Monday, 17 February 2025

सौर ऊर्जा वापरासाठी लोकसहभाग आवश्यक

 

सौर ऊर्जा वापरासाठी लोकसहभाग आवश्यक

 


जगभरात वीजनिर्मिती प्रामुख्याने कोळशापासून किंवा पाण्यापासून केली जाते. कोळसा आणि पाणी या दोन्हीही स्त्रोतांची उपलब्धता मानवाच्या अतिरेकी वापराने कमी होत चालली आहे. सध्या अशा प्रकारच्या बातम्या आपण वाचतोच आहोत. कोळशाच्या कमतरतेमुळे चीन सारखा बलाढ्य देश संकटात सापडला आहे. आपला देश देखील अशाच संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्यामुळे पर्यायी ऊर्जास्रोतांना महत्व येणार आहे, नव्हे ते आले आहे. त्यात वाऱ्यावर ऊर्जा निर्मिती तयार करणाऱ्या पवन चक्क्या 'जिथे वाऱ्याची ठराविक गती उपलब्ध असते' तिथेच उभारता येतात. त्यामुळे पवन उर्जेवर काहीश्या मर्यादा येतात. पण सूर्यापासून ऊर्जेची निर्मिती अमर्याद करता येऊ शकते असे लक्षात आले आहे. सूर्य प्रकाश जगभर कमीजास्ती प्रमाणात कायम उपलब्ध असतो. भारतातील बहुतांशी भागात तर वर्षातील तीनशे दिवस सूर्यप्रकाश असतोच असतो. शिवाय सौर वीजनिर्मितीमध्ये अनेक फायदे असतात. पंचवीस ते तीस वर्षे असे प्रदीर्घ आयुष्य असलेली ही यंत्रणा पूर्णपणे 'देखभाल' विरहित असून यातून अव्याहतपणे फुकट वीज मिळत राहते. मात्र अशा सौर यंत्रणा उभ्या करायला सुरवातीचा खर्च खूप येतो. अशा खर्चिक यंत्रणा उभ्या केल्यानंतर निर्माण झालेली वीज बॅटरी मध्ये साठवून ठेवावी लागते, आणि गरजेनुसार त्याचा वापर करावा लागतो. या बॅटऱ्या देखील महाग असतात त्याची देखभालीचाही खर्च येतो. त्यामुळे ही फुकट वाटणारी वीज ग्राहकांना फारशी परवडणारी नाही. आणि सर्वसामान्य ग्राहक हा खर्च करायला फारसा उत्सुक देखील नसतो.

 

नेट मीटरिंग:

यावर उपाय म्हणून 'नेट मीटरिंग चे तंत्रज्ञान विकसित झाले. नेट मीटरिंग मध्ये बॅटऱ्यांचा वापर काढूनच टाकण्यात आला. या तंत्रज्ञानात इमारतीच्या छतावरील सोलर पॅनल द्वारा निर्माण झालेली वीज बॅटऱ्यांना जोडता थेट महावितरणच्या जाळ्याला (ग्रीडला) जोडली जाते. निर्माण झालेली सौर ऊर्जा वापरून शिल्लक किंवा जास्त निर्माण झालेली वीज ग्राहक महावितरण ला देऊ शकतो, आणि मोबदल्यात त्याचा परतावा देखील मिळु शकतो. थोडक्यात ग्राहक महावितरण ला वीज विकू शकतो. ग्राहकांना फायदेशीर असलेली ही नेटमीटरिंग चे प्रणाली यूरोप अमेरिकेत अतिशय लोकप्रिय आहे. सुट्टीच्या दिवशी हमखास विकेंड ला घराबाहेर पडणारी ही पाश्चिमात्य मंडळी आपल्या घरावरच्या छतावर सौर वीज निर्मिती करून अतिरिक्त झालेली वीज विकून चक्क पैसे कमावतात. भारतात सुमारे २०१० मध्ये 'राष्ट्रीय सोलर मिशन' ची स्थापना झाली. देशात पुढे मात्र या सौर ऊर्जेच्या कामाने वेग पकडला. हळू हळू सर्वच राज्यांनी सौर उर्जेवर लक्ष केंद्रित केलं. प्रत्येक राज्याने नेट मीटर प्रणालीची आपापली धोरणे आखली. ऊर्जेची वाढती गरज आणि पर्यावरणाचे रक्षण या महत्वाच्या बाबींमुळे सुरवातीच्या काही वर्षातच गुजराथ, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यांनी सौर यंत्रणा उभ्या करण्यात आघाडी घेतली. केंद्र सरकारने देऊ केलेली अनुदाने ग्राहकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचवली. मात्र महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाने (एम आर सी) सौर यंत्रणेबाबत निर्णय काहीसा उशिराच घेऊन दि. १० सप्टेंबर २०१५ रोजी नेट मीटर पॉलिसी जाहीर केली. याला 'देर से आये... दुरुस्त आये' असेच म्हणावे लागेल.

 

एखादा वीजग्राहक जेंव्हा घराच्या छपरावर फोटो व्होल्टाइक पॅनल बसवून स्वतः सौरऊर्जा निर्माण करतो, तेंव्हा निर्माण झालेली वीज डी. सी. (डायरेक्ट करंट) प्रकारची असते. इन्व्हर्टर या उपकरणाचा वापर करून या डी.सी. विजेचे . सी. (अल्टरनेटिंग करंट) प्रकारच्या विजेत रूपांतर केले जाते. ही सौरऊर्जा प्रथमतः ग्राहकाच्या गरजेप्रमाणे वापरली जाऊन उरलेली अतिरिक्त ऊर्जा किंवा वीज थेट वीजमहामंडळाच्या जाळ्याला (ग्रीडला) जोडली जाते. वीजग्राहकाच्या आणि महावितरणच्या यंत्रणांमध्ये एक टू-वे मीटर (याला नेट मीटर म्हणतात) जोडला जातो. या वैशिष्ट्यपूर्ण मीटरमध्ये ग्राहकाने निर्माण केलेल्या वीजे मधून वीज मंडळाच्या जाळ्याला जोडलेल्या विजेची नोंद केली जाते. तसेच ग्राहकाला त्याने निर्माण केलेली सौरऊर्जा कमी पडल्यास जी वीज महावितरण कडून घ्यावी लागते त्याची देखील नोंद ह्या नेट मीटर मध्ये घेतली जाते. ग्राहकाने वीजमंडळाकडून घेतलेली (इम्पोर्ट) वीज आणि ग्राहकाने वीजमंडळाच्या जाळ्याला दिलेली वीज (एक्स्पोर्ट) यांच्या नेट मीटर मधील झालेल्या नोंदीतील फरकानुसार वीज देयके (वीज बिले) बनवली जातात. थोडक्यात स्वतः निर्माण केलेली वीज, स्वतःच्या गरजेप्रमाणे वापरून उरलेली वीज ग्राहकाला वीजमंडळाला विकत येते. अर्थात असे करताना 'महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने (एम..आर.सी.) आखून दिलेल्या नियमांतर्गत राहून हा फायदा ग्राहकाला घेता येतो.

