Friday, 14 February 2025

‘ब्लॅक वॉरंट’

‘ब्लॅक वॉरंट’

 ऐंशीच्या दशकातील तिहार जेल मधील थरारक तुरुंगकथा

 

शिवराजसिंग मांगट, विपीन दहिया, सुनील गुप्ता, डि.एस.पी. 'तोमर'


पाच सहा महिन्यांपूर्वी लेखक ऍड. रवींद्रनाथ पाटील यांचे तुरुंगरंग नावाचे पुस्तक वाचनात आले. भूतपूर्व आयपीएस अधिकारी असलेले श्री रवींद्रनाथ पाटील यांनी पुण्यातील येरवडा तुरुंगातील १४ महिन्यांच्या वास्तव्यातील त्यांचे भयंकर अनुभव या पुस्तकात लिहिलेले आहेत. पाच सहा महिन्यांपूर्वी वाचलेल्या ह्या पुस्तकाचा माझ्या मनावर झालेला परिणाम अजूनही मला जाणवतो आहे, तेवढ्यात काल परवाच नेटफ्लिक्स वरील नुकतीच प्रदर्शित झालेली 'ब्लॅक वॉरंट' नावाची वेब सिरीज माझ्या पाहण्यात आली आणि मी पुन्हा तुरुंगाच्या थरारक विश्वात ओढला गेलो. फरक एवढाच की रवींद्रनाथ पाटलांच्या तुरुंगरंग मध्ये लेखकाचे 'येरवडा' जेल मधील अनुभवांचे अंगावर येणारे वर्णन आहे, तर 'ब्लॅक वॉरंट' या वेब सिरीज मध्ये दिल्ली स्थित तिहार तुरुंगातील ऐंशीच्या दशकातील घडलेल्या अनेक महत्वाच्या घटनांची साखळी आहे. ऐंशीच्या दशकात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तिहार तुरुंगातील अनेक बारकावे, तुरुंगातील गुपिते, तुरुंगव्यवस्था प्रेक्षकांच्या समोर आकर्षकपणे मांडलेले आहेत. पुस्तक आणि वेब सिरीज ह्या दोन्हीही माध्यमांतुन तुरुंगाचे अंतरंग जाणून घेणे हा वेगळा वेगळा  अनुभव आहे. एकूणच तुम्हाला तिहार तुरूंगाबाद्द्ल जाणून घ्यायचं असेल तर नेटफ्लिक्स वरील 'ब्लॅक वॉरंट' ही मालिका बघावीच लागेल.

 

काय असते ब्लॅक वॉरंट?

