Monday, 19 January 2026

'अमेरिका'

 

'अमेरिका'

(मला आवडलेलं पुस्तक)

 


'अनिल अवचट' हे माझे आवडते लेखक! त्यांचं लेखन अतिशय साधं, सरळ, असायचं. नुसतं लेखनच नव्हे तर ते प्रत्यक्षात सुद्धा अगदी साधे होते. रहाणीमान, बोलणं देखील साधं सरळ! अवचटांच्या पुस्तकांचं वैशिष्ठ असं असतं की कोणतंही पुस्तक, कधीही, कुठलंही पान उघडून आपण वाचायला सुरवात केली केली तरी पुस्तक आपल्या मनाची पकड घेतं. अवचटांनी सर्वच पुस्तके माझ्या संग्रही आहेत. एखादी सामाजिक घटना किंवा समस्या घेऊन, त्या संबंधी सर्व तपशीलवार माहिती गोळा करून तिचा नीट अभ्यास करायचा, त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन संबंधितांना भेटून त्यांच्याशी संवाद करायचा, मग आपल्या खास 'अवचटी' शैलीत त्याचं संगतवार विष्लेशण करणारे दीर्घ लेख लिहायचे असं त्यांच्या लिखाणाचं स्वरूप असायचं. समाजातील विविध प्रश्नांवर, घटनांवर, समस्यांवर लिखाण करताना त्यांच्यातील सच्चा सामाजिक कार्यकर्ता जागा व्हायचा. त्यांचं लेखन म्हणजे सर्वसामान्य उपेक्षित, पीडित आणि बहुजनांसाठी काहीतरी करू पाहणारं, तळमळणारं,धडपडणारं असायचं.

 

अवचटांचं लेखन वाचल्यावर आपल्याला जाणवतं की आपण आपल्याच देशातील, आजूबाजूच्या समाजातल्या समस्यांबद्दल किती अनभिज्ञ असतो. आपल्या सारख्या सुशिक्षित, सुरक्षित जीवनशैलीत मश्गुल असणाऱ्यांच्या मनात आजूबाजूला जनावरांसारखे जगणारे देखील कुणीतरी आहेत याची आपल्याला कानोकान खबर देखील नसते. अनिल अवचटांच्या दृष्टीने मात्र समाजाची ही परिस्थिती अतिशय अस्वस्थ करणारी असायची. याच अस्वस्थतेतून आणि सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून ते समाजातील समस्यांची उकल करू पाहायचे. हे सर्व लिखाण करताना मात्र अवचट एका विशिष्ठ मर्यादेपर्यंत गुंतलेले असायचे. त्यात ते गुंतून पडायचे नाहीत. ('धार्मिक' या त्यांच्या पुस्तकातून याचा प्रत्यय येतो.) त्यातूनच वाचकांना खिळवून ठेवणारी त्यांची म्हणून एक विशिष्ठ लेखन शैली तयार झालेली होती. तशी मला अवचटांची सर्वच पुस्तके आवडतात, तथापि 'प्रश्न आणि प्रश्न', 'धार्मिक', 'कोंडमारा', 'स्वतः विषयी' अशी काही पुस्तके मला विशेष आवडतात. माझ्या संग्रही असलेले 'अमेरिका' हे पुस्तक अनेक वर्षांपूर्वी कुठेतरी गहाळ झाले होते. मग नुकत्याच पार पडलेल्या पुस्तक महोत्सवातून परत विकत आणून पुन्हा वाचायला घेतले.

 


'अमेरिका' हे पुस्तक म्हणजे निव्वळ प्रवासवर्णन नाही किंवा अमेरिकेला जाणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक पुस्तक देखील नाही. हे पुस्तक म्हणजे लेखकाने अमेरिकेत बघितलेल्या, अनुभवलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचं चिंतन आहे असंच म्हणावं लागेल. अनिल अवचटांना 'आयोवा इंटरनॅशनल रायटर्स प्रोग्रॅम' अंतर्गत साडेतीन महिन्यांसाठी अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली होती. या अमेरिका दौऱ्यादरम्यान अवचटांनी त्यांना आलेले अनुभव, त्यांना भेटलेल्या व्यक्ती, अमेरिकेतील सामाजिक प्रश्न, अडचणी याचं वर्णन वीस प्रकरणांमध्ये मांडलेलं आहे. त्यात अमेरिकेतील भेडसावणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न, मेक्सिको सारख्या शेजारील राष्ट्रामधून येणारे स्थलांतरितांचे लोंढे, अमेरिकेतील वकिलांबद्दल रंजक माहिती, अमेरिकन कुटुंब व्यवस्था, अमेरिकेतील व्यसनाधीनता ही प्रकरणे आपल्याला अचंबित करून सोडतात. अमेरिकेतील वेगळा समाज, वेगळी सामाजिक परिस्थिती, त्यामुळे निर्माण झालेल्या वेगळ्याच संस्कृतीचं पाया, वेगळे संकेत असलेला समाज या बद्दल अतिशय सोप्या, पण औत्सुक्यपूर्ण भाषेत ते आपल्यापुढे मांडतात. तसेच अमेरिकन संस्कृतीचे आपण भारतीयांनी केलेले विकृत अंधानुकरण देखील ते वाचकांसमोर मांडतात. अमेरिकेच्या श्रीमंतीची वर्णने, कथा आपण नेहेमी वाचलेल्या असतात, चित्रपटातून पाहिलेल्या असतात. पण या पुस्तकाच्या माध्यमातून अमेरिकेला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर, समस्यांवर अवचट त्यांच्या खास शैलीत व्यक्त होतात, आणि ते देखील अगदी सहजतेने, थोडक्यात मांडतात. जणू एखाद्या चित्रकाराने एखाद्दुसऱ्या ब्रशच्या फटकाऱ्याने चित्र काढावे तसे आणि तटस्थ नजरेतून...

