Thursday, 19 April 2018

स्वप्नवत धाड... अर्थात चित्रपट 'रेड'



स्वप्नवत धाड...  अर्थात चित्रपट 'रेड'


मुळात सिनेमा हे माध्यमच मुळी 'अशक्यप्राय गोष्टी सत्य आहेत' असा  आभास निर्माण करून थोडावेळ आनंद मिळवायचा प्रकार आहे, असे मला बरेचदा वाटते. सामान्यांच्या नशिबात क्वचितच येणारे प्रेमप्रसंग, प्रेमविवाह, पहिल्याच नजरेत पटणारी अप्सरेसमान सुंदर प्रेयसी, एकाच वेळी दहा दहा गुंडांना लीलया लोळवणारा नायक वगैरे... अशा आभासी गोष्टींचा आनंद मिळवण्यासाठीच आपल्यासारखी सामान्य माणसे चित्रपट बघत असतात.

मी ही असेच एक स्वप्न नेहेमी बघतो. आपल्या देशातून भ्रष्टाचार समूळ नष्ट झाला आहे. सर्व सरकारी अधिकारी अतिशय प्रामाणिकपणे, विनामोबदला, वेळेत सर्व कामे करीत आहेत. ते नम्र ही आहेत. गुंड राजकारण्यांची भीडभाड न ठेवता, त्यांचा कोणताही दबाव न मानता सर्व कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी आपापले कर्तव्य पार पडत आहेत. पण हे सर्व स्वप्नातच ! वस्तुस्थिती नेमकी उलटी...


अशाच एका स्वप्नात दोन तास रमायचे असेल दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांचा 'रेड' हा चित्रपट बघायलाच हवा. आयकर विभागाने सन  १९८१ मध्ये लखनौ येथील एका हाय प्रोफाईल, राजकारणी व्यक्तीच्या अनिर्बंध साम्राज्यावर घातलेल्या धाडीवर हा चित्रपट बेतलेला आहे. एका साहसी, बेधडक आयकर अधिकाऱ्याची ही  कथा आहे. या आयकर अधिकाऱ्याच्या प्रामाणिक वागणुकीमुळे त्याच्या वारंवार बदल्या होत असतात. लखनौ मध्ये बदली होऊन आलेल्या अमेय पटनाईक (अजय देवगण) या अधिकाऱ्याला कुणी एक खबऱ्या टीप देतो की लखनौ मधील एक स्थानिक राजकीय नेता, व खासदार रामेश्वर सिंग (सौरभ शुक्ला) याच्या घरी अमाप अवैध संपत्ती आहे. या अज्ञात खबऱ्याकडून निनावी पत्राद्वारे, फोनवरून ही माहिती मिळताच अमेय लगेचच कमला लागतो. एव्हड्या मोठ्या मात्तब्बर नेत्याच्या घरावर धड घालायची म्हणजे खायचं काम नसतं. या धाडीमुळे कार्यालयातल्या सहकाऱ्यांच्या तसेच स्वतःच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे हे माहित असुन देखील अमेय धाड टाकण्याचा निर्णय घेतो, आणि आपल्या पथकासह धाड टाकतोही...

रामेश्वर सिंग देखील मोठ्या ताकदीचा नेता असतो. तो अमेय पटनाईक आणि सहकाऱ्यांवर दबाव आणतो, त्यांच्यापुढे अडचणींचे डोंगर उभे करतो. पण त्याच्या दबावाला न जुमानता हे अधिकारी आपले कर्तव्य बजावत असतात. या जबरदस्त नेत्यांपुढे ते झुकत नाहीत. या धाडीत अमेय च्या हाती काही लागतं का? रामेश्वर सिंग त्याच्या अपमानाचा बदल घेतो का? या प्रश्नाची उत्तरे चित्रपटात मिळतीलच. पण एक कर्तव्यदक्ष अधिकारी व त्याचे सहकारी विरुद्ध करबुडवेगिरी करणारा एक उन्मत्त राजकीय नेता यांची लढाई आपल्याला दोन तास चांगलीच खिळवून ठेवते. या लढाईत कोणाचं विजय होतो हे आपल्याला माहिती असूनही आपण आणि प्रेक्षक या कथेत गुंतून जातो.  


