Thursday, 18 June 2026

'बायोस्कोप'

 

कविता आणि कथांचा अनोखा कोलाज - 'बायोस्कोप'

दिग्दर्शक: विजू माने-गिरीश मोहिते-गजेंद्र अहिरे-रवी जाधव

        प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं एक अवकाश असतं. प्रत्येक व्यक्तीची आपली एक गोष्ट असते. त्या त्या व्यक्तीच्या जगण्याची गोष्ट, आयुष्यातील घटना-प्रसंगातून, संघर्षातून घेतलेले अनुभव या गोष्टीला आकार देत असतात. पण प्रत्येकालाच व्यक्त होणं शक्य होतंच असं नाही. आपल्यासारख्या सामान्य व्यक्ती केवळ अस्वस्थ होत राहतात, मात्र साहित्यिक, कवी, गायक, वादक, चित्रपट दिग्दर्शक यांसारखे कलाकार त्यांच्या त्यांच्या अवकाशाला गवसणी घालत व्यक्त होताना दिसतात. प्राप्त परिस्थितीत आहे तसंच जगता काहीतरी वेगळं करण्याचा त्यांचा इरादा त्यांना खास माणूस बनवतो. मला वाटतं की कुठल्याही कलाकाराच्या असमाधानाच्या अस्वस्थतेतून कला जन्म घेत असावी. त्यातही कविता ही हृदयात सर्वात अधिक खोलवर जाणारी. कविता म्हणजे भावभावनांचं एकप्रकारे सादरीकरणच असतं. फार क्वचित वेळी असं होतं की एखाद्या कवीच्या कवितेतून एखादा चित्रपट निर्माण होतो. ही कलाकार मंडळी सातत्याने काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करत असतात. सतत काहीतरी नवीन करून पाहण्याची वृत्ती कोणत्याही कलाकाराला समृद्ध बनवत असते आणि ती अनुभूती घेणाऱ्या आपल्यासारख्यांना देखील, 'बायोस्कोप' हा सिनेमा असाच एक चित्रपट क्षेत्रातील नवीन प्रयोग...

         असंच काहीतरी नवीन प्रयोग करण्याच्या उद्देशाने गजेंद्र अहिरे, गिरीश मोहिते, विजू माने आणि रवी जाधव या चारही दिग्गज मराठी दिग्दर्शकांनी आपल्याला आवडलेल्या कवितांवर चित्रपट करायचे ठरवले. प्रत्येकाने आपल्याला आवडलेल्या, वाचताना मनात कुठेतरी खोलवर घुसलेल्या कविता धुंडाळल्या. यातूनच कवी सौमित्र, कवी लोकनाथ यशवंत, कवी संदीप खरे आणि मिर्झा गालिब यांच्या कवितांची निवड केली गेली. मग या चारही दिग्दर्शकांनी आपापल्या नजरेतून निवडलेल्या कवितांवर लघुपटांच्या माध्यमातून व्यक्त व्हायचं ठरवलं. आणि चार कविता - चार दिग्दर्शक आणि चार लघुपट अशा प्रयोगातून 'बायोस्कोप' हा मराठी चित्रपटांचा भावोत्कट कोलाज तयार झाला. या चित्रपटाच्या सुरुवातीलाच 'गुलजार' यांची त्यांच्या खर्जातील खास आवाजातील प्रस्तावना सुरु होते. ते त्यांच्या खास शैलीत सांगतात...

'कम होता है, की नज्म से फिल्म बने.

नज्म एक जज्बाती कैफियत का बयान होता है

जरासा कुरेदो, तो कुछ जिंदा किरदार नजर आने लगते है

नज्म की खुबी ही ये होती है, की हर कोई अपना अपना आसमान

देख ले...'

असं सांगत ते 'बायोस्कोप' हा प्रकार नविन असल्याचं अधोरेखित करतात. गीतकार आणि शायर गुलजार यांच्या आवाजाने एक गंभीर आणि तरल अनुभूतीवर आपण पोहोचतो, आणि एकामागून एक असे चार अफलातून लघुपट आपल्यासमोर उलगडत जातात.

