जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा...
| कवी: संदीप खरे |
कधी कधी आपल्या सारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यात आश्चर्यकारक आणि अविस्मरणीय घटना घडतात, ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. माझ्या आयुष्यात सुप्रसिद्ध कवी 'संदीप खरे' याच्या बरोबर एका छोट्या कार्यक्रमात स्टेज वर त्याच्या शेजारी बसून गप्पा मारण्याचा योग येईल, हे मी कधी स्वप्नातही पाहिले नव्हते, कारण जेवढा कवी संदीप मोठा कलाकार, तेवढा मी सामान्य! पण अशा संदीप बरोबर स्टेज वरून गप्पा मारण्याचा योग आला खरा... दि २४ मे रोजी आमच्या 'गंधार' ग्रुप वर संदीप खरे याला गप्पा मारायला आणि अर्थातच त्याच्या जुन्या, नविन कविता ऐकायला आम्ही आमंत्रित केले. २४ मे च्या सुमारे दीड दोन महिने आधीच आम्ही कार्यक्रमाचे नियोजन सुरू केले. नेहमीप्रमाणे आमचे मित्र श्री नरेंद्र दुवेदी यांच्या टेमघर धरणाच्या पाण्यालगत असलेल्या 'निर्मला' बंगल्यात हा कार्यक्रम ठरवला गेला. संदीप खरे याला मी लहानपणापासून ओळखत असल्याने कार्यक्रमाचे तपशील ठरवण्याची जबाबदारी श्री. दुवेदी यांनी माझ्यावर सोपवली. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण कार्यक्रमाचे तपशील ठरवताना संदीप मला म्हणाला की "आपण कार्यक्रम साधा आणि गप्पांच्या स्वरूपाचा ठेवू आणि तू माझ्याबरोबर स्टेजवर गप्पा मार, तुला आवडतील ते प्रश्न विचार." इथं मात्र मी दचकलो. साहित्याच्या कुठल्याही प्रकाराचा माझा दुरान्वयेही संबंध नाही. कविता ऐकायला, त्यातील आनंद घ्यायला मला आवडते, पण, 'संदीप खरे' सारख्या काव्यसागरातील धाडसी दर्यावर्दी असलेल्या संवेदनशील, प्रतिथयश कवी बरोबर स्टेजवरून दोन अडीच तास गप्पा मारायच्या म्हणजे अवघडच होते. तसे मी संदीपला बोलूनही दाखवले. पण संदीप काही ऐकेना. संदीपचा आग्रह मला देखील मोडवेना. शिवाय माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात येणारी ही दुर्मिळ संधी मी सोडणे हा वेडेपणाच ठरला असता.
तसा मी संदीप खरे ला त्याच्या लहानपणापासून ओळखतो. मंगेश परांजपे नावाच्या माझ्या जवळच्या मित्राचा संदीप हा भाचा! मंगेश प्रमाणे मलाही संदीप 'राजूमामा' म्हणायचा. संदीपचा हा कार्यक्रम ठरल्यावर मी भूतकाळात गेलो. १९७६ ते १९८० दरम्यान मी माझ्या आईवडिलांपासून दूर शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात राहायला आलो. सुरुवातीला काहीसा होम-सिक झालो. घरची आठवण यायची. अशा काळात परांजपे कुटुंबांमध्ये मी रमलो. संदीपचे आजोबा उत्तम तबला वाजवायचे. मी माझ्या शालेय जीवनात तबला शिकलेला असल्याने परांजप्यांच्या घरी अभ्यासाच्या निमित्ताने, तबल्याच्या रियाजासाठी कायम पडिक असे. तिथे आजोळी संदीप नेहमी यायचा. त्यावेळी तो ५/६ वर्षांचा असेल. आईच्या मागे कुरकुर करत कायम काहीतरी बाळहट्ट करणारा संदीप मला अजूनही आठवतो. पुढे शिक्षण संपल्यावर पैसे मिळवण्याच्या भानगडीमुळे गाण्याची आवड, माऊथ ऑर्गन, तबला, चित्रकला वगैरे माझे छंद मागे पडले. व्यवसायात मी पार बुडून गेलो. परांजपे कुटुंबीय, संदीप खरे यांच्याशी देखील संपर्क बराच कमी झाला. अधून मधून क्वचित भेटणे किंवा फोनवर संपर्कात राहीलो. असेच कधीतरी संदीप उत्तम कविता करतो आणि त्याचे कवितांचे कार्यक्रम लोकप्रिय होत आहेत असे ऐकले. मधल्या काळात घरच्यांच्या आग्रहाखातर संदीप इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगची पदविका