Wednesday, 13 January 2016

मला बाई हौस मोठी… रूपवती कन्या व्हावी !

मला बाई हौसं मोठीरूपवती कन्या व्हावी !


आज रोजच्या प्रमाणे सकाळी फिरायला बाहेर पडलो आणि रस्त्यात माझ्या आईच्या मैत्रिणींपैकी एक आज्जी भेटल्या. मी त्यांच्याशी आवर्जून बोलल्यामुळे विलक्षण समाधानाचे भाव त्यांच्या चेहेऱ्यावर उमटले. त्या म्हणाल्या  'माझी जिवाभावाची सखी माझ्या आधी मला सोडून गेली'. काहीश्या भावनाविवश होऊन त्या बोलत होत्या. आईच्या आठवणीने मी हि काहीसा हळवा झालो. आईच्या अनेक आठवणी मनात गर्दी करू लागल्या.


                                                                सौ. मालती जतकर.


अतिशय तरल आणि संवेदनशील मन असलेली माझी आईसुंदर सुंदर कविता करणारी माझी आईस्वतःच्या संसारात रमून गेलेली माझी आईनिरनिराळे चविष्ठ पदार्थ तयार करून सर्वाना हौसेने खाऊ घालणारी माझी आईमाझ्या अडचणीच्या काळात माझ्या मागे खंबीरपणे  उभी राहणारी माझी आईमाझा स्वतंत्र व्यावसाय उभा करताना डब्यात तिने साठवून ठेवलेले पैसे माझ्या हातावर ठेवणारी माझी आईआम्हा भावंडाना नुसत्या नजरेनेच धाकात ठेवणारी माझी आईसुनांना लेकी मानणारी माझी आईस्वतः खूप धार्मिक असूनही माझ्या नास्तिक विचारांचा आदर करणारी माझी आईमाझ्या आजारपणात रात्रभर उशाशी बसून राहणारी माझी आईआयुष्याच्या शेवटच्या अंतिम वळणावर विस्मरणाचा असाध्य विकार होऊनही फक्त मला ओळखणारी आणि अगतीकपणे अंथरुणावर खिळलेली  माझी आई…  आईच्या कितीतरी आठवणी… !

माझी आई आणि वडील दोघेही उत्तम कविता करीत. १९६५ साली माझ्या आईवडिलांचा 'भावनाची फुले' हा कथा संग्रह प्रकाशित झाला होता. कविवर्य कुसुमाग्रजदत्तो वामन पोतदार, डॉ. के. ना. वाटवे, प्रा. नी. शं. नवरे, सौ. संजीवनी मराठे. गं. गो. परिचारक, कवी कुंजविहारी यांच्या सारख्या दिग्गजांचे, थोरामोठ्यांचे अभिप्राय या काव्य संग्रहाला लाभलेले आहेत.

या काव्यसंग्रहातील " मला बाई हौसं मोठीही माझ्या आईची कविता मला नेहेमीच आकर्षित करते. माझ्या आईला मुलींची भारी हौस ! आपल्या मुलीला भरपूर शिकवावे, तिची रोज वेणी फणी करावी, तिला सद्गुणी बनवावे, मोठी झाल्यावर तिचे कन्यादान करून जावयाला तृप्त करावे आशी या माउलीची मनोमन इच्छा होतीस्वतःला मुलगी व्हावी या साठी नवस करणाऱ्या माझ्या आईला एकापाठोपाठ पाच मुलगेच झाले. मग घरात आलेल्या सुनांना तिने आपल्या मुली मानले. अशा पार्श्व भूमीवर तिची हि कविता आपल्यालाही नक्कीच आवडेल.

बाई हौसं मोठी    रूपवती कन्या व्हावी
नीज करे जोजवावी    गीत गाउनी अंगाई

मला बाई हौसं मोठी    व्हावी कन्या सुकुमार
वाढवावी प्रतिदिनी    जशी नभी चंद्रकोर

मला बाई हौसं मोठी    डूल बिंदी पैंजणाची
चालताना बाल माझी    याद यावी पद्मिनीची

मला बाई हौसं मोठी    जाईजुई  चमेलीची
वेणी गुंफावी रोज    कुरळ्याश्या कुंतलांची

मला बाई हौसं मोठी    तिला शिकवावे रोज
माझ्या सौंदर्यवतीला    शोभे सद्गुणांचा साज

 मला बाई हौसं मोठी    द्यावा गीत अलंकार
गृह मंदिरात माझ्या    नित्य वीणेचा झंकार

मला बाई हौसं मोठी    घडावे गं कन्यादान
तृप्त करावा जामात    अर्पुनी गुणांची खाण

परी मला झाले बाई    पांडव एकापाठी
घरी माझ्या पाच लेकी    येतील त्यांच्यासाठी


सौ. मालती जतकर. 

या कवितेत निरागसता आहे, तसेच अभिव्यक्तीत क्लिष्टता नाहीभावना प्रांजळ सोज्वळ आहेत.  या कवितेतील मुली ऐवजी वापरलेला 'लेकी' या शब्दावर वाचक खुश झाला पाहिजे. सुना म्हणता लेकी म्हणणे यातील सूक्ष्म सौहार्द्र सौंदर्य फारच मनोहर आहे. वत्सलरस  असलेल्या या कवितेला अचानक शेवटच्या दोन ओळीत मिळालेल्या कलाटणी मुळे हि कविता अतीव सुंदर झाली आहे

त्या काळात (१९६५ चा काळ ) घरातील सर्वात मोठी सून असलेल्या माझ्या आईला नणंदा, दीर, सासूसासरे, सणवार, सोवळेओवळे, पै पाहुणे या सर्व धबडग्यातून कविता कशा स्फुरायाच्या हे एक कोडेच आहे. मुलगी म्हणजे 'गळ्यातली धोंड' अशी सामाजिक मानसिकता असणाऱ्या त्या काळात मुलीची एव्हडी हौस असणारी माझी आई जगावेगळीच म्हटली पाहिजे…       



राजीव जतकर.
मोबाईल : ९८२२० ३३९७४.
इमेल : electroline4929@gmail.com

3 comments:

  1. छानच आहे कविता..
    हल्ली च्या काही कजाक सासवांना वाचायला दिले पाहिजे

    ReplyDelete
  2. सर,आपल्या आईची कविता छान आहे एकही मुलगी न होता आपल्याला मुले झाली याच दुःख न करता उलट सुनांना लेकी मानणारी सासू किती साधी सोज्वळ वाटती... तसेच आपण कुठतरी अंधारात असताना कोणीतरी दिव्याचे बटन दाबल्यावर जसा लख प्रकाश पडतो आणि अंधारात जे हरवलेल असतं ते एका क्षणात सापडावं तसं तुमच्या आईबद्दलच्या भावना मनातून लेखणीत उतरलेल्या दिसतात .अप्रतिम लिहिलतं सर धन्यवाद !!

    ReplyDelete
  3. अतिशय सुरेख कविता आणि आई बद्दलच्या भावना.

    ReplyDelete