 

दिल--नादान

 'दिल--नादान':

दिल--नादाँ तुझे हुआ क्या है

आख़िर इस दर्द की दवा क्या है

'मिर्झा गालिब'

        नाविन्याने भरलेल्या या बायोस्कोपच्या प्रवासाची सुरुवात मिर्झा गालिब यांच्या 'दिल--नादान' या कवितेवर आधारीत लघुपटातून सुरु होते. जुन्या जमान्यातील 'पद्म' पुरस्कार प्राप्त गायिका (नीना कुलकर्णी) आणि सुरुवातीपासूनच त्यांचा सारंगीवादक साथीदार (सुहास पळशीकर) यांच्या नात्याची अत्यंत तरल गोष्ट दिग्दर्शक 'गजेंद्र अहिरे' सादर करतात. या लघुपटाच्या माध्यमातून गजेंद्र अहिरे यांनी खानदानी कलावंतांच्या उतारवयातील ठहराव मांडला आहे. जुन्या जमान्यातील हे कलावंत कधी भूतकाळाच्या मखमली गालिच्यावर चालतात, तर कधी वर्तमानातील वास्तवातल्या आर्थिक अडचणीचा सामना करताना भावुक होतात. नीना कुलकर्णी आणि सुहास पळशीकर या कसलेल्या कलाकारांनी त्यांच्या अनामिक नात्याला आपल्या संयत अभिनयाने सुंदररित्या फुलवलं आहे. पार्श्वगायिका शुभा जोशी यांनी या लघुपटात गायलेल्या गझलांना तोड नाही. समाजातील बदलत्या प्रवाहात कलाकारांची होणारी उपेक्षा आणि एकाकीपण गजेंद्र अहिरे यांनी अतिशय हळुवार पद्धतीने मांडलंय. दर्जेदार कविता, गझल, पार्श्वभूमीवर सातत्याने आपलं अस्तित्व दाखवणारे सारंगीचे सूर, कलाकारांचा अप्रतिम अभिनय हे सर्व पडद्यावर एकचित्तपणे अनुभवणे ही एक सुखद अनुभूती आहे.

एक होता काऊ

 
'एक होता काऊ'

कुणा ठाव आसक्त होता कशाशी

कुणा ठाव का खेळ होता जीवाशी

कुणी ना पुसे धावतो का आधाशी

कुणा काय घेणे असे कावळ्याशी

पडे तोकडी धाव नेमे उशिरा

तिला पाहण्याला.. जराशी.. जराशी..

'सौमित्र'

        दुसरा लघुपट दिग्दर्शक विजू माने आपल्याला बायोस्कोपच्या दुसऱ्या खिडकीतून उलघडतात. स्वतःच्या काळ्या रंगामुळे न्यूनगंडात अडकलेला तरुण शेजारीच राहणाऱ्या एका सुंदर मुलीच्या प्रेमात पडलाय. पण न्यूनगंडामुळे तो त्याचं प्रेम तिच्यापुढे व्यक्त करू शकत नाही. कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांच्या एका हलक्या फुलक्या  कवितेवर आधारित ही कथा आहे. पण दिग्दर्शक विजू माने यांना त्यांच्या नजरेला ही कविता वेगळीच भासते. कवी सौमित्र यांची कविता दिग्दर्शकाला काहीशी गंभीरपणे वेगळेच सांगण्याचा प्रयत्न करते. आपल्या समाजात एखाद्या व्यक्तीच्या काळ्या रंगाकडे नकारात्मक पद्धतीने बघण्याची जी वृत्ती आहे, त्याबद्दल दिग्दर्शक व्यक्त होतात. काळ्या-गोऱ्या रंगाच्या चौकटीत अडकलेल्या समाजातील चौकटीपेक्षा निखळ प्रेम कसे वरचढ असतं हे सांगण्याचा ते प्रयत्न करतात. या चित्रपटात स्पृहा जोशी आणि कुशल बद्रिके यांचा अभिनय केवळ अप्रतिम आहे. कुशलने तर कमालच केली आहे. अबोल अभिनयातून कुशलने साकारलेला 'कावळ्या' हृदयाला भिडतो. त्याने आरशासमोर केलेला अभिनय पाहून आपलाही कंठ दाटून येतो. या चित्रपटाचा क्लायमॅक्स देखील जबरदस्त...!

