द वूमन इन केबिन १०.

लॉरा ब्लॅकलॉक (किरा नाइटली)
सध्या माझ्या बकेटलिस्ट मध्ये बरेच चित्रपट, वेब मालिका साचल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत आलेल्या 'पंचायत सिझन ४, 'दिल्ली क्राईम ३, 'जॉली एल.एल.बी. ३, 'द फॅमिली मॅन ३, 'द बेंगॉल फाईल्स, 'होमबॉउंड, 'बारामुल्ला, मराठीतील 'बाई तुझ्यापायी, 'दशावतार अश्या वेब मालिका आणि चित्रपट बघायचे राहिलेले असतानाच अचानक 'द वूमन इन केबिन १०' अशा वेगळ्याच नावाचा चित्रपट पाहण्यात आला. कदाचित नावातील वेगळेपणामुळे उत्सुकता वाटून मी हा चित्रपट नेटफ्लिक्स वर पाहिला. हा चित्रपट गुन्हेगारी थरारपट (Crime Thriller) या प्रकारातील असून एकदा जरूर पाहावा असा आहे. प्रत्येक चित्रपट निर्माता अशाप्रकारचे रहस्यमय गुन्हेगारी थरारपट बनवण्यासाठी उत्सुक असतात. कारण सर्वच प्रकारच्या प्रेक्षकांना ते आवडतात. फक्त आपल्या बॉलिवूड मधेच असे चित्रपट बनतात असे नाही तर हॉलिवूड मधील चित्रपट निर्मात्यांना देखील असे चित्रपट बनवण्याचा मोह आवरता येत नाही. अर्थात प्रेक्षकांच्या मनापर्यंत किंवा हृदया पर्यंत फार थोडे थरारपट पोहोचतात. 'द वूमन इन केबिन १०' हा चित्रपट तसा टिपिकल आहे. 'एखाद्या घडलेल्या गुन्ह्यातील रहस्य उलघडण्यासाठी केले जाणारे थरारक प्रयत्न' असेच काहीसे या चित्रपटाचे स्वरूप आहे. पण मुख्य भूमिकेत असलेली 'किरा (की कियारा) नाइटली' या नायिकेचा अप्रतिम अभिनय आणि या चित्रपटाची कथा ज्या आलिशान क्रूझवर घडते त्या क्रूझची प्रेक्षणीय पार्श्वभूमी या मुळे हा चित्रपट थोडा हटके झालाय.
ही गोष्ट आहे एका अभ्यासू आणि धाडसी पत्रकार असलेल्या 'लॉरा ब्लॅकलॉक' हिची ! लॉराला एकदा एका 'अँन बुलमर' नावाच्या श्रीमंत व्यवसायिकेची मेल येते. ही ‘अँन’ कॅन्सरग्रस्त असून ती आता थोड्याच दिवसांची सोबती असते. ती तिचे पती रिचर्डसोबत, तसेच त्यांच्या श्रीमंत पाहुण्यांसोबत, बुलमरच्या नवीन 'चॅरिटेबल फाउंडेशन'साठी नॉर्वेमध्ये एका निधी संकलन कार्यक्रमासाठी क्रूझ मधून जात असते. या चॅरिटी फाउंडेशन संबंधी लिहिण्यासाठी तिने प्रसिद्ध पत्रकार लॉरा ला आमंत्रित केलेले असते.