ही सिरीज बघताना मला या मालिकेच्या 'ब्लॅक वॉरंट' या नावाचा काही अर्थबोध होत नव्हता. मुळात कोर्ट कचेऱ्या, वकील, न्यायालये वगैरे गोष्टीबद्दल आपल्या सारखे सर्वसामान्य लोक अनभिज्ञच असतात. किंबहुना आपण या सर्व गोष्टींपासून जरा लांबच असतो. क्वचित कधीतरी वॉरंट, बेलेबल वॉरंट, नॉन-बेलेबल वॉरंट, पॅरोलवर सुटका वगैरे शब्द आपल्या कानी पडतात. मग हे 'ब्लॅक वॉरंट' नेमकी काय भानगड आहे? हे सुरवातीला समजून घेतले. ज्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झालेली आहे, आणि फाशीच्या शिक्षेतील या दोषी गुन्हेगाराचे दया याचिकेसहीत सर्व पर्याय संपलेले आहेत अशा गुन्हेगारांसाठी 'ब्लॅक वॉरंट' किंवा 'डेथ वॉरंट' काढले जाते. या 'ब्लॅक वॉरंट' जारी करण्याआधी भारतीय घटनेनुसार राष्ट्रपती आणि राज्यपालांकडे हा गुन्हेगार दयेची याचना अर्ज करू शकतो. जर या गुन्हेगाराचा दयेचा अर्ज फेटाळला गेला तर न्यायालय अंतिम आदेश म्हणजेच 'ब्लॅक वॉरंट' जारी करते. या 'ब्लॅक वॉरंट' मध्ये गुन्हेगाराचे नाव, केस क्रमांक, फाशीची तारीख, फाशीची वेळ, ठिकाण वगैरे तपशील नमूद केलेला असतो. या मध्ये आरोपीला मरेपर्यंत फासावर लटकवले जावे आणि या फाशीची अंमलबजावणी झाल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र न्यायालयात सादर करावे असा काहीसा मजकूर असतो. या मजकुराच्या खाली न्यायालयाचा शिक्का आणि वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशाची सही असते. ही सही केल्यावर ज्या फाउंटन पेनाने सही केलेली असते त्या फाउंटन पेनाचे निब हे न्यायाधीश तिथेच कागदावर मोडून टाकतात, अशी पूर्वापार पद्धत आहे. न्यायाधीशाने अत्यंत जड अंतःकरणाने हे ब्लॅक वॉरंट जारी केले आहे असा प्रतीकात्मक अर्थ या निब मोडण्याच्या प्रक्रियेतून दाखवला जातो. शिवाय एकदा पेनाची निब तुटली की ते पेन पुन्हा लिहिण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही, किंवा जाऊ नये असे प्रतीत केले जाते. हे मृत्युदंडाच्या अंतिमतेचे आणि निर्णय पुन्हा न बदलता येण्याचे प्रतीक असते. तसेच यामुळे न्यायाधीशावरचे एखाद्याच्या मृत्यूचे भावनिक ओझे अधोरेखित होते. मात्र आजकाल डिजिटलायझेशनच्या जमान्यात ही निब मोडण्याची प्रथा बंद होत चालली आहे असे समजले. कारण ब्लॅक वॉरंट संगणकावर ड्राफ्ट होऊन त्यावर न्यायाधीश डिजिटल पद्धतीने सही करतात. त्यामुळे आता पेनाचा वापरच होत नाही. असो...

 


 अशा या वेगळ्याच विषयावरची मालिका दिल्लीच्या तिहार तुरुंगातील माजी जेलर 'सुनील गुप्ता' आणि पत्रकार 'सुनेत्रा चौधरी' यांनी लिहिलेल्या ‘ब्लॅक वॉरंट: कन्फेशन ऑफ तिहार जेलर' या पुस्तकावर आधारित आहे (मी अजून हे पुस्तक वाचलेलं नाही). सुनील गुप्ता हे १९८० च्या दशकात तिहार तुरुंगाचे जेलर होते. त्या काळातल्या तिहारच्या अंतरंगात घडणाऱ्या घटना, कैद्यांची गॅंगवॉर्स, कैद्यांची अत्यंत क्रूर, घृणास्पद गुन्हा करण्यामागची मानसिकता यावर ही मालिका बेधडकपणे भाष्य करते. ही मालिका सात भागांचीच आहे. सुरवातीच्या एकदोन भागात कथेचे प्रास्ताविक होते. आपली आणि मालिकेतील पात्रांची ओळख होते. मात्र त्यानंतर एका भयंकर अनुभवातून जात आपण सुनील गुप्तांबरोबर तिहारमय होऊन जातो. आपण तुरुंगाचाच एक भाग होऊन जातो. ब्लॅक वॉरंट च्या कथेला तत्कालीन घटनांची जोड असल्यामुळे ही मालिका आपलं वेगळेपण जपते. तुरुंगातील अधिकाऱ्यांना कायद्यांमुळे कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं याचंही या मालिकेत चित्रण आहे. ऐंशीच्या दशकात तिहार जेल मध्ये तेंव्हा जातीधर्मावर आधारलेल्या कैद्यांच्या तीन वेगवेगळ्या टोळ्या सक्रिय होत्या. अनेक काळे धंदे राजेरोसपणे सुरु होते. अशा ह्या आशियातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या तिहार तुरुंगातील अंतरंगात डोकावण्याची संधी आपल्याला मिळते. 'तुरुंगातील सगळेच कैदी गुन्हेगार नसतात' याचे भान प्रेक्षकांना येते. तुरुंगात असे गुन्हेगार नसलेले किंवा निरपराधीत्व सिद्ध न झाल्यामुळे वर्षानुवर्षे तुरुंगात खितपत पडलेले कैदी असतात. तुरुंगात ना कुणी त्यांचं ऐकून घेणारं असतं, ना कुणी त्यांच्याशी दोन शब्द बोलणारं असतं. ब्लॅक वॉरंट ही मालिका बघितल्यावर आपला तुरुंगातील कैद्यांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो.