 

शासकीय सौरऊर्जा योजना:

काळाची पावले ओळखून आपल्या पंतप्रधानांनी श्री नरेंद्र मोदी यांनी 'पी.एम. सूर्याघर' योजना अमलात आणली आहे. तसेच शेतकऱ्यांना दिवसाही वीज पुरवठा व्हावा यासाठी 'सौर कृषी वीज वाहिनी योजना' देखील आमलात आणली आहे. कोणत्याही लोकोपयोगी प्रकल्पाला शासनाचे पाठबळ आणि राजकीय इच्छाशक्तीची जोड मिळाली की त्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीला वेग येतो. या सौरऊर्जेच्या प्रकल्पांनी सध्या असाच वेग पकडला आहे. सौरऊर्जेच्या निर्मितीमुळे आणि वापरामुळे पर्यावरणाला देखील मोठा हातभार लागतो. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांनी देखील राज्यात सौरऊर्जेच्या वापरला मोठी चालना दिलेली आहे.

 


वीजग्राहकांनापी.एम. सूर्याघर’ योजने अंतर्गत राज्यातील निवासी व्यावसायिक इमारतीवरील छतावर सौर पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्यास सरकार प्रोत्साहित करत आहे. त्यासाठी वीजग्राहकांना मोठ्या प्रमाणात थेट सरकारी अनुदाने (सबसिडी) देण्यात येत आहेत. छोट्या वीज ग्राहकांना देखील या अनुदानाचा लाभ घेता येतो. एका किलोवॅट साठी तीस हजार रुपये तर दोन किलोवॅट साठी साठ हजार रुपये एवढे अनुदान मिळते. त्यामुळे महिना तीनशे युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना जवळजवळ मोफत वीज मिळवण्याची आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळवण्याची संधी मिळत आहे. पी.एम. सूर्यावर योजना शहरी आणि ग्रामीण वीजग्राहकांसाठी उपलब्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणने 'सौरग्राम' ही एक महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन अशा शंभर गावांना विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर कार्यकर्ण्याची ही ती योजना आहे. ग्रामीण भागातील गावांना शेतकऱ्यांच्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या कृषी पंपाबरोबरच स्थानिक पाणी पुरवठा, गावातील रस्त्यावरील दिवे, सार्वजनिक आटाचक्की, या सारख्या वापरासाठी देखील सौरऊर्जा वापर करण्यासाठी उद्युक्त केले जात आहे. गावातील ग्रामपंचायत कार्यालय, स्थानिक पाणीपुरवठा योजनांची विजेची गरज सौर पॅनेल्स बसवून पूर्ण केली जात आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील 'मान्याची वाडी' या प्रगतिशील गावाने या ग्राम योजने अंतर्गत काम करून हे गाव विजेच्या बाबतील पूर्णपणे आत्मनिर्भर बनवले आहे. या गावाने आपली विजेची संपूर्ण गरज गावातच सौरऊर्जा निर्माण करून यशस्वी पाऊल टाकले आहे. या गावातील प्रत्येक घरावर सूर्यावर मोफत वीज योजनेचा लाभ घेऊन सौर पॅनेल्स बसवली आहेत. त्यामुळे या गावातील सर्व गावकऱ्यांचे वीजबिल शून्य येते आणि त्यांना अतिरिक्त वीज महावितरणला विकून उत्पन्नाची संधी देखील मिळत आहे. विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर झालेल्या दुसऱ्या गावाचे उदाहरण देता येईल ते म्हणजे खेड तालुक्यातील 'टेकवडी' हे गाव. हे गाव देखील सौर ऊर्जेद्वारे स्वतःची प्रगती करत आहे.

 


 शासनाचे ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष असून ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना या आणि अशा अनेक योजनांचा फायदा देण्याचे राज्य सरकार आणि महावितरण यांनी ठेवले आहे. मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजनेच्या माध्यमातून सध्या राज्यात सुमारे दहा हजार मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा निर्मितीचा प्रकल्प बसवण्यात येत आहे. हा जगातील सर्वात मोठा 'डिस्ट्रीब्युटेड रिन्यूएबल एनर्जी प्रकल्प आहे. सौर ऊर्जेची निर्मिती करून कृषीफीडर्स च्या माध्यमातून शेतीला दिवसा वीज पुरवठा करायचा अशी ही योजना आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी जून २०१७ मध्ये मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजना सुरु केली. त्यातून २३४ कृषिवाहिन्यांवरील एक लाख शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज पुरवठा दिला जात आहे. या योजनांची कार्यवाही करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा प्रकल्पांना सार्वजनिक जमिनी शोधून काढून त्या उपलब्ध करणे, प्रकल्प उभारणीसाठी निविदा (टेंडर्स) काढणे, आराखडे निश्चित करणे, वाढीव ऊर्जा निर्मीती निर्माण होतानाच आधीच्या अस्तित्वात असलेल्या वीज जाळ्यात सुधारणा करणे वगैरे आव्हाने असतात. प्रकल्पासाठी जमिनी उपलब्ध करण्यासाठी महसूल खात्याची मदत घ्यावी लागते. राज्याचा ऊर्जा विभाग आणि महावितरण हे धोरण निश्चिती आणि अंमलबजावणी यासाठी समन्वयाने काम करीत असतात. शेतकऱ्यांना कायमस्वरूपी आणि हक्काची सिंचन सुविधा अशा प्रकल्पातून उपलब्ध होते. एकदा सौर पंप बसवला की सौर पॅनल मधून २५ वर्षे अखंड वीजपुरवठा होतो. आगामी काही वर्षात राज्यातील शेतीच्या सिंचनासाठी संपूर्णपणे सौर ऊर्जा वापरता येऊ शकते. स्वयंपूर्णेतेच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल ही एक अभिमानाची बाब आहे. या संपूर्ण प्रक्रियेत महावितरण चा सहभाग आणि योगदान फार मोलाचं आहे.

