Thursday, 12 April 2018

दीर्घकाळ लक्षात राहील अशी 'हिचकी'


दीर्घकाळ लक्षात राहील अशी 'हिचकी'


माझ्या लहानपणी माझ्या वर्गात एक मुलगा होता. तो तोतरा बोलायचा. सगळे जण त्याची चेष्टा करायचे. बिचारा सगळं सहन करायचा. मला फार वाईट वाटायचं. आता तो प्रतिथयश व्यावसायिक आहे. तोतरेपणा त्याच्या प्रगतीच्या आड आला नाही. आम्ही अजूनही संपर्कात आहोत. माझा आणखीन एक मित्र तोतरे बोलताना खूप वेडेवाकडे चेहेरे करतो. त्याची जीभ बाहेर येते. त्याला बोलताना खूप त्रास होताना दिसतो. याचप्रमाणे टोरेंट सिंड्रोम नावाचा एक आजार असतो. या आजारात लहानपणापासून बोलताना विचित्र आवाज येतात. हा आवाज येताना मानेला हलकेसे झटकेही येतात. या अशा आजारात येणाऱ्या विक्षिप्त आवाजांवर आणि हालचालींवर त्यांचे कुठलेही नियंत्रण नसते. या ‘टोरेट सिंड्रोम’ आजाराच्या पार्श्वभूमी असलेला  ‘हिचकी’ हा नितांतसुंदर चित्रपट आपल्याला आनंद देतो. 

'हिचकी' या चित्रपटाची कथा तशी साधी, सरळ आहे, आणि प्रेक्षकांच्या अपेक्षेप्रमाणे उलघडत ही जाते. राणी मुखर्जीचा कमालीचा सुंदर अभिनय, आणि चित्रपटाचे सादरीकरण यामुळे चित्रपट रंगतदार होतो. 'हिचकी' हा चित्रपट पाहताना सुरवातीला आपणही नयनाच्या तोंडातून निघणाऱ्या  अशा आवाजांनी काळजीत पडतो, आणि न कळत आपण चित्रपटाच्या कथेत गुंतत जातो.

चित्रपटातील नायिका ‘नयना माथूर’ (राणी मुखर्जी) या तरुणीला लहानपणापासून टोरेट सिंड्रोम हा आजार असतो. बोलताना तिच्या तोंडातून ‘ज्जा, ज्जा’ किंवा ‘व्वा,व्वा’ असे विक्षिप्त आवाज येत असतात. या नको असलेल्या आवाजावर नयनाचे कसलेही नियंत्रण नसते. ताणतणावाच्या प्रसंगी या नकोश्या वाटणाऱ्या आवाजाचा वेग आणि तीव्रताही वाढत असते. साहजिकच लहानपणापासूनच समाजात वावरताना ती चेष्टेचा आणि तिरस्काराचा विषय बनलेली असते. तिचे वडील (सचिन पिळगांवकर) हे देखील तिच्यावर सारखे चिडत असतात. लहानपणापासून असलेल्या व्यंगामुळे नयनाला अनेक शाळांमधून डच्चू मिळालेला असतो. मात्र एका शाळेतील मुख्याधापक (विक्रम गोखले) तिला परिस्थितीवर मात करायला शिकवतात. तिला प्रोत्साहन देतात. त्यामुळे मात्र नयनाच्या व्यंगाचे रूपांतर तिच्या बलस्थानात होते आणि तिचा आत्मविश्वास कमालीचा वाढतो.
मोठी झाल्यावर शिक्षिकेचेच काम करायचे असे तिच्या मनाने घेतलेले असते, आणि तिचे तसे प्रयत्नही चालू असतात. पण तिला बोलताना येणारी 'हिचकी' मोठा अडसर ठरत असते. योगायोगाने आणि काही विशिष्ठ परिस्थितीमुळे एका उच्चभ्रू शाळेत तिला शिक्षिकेची नोकरी मिळते, आणि एका वेगळ्याच आव्हानाला तिला सामोरे जावे लागते. या शाळेत शिकवण्यासाठी 'नववी फ' चा वर्ग नयनाला दिला जातो. 'राईट टू एज्युकेशन' या कायद्यांतर्गत एका झोपडपट्टीतील चौदा मुलांसाठी या उच्चभ्रू शाळेने 'नववी फ' हा वर्ग सुरु केलेला असतो. ह्या झोपडपट्टीमधून आलेल्या मुलांना शाळेकडून फारशी चांगली वागणूक मिळत नसल्याने न्यूनगंड निर्माण झालेली ही सर्व मुले मस्तीखोर, दंगेखोर झालेली असतात. त्यामुळे स्वतःच्या शाररिक व्यंगावर मात करताना नयना नववी फ मधील भरकटलेल्या मुलांना मार्गावर आणते. या दोन्हीही पातळ्यांवर नयना कशी यशस्वी होते हे पडद्यावर पाहणेच योग्य ठरेल.


खरं तर 'हिचकी' हा राणी मुखर्जी चा एकटीचाच चित्रपट आहे असे म्हणायला हरकत नाही. ती आणि तिचा अभिनय सर्व चित्रपटभर व्यापून राहतो. स्वतःच्या व्यंगाबरोबरच समोर येणाऱ्या आव्हानाबरोबर सतत चालू असलेली झटापट, घुसमट तिच्या देहबोलीबरोबरच अभिनयातून दाखवताना राणी ने कमाल केली आहे. भडक नाट्यमय प्रसंग, नृत्ये, मारामाऱ्या असल्या गोष्टींना बगल देत दिग्दर्शक 'सिद्धार्थ मल्होत्रा' याने चित्रपटाचा वेग कायम ठेवला आहे. त्रुटी कशात नसतात? याही चित्रपटात त्या काहीप्रमाणात आहेतच, पण त्या महत्वाच्या नाहीत.