प्राप्त करून घेण्यातही यशस्वी झाला. पण हे तांत्रिक क्षेत्र संदीपला रमविणारे नव्हते, म्हणून इलेक्ट्रीकचा शॉक देण्यापेक्षा कवितेतून प्रकाश पाडणे त्याने स्वीकारले. त्याची प्रत्येक कविता मनाला भिडणारी, 'आपल्याच मनातले विचार संदीप मांडतोय' ही श्रोत्यांची भावना आणि त्याचे सुंदर सादरीकरण यातून तरुण मंडळी संदीपवर लट्टू झाली. कवितांचे उत्तम सादरीकरण ही संदीपच्या यशाची महत्त्वाची बाजू आणि ती वेगवेगळ्या प्रयोगातून लोकांपुढे आणणे ही त्याची हातोटी! पुढे सलील कुलकर्णी बरोबर त्याचे रसायन मस्त जमले आणि 'आयुष्यावर बोलू काही' या अद्भुत कार्यक्रमाचा जन्म झाला. या कार्यक्रमातून पुढे आलेल्या कविता, गाणी लोकांच्या विशेषतः तरुणांच्या ओठांवर आली. संदीपने तरुणाईला अक्षरशः वेड लावले. त्याचे 'आयुष्यावर बोलू काही' चे प्रयोग शेकडो वेळा बघणारे तरुण माझ्या पहाण्यात आहेत. पुढे रसिकांच्या संदीप कडून अपेक्षा वाढत गेल्या अन् त्या अपेक्षा पूर्ण करण्यातही संदीप कमालीचा यशस्वी झाला.
अशा या सुप्रसिद्ध कवी, गीतकार, उत्तम अभिनेता, तरुणाईला वेड लावणाऱ्या, कॉपीरायटींग आणि जाहिरातीच्या क्षेत्रात मनसोक्त मुसाफिरी करणाऱ्या, माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात कवितेबद्दल आकर्षण निर्माण करणाऱ्या 'बहुआयामी' अशा कलाकाराची मुलाखत घेणे, त्याच्याबरोबर स्टेजवर बसून कवितेबद्दल बोलणे हे सोपे काम नव्हते. कार्यक्रमाच्या आधी दोन तीन वेळेला मी संदीपला 'कार्यक्रम कसा करायचा? कार्यक्रमाचे स्वरूप काय ठेवायचे?' असे प्रश्न विचारले. पण त्याने मला 'काळजी करू नको रे, आपण नेहमी जशा गप्पा मारतो, तसेच गप्पा मारूयात.' असे सांगितले. तरीही आयत्या वेळी गडबड नको म्हणून मी काही प्रश्न तयार ठेवले होते. मुलाखती वेळी खूप काही लिहून गेलो होतो. पण त्याची काही गरजच पडली नाही. गप्पा सहज रंगत गेल्या... गप्पांदरम्यान संदीपने मनस्वीपणे आपल्या भावना, विचार व्यक्त केले. अनेक जुन्या-नव्या कविता सादर केल्या. त्यातून मी जे वेचू शकलो त्याचे हे शब्दांकन...
कधीतरी वेड्यागत वागायला हवे.
उगाचच रात्रभर जागायला हवे...
सुखासीन जगण्याची झाली जळमटे.
जगणेच सारे पुरे झाडायला हवे..
कधीतरी वेड्यागत वागायला हवे...
पुढे 'कविता कशी सुचते? कधी सुचते? कुठे सुचते?' याबद्दल बोलताना संदीप म्हणाला "कविता ही नेणिवेतून सुचते, जाणिवेतून नाही. कुठली कविता कधी सुचेल, कुठे सुचेल त्याला काही लॉजिकच नसते. 'आताशा मला हे असे काय होते... कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते..!'. ही कविता मला वयाच्या २७/२८ व्या वर्षी सुचली. असं काहीतरी सुचण्याचं माझं वय देखील नव्हतं. विजय टॉकीजच्या पायऱ्यांवर बसलेलो असताना, आजूबाजूच्या गर्दीच्या कोलाहलात या कवितेच्या सुरुवातीच्या चार ओळी मला सुचल्या. एकीकडे मी सिनेमा बघतोय, पण माझ्या आत मात्र कवितेच्या काही ओळींचे चक्र फिरत होते. त्यानंतर सुचणं बंद झालं. त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर अचानक एका मध्यरात्री त्याच कवितेच्या पुढच्या ओळी सुचू लागल्या. त्यामुळे कविता सुचण्याच्या प्रक्रियेत ती सुचायचे ठिकाण, काळ, वेळ यांचा काही एक संबंध नसतो. याची उदाहरणे देताना संदीपने 'आताशा असे हे मला काय होते...' या कवितेबरोबर इतरही काही कविता जसे 'पाऊसराव'.. किंवा 'मी जाता जाता तिला बोललो काही'.. अशा अप्रतिम कविता सादर केल्या. त्यातील एक कविता खूप मजेशीर होती.