बैल

'बैल'

        'बायोस्कोप' मधील सुंदर लघुपटांच्या साखळीतील पुढचा लघुपट आहे 'बैल'. हा लघुपट एका वेगळ्याच धाटणीचा आहे. वास्तवदर्शी जाणिवा राखत, प्रसंगी विद्रोही कविता करणारे कवी 'लोकनाथ यशवंत' महाराष्ट्राला परिचित आहेतच. त्यांच्या कवितांमधून त्यांनी ग्रामीण भागातील दुःख, माणूसपण व्यक्त केलेलं आहे. गरिबी आणि भीषण दुष्काळामुळे पिचलेला शेतकरी आणि त्याचा लाडका मूक बैल यांच्यातील भावनिक बंधांची हृदयद्रावक गोष्ट हा कवी आपल्या 'बैल' या कवितेतून मांडतो. ती कविता अशी...

             लहानपणी मनसोक्त हुंदडायचो,

 आणि थकून आईच्या दुधाळ स्तनांजवळ जायचो

तेव्हा मला खुंट्याला बांधून आईचे दूध विकायचे

माझे कुपोषण करायचे-

तरुण झालो तेव्हा, वृषण ठेचून नांगरायला लावली शेती.

लाख मोलाच्या 'समागमाचं' करून टाकलं दमन

तुमच्या हिरवेपणासाठी घातलं मातीत

मालक... तरी ही तुम्ही आत्महत्या करता?

'लोकनाथ यशवंत'

मंगेश देसाई

        बैल या कवितेवर आधारित याच नावाचा उत्कृष्ठ लघुपट दिग्दर्शक 'गिरीष मोहिते' यांनी दिग्दर्शित केला आहे. 'पंजाब' नावाचा (मंगेश देसाई) विदर्भातील एक सुशिक्षित कापूस उत्पादक शेतकरी कापसाला भाव मिळत नसल्याने त्रासलेला, कर्जत बुडालेला, निराश झालेला असतो. यावर उपाय म्हणून त्याच्या लाडक्या  बैलाला विकणे त्याला मान्य नसते. पण शेवटी त्याला त्याच्या लाडक्या बैलाला देखील विकावे लागते. पुढे काय होते ते हा लघुपट बघूनच समजून घ्यावे लागेल. या कवितेतून आणि लघुपटातून त्या बैलाची जणू कैफ़ियतच मांडलेली आहे. सद्यःपरिस्थितीतील असंवेदनशील शहरीकरण आणि आजच्या आपल्या शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती ह्या गोष्टी मांडून दिग्दर्शकाने कवितेशी इमान राखून ही कलाकृती निर्माण केली आहे. शेतकऱ्याची व्यथा मांडताना मंगेश देसाई या अभिनेत्याने आपलं अभिनय कौशल्य कमालीच्या सुंदर पद्धतीनं दाखवलंय. 

मित्रा

'मित्रा'

        उदासीचा रंग... सोसायलाही अवघड आणि शब्दात मांडायलाही. खूप जोरात ओरडावं, आणि हाक पोहोचू नये तशी अवस्था, तशी पोकळी. हा रंग शोधू तितका खोल खोल आपला हात धरून जाणारा. सापडला म्हणता म्हणता निसटून जाणारा. संदीप खरे ची ही कविता अक्षरशः सुन्न करून सोडते.

                              उदासीत या कोणता रंग आहे.?

तुला ठाव नाही, मला ठाव नाही.