 


वीजग्राहकांचा प्रतिसाद महत्वाचा.

'सर्व गोष्टीं शासनानेच कराव्या' अशी आम्हा नागरिकांची धारणा असते. शासन असो किंवा महावितरण हे त्यांच्या परीने कार्यरत असतातच, तथापि सजग नागरिक म्हणून आपलेही योगदान विकासगंगेत द्यायला हवे. राज्यसरकारच्या आणि महावितरणच्या ह्या अक्षय सौरऊर्जा निर्माण करण्याच्या प्रयत्नांना वीज ग्राहकांनी देखील सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा. सुरवातीला सौर पॅनल्स बसवताना येणाऱ्या खर्चाला वीज ग्राहक बिचकतात. त्यांना हा खर्च जास्तीचा वाटतो. पण एकदा सौर यंत्रणा बसवल्यावर वीजबिलातल्या बचतीचा विचार केल्यास हा सुरवातीला केलेला खर्च तीनचार वर्षातच भरून निघतो. त्यानंतर पुढील पंचवीस वर्षे फुकट वीज मिळत राहते. शिवाय सौरयंत्रणा पूर्णपणे देखभाल विरहित असतात. (फक्त ही बसवलेली सौर ऊर्जा पॅनेल्स ठराविक काळानंतर स्वच्छ करावी लागतात. अन्यथा अस्वच्छ पॅनेल्स मधून वीज निर्मिती कमी प्रमाणात होऊन त्याचा थेट परिणाम वीजबिलावर होतो.) साधारणपणे नऊ ते दहा स्क्वेअर मीटर आकाराच्या उघड्या जागेत किंवा छतावर एक किलोवॅट साठी सोलर पॅनल बसवता येतात. त्यामुळे घरावरील पत्रे, कौले, गच्चीवर, तसेच कारखान्यांच्या शेडवर रूफ टॉप सोलर पॅनल बसवून प्रत्येक ग्राहकाने आपली स्वतःची वीज निर्मिती करणे आवश्यक आहे. उंच इमारतीतील सामायिक वापरासाठी लागणारी वीज जसे लिफ्ट, वॉटर पंप्स, जिना आणि पार्किंग मधील दिवे यासाठी सौर ऊर्जा वापरून सामायिक वीज बिल कमी करता येते, आणि त्यासाठी येणारा दार डोई खर्चही विभागला जाऊ शकतो.

महावितरण किंवा इतरही अस्तित्वात असलेल्या वितरण कंपन्यांमार्फत रूफ टॉप सौर यंत्रणा बसवून घेण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि पारदर्शक करण्यात आलेली आहे. मात्र या वितरण कंपन्यांनी निश्चित केलेल्या मान्यताप्राप्त एजन्सी मार्फतच वीज ग्राहकाला हे काम करून घ्यावे लागते. सौर यंत्रणा बसवून घेण्यासाठी दोन वेगवेगळ्या वेबसाईट्स ची मदत घ्यावी लागते. www.pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर वीजग्राहकाला अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो, आणि www.mahadiscom.in ह्या साईटवरून नेट मीटरिंग साठी अर्जाची पूर्तता करावी लागते. अर्थात वितरण कंपन्यांच्या मान्यताप्राप्त एजन्सीज हे काम सुलभ पद्धतीने करू शकतात.          

शासनाच्या ह्या सौर ऊर्जेच्या योजनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (MSEDCL) मोठा पुढाकार घेतला आहे. मोफत सूर्यघर योजना वीज ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये डिजिटल सौर रथाच्या माध्यमातून हजारो वीजग्राहकां बरोबर महावितरण थेट संवाद साधत आहे. डिजिटल स्क्रिनचा वापर, योजनांचे सादरीकरण माहितीपत्रकांद्वारे या निरनिराळ्या शासकीय सौर योजनांची माहिती देण्यात येत आहे. या योजनांचा मोठ्याप्रमाणात जागर करण्यासाठी महावितरण आणि महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (MASMA) यांच्या सहकार्याने मोठे भरीव काम करत आहे. यासाठी पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री राजेंद्रजी पवार, उपकार्यकारी अभियंता श्री. संतोष पटनी त्यांचे सहकारी विशेष परिश्रम घेत आहेत. पुणे शहरातील अनेक भागातल्या सोसायट्या, अपार्टमेंट्समधील नागरिकांशी महावितरणचे कर्मचारी आणि जनमित्रांद्वारे देखील संवाद साधण्यात येत आहे. महावितरणच्या या प्रयत्नांना वीजग्राहकांनी, विशेषतः सोसायटयांनीं प्रतिसाद दिला पाहिजे.

 

नागरिकांच्या सहकार्या शिवाय राज्य सरकार असो किंवा महावितरण असो या यंत्रणा सक्षमपणे पूर्ण ताकदीने काम करू शकत नाहीत, हे आपण लक्षात घ्यायला हवे. थोडक्यात लोकसहभागा शिवाय कोणताही विकास कधीच होत नसतो. त्यामुळे वीजग्राहकांनी देखील आपापल्या छतावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जा निर्मण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे स्वतःच्या विकासाबरोबर देशाचाही विकास साधता येईल.  

  • ·       सोलर ऊर्जा, नेट मीटरिंग च्या अधिक माहितीसाठी एम..आर.सी. च्या किंवा महावितरणच्या वेब-साईटला भेट द्या.

 

राजीव जतकर.

 विद्युत सुरक्षा मंच-पुणे.