एक होता मासा, त्याचा लाल झाला घसा..
डॉक्टर म्हणाले चार दिवस, कोरड्या पाण्यात बसा..
कोरडे पाणी शोधत शोधत, मासा हिंडला खूप..
शोधता शोधता मरून गेला, बदलून आता रूप..
कोरडे पाणी डोळ्यात ठेवून, आता फिरतो नेहमी..
गतजन्मीचा मासा, म्हणजे या जन्मीचा मी.
ही कविता मजेशीर असली तरी शेवटी ती खूप काही सांगून जाते.
आपण सामान्य माणसं कधी कधी दुःखी झाल्यावर नुसतेच उदास मनःस्थितीत जातो, पण संदीप सारख्या प्रतिभावंत कवीच्या लेखणीतून 'उदासीत या कोणता रंग आहे' किंवा 'अजून उजाडत नाही ग' या सारख्या कवितांच्या ओळी कागदावर सहज उतरतात..
उदासीत या कोणता रंग आहे.
तुझा ठाव नाही, मला ठाव नाही..
जसा की नदीच्या तीरी, मी प्रवासी
तुला रंग नाही, मला गाव नाही..
'उदासीत या कोणता रंग आहे..’ ही कविता आणि त्याची पार्श्वभूमी सांगताना काही आठवणी, त्याचा अभिनयाचा प्रवास देखील संदीपने श्रोत्यांसमोर मांडला. 'बायोस्कोप' नावाच्या एका मराठी चित्रपटात चार संवेदनशील दिग्दर्शकांनी त्यांच्या आवडीच्या कविता आणि त्याला अनुसरून कथेची निवड करून, चार लघुपट निर्माण केले होते. हे चारही लघुपट गुलजार साहेबांनी बेमालूमपणे एकमेकात गुंफले होते. दिग्दर्शक रवी जाधव यांनी विजय तेंडुलकर यांच्या 'मित्रा' नावाच्या कथेशी संदीपच्या 'उदासीत या' कवितेची सांगड घालून हा लघुपट तयार केला. रवी जाधव यांनी या लघुपटात संदीपला अभिनय करण्याची विनंती केली. गुलजार साहेबांनी संदीपच्या या लघुपटातील अभिनयाचं आणि विशेषतः त्याच्या या कवितेचं भरभरून कौतुक केलं. आणि संदीपच्या या सुरेख कवितेचं त्यांनी हिंदीत भाषांतर करून 'भला उदासी का रंग क्या है!' असा कलाविष्कारही केला. कार्यक्रमाच्या या टप्प्यावर गंभीर कवितांनी हॉल मधील वातावरण खूप भारावल्यासारखे, काहीसे जड झाले होते, हे माझ्या लक्षात आले होते आणि कदाचित संदीपच्याही! मग काहीशा हलक्याफुलक्या कविता सादर होऊ लागल्या. 'ढिपाडी ढिपांग' सारख्या कवितांची निर्मिती तयार होताना घडलेल्या काही धमाल घटना संदीप कडून ऐकताना श्रोते खुर्चीत काहीसे सैलावले.
संदीप बरोबर गप्पा मारताना 'आयुष्यावर बोलू काही' ह्या कार्यक्रमाबद्दल, त्या कार्यक्रमाच्या यशाबद्दल उल्लेख करणं स्वाभाविकच होतं. कारण 'आयुष्यावर...' चं यश इतकं अफाट, उत्तुंग आहे की संदीपच्या कारकिर्दीच्या यशाचा तो एक मैलाचा दगड आहे असेच म्हणावे लागेल. या कार्यक्रमाचे तब्बल दोन हजाराहून अधिक प्रयोग झाले आहेत. संदीप म्हणाला 'एक चांगली कविता ही सगळ्या वयोगटातील श्रोत्यांसाठी असते. बालगीत फक्त लहान मुलांचे नसते. प्रेमावरच्या कविता ही फक्त तरुणांसाठी नसतात. या कार्यक्रमात लहान मुलांपासून, आजी आजोबांपर्यंत सर्वजण कवितांचा आनंद घेत असतात. या कार्यक्रमासाठी आम्ही वेगळं काही केलं नाही, वेगळा आव आणला नाही, मात्र जे केलं ते प्रामाणिकपणे सादर केलं. आयुष्यावर... चा प्रवास अगदी सहज गमतीत सुरू झाला आणि जोपर्यंत त्याची गंमत येतीये तो पर्यंत तो चालू राहील.