जसा की नदीच्या तटी मी प्रवासी

तुला रंग नाही, मला गाव नाही.

         कवी संदीप खरे यांची 'उदासीत या कोणता रंग आहे?' ही कविता ऐकून गुलजार साहेबांनी संदीपचं विशेष कौतुक करत त्याला प्रश्न केला होता की, 'ये उदासी का रंग आपको कहा से मिला?' आणि मग त्यांनी संदीपच्या मराठी कवितेचा हिंदी कलाविष्कार देखील केला. 'बायोस्कोप' मधील चौथ्या आणि शेवटच्या लघुपटाची सुरुवात होते ती गुलजार साहेबांच्या धिरगंभीर, खर्जातल्या आवाजात...

'भला उदासी का रंग क्या है?

 तुम्हे पता है मुझे मालुम...

 इस उदासी का रंग क्या है?'

 कवी संदीप खरे यांची 'उदासीत या कोणता रंग आहे?' ही कविता ऐकून गुलजार साहेबांनी संदीपचं विशेष कौतुक करत त्याला प्रश्न केला होता की, 'ये उदासी का रंग आपको कहा से मिला?' आणि मग त्यांनी संदीपच्या मराठी कवितेचा हिंदी कलाविष्कार देखील केला. संदीपची 'उदासीत या...' ही कविता जेव्हा दिग्दर्शक रवी जाधव यांच्या वाचनात आली तेव्हा त्यांना विजय तेंडुलकरांची 'मित्रा' ही समलैंगिक प्रश्नावर आधारित असलेली कथा आठवली. मग त्यांना वाटलं की या समलैंगिक व्यक्तींच्या आयुष्यातील उदासीचा कोणता रंग असेल? आणि हा रंग शोधताना 'मित्रा' हा भावोत्कट लघुपट तयार झाला. हा लघुपट इतका वेगळा होता की या लघुपटाला नॅशनल अवॉर्ड देखील मिळाले. नटरंग, बालगंधर्व, न्यूड, कॉफी आणि बरंच काही, टाईमपास, कच्चा लिंबू अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी स्वतःला व्यक्त केलंय. 'समलैंगिकता' या फारसा बोलल्या जाणाऱ्या विषयावरची 'मित्रा' ही कथा ७० च्या दशकात लिहिली गेली होती. त्यावर १९८० मध्ये तेंडुलकर यांचे 'मित्राची गोष्ट' हे नाटक रंगभूमीवर आले. बायोस्कोपच्या प्रयोगाच्या माध्यमातून दिग्दर्शक रवी जाधवांनी विजय तेंडुलकर यांच्या 'मित्रा' या कथेबरोबर कवी संदीप खरे यांच्या 'उदासीत या... या 'कवितेची उत्तम सांगड घालून हा लघुपट तयार झालारवी जाधव यांना धाडसी विषयांचे सिनेमात रुपांतर करण्याची उपजत शक्ती आहे. रवी जाधव म्हणतात 'लोकांना माझ्या चित्रपटांचे विषय धाडसी वाटतात, पण मला वाटते की, मी हाताळलेले विषय वास्तवाच्या जवळचे असतात. त्यामुळे प्रेक्षकांना ते आवडतात.

          'मित्रा' ह्या लघुपटातील काळ १९४५ चा असल्याने रवी जाधवांनी हा लघुपट कृष्ण-धवल रंगात करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय दाद देण्याजोगा आहे. निसर्गातच समलैंगिक व्यक्तिमत्त्व लाभलेली 'सुमित्रा' (वीणा जामकर) आणि तिच्यावर मनापासून प्रेम करणारा 'विन्या' (स्वतः कवी संदीप खरे) यांची ही गोष्ट आहे. आपल्या जवळच्या मित्राला विन्याला 'आपल्यातलं वेगळेपण कसं सांगायचं' या कोंडीत सुमित्रा सापडलेली असते. त्या काळात समलैंगिकता अज्ञात होती, समाजाला अमान्य होती, किंवा ती एक गंभीर आजार म्हणून पाहिली जात होती. सुमित्रा काहीशी पुरषी, ध्येयपूर्ण, धाडसी, बेधडक असूनही भावनिक दृष्ट्या नाजूक असते. सुमित्रा मुलांप्रमाणे सायकल चालवते, प्रसंगी सिगारेट ही ओढते. त्या जुन्या काळातल्या पार्श्वभुमीवर सुमित्राचं जगणं धाडसीच असतं.


