Monday, 11 January 2016

'एलिझाबेथ एकादशी'… एका निरागस चित्रपटाचा अनुभव.

'एलिझाबेथ एकादशी'… एका निरागस चित्रपटाचा अनुभव.





कालच एलिझाबेथ एकादशी हा चित्रपट पाहिला. या चित्रपटाची पार्श्वभूमी पंढरपूर एकादशीची वारी याची आहे. मला हा चित्रपट आवडण्याची अनेक करणे आहेत. हा चित्रपट आपल्याला लहान मुलांच्या निरागस अश्या भावविश्वात घेऊन जातो. यातील कथानक अतिशय साधे सोपे आहे. संवाद कमालीचे सहज सुंदर आहेत. सोप्या कथानकाच्या ओघात संवाद सहजपणे येतातत्यात कोणताही बडेजाव नाही, काहीही आव आणलेला नाहि. या चित्रपटाचे खर्या अर्थाने असणारे नायक म्हणजे यात असलेले ज्ञानेश, झेंडू, गण्या हे या चित्रपटात सहजतेने वावरतात. ही पोरे म्हणजे कमाल आहेत.

'एलिझाबेथ एकादशी' बघताना आपण नकळत आपल्या स्वतः च्या बालपणात जातो. मी तर पंढरपूरात काही वर्षे रहिलेलो. इयत्ता वी ते १० वी पर्यंतचे माझे शिक्षण पंढरपूरात झालेले. त्यामुळे चित्रपटात दाखवलेले पंढरपूरचे बारकावे मला क्षणोक्षणी जाणवत होते. पंढरपूरातील अरुंद गल्लीबोळ, चौकोनी दगड लाऊन केलेले रस्ते, एकादशी ची गर्दी, चंद्रभागा  नदीचा घाट, विशिष्ठ ढंगाची सुंदर बाज असलेली  सोलापुरी भाषा, त्यातील ह्या मुलांच्या तोंडी अधून मधून येणाऱ्या 'गाबड्या, सुकाळीच्या, फुकनीच्या, हागरया, नरासाळ्या वगै. शिव्या मला चक्क सुखावत  होत्या. एकमेकांना 'माउली' म्हणून संबोधणे मला फार आवडते. त्यामुळे चित्रपट पहाताना जणू मी लहानच झालो होतोहा चित्रपट कधी संपूच नये असे वाटत होते.



जुन्या पंढरपूरातील घरे एकमेकांना आगदी चिटकून बांधलेली आहेत. अतिशय अरुंद असलेल्या जिन्याच्या पायऱ्या उंचच उंच असतात. जवळ जवळ बांधलेल्या या जुन्या घरांच्या छपरावरून इकडून तिकडे आगदी सहजपणे जाता येते. पंढरपुरातल्या गल्लीबोळातून फिरताना एक प्रकारचा विशिष्ठ वास यायचा,  तो हि मला चित्रपट बघताना जाणवत होतापंढरपुरातील लोकांचे राहणीमान, जीवनशैली, बोली भाषा या चित्रपटात बघायला मिळते. दिग्दर्शक परेश मोकाशी यांची खरे तर कमालच आहे. खरे तर या चित्रपटाची कथा तशी साधीच किंवा वाक्यात सांगता येण्यासारखी ! पण दिग्दर्शक परेश मोकाशी लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी हा चित्रपट नितांत सुंदर बनवलेला आहे. उत्तम संवाद लेखन हा या चित्रपटाचा आत्मा आहे.

एलिझाबेथ एकादशी हा चित्रपट अनेकांना वेगवेगळ्या कारणांनी आवडेल, जसे  कुणाला त्यातील काम करणाऱ्या मुलांची निरागसता आवडेल, कुणाला त्यातील सकस संवाद लेखन आवडेल, कुणाला दिग्दर्शकाचे कसब आवडेल, मला तर हे सर्व आवडलेच, पण विशेष आवडला तो पंढरपूरचा backdrop….   हा चित्रपट पहाच
  राजीव जतकर.
मोबाईल : ९८२२० ३३९७४.


No comments:

Post a Comment