दीर्घकाळ लक्षात राहील अशी 'हिचकी'
माझ्या
लहानपणी माझ्या वर्गात एक मुलगा होता. तो तोतरा बोलायचा. सगळे जण त्याची चेष्टा करायचे. बिचारा सगळं सहन करायचा. मला फार वाईट वाटायचं. आता तो प्रतिथयश व्यावसायिक आहे. तोतरेपणा त्याच्या प्रगतीच्या आड आला नाही. आम्ही अजूनही संपर्कात आहोत. माझा आणखीन एक मित्र तोतरे बोलताना खूप वेडेवाकडे चेहेरे करतो. त्याची जीभ बाहेर येते. त्याला बोलताना खूप त्रास होताना दिसतो. याचप्रमाणे टोरेंट सिंड्रोम नावाचा एक आजार असतो. या आजारात लहानपणापासून बोलताना विचित्र आवाज येतात. हा आवाज येताना मानेला हलकेसे झटकेही येतात. या अशा आजारात येणाऱ्या विक्षिप्त आवाजांवर आणि हालचालींवर त्यांचे कुठलेही नियंत्रण नसते. या ‘टोरेट सिंड्रोम’ आजाराच्या पार्श्वभूमी असलेला ‘हिचकी’ हा नितांतसुंदर चित्रपट आपल्याला आनंद देतो.
'हिचकी' या चित्रपटाची कथा तशी साधी, सरळ आहे, आणि प्रेक्षकांच्या अपेक्षेप्रमाणे उलघडत ही जाते. राणी मुखर्जीचा कमालीचा सुंदर अभिनय, आणि चित्रपटाचे सादरीकरण यामुळे चित्रपट रंगतदार होतो. 'हिचकी' हा चित्रपट पाहताना सुरवातीला आपणही नयनाच्या तोंडातून निघणाऱ्या अशा आवाजांनी काळजीत पडतो, आणि न कळत आपण चित्रपटाच्या कथेत गुंतत जातो.
चित्रपटातील नायिका ‘नयना माथूर’ (राणी मुखर्जी) या तरुणीला लहानपणापासून टोरेट सिंड्रोम हा आजार असतो. बोलताना तिच्या तोंडातून ‘ज्जा, ज्जा’ किंवा ‘व्वा,व्वा’ असे विक्षिप्त आवाज येत असतात. या नको असलेल्या आवाजावर नयनाचे कसलेही नियंत्रण नसते. ताणतणावाच्या प्रसंगी या नकोश्या वाटणाऱ्या आवाजाचा वेग आणि तीव्रताही वाढत असते. साहजिकच लहानपणापासूनच समाजात वावरताना ती चेष्टेचा आणि तिरस्काराचा विषय बनलेली असते. तिचे वडील (सचिन पिळगांवकर) हे देखील तिच्यावर सारखे चिडत असतात. लहानपणापासून असलेल्या व्यंगामुळे नयनाला अनेक शाळांमधून डच्चू मिळालेला असतो. मात्र एका शाळेतील मुख्याधापक (विक्रम गोखले) तिला परिस्थितीवर मात करायला शिकवतात. तिला प्रोत्साहन देतात. त्यामुळे मात्र नयनाच्या व्यंगाचे रूपांतर तिच्या बलस्थानात होते आणि तिचा आत्मविश्वास कमालीचा वाढतो.
मोठी झाल्यावर शिक्षिकेचेच काम करायचे असे तिच्या मनाने घेतलेले असते, आणि तिचे तसे प्रयत्नही चालू असतात. पण तिला बोलताना येणारी 'हिचकी' मोठा अडसर ठरत असते. योगायोगाने आणि काही विशिष्ठ परिस्थितीमुळे एका उच्चभ्रू शाळेत तिला शिक्षिकेची नोकरी मिळते, आणि एका वेगळ्याच आव्हानाला तिला सामोरे जावे लागते. या शाळेत शिकवण्यासाठी 'नववी फ' चा वर्ग नयनाला दिला जातो. 'राईट टू एज्युकेशन' या कायद्यांतर्गत एका झोपडपट्टीतील चौदा मुलांसाठी या उच्चभ्रू शाळेने 'नववी फ' हा वर्ग सुरु केलेला असतो. ह्या झोपडपट्टीमधून आलेल्या मुलांना शाळेकडून फारशी चांगली वागणूक मिळत नसल्याने न्यूनगंड निर्माण झालेली ही सर्व मुले मस्तीखोर, दंगेखोर झालेली असतात. त्यामुळे स्वतःच्या शाररिक व्यंगावर मात करताना नयना नववी फ मधील भरकटलेल्या मुलांना मार्गावर आणते. या दोन्हीही पातळ्यांवर नयना कशी यशस्वी होते हे पडद्यावर पाहणेच योग्य ठरेल.
खरं तर 'हिचकी' हा राणी मुखर्जी चा एकटीचाच चित्रपट आहे असे म्हणायला हरकत नाही. ती आणि तिचा अभिनय सर्व चित्रपटभर व्यापून राहतो. स्वतःच्या व्यंगाबरोबरच समोर येणाऱ्या आव्हानाबरोबर सतत चालू असलेली झटापट, घुसमट तिच्या देहबोलीबरोबरच अभिनयातून दाखवताना राणी ने कमाल केली आहे. भडक नाट्यमय प्रसंग, नृत्ये, मारामाऱ्या असल्या गोष्टींना बगल देत दिग्दर्शक 'सिद्धार्थ मल्होत्रा' याने चित्रपटाचा वेग कायम ठेवला आहे. त्रुटी कशात नसतात? याही चित्रपटात त्या काहीप्रमाणात आहेतच, पण त्या महत्वाच्या नाहीत.
स्वतःच्या शाररिक व्यंगावर मात करणाऱ्या नयना माथूर या शिक्षिकेची भूमिका करणाऱ्या राणी मुखर्जीचा हा नितांतसुंदर चित्रपट दीर्घकाळ लक्षात राहावा असाच आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संबंधावर ही भाष्य करणारा 'हिचकी' मुलांनी आणि शिक्षकांनी देखील बघायलाच हवा.
राजीव जतकर.
No comments:
Post a Comment