        स्वतःमध्ये काहीतरी वेगळेपण आहे हे जाणवल्यावर सुमित्रेची घुसमट 'वीणा जामकर' या अभिनेत्रीने अफाट साकारलेली आहे. वीणा जामकरच्या अभिनयाचं विशेष कौतुक करायला हवं. कारण कुठेही समलैंगिकतेचा उल्लेख करता ती सुमित्राची वेगळी अवस्था आपल्या सहज अभिनयातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते. संदीप खरे कवी म्हणून आपल्या सर्वांचाच आवडता. त्याचा हा अभिनयासाठी असलेला पहिलाच चित्रपट असूनही त्याने त्याच्या भूमिकेतील जपलेला इनोसन्स आणि संयमी संवादफेक विशेष कौतुकास्पद आहे. दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांचा 'मित्रा' हा लघुपट मैलाचा दगड ठरावा. सलील कुलकर्णी यांनी संदीपच्या 'उदासीत या...' या कवितेला अप्रतिम चाल दिली आहे. या लघुपटाच्या शेवटी दिग्दर्शक एका ओळीतून 'समलैंगिकतेच्या' प्रश्नाचा संबंध 'आजच्या वर्तमानाशी' जोडतो आणि त्यामुळे या लघुपटाची उंची कैक पटीने वाढते.

After more than 67 years of Independence

'Mitra' is still looking for freedom...

   

        'चार दिग्दर्शक - चार कवी - एक चित्रपट' अशी टॅग लाइन असलेल्या 'बायोस्कोप' मधील लघुपटातील सर्व कथा ह्या Between the lines बोलतात. या लघुपटांचे सर्वच दिग्दर्शक चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्त होणारे सृजनशील आणि त्यांच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करणारे आहेत. एखाद्या कवितेमधील आशयाला, अनुभूतीला धरून एखादी पटकथा लिहिणे, हाच मुळी एक आगळा वेगळा प्रयोग म्हणावा लागेल. हा प्रयोग भारतात प्रथमच केला गेलेला आहे. संवेदनशील चित्रपट रसिकांसाठी 'बायोस्कोप' हा चित्रपट खरोखर एक मेजवानीच आहे. या चार ही दिग्दर्शकांची जडणघडण वेगळी, प्रत्येकाची गोष्ट सांगायची पद्धत वेगळी, प्रत्येकाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा, प्रत्येकाची कवितांची आवड वेगळी, प्रत्येकाची संगीताची आवड वेगळी असून ही हे चौघे ही एकत्र येऊन प्रेक्षकांना चार वेगवेगळे अनुभव देतात. आपल्याला आवडलेल्या कवितेचा आपल्याला जाणवलेला, भावलेला वेगळा दृष्टीकोन लोकांपर्यंत पोहोचवण्यात हे चारीही दिग्दर्शक कमालीचे यशस्वी झालेले आहेत. त्यांनी केलेल्या या वेगळ्या प्रयोगाची आणि धाडसी प्रयत्नाची दखल प्रत्येक मराठी मनाने घ्यायला हवी. 'बायोस्कोप' हा निव्वळ मनोरंजन करणारा चित्रपट नाही, मात्र संवेदनशील प्रेक्षकांसाठी हा कवितांचा भावोत्कट सोहळाच आहे.

 

राजीव जतकर

१८-०६-२०२६.

  • हा चित्रपट प्राईम व्हिडीओ वर उपलब्ध आहे.  

No comments:

Post a Comment