 

विपीन दहिया, शिवराजसिंग मांगट आणि सुनील गुप्ता

या मालिकेची सुरवात तिहार जेलमधील जेलरच्या पदासाठी सुनील गुप्तांच्या (जहान कपूर) इंटरव्हयूने होते. सुनील गुप्ता हे अतिशय अबोल, संस्कारी, हळव्या मनाचे आणि अतिशय प्रामाणिक असतात. त्यांची शरीरयष्टी देखील यथातथाच असते. तिहारच्या गुन्हेगारांच्या वातावरणात ते कितपत टिकतील? अशी शंका त्यांचा  इंटरव्हयू घेणाऱ्या अधिकाऱ्यांना येते. ते इंटरव्हयू दरम्यान सुनील गुप्तांना तसे बोलूनही दाखवतात. पुढे जेलरच्या नोकरीत रुजू झाल्यावर सुनील गुप्ता त्यांचे वरिष्ठ अधिकारी डि.एस.पी. 'तोमर' (राहुल भट) यांच्याकडून तिहार तुरुंगातील बारकावे समजून घेतात. सुनील गुप्तांच्या बरोबर तुरुंगात रुजू झालेले त्यांचे सहकारी जेलर शिवराजसिंग मांगट (परमवीरसिंग चिमा) आणि विपीन दहिया (अनुराग ठाकूर) हे देखील तुरुंगातील वातावरणाला सरावतात. सुनील गुप्ता, डि.एस.पी. तोमर, शिवराजसिंग मांगट आणि विपीन दहिया हे चौघेही भिन्न स्वभावाचे असतात. प्रत्येकाची अशी एक कौटुंबिक कहाणी आहे. तुरुंगातील नोकरीतील अडचणींबरोबर घरगुती समस्या देखील त्यांच्या अडचणीत भर टाकत असतात. मुळात ह्या मालिकेला कथानक असं नाहीये. तुरुंगातील घटनांच्या साखळीत आपण पार गुंतत जातो. ऐंशीच्या दशकात जेंव्हा सुनील गुप्ता तिहार मध्ये कार्यरत होते तेंव्हा कुप्रसिद्ध 'रंगा-बिल्ला' या गुन्हेगारांना फाशी झाली होती. या रंगा-बिल्ला फाशी च्या घटनेचा थरारक अनुभव आपल्याला घेता येतो. फाशीवर जाणाऱ्या गुन्हेगारांची मानसिक स्थिती काय होत असेल? हे पाहताना आपला थरकाप होतो. याच काळात म्हणजे ११ फेब्रुवारी १९८४ रोजी कुप्रसिद्ध काश्मिरी नेता 'मकबूल भट' याला देखील तिहार मध्ये फाशी देण्यात आले. ह्या घटनेच्या वेळी देखील तिहार मध्ये काय घडले होते याचे थरारक प्रसंग अंगावर येतात. सुनील गुप्तांनी या हाय प्रोफाइल कैद्याबद्दल आपल्या भावना प्रामाणिकपणे त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवल्या आहेत. याच दशकात झालेल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या देखील तिहार मध्ये खळबळ उडवून देते. पुढे सुनील गुप्ता मवाळ स्वभाव सोडून धाकड होतात का? हे या मालिकेत बघावे लागेल. शाररिक आणि मानसिक घुसमट करणाऱ्या 'तिहार' जेलच्या वातावरणात संस्कारी आणि हळव्या मनाच्या सुनील गुप्तांचा कसा निभाव लागतो? याची अंगावर शहारा आणणारी कहाणी म्हणजे ही मालिका 'ब्लॅक वॉरंट'! 