१७ फेब्रुवारी २०२५

Friday, 14 February 2025

‘ब्लॅक वॉरंट’

‘ब्लॅक वॉरंट’

 ऐंशीच्या दशकातील तिहार जेल मधील थरारक तुरुंगकथा

 

शिवराजसिंग मांगट, विपीन दहिया, सुनील गुप्ता, डि.एस.पी. 'तोमर'


पाच सहा महिन्यांपूर्वी लेखक ऍड. रवींद्रनाथ पाटील यांचे तुरुंगरंग नावाचे पुस्तक वाचनात आले. भूतपूर्व आयपीएस अधिकारी असलेले श्री रवींद्रनाथ पाटील यांनी पुण्यातील येरवडा तुरुंगातील १४ महिन्यांच्या वास्तव्यातील त्यांचे भयंकर अनुभव या पुस्तकात लिहिलेले आहेत. पाच सहा महिन्यांपूर्वी वाचलेल्या ह्या पुस्तकाचा माझ्या मनावर झालेला परिणाम अजूनही मला जाणवतो आहे, तेवढ्यात काल परवाच नेटफ्लिक्स वरील नुकतीच प्रदर्शित झालेली 'ब्लॅक वॉरंट' नावाची वेब सिरीज माझ्या पाहण्यात आली आणि मी पुन्हा तुरुंगाच्या थरारक विश्वात ओढला गेलो. फरक एवढाच की रवींद्रनाथ पाटलांच्या तुरुंगरंग मध्ये लेखकाचे 'येरवडा' जेल मधील अनुभवांचे अंगावर येणारे वर्णन आहे, तर 'ब्लॅक वॉरंट' या वेब सिरीज मध्ये दिल्ली स्थित तिहार तुरुंगातील ऐंशीच्या दशकातील घडलेल्या अनेक महत्वाच्या घटनांची साखळी आहे. ऐंशीच्या दशकात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तिहार तुरुंगातील अनेक बारकावे, तुरुंगातील गुपिते, तुरुंगव्यवस्था प्रेक्षकांच्या समोर आकर्षकपणे मांडलेले आहेत. पुस्तक आणि वेब सिरीज ह्या दोन्हीही माध्यमांतुन तुरुंगाचे अंतरंग जाणून घेणे हा वेगळा वेगळा  अनुभव आहे. एकूणच तुम्हाला तिहार तुरूंगाबाद्द्ल जाणून घ्यायचं असेल तर नेटफ्लिक्स वरील 'ब्लॅक वॉरंट' ही मालिका बघावीच लागेल.

 

काय असते ब्लॅक वॉरंट?

ही सिरीज बघताना मला या मालिकेच्या 'ब्लॅक वॉरंट' या नावाचा काही अर्थबोध होत नव्हता. मुळात कोर्ट कचेऱ्या, वकील, न्यायालये वगैरे गोष्टीबद्दल आपल्या सारखे सर्वसामान्य लोक अनभिज्ञच असतात. किंबहुना आपण या सर्व गोष्टींपासून जरा लांबच असतो. क्वचित कधीतरी वॉरंट, बेलेबल वॉरंट, नॉन-बेलेबल वॉरंट, पॅरोलवर सुटका वगैरे शब्द आपल्या कानी पडतात. मग हे 'ब्लॅक वॉरंट' नेमकी काय भानगड आहे? हे सुरवातीला समजून घेतले. ज्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झालेली आहे, आणि फाशीच्या शिक्षेतील या दोषी गुन्हेगाराचे दया याचिकेसहीत सर्व पर्याय संपलेले आहेत अशा गुन्हेगारांसाठी 'ब्लॅक वॉरंट' किंवा 'डेथ वॉरंट' काढले जाते. या 'ब्लॅक वॉरंट' जारी करण्याआधी भारतीय घटनेनुसार राष्ट्रपती आणि राज्यपालांकडे हा गुन्हेगार दयेची याचना अर्ज करू शकतो. जर या गुन्हेगाराचा दयेचा अर्ज फेटाळला गेला तर न्यायालय अंतिम आदेश म्हणजेच 'ब्लॅक वॉरंट' जारी करते. या 'ब्लॅक वॉरंट' मध्ये गुन्हेगाराचे नाव, केस क्रमांक, फाशीची तारीख, फाशीची वेळ, ठिकाण वगैरे तपशील नमूद केलेला असतो. या मध्ये आरोपीला मरेपर्यंत फासावर लटकवले जावे आणि या फाशीची अंमलबजावणी झाल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र न्यायालयात सादर करावे असा काहीसा मजकूर असतो. या मजकुराच्या खाली न्यायालयाचा शिक्का आणि वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशाची सही असते. ही सही केल्यावर ज्या फाउंटन पेनाने सही केलेली असते त्या फाउंटन पेनाचे निब हे न्यायाधीश तिथेच कागदावर मोडून टाकतात, अशी पूर्वापार पद्धत आहे. न्यायाधीशाने अत्यंत जड अंतःकरणाने हे ब्लॅक वॉरंट जारी केले आहे असा प्रतीकात्मक अर्थ या निब मोडण्याच्या प्रक्रियेतून दाखवला जातो. शिवाय एकदा पेनाची निब तुटली की ते पेन पुन्हा लिहिण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही, किंवा जाऊ नये असे प्रतीत केले जाते. हे मृत्युदंडाच्या अंतिमतेचे आणि निर्णय पुन्हा न बदलता येण्याचे प्रतीक असते. तसेच यामुळे न्यायाधीशावरचे एखाद्याच्या मृत्यूचे भावनिक ओझे अधोरेखित होते. मात्र आजकाल डिजिटलायझेशनच्या जमान्यात ही निब मोडण्याची प्रथा बंद होत चालली आहे असे समजले. कारण ब्लॅक वॉरंट संगणकावर ड्राफ्ट होऊन त्यावर न्यायाधीश डिजिटल पद्धतीने सही करतात. त्यामुळे आता पेनाचा वापरच होत नाही. असो...

