'फाळणीच्या भळभळणाऱ्या जखमा... 'हुस्ना'

पियुष मिश्रा
'बड़ी तन के खड़ी थी
सीधी खड़ी थी एक 'लाइन' !
'मुसव्वीर (चित्रकार) से कहा उसने
बहुत अच्छा किया जो--
कैनव्हास पर रहने दिया मुझको !
जमीन पर गिरती में
तो फिर कोई बटवारा हो जाता'---
गुलज़ार
एखाद्या प्रदेशाच्या फाळणीमुळे त्या प्रदेशातील सामान्य नागरिकांच्या जीवनावर अत्यंत खोलवर, वेदनादायी आणि दीर्घकालीन परिणाम होतात. ही केवळ भौगोलिक सीमांची फाळणी नसते तर त्या प्रदेशातील कोट्यवधी लोकांच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक मानवी शोकांतिका असते. फाळणीमुळे अनेक कुटुंबे कायमची विखुरतात, दुरावली जातात. नातेवाईक, मित्र, शेजारी एकमेकांपासून दूर जातात. फाळणीच्या काळात अनेकदा जातीय, धार्मिक, वांशिक हिंसाचार उसळतो. यात लाखो निष्पाप लोकांचा बळी जातो. अशा काळात महिलांना सर्वांत जास्त अत्याचाराला सामोरे जावे लागते. स्त्रियांचे अपहरण, मानसिक, शारीरिक शोषण व अत्याचार होतात. नागरिकांचे पिढ्यानपिढ्या चालत आलेले व्यवसाय, नोकऱ्या, उत्पन्नाची साधने एका रात्रीत नष्ट होतात. त्यांना शून्यातून नवीन आयुष्य सुरू करावे लागते. फाळणीनंतर लोकांना आपआपली घरे, शेतजमिनी, जन्मभूमी अचानक सोडून जावे लागते. लाखो लोकांना स्वतःच्याच देशात किंवा नवीन प्रदेशात शरणार्थी छावण्यांमध्ये अत्यंत हालअपेष्टांच्या परिस्थितीत राहावे लागते. आधी गुण्यागोविंदाने एकत्र राहणाऱ्या वेगवेगळ्या समुदायांमध्ये कायमचा अविश्वास आणि द्वेषाची भिंत उभी राहते. फाळणी झालेल्या प्रदेशामधील ऐतिहासिक स्थळे, प्रार्थनास्थळे आणि स्थानिक संस्कृतीचे दोन भाग झाल्यामुळे सांस्कृतिक समृद्धता नष्ट होते. गुलज़ार यांची सुरुवातीला उल्लेख केलेली कविता वाचून मन विचारमग्न झाले.
गुलज़ार म्हणतात, 'एक ऐटीत उभी असलेली रेष एका चित्रकाराला म्हणते 'बरं झालं तु मला कॅनव्हास वरच ठेवलंस. मी जमिनीवर पडले असते तर फाळणी (बटवारा) च झाली असती.' गुलज़ार यांचा जन्म आत्ताच्या पाकीस्तान मधला. भारताची फाळणी झाल्यावर गुलज़ार यांचे कुटुंब भारतातल्या अमृतसर येथे स्थायिक झाले. पुढे मुंबईत चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून स्थिरावले. गुलज़ार आणि त्यांच्या कविता, शायरी यावर बरंच काही लिहिण्यासारखं आहे. किंबहुना कितीही लिहिलं तरी ते कमीच पडेल. गुलज़ारांची कविता वाचताना भारत-पाकिस्तानच्या भयंकर फाळणीचे विचार मनात घोळत असतानाच कवी/गीतकार पियुष मिश्रा यांनी रचलेली 'हुस्ना' ही कविता वाचनात आली आणि मन पुन्हा अस्वस्थ झाले.