 

जहान कपूर

ही वेब सिरीज बघताना जेलर सुनील गुप्तांची भूमिका करणाऱ्या 'जहान कपूर' या अभिनेत्याकडे माझं वारंवार लक्ष वेधले जात होते. त्याच्याकडे बघताना मला सारखा 'शशी कपूरचा भास होत होता. ही मालिका बघून झाल्यावर जहान कपूरची माहिती मिळवली आणि समजले की हा जहान कपूर शशी कपूरचा नातू आहे. शशी कपूरचा मुलगा कुणाल कपूर आणि त्याची बायको शीना सिप्पी (शोले फेम रमेश सिप्पी ची मुलगी) यांचा जहान कपूर हा मुलगा! त्याने आपली अभिनयाची कारकीर्द थिएटर च्या माध्यमातून सुरु केली. हंसल मेहेताच्या 'फराज' चित्रपटातून त्याला ब्रेक मिळाला. 'ब्लॅक वॉरंट' या मालिकेतील मध्यवर्ती भूमिकेत त्याला पहिल्यांदाच एवढी मोठी भूमिका मिळाली आहे. जहान ने त्याला मिळालेल्या संधीच अक्षरशः सोनं केलंय. त्याने या मिळालेल्या भूमिकेचा गाभा न सोडता संयत अभिनयाचं दर्शन दाखवलंय. चार्ल्स शोभराज च्या भूमिकेतील 'सिद्धांत गुप्ता', शिवराजसिंग मांगट आणि विपीन दहिया यांच्या भूमिका करणारे  अनुक्रमे 'परमवीरसिंग चिमा' आणि 'अनुराग ठाकूर' यांनी आपापल्या भूमिका चोख केल्या आहेत. डि एस पी तोमर च्या भूमिकेतील 'राहुल भट' हा अभिनेता देखील दाखल घेण्यासारखा! तोमरचा टोन अचूक पकडत सर्वांवर धाक दाखवणारा अधिकारी राहुल भट ने मस्त रंगवलाय. 'गौरव कालूष्टे' या मराठी अभिनेत्याचा इथं आवर्जून उल्लेख करायला हवा. सध्या झी५ वरील 'शिवा' नावाच्या मराठी सिरीयल मध्ये तो काम करतोय. नुकताच त्याचा  'इलू इलू' हा चित्रपट प्रदर्शित झालाय. इतरही अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स मध्ये तो काम करतोय. हिंदी अभिनेत्यांच्या भाऊगर्दीत पुढे येणारे मराठी अभिनेते पहिले की कसं छान वाटतं... 

 

गौरव कालूष्टे

पुस्तकावर आधारित फार कमी कलाकृती असतात, ज्या लेखकाच्या शब्दांना योग्य तो न्याय देतात. ब्लॅक वॉरंट च्या दिग्दर्शकाने (विक्रमादित्य मोटवानी) पटकथाकाराने, संगीतकाराने, अभिनय करणाऱ्या अभिनेत्यांनी सुनील गुप्ता यांच्या पुस्तकातील शब्दांना, भावनांना, विचारांना योग्य न्याय दिलाय असे म्हणावे लागते. ही वेब सिरीज बघताना मनात विचार आला की, 'ब्लॅक वॉरंट: कन्फेशन ऑफ तिहार जेलर' या पुस्तका इतकेच प्रभावी लिखाण असलेल्या ‘तुरुंगरंग’ या मराठी पुस्तकावरून देखील एखादी छान, सशक्त अशी मराठी मालिका का बनू नये? सर्जनशील चित्रपट किंवा वेब सिरीज निर्माते, पटकथा लेखक, दिग्दर्शक यांचे लक्ष प्रयत्नपूर्वक 'तुरुंगरंग' या पुस्तकाकडे वेधायला हवे. 

 

राजीव जतकर

११ फेब्रुवारी २०२५.  


No comments:

Post a Comment