सिंघम आणि सिंघम रिटर्न्स प्रमाणे याही चित्रपट 'अजय देवगण' अभिनयाची बाजी मारतो. अभिनयाची त्याची स्वतःची अशी खास शैली आहे. त्याचा स्वतःचा असा चाहता प्रेक्षकवर्ग ही आहे. परीक्षकांच्या पसंतीला तो उतरतोच. त्याने भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. 'इलियाना डिक्रीस' हिने पतीच्या संघर्षात त्याच्या पाठीशी ठामपणे उभारणाऱ्या पत्नीची भूमिका ठीक केलीये. अर्थात अजय देवगण आणि सौरभ शुक्ला च्या अभिनयाच्या वादळात तिची भूमिका नगण्य आहे. तिला चित्रपटात, कथेत फारसा वाव ही नाही.


रामेश्वर सिंग च्या भूमिकेत सौरभ शुक्ला कहर करतो. हा माझा फार आवडता नट आहे. 'जॉली एल.एल.बी.' मधील त्याची न्यायाधीशाची भूमिका पाहून मी त्याच्या प्रेमातच पडलोय. 'रेड' चित्रपटात त्याने उन्मत्त, मग्रूर, कपटी असा राजकीय नेता मोठ्या ताकदीने उभा केलाय. 'राजकुमार गुप्ता' यांचे दिग्दर्शन तसेच चित्रपटाची कथा व संवाद लिहिणारे 'रितेश शहा' यांनी चित्रपट उत्कंठापूर्ण बनवला आहे. त्यामुळे दोन तास प्रक्षकांना कथेत गुंतवून ठेवण्यात हि मंडळी यशस्वी ठरली आहेत.

 ही  'रेड' जरी  सत्य घटनेवर आधारित असली तरी सद्यःपरिस्थिती बघता ती स्वप्नवतच आहे. आता ना असे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, ना कुणाला भ्रष्टाचार व  कर भरण्याबद्दल आस्था आहे. त्यामुळे असे स्वप्नवत चित्रपट बघून दोन तास जीवाची करमणूक करून घेणे एव्हडेच काय ते आपल्यासारख्यांच्या सामान्यांच्या हातात राहते.

राजीव जतकर.         


Thursday, 12 April 2018

दीर्घकाळ लक्षात राहील अशी 'हिचकी'


दीर्घकाळ लक्षात राहील अशी 'हिचकी'


माझ्या लहानपणी माझ्या वर्गात एक मुलगा होता. तो तोतरा बोलायचा. सगळे जण त्याची चेष्टा करायचे. बिचारा सगळं सहन करायचा. मला फार वाईट वाटायचं. आता तो प्रतिथयश व्यावसायिक आहे. तोतरेपणा त्याच्या प्रगतीच्या आड आला नाही. आम्ही अजूनही संपर्कात आहोत. माझा आणखीन एक मित्र तोतरे बोलताना खूप वेडेवाकडे चेहेरे करतो. त्याची जीभ बाहेर येते. त्याला बोलताना खूप त्रास होताना दिसतो. याचप्रमाणे टोरेंट सिंड्रोम नावाचा एक आजार असतो. या आजारात लहानपणापासून बोलताना विचित्र आवाज येतात. हा आवाज येताना मानेला हलकेसे झटकेही येतात. या अशा आजारात येणाऱ्या विक्षिप्त आवाजांवर आणि हालचालींवर त्यांचे कुठलेही नियंत्रण नसते. या ‘टोरेट सिंड्रोम’ आजाराच्या पार्श्वभूमी असलेला  ‘हिचकी’ हा नितांतसुंदर चित्रपट आपल्याला आनंद देतो. 

'हिचकी' या चित्रपटाची कथा तशी साधी, सरळ आहे, आणि प्रेक्षकांच्या अपेक्षेप्रमाणे उलघडत ही जाते. राणी मुखर्जीचा कमालीचा सुंदर अभिनय, आणि चित्रपटाचे सादरीकरण यामुळे चित्रपट रंगतदार होतो. 'हिचकी' हा चित्रपट पाहताना सुरवातीला आपणही नयनाच्या तोंडातून निघणाऱ्या  अशा आवाजांनी काळजीत पडतो, आणि न कळत आपण चित्रपटाच्या कथेत गुंतत जातो.