पियुष मिश्रा हे देखील अतिशय प्रतिभा संपन्न, तरुणांच्या मध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले कवी आहेत. त्यांची 'एक बगले में चांद होगा...', 'अरे रुक जा रे बंदे', 'आरंभ है प्रचंड', 'हुस्ना' ही गीते समकालीन गीतकारांपेक्षा खूप वेगळी आहेत. पियुष मिश्रा हे डाव्या राजकीय विचारसरणीशी संबंधित असल्याने त्यांच्या गीतांमध्ये दुःख, प्रेम, विरह या बरोबर विद्रोह देखील प्रकर्षाने दिसतो. पियुष मिश्रांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी बरेचदा त्यांनी लिहिलेले गाणं ते स्वतःच गातात. त्यांचा असा आविष्कार पहाण्यासाठी, ऐकण्यासाठी, अनुभवण्यासाठी तरुणाई त्यांच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी करते. पियुष मिश्रा हे स्वतः खूप संवेदनशील कवी आहेत. त्यांच्या लिखाणातुन, स्वरातुन जिवाला पीळ पाडणारी आर्तता व्यक्त होते. त्यांच्या गाण्यांचे झपाटलेपण आपोआपच आपल्यावर स्वार होते. आणि विशेष म्हणजे आपल्यावर स्वार झालेले हे झपाटलेपण उतरूही नये असं वाटत राहतं. पियुष मिश्रांचे 'हुस्ना' हे गीत निव्वळ लाजवाब आहे. पियुष मिश्रांचे 'हुस्ना' हे गीत आपल्याला असंच झपाटतं. एखाद्या गाण्याची पार्श्वभूमी किंवा गोष्ट आपल्याला आधीच कळली तर त्या गाण्याकडे बघण्याचा नजरियाच बदलतो. 'हुस्ना' या गाण्याची कहाणी अशीच अस्वस्थ करणारी असून या कहाणीला पार्श्वभूमी आहे भारत-पाकिस्तान फाळणीची! या फाळणीच्या आधीपासुनच असलेल्या एका जुन्या प्रेमाची आणि फाळणीनंतर ताटातूट झालेल्या प्रेमी जीवांची ही एक करुणरसात गुंफलेली काव्यरचना आहे.
हे गीत एका पत्राच्या स्वरूपात आहे. १९४७ च्या फाळणी आधी पाकिस्तानातील लाहोर शहरात 'जावेद' आणि 'हुस्ना' या प्रेमी जिवांमध्ये प्रेम फुलत होतं. दोघांच्या गाठी भेटी होत असतात. दोघांच्याही मनात लाहोरच्या धुक्यात हरवलेल्या, दव पांघरलेल्या वाटा आहेत. दोघांचं लग्न देखील ठरलंय. दोघांच्याही मनात एकमेकांविषयी अनाहूत उत्कट ओढ वाटत असतानाच भारत-पाकिस्तानची फाळणी होते. जावेद कामानिमित्त भारतात लखनौला आलेला असतो आणि भारतातच अडकतो. सर्व नातेवाईक, मित्र, शेजारी विखुरले जातात. जावेद-हुस्ना या प्रेमी जिवांची कायमची ताटातूट होते. 'जावेद' लखनौला स्थायिक होतो तर 'हुस्ना' लाहोर मध्येच अडकते. १९४७ च्या फाळणीनंतर सुमारे २० वर्षांनंतर म्हणजे १९६७ मध्ये एका लग्नाच्या निमित्ताने लाहोरमधील फाळणीच्या आधी असलेल्या मित्रांचे एक एकत्र जमायचे ठरते. तेव्हा 'हुस्ना' सोडून सगळे एकत्र जमतात. त्यावेळी जावेदला समजते की 'हुस्ना' अजूनही त्याची वाट बघत आहे. गेल्या २० वर्षांत समाजाकडून अनेक अत्याचार सहन करत अजूनही जावेदची वाट बघते आहे. हे ऐकून जावेद अतिशय दुःखी होतो आणि हुस्नाला तो एक पत्र लिहितो आणि 'हुस्ना' हे पत्राच्या स्वरूपात लिहिलेलं एक विरहगीत बनतं.
