Monday, 19 March 2018

'अनोखी गुढी'

'अनोखी गुढी'
सण हे माणसाच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारे असतात. पडावा म्हणजे हिंदू धर्मानुसार नववर्षाचा प्रारंभ दिवस ! 'साडेतीन मुहूर्तापैकी एक' असा दिवस असल्यामुळे नवीन उपक्रमांची सुरवात, नवीन वास्तूंची खरेदी पाडव्याचा मुहूर्त साधून करतात.


आजचा दिवस आमच्या साठी खास होता. आज आम्ही नवीन कार घेतली. आज कार चा ताबा मिळणार होता. सकाळीच उत्साहात आवराआवरी सुरु असताना पुस्तक पेठेचे श्री.संजय भास्कर जोशी यांचा मेसेज मिळाला. गेल्या वर्षीप्रमाणे त्यांच्या पुस्तक पेठेत सकाळी दहा वाजत 'पुस्तकांची गुढी' उभी करण्याचा आगळावेगळा कार्यक्रम होता. ही पुस्तकांची गुढी सुप्रसिद्ध लेखक, रंगकर्मी श्री अतुल पेठे यांच्या हस्ते उभी करण्यात येणार होती. त्यानंतर त्यांच्याबरोबर पुस्तकप्रेमींना गप्पाही मारता येणार होत्या. संध्याकाळी सहा वाजता पुस्तकांची गुढी उतरवण्यासाठी लेखक, कवी, संगीत अभ्यासक श्री. आशुतोष जावडेकर येणार होते. त्यानंतर त्यांच्याबरोबर संवाद साधण्याची संधी, असा मस्त कार्यक्रम होता. ही आनंदसंधी आम्ही उभयता सोडणे शक्यच नव्हते. नवीन खरेदी केलेल्या कार चा ताबा काय उद्या परवा घेतला तर फारसे काही बिघडत नव्हते. आम्ही पुस्तकांची गुढी उभी करायला पुस्तक पेठेत गेलो.


अतुल पेठेंना मी पहिल्यांदाच पाहत होतो. त्यांच्या शुभहस्ते पुस्तकांची गुढी उभारण्यात आली. मग गप्पांचा फड जमला. अतुल पेठे अतिशय साधे, बोलताना कोणताही आव आणता, मस्त गप्पा मारत होते. श्रोत्यांच्या प्रश्नांना सोप्या भाषेत मोकळेपणाने उत्तरे देत होते. कुणीतरी त्यांना प्रश्न विचारला 'चांगल्या कलाकृतीची व्याख्या काय?, ती कशी ओळखावी?' या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले 'एखाद्या कलाकृतीने मग ते नाटक असो वा पुस्तक त्याचा आस्वाद घेताना मनाला डंख बसला पाहिजे. आपल्यात अंतर्बाह्य बदल झाला पाहिजे. मन समृद्ध झाले पाहिजे.’ वाचन संस्कृती बद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘आपले आयुष्य समृद्ध होण्यासाठी वेगवेगळ्या विषयावरील पुस्तकांचे वाचन करावयास हवे. वाचनाची आवड जाणीवपूर्वक आणि हळूहळू विकसित केली पाहिजे. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजवणे फार गरजेचे आहे. 'पुढील पिढीमध्ये वाचन संस्कार करण्याची मोठी जबाबदारी पालकांची आणि प्रामुख्याने प्राध्यापकांची आहे' असेही ते म्हणाले.


संध्यकाळी 'पुस्तकांची गुढी' उतरवली गेली सुप्रसिद्ध लेखक,कवी, संगीत अभ्यासक आशुतोष जावडेकर याच्या हस्ते! नंतर जवळजवळ दोन तास त्याने उपस्थित श्रोत्यांबरोबर दिलखुलास गप्पा मारल्या. तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारा हा मनस्वी माणूस खूप विलक्षण आहे. गप्पांच्या ओघात मी त्याला विचारले 'कोणत्याही कलाकारामध्ये दिसणारी प्रतिभा जन्मजात किंवा अंगभूतच असते की ती प्रयत्नपूर्वक वाढवता येते?' माझ्या प्रश्नाला त्याने खूप छान उत्तर दिले. तो म्हणाला ' प्रतिभा काही प्रमाणात अंगभूत असावीच लागते. ती कलाकारांकडे असतेच. पण प्रयत्नांची जोड असल्याशिवाय प्रतिभा फुलत नाही.'


लेखन,संगीत, काव्य, नाटक अश्या विविध माध्यमातून व्यक्त होणाऱ्या या दोनीही कलाकारांसोबत गप्पा मारताना आमचा आजचा पडावा सार्थकी लागला. हे क्षण अविस्मरणीय असेच आहेत. नवीन कार खरेदीच्या आभासी आनंदापेक्षा आज विलक्षण प्रतिभासंपन्न कलाकारांबरोबर गप्पा मारण्याचा आनंद काही औरच होता!
राजीव

No comments:

Post a Comment