Tuesday, 19 January 2016

"आमच्या घरातून नं… चक्क पर्वती दिसते"

"आमच्या घरातून नं चक्क पर्वती दिसते"
अर्थात  'आम्ही पुणेकर'


"आमच्या घरातून नं चक्क पर्वती दिसतेकिंवा "आमच्या गच्चीतून ना सिंहगड दिसतो" हि पक्क्या पुणेकरांची आवडीची वाक्ये ! अधून मधून असे कुणालातरी सांगितल्या शिवाय खरा पुणेकर जगूच शकत नाही. आज सकाळी वेताळ टेकडीवरून पर्वती कडे पाहताना मला एका गंमतशीर प्रसंगाची आठवण झाली. ऐंशी च्या दशकात आम्ही निगडी प्राधिकरणात एक बंगला बांधून तिथे राहायला गेलो होतो. सेक्टर २१ मध्ये असलेल्या आमच्या बंगल्याच्या आजूबाजूला कुठलीच बांधकामे झालेली नव्हती. फक्त बाजूला बजाज ऑटो चा कारखाना दिसत असे. त्यामुळे बंगल्याच्या गच्ची वरून दूरपर्यंतचा भाग दिसत असेआमच्या शरद ने (माझा थोरला भाऊ) एक मोठी दुर्बीण आणली होती. त्यातून दूरवरची दृश्ये बघण्याचा आम्हाला छंदच लागला होता. एके दिवशी आम्हाला साक्षात्कार झाला, आमच्या निगडीतील बंगल्याच्या गच्ची वरून आम्हाला चक्क पर्वती दिसली. ( म्हणजे खरे तर आम्हाला तसा भास झाला.) आणि पुण्यापासून तब्बल वीस किलोमीटर दूर असलेले आमचे घर जाण्य पुण्यातच असल्याचे प्रचंड समाधान आम्हा सर्वांच्या चेहेऱ्यावरून बदाबदा ओसंडून वाहू लागले.



आम्हा पुणेकरांचा हा स्वभावविशेष इतरही काही बाबतीत आम्ही पुणेकरांनी प्रयत्नपूर्वक जोपासला आहे. आता हेच बघा ना…

 कांताबेनच्या  दुकानातली बाकरवडी चितळ्यांच्या बाकरवडी एव्हडी चांगली असली तरी आम्ही चितळ्यांच्या बाकरवडी साठी जीव टाकतो. 'बाकरवडी संपली' किंवा 'बाकरवडी एक वाजेपर्यंतच मिळेल' अशी उद्धट भाषा आम्ही पुणेकर आनंदाने सहन करतो. एकदा आमच्या वहिनींच्या हातावर कांताबेन ची बाकरवडी ठेवत मी म्हणालो "तासभर रांगेत उभे राहून आणली बाकरवडी चितळ्याच्या कडून !" वडी खाता खाता अतीव समाधानाने वाहिनी उत्तरल्या  " चितळ्यांच्या बाकरवडीची सर इतर कोणालाच नाही."

या आणि अश्या अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे आम्हा पुणेकरांचे आगळेपण तुम्हाला दिसेल.

 पेढे हि चितळ्यांचेच किंवा फार फार तर घोडके यांचे     

आम्ही पुणेकर वर्तमानपत्र फक्त 'सकाळ' घेतो. सकाळचा चहा आणि सकाळ नसेल तर आमचे काही बाबतीत फार वांधे होतात हो ! आताश्या पुण्यात इतरही काही वर्तमानपत्रे आपला जम बसवू पाहत आहेत. पण सकाळ तो सकाळ ! परवा आमचा बंड्या प्रातर्विधी साठी 'सकाळच' हवा असा हट्ट धरून बसला होता. (भावी पुणेकरच तो) आता बोला

·         चितळ्यांच्या प्रमाणे आम्हा पुणेकरांचे आणखीन एक दैवत म्हणजे पु. ना. गाडगीळ हे सोने दागिने विकणारी मंडळी. पु.ना. गाडगीळ हेच फक्त सोने विकतात बाकीचे सर्व सराफ सोन्याचा वर्ख लावलेले लोखंड किंवा तत्सम धातू विकतात असे आम्हा पुणेकरांचे ठाम मत आहेपु.ना. गाडगीळ दुकानाच्या बाहेर एक दीड किलोमीटर रांगेत उन्हातान्हाचे किंवा रात्री उशिरा पर्यंत उभे राहून अर्धा ग्रॅम सोने,  तेही अक्षयतृतीयेच्याच मुहूर्तावर घेणे यातील पराकोटीचा आनंद समाधान पुण्याबाहेरील लोकाना ( आम्ही अशांना सरसकट परप्रांतीय म्हणतो ) कसे समजणार? त्यासाठी असावे लागते पक्के पुणेकरच !

·         पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती पेक्षाही आम्हा पुणेकरांचे श्रद्धास्थान म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ! इतर कोणत्याही देवाधीकांचे दर्शन घेण्यात फारसा वेळ दवडता आम्ही दगडूशेठ गणपती चे दर्शन घेऊन हमखास मिळणारे पुण्य मिळवतो. इतर शहरात किंवा राज्यात स्थाईक झालेले काही पुणेकर आवर्जून पुण्यात येतात एकवीस नारळाचे तोरण मंदिरात बांधून किलो किलो ने पुण्य मिळवतात. आणि हो गणपतीचे दर्शन अरुंद रस्त्यावर तासंतास रांगा लाऊन, रहदारीला अडथळा आणून एक वेगळेच जास्तीचे पुण्या आम्हा पुणेकरांना मिळते ते म्हणजे बोनसच !

आम्हा पुणेकरांच्या अश्या अनेक गोष्टी सांगायला गेलो तर एक प्रबंधच लिहावा लागेल. " बेडेकर किंवा वैद्यांची मिसळ, सुजाता मस्तानी, डेक्कन वरची आप्पा ची खिचडी,  वैशाली, रुपाली वरचा गप्पांचा अड्डा, वाडेश्वर ची इडली अशी आमची अनेक वैशिष्ट्यपूर्ण श्रद्धा स्थाने आहेत. प्रत्येक ठिकाणावर स्वतंत्र लेख लिहिता येइल. पण आत्ता वेळ नाही, तुम्हाला सुचली तर जरूर कळवा. आत्ता मात्र मला पळावे  लागणार आहे मंडई जवळच्या 'महाराष्ट्र टी डेपो' मध्ये ! हा चहा घेतल्या शिवाय आम्हा पुणेकरांच्या सकाळी पोटात कळ येत नाही. जाम वांधे होतात राव !   


राजीव जतकर
मोबाईल : ९८२२० ३३९७४.
इमेल : electroline4929@gmail.com






No comments:

Post a Comment