 


 अशा या वेगळ्याच विषयावरची मालिका दिल्लीच्या तिहार तुरुंगातील माजी जेलर 'सुनील गुप्ता' आणि पत्रकार 'सुनेत्रा चौधरी' यांनी लिहिलेल्या ‘ब्लॅक वॉरंट: कन्फेशन ऑफ तिहार जेलर' या पुस्तकावर आधारित आहे (मी अजून हे पुस्तक वाचलेलं नाही). सुनील गुप्ता हे १९८० च्या दशकात तिहार तुरुंगाचे जेलर होते. त्या काळातल्या तिहारच्या अंतरंगात घडणाऱ्या घटना, कैद्यांची गॅंगवॉर्स, कैद्यांची अत्यंत क्रूर, घृणास्पद गुन्हा करण्यामागची मानसिकता यावर ही मालिका बेधडकपणे भाष्य करते. ही मालिका सात भागांचीच आहे. सुरवातीच्या एकदोन भागात कथेचे प्रास्ताविक होते. आपली आणि मालिकेतील पात्रांची ओळख होते. मात्र त्यानंतर एका भयंकर अनुभवातून जात आपण सुनील गुप्तांबरोबर तिहारमय होऊन जातो. आपण तुरुंगाचाच एक भाग होऊन जातो. ब्लॅक वॉरंट च्या कथेला तत्कालीन घटनांची जोड असल्यामुळे ही मालिका आपलं वेगळेपण जपते. तुरुंगातील अधिकाऱ्यांना कायद्यांमुळे कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं याचंही या मालिकेत चित्रण आहे. ऐंशीच्या दशकात तिहार जेल मध्ये तेंव्हा जातीधर्मावर आधारलेल्या कैद्यांच्या तीन वेगवेगळ्या टोळ्या सक्रिय होत्या. अनेक काळे धंदे राजेरोसपणे सुरु होते. अशा ह्या आशियातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या तिहार तुरुंगातील अंतरंगात डोकावण्याची संधी आपल्याला मिळते. 'तुरुंगातील सगळेच कैदी गुन्हेगार नसतात' याचे भान प्रेक्षकांना येते. तुरुंगात असे गुन्हेगार नसलेले किंवा निरपराधीत्व सिद्ध न झाल्यामुळे वर्षानुवर्षे तुरुंगात खितपत पडलेले कैदी असतात. तुरुंगात ना कुणी त्यांचं ऐकून घेणारं असतं, ना कुणी त्यांच्याशी दोन शब्द बोलणारं असतं. ब्लॅक वॉरंट ही मालिका बघितल्यावर आपला तुरुंगातील कैद्यांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो.

 

विपीन दहिया, शिवराजसिंग मांगट आणि सुनील गुप्ता

या मालिकेची सुरवात तिहार जेलमधील जेलरच्या पदासाठी सुनील गुप्तांच्या (जहान कपूर) इंटरव्हयूने होते. सुनील गुप्ता हे अतिशय अबोल, संस्कारी, हळव्या मनाचे आणि अतिशय प्रामाणिक असतात. त्यांची शरीरयष्टी देखील यथातथाच असते. तिहारच्या गुन्हेगारांच्या वातावरणात ते कितपत टिकतील? अशी शंका त्यांचा  इंटरव्हयू घेणाऱ्या अधिकाऱ्यांना येते. ते इंटरव्हयू दरम्यान सुनील गुप्तांना तसे बोलूनही दाखवतात. पुढे जेलरच्या नोकरीत रुजू झाल्यावर सुनील गुप्ता त्यांचे वरिष्ठ अधिकारी डि.एस.पी. 'तोमर' (राहुल भट) यांच्याकडून तिहार तुरुंगातील बारकावे समजून घेतात. सुनील गुप्तांच्या बरोबर तुरुंगात रुजू झालेले त्यांचे सहकारी जेलर शिवराजसिंग मांगट (परमवीरसिंग चिमा) आणि विपीन दहिया (अनुराग ठाकूर) हे देखील तुरुंगातील वातावरणाला सरावतात. सुनील गुप्ता, डि.एस.पी. तोमर, शिवराजसिंग मांगट आणि विपीन दहिया हे चौघेही भिन्न स्वभावाचे असतात. प्रत्येकाची अशी एक कौटुंबिक कहाणी आहे. तुरुंगातील नोकरीतील अडचणींबरोबर घरगुती समस्या देखील त्यांच्या अडचणीत भर टाकत असतात. मुळात ह्या मालिकेला कथानक असं नाहीये. तुरुंगातील घटनांच्या साखळीत आपण पार गुंतत जातो. ऐंशीच्या दशकात जेंव्हा सुनील गुप्ता तिहार मध्ये कार्यरत होते तेंव्हा कुप्रसिद्ध 'रंगा-बिल्ला' या गुन्हेगारांना फाशी झाली होती. या रंगा-बिल्ला फाशी च्या घटनेचा थरारक अनुभव आपल्याला घेता येतो. फाशीवर जाणाऱ्या गुन्हेगारांची मानसिक स्थिती काय होत असेल? हे पाहताना आपला थरकाप होतो. याच काळात म्हणजे ११ फेब्रुवारी १९८४ रोजी कुप्रसिद्ध काश्मिरी नेता 'मकबूल भट' याला देखील तिहार मध्ये फाशी देण्यात आले. ह्या घटनेच्या वेळी देखील तिहार मध्ये काय घडले होते याचे थरारक प्रसंग अंगावर येतात. सुनील गुप्तांनी या हाय प्रोफाइल कैद्याबद्दल आपल्या भावना प्रामाणिकपणे त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवल्या आहेत. याच दशकात झालेल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या देखील तिहार मध्ये खळबळ उडवून देते. पुढे सुनील गुप्ता मवाळ स्वभाव सोडून धाकड होतात का? हे या मालिकेत बघावे लागेल. शाररिक आणि मानसिक घुसमट करणाऱ्या 'तिहार' जेलच्या वातावरणात संस्कारी आणि हळव्या मनाच्या सुनील गुप्तांचा कसा निभाव लागतो? याची अंगावर शहारा आणणारी कहाणी म्हणजे ही मालिका 'ब्लॅक वॉरंट'! 