खरं तर आता जावेद लखनौ मध्ये स्थिरावला आहे. त्याला दोन मुले देखील आहेत. तसं सगळं सुरळीत चाललंय. पण आता त्याच्या विस्कटलेल्या प्रेमाच्या जखमेवरची खपलीच जणू निघाली आहे. पुन्हा सगळ्या आठवणी जागी झालेल्या आहेत. मन पुन्हा लाहोरला रेंगाळतंय. त्याच्या आठवणीतलं लाहोर, हुस्नाच्या पाऊलखुणा त्याला आठवतायत. मग मनातली वेदना झरू लागते. हुस्नाला पत्र लिहिताना त्याच्या मनातील अंधुक, निवडक आठवणींचा झिम्मा शब्दांतून कागदावर उमटू लागतो...
'लाहोर के उस पहेले जिले के दो परगना मे पहुंचे.
रेशम गली के, दूजे कुचे के, चौथे मकां पे पहुंचे.
और कहेते है जिसको दूजा मुल्क, उस पाकिस्तान मे पहुंचे.
लिखता हु खत मे हिंदोस्ता से, पहेलु-ए-हुस्ना मे पहुंचे.
ओ हुस्ना...
पत्राच्या सुरुवातीलाच जावेद आता फाळणीनंतर 'दूजा मुल्क' ठरलेल्या पाकिस्तानातल्या लाहोरमधील हुस्नाच्या घराच्या पत्त्यावर मनाने पोहोचलेला असतो, तो विरहाने व्याकूळ होऊन मनात विचारतो, 'बाकी तू कशी आहेस? बाकी तिकडे कसं आहे सगळं? घराजवळचा बाजाराच्या वाटेवरचा पिंपळ अजूनही तसाच सळसळतो का?त्याची पानं तशीच गळतात का ग अजून? त्या पिंपळाचं तळहाताएवढं जाळीदार पान माझ्याकडे मी अजूनही जपून ठेवलेलं आहे..
पत्ते क्या झडते है पाकिस्तान में वैसे ही
जैसे झडते है यहा..
ओ हुस्ना...
होता उजाला क्या वैसा ही है
जैसा होता है हिंदोस्तां मे यहा
ओ हुस्ना..
जावेद हुस्नाच्या आणि लाहोरच्या आठवणींनी व्याकूळ होतो. पुढे कवी लिहितो, मला आठवतंय ईदच्या वेळची धामधूम, नमाजासाठी लवकर उठून मशिदीत पोहोचलं की तेथील नमाजी लोकांची गर्दी, आवारात जिकडे नजर जाईल तिकडे झुकलेले नमाजी. मशिदी बाहेरचा रेवड्या, शेवयांचा खमंग वास अजूनही माझ्या मनात, नाकात दरवळतोय. मला आठवतंय दिवाळीतील रोषणाई, लालाजींच्या दुकानातली मिठाई, पंजाबी लोकांचा बैसाखीचा भांगडा, बेधुंद नाचताना होणारी चिमट्याची खणखण. लाहोर मध्ये थंडीत लाकूडफाटा जमवत होळीचा सण साजरा होत असे. मग होळीची गर्दी पांगल्यावर त्याच उबदार ओंडक्यावर आपण दोघांनी धरलेले एकमेकांचे हात. तो उबदार, हवाहवासा वाटणारा तुझा स्पर्श...
'वो ईदकी लंबी नमाजें
सेवैयों की झालर'
'वो दिवाली के दिये संग में
बैसाखी के बादल'
'होली की वो लकडी जिनमें
धडकन है संग संग आंच लगाई'
'ओ मेरी हुस्ना'...