लॉरा या आलिशान क्रूझ वर एका संध्याकाळी दाखल होते. लॉराचा पूर्वाश्रमीचा प्रियकर देखील क्रूझवर आलेला असतो. तो बुलमरसाठी फोटोग्राफीचे काम करत असतो. क्रूझ तीन दिवसांच्या छोट्या सफरीवर निघते. संध्याकाळच्या अल्हादायक वातावरणात सोनेरी वाईनच्या सोबतीने गप्पाटप्पा रंगतात. रात्री उशिरा सगळे झोपतात. लॉरा'ला ८ नंबरची केबिन दिलेली असते. पहिल्याच रात्री लॉराला मध्यरात्री कसल्याश्या आवाजाने जाग येते. तिच्या शेजारीच असलेल्या केबिन नंबर १० मधून कसलेतरी भांडणाचे आवाज येत असतात. काय झाले असावे? लॉरा उत्सुकतेने क्रूझच्या बाल्कनीत येते, आणि काही कळायच्या आत १० नंबरच्या केबिनमधून एका स्त्रीला बाहेर समुद्रात फेकले गेल्याचे लॉरा ला दिसते. लॉराला प्रचंड धक्का बसतो. ती ताबडतोप आपल्या खोलीबाहेर येऊन सर्व पाहुण्यांना आणि क्रूझच्या कर्मचाऱ्यांना उठवून घडलेली घटना सांगते. १० नंबरच्या केबिन ची संपूर्ण तपासणी केल्यावर क्रूझचे कर्मचारी 'इथं काहीही अनुचित घडलेलंच नाहीये' असं सांगतात. एवढंच काय पण १० नंबरच्या केबिन मध्ये कोणीही राहत नाही. ही केबिन कुणालाही दिलेली नव्हती असेही ते निक्षून सांगतात. लॉरा गोंधळते. ती सर्वांना 'मी माझ्या डोळ्यांनी एका स्त्रीचा खून होताना पाहिलंय' असं सर्वांना वारंवार सांगते. पण तिच्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही. मग हा लॉराला झालेला भ्रम होता? की खरंच घडलेला रहस्यमय खून?
लॉरा ही हाडाची पत्रकार असल्याने ती ह्या घटनेचा छडा लावायचे ठरवते. पुढे हा तपास करताना लॉराला कोणकोणत्या संकटांना सामोरे जावे लागते, हे खूप मनोरंजक पद्धतीने दिग्दर्शक 'सायमन स्टोन' यांनी उलघडलेलं आहे. ह्या चित्रपटाचे लेखक 'ज्यो श्रपनेल' यांनी ह्या चित्रपटाची कथा प्रसिद्ध कादंबरीकार 'रूथ वेअर' यांच्या 'द वूमन इन केबिन १०' ह्याच नावाच्या कादंबरीवर आधारित लिहिलेली आहे. या चित्रपटाचे छायाचित्रण 'बेन डेव्हिस' यांनी अतिशय नयनरम्य पद्धतीने केले आहे. 'बेंजामिन वॉलफिश' या संगीतकाराने या चित्रपटाची रहस्यमय दाहकता अतिशय छान पद्धतीने वाढवली आहे. अनेक धक्के देत जेंव्हा हा चित्रपट जेंव्हा पुढे सरकतो तेंव्हा पार्श्वसंगीत महत्वाचे ठरते. लॉरा च्या भूमिकेतील 'किरा नाइटली' ह्या अभिनेत्रीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. संपूर्ण चित्रपट तिनेच व्यापला आहे. फक्त तिच्या अभिनयासाठी हा चित्रपट बघायला हवा. किरा नाइटली हिने खुनाचे रहस्य उलघडण्यासाठी केलेली धडपड, त्यात तिला अधूनमधुन येणारे नैराश्य प्रेक्षकांना खोलवर जाणवते आणि आपण प्रेक्षक न कळत चित्रपटाच्या रहस्यमय कथेत गुंतत जातो. ह्या चित्रपटाची सुरवात काहीशी कंटाळवाणी असली तरी उत्तरार्धात हा चित्रपट आपल्या मनाची पकड घेतो. चित्रपट संपण्याच्या बऱ्याच आधी पुढे काय होणार हे आपल्याला कळते तरी देखील हा चित्रपट कंटाळवाणा होत नाही.
क्राईम थ्रिलर हा चित्रपटाचा असा कलाप्रकार आहे की दिग्दर्शक आणि कथालेखकाला तो आव्हानात्मक असतो. प्रेक्षकांना कथेत गुंतवून ठेवावे लागते. प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत न्यावी लागते. धक्कातंत्राचा वापर अशा कलाप्रकारात फार कौशल्याने करावा लागतो. ह्या सर्व गोष्टी 'द वूमन इन केबिन १०' या चित्रपटात बऱ्यापैकी जमून आल्या आहेत. किरा नाइटली च्या अभिनयासाठी आणि अतिशय विलासीआणि आलिशान क्रूझ वरील डोळ्यांना सुखावणाऱ्या चित्रीकरणासाठी हा चित्रपट एकदा बघायला हरकत नाही. (नेटफ्लिक्स वर आहे)
राजीव जतकर
२६ नोव्हेंबर २०२५.



No comments:
Post a Comment