चित्रपटातील नायिका ‘नयना माथूर’ (राणी मुखर्जी) या तरुणीला लहानपणापासून टोरेट सिंड्रोम हा आजार असतो. बोलताना तिच्या तोंडातून ‘ज्जा, ज्जा’ किंवा ‘व्वा,व्वा’ असे विक्षिप्त आवाज येत असतात. या नको असलेल्या आवाजावर नयनाचे कसलेही नियंत्रण नसते. ताणतणावाच्या प्रसंगी या नकोश्या वाटणाऱ्या आवाजाचा वेग आणि तीव्रताही वाढत असते. साहजिकच लहानपणापासूनच समाजात वावरताना ती चेष्टेचा आणि तिरस्काराचा विषय बनलेली असते. तिचे वडील (सचिन पिळगांवकर) हे देखील तिच्यावर सारखे चिडत असतात. लहानपणापासून असलेल्या व्यंगामुळे नयनाला अनेक शाळांमधून डच्चू मिळालेला असतो. मात्र एका शाळेतील मुख्याधापक (विक्रम गोखले) तिला परिस्थितीवर मात करायला शिकवतात. तिला प्रोत्साहन देतात. त्यामुळे मात्र नयनाच्या व्यंगाचे रूपांतर तिच्या बलस्थानात होते आणि तिचा आत्मविश्वास कमालीचा वाढतो.
मोठी झाल्यावर शिक्षिकेचेच काम करायचे असे तिच्या मनाने घेतलेले असते, आणि तिचे तसे प्रयत्नही चालू असतात. पण तिला बोलताना येणारी 'हिचकी' मोठा अडसर ठरत असते. योगायोगाने आणि काही विशिष्ठ परिस्थितीमुळे एका उच्चभ्रू शाळेत तिला शिक्षिकेची नोकरी मिळते, आणि एका वेगळ्याच आव्हानाला तिला सामोरे जावे लागते. या शाळेत शिकवण्यासाठी 'नववी फ' चा वर्ग नयनाला दिला जातो. 'राईट टू एज्युकेशन' या कायद्यांतर्गत एका झोपडपट्टीतील चौदा मुलांसाठी या उच्चभ्रू शाळेने 'नववी फ' हा वर्ग सुरु केलेला असतो. ह्या झोपडपट्टीमधून आलेल्या मुलांना शाळेकडून फारशी चांगली वागणूक मिळत नसल्याने न्यूनगंड निर्माण झालेली ही सर्व मुले मस्तीखोर, दंगेखोर झालेली असतात. त्यामुळे स्वतःच्या शाररिक व्यंगावर मात करताना नयना नववी फ मधील भरकटलेल्या मुलांना मार्गावर आणते. या दोन्हीही पातळ्यांवर नयना कशी यशस्वी होते हे पडद्यावर पाहणेच योग्य ठरेल.


खरं तर 'हिचकी' हा राणी मुखर्जी चा एकटीचाच चित्रपट आहे असे म्हणायला हरकत नाही. ती आणि तिचा अभिनय सर्व चित्रपटभर व्यापून राहतो. स्वतःच्या व्यंगाबरोबरच समोर येणाऱ्या आव्हानाबरोबर सतत चालू असलेली झटापट, घुसमट तिच्या देहबोलीबरोबरच अभिनयातून दाखवताना राणी ने कमाल केली आहे. भडक नाट्यमय प्रसंग, नृत्ये, मारामाऱ्या असल्या गोष्टींना बगल देत दिग्दर्शक 'सिद्धार्थ मल्होत्रा' याने चित्रपटाचा वेग कायम ठेवला आहे. त्रुटी कशात नसतात? याही चित्रपटात त्या काहीप्रमाणात आहेतच, पण त्या महत्वाच्या नाहीत.


स्वतःच्या शाररिक व्यंगावर मात करणाऱ्या नयना माथूर या शिक्षिकेची भूमिका करणाऱ्या राणी मुखर्जीचा हा नितांतसुंदर चित्रपट दीर्घकाळ लक्षात राहावा असाच आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संबंधावर ही भाष्य करणारा 'हिचकी' मुलांनी आणि शिक्षकांनी देखील बघायलाच हवा.
 
राजीव जतकर.