करते. 

          या अर्जेंटिनियन लोकांचा स्वत:ला घड्याळाला बांधून घ्यायला आवडत नाही. इथल्या सार्वजनिक जीवनात "अर्ध्या तसच उशीर" हा उशीर मानलाच जात नाही. (हे काहीसे आपल्यासारखेच आहे, नाही का?) शिवाय हि मंडळी 'आफ्टरनून सिएस्टा ' म्हणजे वामकुक्षी आवश्य घेतात. अत्यंत आनंदित राहणाऱ्या ह्या अर्जेंटिनियन लोकांचा आवडता छंद म्हणजे मनसोक्त ' पोहणे '! छोटासा का होईना एक स्विमिंग पूल तुम्हाला घरटी आढळेल. मित्रांच्या बरोबर गप्पा मारत, छान पैकी फेसाळणाऱ्या बीयरचा अथवा जगात प्रसिद्ध असलेली अर्जेंटिनियन वाईनचा स्वाद घेणे ही आनंदी जीवनाची बहुतेकांची संकल्पना !
           

          अर्जेन्टिना मधील खाद्य संस्कृती, कलाक्षेत्र हेही अतिशय समृद्ध असे आहे. अर्जेंटिनाचे नाव कलाक्षेत्रात जोडले गेले आहे ते टॅंगो या नृत्य प्रकारामुळे! उत्तर अमेरिका व युरोपीय देशामधील नृत्य शौकिकांना वेड लावणाऱ्या या शैलीदार नृत्याचा उगम अर्जेंटिना च्या ब्युनोसएअर्स (अर्जेंटिनाची राजधानी ) च्या कष्टकरी वर्गात झाला. या वर्गातील 'मिलोंगा' या पारंपारिक नृत्यातून 'टॅंगो' हा नृत्यप्रकार निर्माण झाला असे मानले जाते. सन १८९० साली टॅंगो ' हा शब्द प्रथम प्रचारात आला. विसाव्या शतकाच्या आरंभी ब्युनोस एअर्समधून युरोप मध्ये गेलेल्या नर्तकांची टान्गोचा पदन्यास युरोप मध्ये नेला. १९३० नंतर ' टॅंगो ' च्या सादरीकरणात बदल घडून हा नृत्यप्रकार नृत्यकेंद्रित न राहता काहीसा गायनाकडेही वळला. ' टॅंगो ' नृत्याच्या टॅंगो अर्जेन्टिना, टांगो उरुग्वायो, टॅंगो फिनिश, टॅंगो निवो अशा अनेक शैली प्रचलित आहेत . 
         
          हर्षवर्धनच्या  एका वर्षाच्या अर्जेन्टिना मधील वास्तव्यात त्याला प्रकर्षाने वेगळेपण जाणवले ते तेथील खाद्य संस्कृतीत ! अर्जेन्टिनाचे खास पारंपारिक पेय म्हणजे ' येर्बामाते '! 
म्हणजेच इथला पारंपारिक पद्धतीचा चहा.


 प्राचीन काळात वाळवलेला भोपळा पोखरून त्यात हा चहा बनवत, आणि त्यातूनच तो पीत. आता धातूंच्या भांड्यात ' येर्बामाते ' बनवतात. त्या भांड्यात धातुचाच एक स्ट्रॉ घालून सगळ्यांनी आलटून पालटून ' येर्बामाते ' पिण्याची पद्धत आहे . हा चहा कडूसर चवीचा असतो . हर्षवर्धनला त्याची चव फारशी आवडली नाही असे सांगतो. 


अर्जेन्टीनाच्या खाद्य संस्कृतीवर स्पेन, इटली, जर्मनी, फ्रान्स या युरोपीय देशातील पाककलेचा मोठा प्रभाव दिसून येतो. अर्जेन्टीना मधील लोक हे संपूर्ण मांसाहारी आहेत. तेथील जेवणातील मुख्य पदार्थ आहे 'बीफ ! जगात सर्वात जास्त रेडमीट अर्जेन्टीनातच खाल्लं जातं. पास्ता सॉसेजेस सारखे परदेशी पदार्थ येथे चांगलेच रुळलेले आहेत.
         
           वर्षभर असे पदार्थ खाऊन हर्षवर्धनचे वजन १०/१२ किलोने वाढले होते . आता तो कधी कधी आम्हालाही तिकडचे पदार्थ तयार करून खायला घालतो. अर्जेंटिनियन खाद्यपदार्थ तयार करता करता तो  आम्हाला त्याच्या एक वर्षाच्या वास्तव्यात अनेक आठवणी सांगत असतो. त्याच्या अर्जेंटिनातल्या कुटुंबियांच्या आठवणी सांगता सांगता भावूक होतो. आम्हाला म्हणतो " मी मिळवता झालो की तुम्हाला नक्की अर्जेंटिनात घेऊन जाईन ". आम्हीही या आनंदी लोकांच्या देशात जाण्याच्या केवळ कल्पनेनेही शहारून जातो ….

राजीव जतकर . 
मोबाइल : ९८२२०३३९७४


(पूर्व प्रसिध्दी : महाराष्ट्र टाईम्स २८-०८-२०१५)





No comments:

Post a Comment