संदीप बरोबर गप्पा मारताना मला जाणवत होते की त्याचे बोलणे मोजके आहे, पण स्पष्ट आहे. विचार पक्के आहेत आणि प्रगल्भ देखील! 'कविता लिहिताना गंभीर विषय असेल तर त्याचे शब्दांकन करताना जर स्वतःच्या डोळ्यात पाणी तरळले तरच ती कविता योग्य झाल्याची भावना पावती स्वतःला मिळते' असे संदीप म्हणतो. खूप वाचन, कवितांचा अभ्यास, निरीक्षण आणि कविता स्फुरण्याची ईश्वरदत्त देणगी यातून चांगली कविता स्फुरते असे संदीप नेहमी सांगतो. आमच्या गप्पांमध्ये संदीपने आस्तिक आणि नास्तिक यावर देखील भाष्य केले. माझ्या फर्माईशवर त्याने 'नास्तिक' ही माझी आवडती कविता सादर केली. या विषयावर बोलताना संदीप म्हणाला 'आस्तिक-नास्तिक हे फार घोटाळ्याचं प्रकरण आहे. कुसुमाग्रजांना एकदा कोणीतरी प्रश्न विचारला की देव आहे का नाही? त्यावर ते म्हणाले होते की ज्यांना गरज आहे, त्यांच्यासाठी देव आहे, ज्यांना त्याची गरज नाही त्यांच्यासाठी नाही. इतकं ते सोपं आहे ते. तो पुढे म्हणाला..
इश्वर आहे अथवा नाही मला विचारे कोणी.
विनम्र भावे उत्तर देतो हात जोडुनी दोन्ही..
इश्वर आहे.. परंतु त्याची किमया विचित्रवाणी.
तोच सुचवतो मला सारखी नास्तिकतेची गाणी..
संदीपचा दैवावर विश्वास आहे. कवितेचे शब्द सुचणे ही ईश्वरदत्त देणगी आहे असे तो मानतो. आपल्या कामाशी, कामावरच्या श्रद्धेशी प्रामाणिक रहाणारा तो आस्तिक! ही त्याची स्वतःची आस्तिकतेची व्याख्या!
गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. संदीपचे बोलणे संपूच नये असे वाटत होते. संदीपच्या गप्पांच्या ओघात त्याने अनेक नवीन-जुन्या कविता ऐकवल्या. पण मन भरत नव्हते. श्रोत्यांच्या मनातील देखील अनेक प्रश्नांना संदीपने दिलखुलासपणे उत्तरे दिली. कार्यक्रम तब्बल अडीच तासानंतर नाईलाजाने संपला. माझे समाधान होत नव्हते. जेवणाच्या वेळी मी संदीपला विचारले, 'तुझी आनंदी दिवसाची संकल्पना काय? यावर संदीप सहज उत्तरला, 'छानसे खाणे, पुस्तक वाचणे आणि मस्त भटकंती करणे!' मी पुन्हा विचारले 'आणि तुझी आनंदी आयुष्याची संकल्पना काय?' यावर संदीपने सांगितले 'आयुष्यभर स्वतःला आवडेल असे काम करायला मिळणे'! असा हा संदीप अगदी सहज सोपा आहे. मी तर या कार्यक्रमावर खुप खुष झालो होतो. संदीप बरोबर स्टेजवर त्याच्या शेजारी बसुन गप्पा मारणे हा आनंद मला आयुष्यभर पुरणारा आहे. साध्या सोप्या कविता करणारा संदीप मनाने, विचाराने देखील साधा आणि स्पष्ट आहे. एवढ्या यशस्वीतेच्या शिखरावर असलेला संदीप आपल्या सुस्वभावी वृत्तीमुळे आपले पाय जमिनीवर ठेवून आहे. त्यामुळे 'कवी' संदीप खरे मोठा की 'माणूस' म्हणून संदीप खरे मोठा ही उकल होणे अवघडच आहे. म्हणूनच अनेक मोठ्या माणसांबद्दल बोलले जाते ते संदीप खरेंच्या बाबतीतही सत्य आहे. "झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा!"
राजीव जतकर
४ जून २०२६.