स्वतःच्या शाररिक व्यंगावर मात करणाऱ्या नयना माथूर या शिक्षिकेची भूमिका करणाऱ्या राणी मुखर्जीचा हा नितांतसुंदर चित्रपट दीर्घकाळ लक्षात राहावा असाच आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संबंधावर ही भाष्य करणारा 'हिचकी' मुलांनी आणि शिक्षकांनी देखील बघायलाच हवा.
 
राजीव जतकर.



Monday, 19 March 2018

'अनोखी गुढी'

'अनोखी गुढी'
सण हे माणसाच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारे असतात. पडावा म्हणजे हिंदू धर्मानुसार नववर्षाचा प्रारंभ दिवस ! 'साडेतीन मुहूर्तापैकी एक' असा दिवस असल्यामुळे नवीन उपक्रमांची सुरवात, नवीन वास्तूंची खरेदी पाडव्याचा मुहूर्त साधून करतात.


आजचा दिवस आमच्या साठी खास होता. आज आम्ही नवीन कार घेतली. आज कार चा ताबा मिळणार होता. सकाळीच उत्साहात आवराआवरी सुरु असताना पुस्तक पेठेचे श्री.संजय भास्कर जोशी यांचा मेसेज मिळाला. गेल्या वर्षीप्रमाणे त्यांच्या पुस्तक पेठेत सकाळी दहा वाजता 'पुस्तकांची गुढी' उभी करण्याचा आगळावेगळा कार्यक्रम होता. ही पुस्तकांची गुढी सुप्रसिद्ध लेखक, रंगकर्मी श्री अतुल पेठे यांच्या हस्ते उभी करण्यात येणार होती. त्यानंतर त्यांच्याबरोबर पुस्तकप्रेमींना गप्पाही मारता येणार होत्या. संध्याकाळी सहा वाजता पुस्तकांची गुढी उतरवण्यासाठी लेखक, कवी, संगीत अभ्यासक श्री. आशुतोष जावडेकर येणार होते. त्यानंतर त्यांच्याबरोबर संवाद साधण्याची संधी, असा मस्त कार्यक्रम होता. ही आनंदसंधी आम्ही उभयता सोडणे शक्यच नव्हते. नवीन खरेदी केलेल्या कार चा ताबा काय उद्या परवा घेतला तर फारसे काही बिघडत नव्हते. आम्ही पुस्तकांची गुढी उभी करायला पुस्तक पेठेत गेलो.


अतुल पेठेंना मी पहिल्यांदाच पाहत होतो. त्यांच्या शुभहस्ते पुस्तकांची गुढी उभारण्यात आली. मग गप्पांचा फड जमला. अतुल पेठे अतिशय साधे, बोलताना कोणताही आव न आणता, मस्त गप्पा मारत होते. श्रोत्यांच्या प्रश्नांना सोप्या भाषेत मोकळेपणाने उत्तरे देत होते. कुणीतरी त्यांना प्रश्न विचारला 'चांगल्या कलाकृतीची व्याख्या काय?, ती कशी ओळखावी?' या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले 'एखाद्या कलाकृतीने मग ते नाटक असो वा पुस्तक त्याचा आस्वाद घेताना मनाला डंख बसला पाहिजे. आपल्यात अंतर्बाह्य बदल झाला पाहिजे. मन समृद्ध झाले पाहिजे.’ वाचन संस्कृती बद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘आपले आयुष्य समृद्ध होण्यासाठी वेगवेगळ्या विषयावरील पुस्तकांचे वाचन करावयास हवे. वाचनाची आवड जाणीवपूर्वक आणि हळूहळू विकसित केली पाहिजे. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजवणे फार गरजेचे आहे. 'पुढील पिढीमध्ये वाचन संस्कार करण्याची मोठी जबाबदारी पालकांची आणि प्रामुख्याने प्राध्यापकांची आहे' असेही ते म्हणाले.


संध्यकाळी 'पुस्तकांची गुढी' उतरवली गेली सुप्रसिद्ध लेखक,कवी, संगीत अभ्यासक आशुतोष जावडेकर याच्या हस्ते! नंतर जवळजवळ दोन तास त्याने उपस्थित श्रोत्यांबरोबर दिलखुलास गप्पा मारल्या. तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारा हा मनस्वी माणूस खूप विलक्षण आहे. गप्पांच्या ओघात मी त्याला विचारले 'कोणत्याही कलाकारामध्ये दिसणारी प्रतिभा जन्मजात किंवा अंगभूतच असते की ती प्रयत्नपूर्वक वाढवता येते?' माझ्या प्रश्नाला त्याने खूप छान उत्तर दिले. तो म्हणाला ' प्रतिभा काही प्रमाणात अंगभूत असावीच लागते. ती कलाकारांकडे असतेच. पण प्रयत्नांची जोड असल्याशिवाय प्रतिभा फुलत नाही.'


लेखन,संगीत, काव्य, नाटक अश्या विविध माध्यमातून व्यक्त होणाऱ्या या दोनीही कलाकारांसोबत गप्पा मारताना आमचा आजचा पडावा सार्थकी लागला. हे क्षण अविस्मरणीय असेच आहेत. नवीन कार खरेदीच्या आभासी आनंदापेक्षा आज विलक्षण प्रतिभासंपन्न कलाकारांबरोबर गप्पा मारण्याचा आनंद काही औरच होता!
राजीव