 

जहान कपूर

ही वेब सिरीज बघताना जेलर सुनील गुप्तांची भूमिका करणाऱ्या 'जहान कपूर' या अभिनेत्याकडे माझं वारंवार लक्ष वेधले जात होते. त्याच्याकडे बघताना मला सारखा 'शशी कपूरचा भास होत होता. ही मालिका बघून झाल्यावर जहान कपूरची माहिती मिळवली आणि समजले की हा जहान कपूर शशी कपूरचा नातू आहे. शशी कपूरचा मुलगा कुणाल कपूर आणि त्याची बायको शीना सिप्पी (शोले फेम रमेश सिप्पी ची मुलगी) यांचा जहान कपूर हा मुलगा! त्याने आपली अभिनयाची कारकीर्द थिएटर च्या माध्यमातून सुरु केली. हंसल मेहेताच्या 'फराज' चित्रपटातून त्याला ब्रेक मिळाला. 'ब्लॅक वॉरंट' या मालिकेतील मध्यवर्ती भूमिकेत त्याला पहिल्यांदाच एवढी मोठी भूमिका मिळाली आहे. जहान ने त्याला मिळालेल्या संधीच अक्षरशः सोनं केलंय. त्याने या मिळालेल्या भूमिकेचा गाभा न सोडता संयत अभिनयाचं दर्शन दाखवलंय. चार्ल्स शोभराज च्या भूमिकेतील 'सिद्धांत गुप्ता', शिवराजसिंग मांगट आणि विपीन दहिया यांच्या भूमिका करणारे  अनुक्रमे 'परमवीरसिंग चिमा' आणि 'अनुराग ठाकूर' यांनी आपापल्या भूमिका चोख केल्या आहेत. डि एस पी तोमर च्या भूमिकेतील 'राहुल भट' हा अभिनेता देखील दाखल घेण्यासारखा! तोमरचा टोन अचूक पकडत सर्वांवर धाक दाखवणारा अधिकारी राहुल भट ने मस्त रंगवलाय. 'गौरव कालूष्टे' या मराठी अभिनेत्याचा इथं आवर्जून उल्लेख करायला हवा. सध्या झी५ वरील 'शिवा' नावाच्या मराठी सिरीयल मध्ये तो काम करतोय. नुकताच त्याचा  'इलू इलू' हा चित्रपट प्रदर्शित झालाय. इतरही अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स मध्ये तो काम करतोय. हिंदी अभिनेत्यांच्या भाऊगर्दीत पुढे येणारे मराठी अभिनेते पहिले की कसं छान वाटतं... 

 

गौरव कालूष्टे

पुस्तकावर आधारित फार कमी कलाकृती असतात, ज्या लेखकाच्या शब्दांना योग्य तो न्याय देतात. ब्लॅक वॉरंट च्या दिग्दर्शकाने (विक्रमादित्य मोटवानी) पटकथाकाराने, संगीतकाराने, अभिनय करणाऱ्या अभिनेत्यांनी सुनील गुप्ता यांच्या पुस्तकातील शब्दांना, भावनांना, विचारांना योग्य न्याय दिलाय असे म्हणावे लागते. ही वेब सिरीज बघताना मनात विचार आला की, 'ब्लॅक वॉरंट: कन्फेशन ऑफ तिहार जेलर' या पुस्तका इतकेच प्रभावी लिखाण असलेल्या ‘तुरुंगरंग’ या मराठी पुस्तकावरून देखील एखादी छान, सशक्त अशी मराठी मालिका का बनू नये? सर्जनशील चित्रपट किंवा वेब सिरीज निर्माते, पटकथा लेखक, दिग्दर्शक यांचे लक्ष प्रयत्नपूर्वक 'तुरुंगरंग' या पुस्तकाकडे वेधायला हवे. 

 

राजीव जतकर

११ फेब्रुवारी २०२५.  


Wednesday, 1 January 2025

'कटहल' (छोटी कथा-बडा धमाका)

 

'कटहल'

(छोटी कथा-बडा धमाका)

 

'कटहल' बोले तो 'फणस '

कोणत्याही चित्रपट निर्मितीमध्ये कथेचं महत्व अनन्यसाधारण असतं. वेगवेगळ्या विषयावरील कथा हुडकून किंवा रचून त्या चित्रपटाच्या माध्यमातून सादर केल्या जातात. कथेमध्ये नाट्यपूर्ण घटना असणे, कथेचा शेवट अनपेक्षित वळणाने होणे, अशा गोष्टींनी कथा, आणि त्या कथेवर आधारित असलेला चित्रपट प्रेक्षणीय करणे वगैरे, हे कथाकार, दिग्दर्शक वगैरे मंडळी करत असतात. चित्रपटासाठी कथा जशीच्या तशी चित्रित करता येत नाही, त्यासाठी कथेला अनुसरून पटकथा तयार करावी लागते. काही कथा खूप छोट्या असतात. अशा लघुकथांवरून चित्रपट तयार करताना त्यात बरीच भर घालावी लागते. बऱ्याच वेळेला काही उपकथानकांची देखील जोड ह्या चित्रपटाच्या मूळ कथेला बेमालूमपणे द्यावी लागते. त्यामुळे पुष्कळदा मूळ कथेचा लेखक आणि पटकथा लेखक वेगवेगळे असतात. त्या व्यतिरिक्त  पटकथा तयार होताना कथेला अनुसरून संवादलेखन आणि गाण्यांची पेरणी करून चित्रपटाला उठाव दिला जातो. संवादलेखक आणि गीतकार हे देखील वेगळे असतात. मात्र काही प्रतिभावान लेखक कथा, पटकथा, संवाद, एवढेच काय पण गीत लेखक म्हणून देखील भूमिका लिलया निभावताना दिसतात. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणून ग.दि. माडगूळकर ह्यांचे नाव घेता येईल. सुमारे सत्तर ऐंशी चित्रपटांसाठी त्यांनी अशा प्रकारचे चौफेर लेखन केलं आहे. दादा कोंडके हे देखील असेच हरहुन्नरी, चौफेर कलाकार होते.

 

पत्रकाराच्या भूमिकेत 'राजपाल यादव'

मला कथाकारांमध्ये असलेली आश्चर्यकारक प्रतिभा नेहेमीच थक्क करत आलेली आहे. कथा म्हणजे अनेक घटनांची मालिका असते. छोट्या कथेतील घटनांची मालिका बऱ्याच वेळी आपण वन लायनर पद्धतीने सांगू शकतो. पण अशा संक्षिप्त स्वरूपातील कथा अगदीच कंटाळवाणी होऊ शकते. पूर्ण लांबीचा चित्रपट करताना अश्या वेगळ्या लघु कथा किंवा वन लायनर कथा अनेक पद्धतीने फुलवाव्या लागतात. कथेच्या अनुषंगाने कथेमध्ये काही इतरही पात्रांची रचना केली जाते. मग या पात्रांची स्वभाव वैशिष्ठ्ये, या पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण होणारे संघर्ष, भोवतालचे सामाजिक वातावरण दाखवत कथा करमणूकप्रधान केली जाते. कधी ही कथा विनोदी पद्धतीने, कधी रहस्यमय अंगाने,तर कधी कधी प्रेक्षकांच्या भावनेला हात घालत सादर केली जाते. कथेत सतत 'पुढे काय होणार? अशी चित्रपट रसिकांना उत्कंठा वाटायला लावताना लेखकाचे कौशल्य पणाला लागते. चित्रपट निर्मितीतून कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे खूपच कठीण काम असते. पण हे काम कथाकार, दिग्दर्शक मंडळी सहजपणे करत असतात.