'मित्रा' या लघुपटातील संदीपची ही कविता आणि संदीपच्या अभिनयाचा आनंद घेण्यासाठी युट्यूब वरील 'उदासीनता...' या कवितेची लिंक इथे जोडतो आहे.
https://youtu.be/rGznX6RJoCk?si=4x8vGTbvZSr4JJR0



तू चित्रपटाबद्दल लिहिलेलं वाचतो तेंव्हा संपूर्ण चित्रपट डोळ्यासमोरून तरळून जातो. तुझं प्रवास वर्णन वाचताना वाचकाला त्या ठिकाणी असल्याची अनुभूती येते. या कार्यक्रमाबद्दल वाचताना अगदी तसंच वाटलं. मुलाखत देताना संदीप खरे तुझ्या हाकेआधी प्रतिसाद देत होता.तरी देखील तुझं त्याला बोलतं करण्याचं कौशल्य दिसून आलं. तुझ्यामधला हा सुप्त गुण या निमित्ताने समोर आला. संदीप खरे, गुरू ठाकूर, वैभव जोशी यांच्या कविता आपल्याला भावतात कारण त्या समजायला सोप्या असतात आणि आपण त्यांच्या कवितांशी सहजगत्या जोडले जातो. विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती घेण्याची संधी तुला मिळत राहो आणि त्या ऐकण्याची आम्हाला!
ReplyDeleteजतकरसर, आपली निरीक्षण शक्ती आणि भाषा सौंदर्य अप्रतिम आहे, विषयाची उत्तम जाण आणि मांडणी शिस्त बद्ध!
ReplyDeleteसंदीप बद्दल लिहिताना तो आपल्याला मामा म्हणतो ह्यामध्ये फार न गुंतता ज्या आदराने तुम्ही संपूर्ण कार्यक्रम डोळ्यासमोर उभा केलात.
तुमच्या ह्या हातोटीला सलाम🙏
सुंदर शब्दांकन...अप्रतिम...👌♥️
ReplyDeleteतुम्ही ही निरीक्षक, समिक्षक , रसिक आहात,
ReplyDeleteहे करताना तुम्ही ही कलाकार होवून छानच लिहिता.
तुमच्या लिखाणात जीवंतपणा असल्याचे जाणवते.
आम्हाला तुमचे लिखाण आवडते.
कवी संदीप खरे सोबत कार्यक्रम आम्ही आता वाचताना अनुभवतो आहे.
धन्यवाद सर ...
वाचताना मी स्वतः त्या गप्पांच्या मैफिली मध्ये आहे असे क्षणभर वाटले...सहज सोपा संदीप तु तितक्याच सहज सुंदर शैलीत उलगडून दाखविलास. मस्त वाटले ..
ReplyDeleteअतिशय सुंदर सर आणि मनाला भिडणारा लेख! आपल्या साध्या, प्रामाणिक शब्दांत तुम्ही एक अविस्मरणीय अनुभव जिवंत केला आहे. संदीप खरे यांच्यासारख्या दिग्गज कवीसोबतचा संवाद आणि त्यामागील भावना वाचताना मलाही त्या क्षणांचा भाग असल्यासारखे वाटले. नम्रता, संवेदनशीलता आणि उत्कृष्ट कथनशैली यांचा सुंदर मिलाफ या लेखात दिसून येतो. पुढील भाग वाचण्याची उत्सुकता लागली आहे. हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
ReplyDeleteखुपच छान,
ReplyDeleteअशी मुलाखत घ्यायला मिळणे हे एक मोठे आव्हान तुला मिळाले व ते तू खूप सुंदर रित्या पार पाडले. एकूण मुलाखतीचे वर्णन सुंदर शब्दात केले आहे. त्यांनी अडीच तीन तासात बऱ्याच कविता केल्या असतील जर त्या संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रीकरण केले असेल तर ते जरूर पाठव.
पुढील नवीन कार्यास शुभेच्छा 🎉 🎉 🎉
This comment has been removed by the author.
ReplyDeleteDear Rajiv
ReplyDeleteCongratulations!!!
Very well narated ....could get nice glimpses of the Program. Back In 2005, I remember you organising the first weekly meeting of Rotary club, based on Poems on Monsoon theme and presented by then young and budding poet, Shree Sandeep Khare. The name of the program was, "Sari war Sari" 😀
Keep up the good work 👏👏👏
अगदी मुद्देसूद लिखाण, संपुर्ण चित्र डोळ्यासमोर उभे राहते. छानच वर्णन केले आहे. असेच लिहा. ...
ReplyDeleteखूप सुंदर
ReplyDelete