प्रेमाच्या विरहात दुखावेगाने जावेदने लिहिलेले हे पत्ररुपी काव्य आपल्याला दुःखी तर करतेच पण त्याहीपेक्षा अधिक अस्वस्थ करते. मनात विचार येतात की खरंच आवश्यक असते का एखाद्या प्रदेशाची फाळणी? राजकारण्यांसाठी ती आवश्यक असेलही पण सामान्यांचं काय? हे गीत केवळ एका प्रेमी युगुलाची कथा नाही, तर भारत-पाकिस्तान फाळणीनंतर दुरावलेली मनं आणि मानवी संबंधांची गुंतागुंत यात आहे.
या गीताच्या शेवटी कवी विचारतो...
'ये हीरों के रांझों के नगमे क्या अब भी, सुने जाते हैं वहाँ ?'
ओ हुस्ना...
'और
रोता है रातो में,
पाकिस्तान क्या वैसे ही
जैसे हिंदोस्तां'
ओ हुस्ना...
आज तिकडे काही खरोखर बदललंय का? अजुनही हिर-रांझा च्या कविता तिकडे गायल्या जातात का? ऐकल्या जातात का? हिंदुस्तान प्रमाणे पाकिस्तान देखील रडतो का? ओ हुस्ना...
तेव्हा मीही वेगळा होतो आजच्या पेक्षा, अन् तू ही बदललीस असशील माझ्या कल्पनेपेक्षा... आता आठवणी धुसर होत चालल्या आहेत, पण काळजातला व्रण अजुनही त्रास देतोच आहे. तुझी देखील अवस्था माझ्यासारखीच आहे का?...
पियुष मिश्रांची 'हुस्ना' (Husna) ही प्रसिद्ध कविता आणि गाणे एका पाकिस्तानी लघुकथेवर आधारित असलेल्या नाटकासाठी लिहिले गेले होते. 'हुस्ना' हे गाणे मूळचे 'पत्तर अनारा दे' (Pattar Anaaran De) या पाकिस्तानी लघुकथेवर आधारित एका नाटकासाठी लिहिले गेले होते. ही कविता ऐकताना, समजून घेताना मन अक्षरशः सुन्न होते. मला तर या कवितेने झपाटून टाकलं. या कवितेबद्दल एका मुलाखतीमध्ये बोलताना पियुष मिश्रा म्हणतात, "या देशाची फाळणी आम्ही सर्व-सामान्य लोकांनी केलेली नाही. हा देश चालवणाऱ्या नेत्यांनी हिंदू-मुस्लिम वेगळे केले. अजुनही वाघा बॉर्डर खुली केली गेली, तर पाकिस्तानातील सामान्य जनता हिंदुस्तानात आणि हिंदुस्तानातील लोक एकमेकात मिसळून जातील. पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनीतील लोक जर एकत्र येऊ शकतात, तर भारत-पाकिस्तानातील लोक देखील एकत्र का येऊ शकणार नाहीत? केवळ राजकारण्यांनी हिंदू-मुस्लिम यांच्यात द्वेष निर्माण केला आहे." हे सर्व बोलताना पियुष मिश्रा भावनाविवश होतात. बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळतात. त्यांची ही मुलाखत देखील बघण्यासारखी, अनुभवण्यासारखी आहे. हे मूळचे नाटकासाठी लिहिलेले गाणे असले, तरी २०१२ मध्ये जेव्हा पियुष मिश्रा यांनी ते 'कोक स्टुडिओ' (Coke Studio @ MTV) मध्ये गायले, तेव्हा ते जगभरात प्रचंड लोकप्रिय झाले.
https://youtu.be/4zTFzMPWGLs?si=ClWSFxjt7yl9539V
आणि
https://share.google/WCOAonGCVlpCbzy5A
शेअर करतो आहे.
या कवितेचा जरूर आनंद घ्या. माझी खात्री आहे आपल्याला ही हे गीत झपाटून टाकेल, सुन्न करेल. ही अनुभूती घ्याच!
राजीव जतकर
१५ सप्टेंबर २०२६.


No comments:
Post a Comment