 


मुळात कथाकारांना वेगवेगळ्या विषयांवरच्या कथा सुचतातच कशा? ह्याचं मला नेहेमीच आश्चर्य वाटत आलंय. काही मजेशीर कथांचे उदाहरण इथे देता येईल. कथालेखक 'शंतनू श्रीवास्तव', पटकथा आणि संवाद लेखक 'अक्षत घलडियाल' यांचा 'बधाई हो' हा चित्रपट कुटुंबातील मध्यमवयीन व्यक्तीच्या लैंगिक जीवनावर उघडपणे भाष्य करतो. या कुटुंबातील पन्नाशीतील जोडप्याच्या जीवनात 'गुड न्यूज' येते आणि या कुटुंबाचे विश्वच बदलून जाते. एरवी गुड न्यूज म्हणलं की कुटुंबात चैतन्याने बाहेरून येणं अपेक्षित असते, पण पन्नाशीतील आई गरोदर राहिल्यामुळे संपूर्ण कुटुंब अतिशय लाजिरवाण्या परिस्थितीत येऊन ठेपते. खरं तर ह्या चित्रपटाचा विषय मध्यमवर्गीय कुटुंबाची भावनिक आणि सामाजिक गळचेपी मांडणारा आणि गंभीर आहे. पण ह्या कुटुंबाची ह्या गुडन्यूज मुळे झालेली लाजिरवाणी परिस्थिती विनोदी पद्धतीने मांडण्यात आली आहे. भारतीय समाजात लैंगिक संबंध किंवा प्रेमभावना या बद्दल खुलेपणाने चर्चा होत नाही. त्यातच जास्ती वयाच्या दाम्पत्यांनी प्रेम करणे असभ्यपणाचे मानले जाते. आईला देवासमान मानणारा आपला समाज हे विसरून जातो की, पन्नाशीतली आपली आई ही देखील एक स्त्री आहे. तिला देखील भावना आहेत. 'पन्नाशीतील आई वडिलांनी मूल जन्माला घालणे ह्यात शरमेची बाब मुळीच नाही' हा विचार चित्रपटाच्या कथाकाराने, पट्कथाकाराने, संवाद लेखकाने खूप ताकदीने मांडला आहे. अतिशय सध्या, छोट्या कथेची मांडणी या चित्रपटाच्या सर्वच कलाकारांनी अप्रतिमपणे सादर केली आहे. हा गंभीर विषयावरचा  हलक्याफुलक्या विनोदी पद्धतीने चित्रित केलेला चित्रपट पाहण्यासारखा आहे.  

 

चोरीला गेलेल्या फणसाच्या झाडाकडे बघणारा आमदार व त्याचे कुटुंबीय 

छोटी कथा, त्यात बेमालूमपणे विरघळणाऱ्या उपकथा, खुसखुशीत संवाद लेखन यांच्या अप्रतिम मिश्रणातून तयार झालेला 'लापता लेडीज' या चित्रपटाचं उदाहरण देखील या निमित्तानं देता येईल. या चित्रपटाची कथा देखील दोनचार ओळीत सांगण्यासारखी आहे. नुकताच लग्न झालेला नवरदेव आपल्या रिवाजाप्रमाणे डोक्यावरून पदर घेतलेल्या बायकोला घेऊन गावाकडच्या घरी येतो. येताना रेल्वे प्रवासादरम्यान दोन घुंघट घेतलेल्या नववधूची अदलाबदली होते. गावाकडील कुटुंबातील सर्वजण आनंदित असतात. पण आपण जीला बायको म्हणून घरी आणलाय ती आपली बायकोच नाही, वेगळीच कुणीतरी आहे, असं जेंव्हा या नवरोबाला कळतं तेंव्हा एकच गोंधळ उडतो. पुढे या धमाल कथेत एखाद दुसरे उपकथानक मिसळून एक धमाल आणि आश्चर्यकारक चित्रपट आपल्याला पाहायला मिळतो. संवादातून हा चित्रपट आपल्याला खळखळून हसवतो तर काही प्रसंगी आपल्या डोळ्याच्या कडा देखील पाणावतात. अशा उत्तम कथांनी सजलेल्या अनेक चित्रपटांची इथं मोठी यादीच देता येईल. टॉम हंक चा  'बिग' नावाचा इंग्रजी चित्रपट देखील अशाच अफाट कथेचा! कथा खूपच छोटी! लहानपणाला कंटाळलेल्या छोट्या 'जॉश' ला मोठं व्हायचं असतं आणि एकदा चमत्कार घडतो आणि तो चक्क मोठा होतो. मग पुढे घडणाऱ्या गंमतीजमतींवर आधारित हा चित्रपट अनेक वळणे घेत पुढे जातो. बिग हा चित्रपट १९८८ साली प्रदर्शित झाला होता. गॅरी रॉस आणि ऍना स्पीलबर्ग या द्वयीने बिग ची कथा लिहिली होती. केवळ १८ दशलक्ष डॉलर्स इतक्या उत्पादनखर्चात तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरातून तब्बल १५० दशलक्ष डॉलर्स ची कमाई केली होती. सध्या, सोप्या आणि एका वाक्यात सांगता येण्यासारख्या कथेचे मराठी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम उदाहरण म्हणजे सुमित्रा भावे आणि सुनील सुखटणकर यांचा 'एक कप च्या' हा अप्रतिम चित्रपट! चित्रपटाची कथा सांगायची झाली तर खेडेगावातील एका गरीब कुटुंबाला अचानक एकदा ७३ हजार रुपयांचे वीजबिल येते आणि ते संपूर्ण कुटुंब अक्षरशः कोलमडून पडते. मग या प्रचंड आलेल्या या वीजबिलाच्या तक्रारीवर न्याय मिळवण्यासाठी या कुटुंबाला काय काय अडचणी येतात याचं सुरेख आणि वास्तवदर्शी चित्रण या चित्रपटात केलं गेलंय. छोट्या कथेच्या माध्यमातून करमणुकीबरोबरच समाजातील भ्रष्टाचार आणि कायद्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं महत्वाचं काम हा चित्रपट करतो.

