स्वप्नवत धाड... अर्थात चित्रपट 'रेड'
मुळात सिनेमा हे माध्यमच मुळी 'अशक्यप्राय गोष्टी सत्य आहेत' असा आभास निर्माण करून थोडावेळ आनंद मिळवायचा प्रकार आहे, असे मला बरेचदा वाटते. सामान्यांच्या नशिबात क्वचितच येणारे प्रेमप्रसंग, प्रेमविवाह, पहिल्याच नजरेत पटणारी अप्सरेसमान सुंदर प्रेयसी, एकाच वेळी दहा दहा गुंडांना लीलया लोळवणारा नायक वगैरे... अशा आभासी गोष्टींचा आनंद मिळवण्यासाठीच आपल्यासारखी सामान्य माणसे चित्रपट बघत असतात.
मी ही असेच एक स्वप्न नेहेमी बघतो. आपल्या देशातून भ्रष्टाचार समूळ नष्ट झाला आहे. सर्व सरकारी अधिकारी अतिशय प्रामाणिकपणे, विनामोबदला, वेळेत सर्व कामे करीत आहेत. ते नम्र ही आहेत. गुंड राजकारण्यांची भीडभाड न ठेवता, त्यांचा कोणताही दबाव न मानता सर्व कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी आपापले कर्तव्य पार पडत आहेत. पण हे सर्व स्वप्नातच ! वस्तुस्थिती नेमकी उलटी...
अशाच एका स्वप्नात दोन तास रमायचे असेल दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांचा 'रेड' हा चित्रपट बघायलाच हवा. आयकर विभागाने सन १९८१ मध्ये लखनौ येथील एका हाय प्रोफाईल, राजकारणी व्यक्तीच्या अनिर्बंध साम्राज्यावर घातलेल्या धाडीवर हा चित्रपट बेतलेला आहे. एका साहसी, बेधडक आयकर अधिकाऱ्याची ही कथा आहे. या आयकर अधिकाऱ्याच्या प्रामाणिक वागणुकीमुळे त्याच्या वारंवार बदल्या होत असतात. लखनौ मध्ये बदली होऊन आलेल्या अमेय पटनाईक (अजय देवगण) या अधिकाऱ्याला कुणी एक खबऱ्या टीप देतो की लखनौ मधील एक स्थानिक राजकीय नेता, व खासदार रामेश्वर सिंग (सौरभ शुक्ला) याच्या घरी अमाप अवैध संपत्ती आहे. या अज्ञात खबऱ्याकडून निनावी पत्राद्वारे, फोनवरून ही माहिती मिळताच अमेय लगेचच कमला लागतो. एव्हड्या मोठ्या मात्तब्बर नेत्याच्या घरावर धड घालायची म्हणजे खायचं काम नसतं. या धाडीमुळे कार्यालयातल्या सहकाऱ्यांच्या तसेच स्वतःच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे हे माहित असुन देखील अमेय धाड टाकण्याचा निर्णय घेतो, आणि आपल्या पथकासह धाड टाकतोही...
सिंघम आणि सिंघम रिटर्न्स प्रमाणे याही चित्रपट 'अजय देवगण' अभिनयाची बाजी मारतो. अभिनयाची त्याची स्वतःची अशी खास शैली आहे. त्याचा स्वतःचा असा चाहता प्रेक्षकवर्ग ही आहे. परीक्षकांच्या पसंतीला तो उतरतोच. त्याने भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. 'इलियाना डिक्रीस' हिने पतीच्या संघर्षात त्याच्या पाठीशी ठामपणे उभारणाऱ्या पत्नीची भूमिका ठीक केलीये. अर्थात अजय देवगण आणि सौरभ शुक्ला च्या अभिनयाच्या वादळात तिची भूमिका नगण्य आहे. तिला चित्रपटात, कथेत फारसा वाव ही नाही.
रामेश्वर सिंग च्या भूमिकेत सौरभ शुक्ला कहर करतो. हा माझा फार आवडता नट आहे. 'जॉली एल.एल.बी.' मधील त्याची न्यायाधीशाची भूमिका पाहून मी त्याच्या प्रेमातच पडलोय. 'रेड' चित्रपटात त्याने उन्मत्त, मग्रूर, कपटी असा राजकीय नेता मोठ्या ताकदीने उभा केलाय. 'राजकुमार गुप्ता' यांचे दिग्दर्शन तसेच चित्रपटाची कथा व संवाद लिहिणारे 'रितेश शहा' यांनी चित्रपट उत्कंठापूर्ण बनवला आहे. त्यामुळे दोन तास प्रक्षकांना कथेत गुंतवून ठेवण्यात हि मंडळी यशस्वी ठरली आहेत.
ही 'रेड' जरी
सत्य घटनेवर आधारित असली तरी सद्यःपरिस्थिती बघता ती स्वप्नवतच आहे. आता ना असे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, ना कुणाला भ्रष्टाचार व कर भरण्याबद्दल आस्था आहे. त्यामुळे असे स्वप्नवत चित्रपट बघून दोन तास जीवाची करमणूक करून घेणे एव्हडेच काय ते आपल्यासारख्यांच्या सामान्यांच्या हातात राहते.
राजीव जतकर.
No comments:
Post a Comment