 

पोलीस इन्स्पेक्टर महिमा आणि तिचे सहकारी. 

 'कटहल' नावाचा अश्याच छोट्या कथेचा एक सुंदर चित्रपट नुकताच माझ्या पाहण्यात आला. कथा दोनतीन ओळीत सांगण्यासारखी, पण हा चित्रपट सुमारे दोन तास आपले मस्त मनोरंजन करतो. 'कटहल' म्हणजे फणस. तर होतं असं की उत्तरप्रदेशातील मोबा नावाच्या गावातील एका आमदाराच्या बंगल्यातल्या झाडावरून दोन भले मोठे फणस चोरीला जातात. ते शोधण्यासाठी हा आमदार पोलीस ठाण्यात फणसाच्या चोरीची तक्रार नोंदवतो. पोलिसांकडून होणाऱ्या या चोरीला गेलेल्या फणसाच्या शोधकार्याची धमाल या चित्रपटात अतिशय मनोरंजक पद्धतीने मांडली आहे. या आमदाराच्या घरी एकदा त्याच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते जेवायला आलेले असतात. जेवताना आमदाराच्या बायकोने वाढलेले फणसाचे लोणचे त्यांना फारच आवडते. वरिष्ठ या फणसाच्या लोणच्याची मागणी करून लोणचे पाठवले तर आमदाराला बढती देण्याचे आणि महत्वाच्या खात्याचा मंत्री बनवण्याचे आश्वासन देतात. ह्या घटनेनंतर आमदाराच्या बंगल्यातल्या झाडावरचे दोन फणस चोरीला जातात. मोठ्या आणि महत्वाच्या खात्याचा मंत्री होण्याच्या या आमदाराच्या महत्वाकांक्षेला खीळ बसते. मग आमदार पोलीस चौकीत जाऊन एफआयआर दाखल करून पोलीस यंत्रणेला कमला लावतात. आता हे चोरीला गेलेले दोन फणस हुडकायचे कसे? असा प्रश्न पोलिसांना पडतो. राजकीय दबावामुळे पोलिसही बिचारे तपासाच्या कामाला लागतात. पोलिसांच्या फणसाच्या तपासकार्याच्या कथेत एक ट्विस्ट येतो. गावातली एक गरीब मुलगी बेपत्ता असल्याचं समोर येतं. 'फणसाची चोरी कुणी केली असावी?' या गोंधळात पडलेली पोलीस इन्स्पेक्टर महिमा (सान्या मल्होत्रा) फणसाच्या चोरीचा संबंध या बेपत्ता मुलीशी असावा अश्या विचाराने पुढचा तपास सुरु ठेवते. पुढे फणसाची चोरी सापडते का? हे समजण्यासाठी चित्रपट बघण्यात मजा आहे.

 

पोलीस इन्स्पेक्टर महिमा आणि तिचे सहकारी. 

 'अशोक मिश्रा' यांच्या कथेवरील हा चित्रपट अतिशय हलक्याफुलक्या आणि विनोदी पद्धतीने चित्रित करण्यात आलाय. कटहल हा चित्रपट छोटी गोष्ट मनोरंजक पद्धतीने सांगताना समाजातील जातिव्यवस्थेवर भाष्य करतो. आमदाराच्या घराच्या फणसाच्या चोरीची गंभीरपणे दखल घेणारे पोलीस खाते एका गरीब बेपत्ता झालेल्या मुलीच्या बापाच्या तक्रारींकडे मात्र दुर्लक्ष करते, या सामाजिक वास्तवाकडे हा चित्रपट लक्ष वेधून घेतो. सुमारे दोन तासांचा हा चित्रपट आपल्याला शेवटपर्यंत कथेत गुंतवून ठेवतो. पोलीस इन्स्पेक्टर महिमा ची भूमिका साकारणाऱ्या 'सान्या मल्होत्रा'ने तीचं काम समरसून केलंय. तिने चित्रपटासाठी घेतलेली मेहेनत चित्रपट बघताना जाणवते. विजयराज ह्या जबरदस्त अभिनेत्याची आमदाराची भूमिका खूपच दमदार आहे. राजपाल यादव ने साकारलेला पत्रकार चित्रपटात धमाल उडवून देतो. अनंत जोशी, विजेंद्र काला, रघुवीर यादव हे अनुभवी अभिनेते चित्रपट मनोरंजक करण्यात मोठा हातभार लावतात.  कटहलच्या छोट्या कथेचं सोनं करण्यात दिग्दर्शक 'यशोवर्धन मिश्रा' कमालीचे यशस्वी झालेले आहेत. त्यांनी विनोदाच्या माध्यमातून सामाजिक व्यवस्थेवर उपहासात्मक भाष्य केलंय.  मुलींना समाजात मिळणारं दुय्यम स्थान, जातीय विषमता, मुलापेक्षा मुल्गी मोठ्या पदावर असल्यास त्यांच्या लग्नाला घरच्यांचा असलेला विरोध अशा अनेक विषयांना कथेच्या ओघात न कळत हात घातला जातो. चित्रपटाचा शेवट अपेक्षित असला तरी चित्रपटाचं सादरीकरण अफाट आहे. हा उत्तम चित्रपट तयार होताना अर्थातच काही त्रुटी राहिलेल्या आहेत. तथापि एका छोट्या कथेची गंमत अनुभवायची असेल तर त्रुटींकडे दुर्ल्क्षच करायला हवं. संपूर्ण कुटुंबासोबत एखाद्या विकेंडला आरामात बसून बघण्यासारखा हा चित्रपट एन्जॉय करायला हरकत नाही.

हा चित्रपट नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे.


राजीव जतकर.

१ जानेवारी २०२५.