 

अमेरिकेतील 'कचरा' ह्या विषयावर लिहिलेल्या प्रकरणात 'अमेरिका हा देश जगात सर्वात जास्त कचरा निर्माण करणारा देश आहे'  हे वाचून आपला अमेरिकेबद्दलचा समज दूर होतो. रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे हा अमेरिकला भेडसावणारा प्रश्न असून त्यावर हा देश काय काय  उपाययोजना करतो हे वाचणे अचंबित करणारे आहे. अमेरिकेत प्रत्येक वस्तूला लागणारं पॅकिंग, सतत वापरले जाणारे टिश्यू पेपर्स वगैरेंच्या निर्मितीमुळे होणारे भयंकर प्रदूषण याचा थक्क करणारा आढावा या पुस्तकात लेखकाने घेतला आहे. अमेरिकन 'वकिलांची अवस्था कशी आहे?, त्यांचे प्रश्न काय आहेत?, याची मजेशीर माहिती अवचटांनी 'वकील' या प्रकरणात लिहिलेली आहे. अमेरिकेत कोणीही, कुणावरही, उठसुठ, अगदी छोट्या छोट्या कारणांसाठी देखील खटले भरत असतात. अमेरिकेत त्याला 'सू' करणे असं म्हणतात. या प्रकरणातील एकेक किस्से वाचताना थक्क व्हायला होतं. 

 

अनिल अवचटांचा मूळ पिंड हा सामाजिक कार्यकर्त्याचा! त्यामुळे त्यांच्या ह्या पुस्तकात काळे गोरे भेदभाव, रेड इंडियन्स, मेक्सिको मधील कामगारांचे प्रश्न, त्यांची स्थलांतरे याचा आढावा घेतलेला दिसतो. अमेरिकेला जाण्याआधी अवचटांनी मेक्सिकन मजुरांविषयी बरेच वाचन केलेले असल्यामुळे त्यांना मेक्सिको बद्दल खूप आकर्षण होते. आपल्याकडील ऊस-तोडणी कामगारांसाठी मेक्सिकन कामगारांविषयी जाणून घेणे त्यांना आवश्यक वाटले. मग मेक्सिकोला जातानाचा प्रवास, तिथली माणसं, त्यांचं दारिद्र्य याचं त्यांनी केलेलं निरीक्षण अफाट आहे. तिथले मजूर रोजगारासाठी कायम अमेरिकेत स्थलांतर करीत असतात. हे मजूर कमी पैशात, कमी सोयी असलेल्या ठिकाणी राहून आपली उपजीविका करत असतात. स्थलांतरित मजुरांना अमेरिकेत अतिशय तुच्छ वागणूक मिळते याचीही माहिती आपल्याला मिळते. भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या लोकांमध्ये तुलनेने गुजराथी लोक जास्त असतात. अमेरिकन व्हिसा, ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी भारतीय नागरिक काय काय क्लुप्त्या करत असतात ते या पुस्तकातील 'भारतीय' या लेखात मजेशीर पद्धतीने सांगितलंय. याच बरोबर भारतीयांचं अमेरिकेत असलेलं स्थान, त्यांचे कामधंदे, भारतीयांच्या मुलांची असलेली द्विधा मनस्थिती या बद्दल लेखक तटस्थपणे  वर्णन करतात.

 


या पुस्तकाच्या शेवटच्या 'चार शब्द' या प्रकरणात लेखक अनिल अवचट आपल्या मनोगतात म्हणतात.. "अमेरिकेतील प्रश्न समजावून घेण्याने मला भारतातल्या प्रश्नांकडे पाहायची एक वेगळी दृष्टी मिळू शकली ही माझ्या दृष्टीने मोठीच घटना! अमेरिका हा देश श्रीमंत म्हणून गणला जात असला तरी त्याची 'बडा घर पोकळ वासा' अशीच परिस्थिती आहे. संपन्न अमेरिकेच्या पोटात बेघर लोकांचं एक गरीब राष्ट्र अस्तित्वात आहे आणि भारतासारख्या दरिद्री देशात श्रीमंत लोकांची चैनीची सर्व साधनं उपलब्ध असलेली संरक्षित बेटं अस्तित्वात आहेत, असं सगळं संमिश्र चित्र गोंधळवून टाकणारं आहे. पण समजावून घेतलं तर चांगल्या-वाईटाची, योग्य-अयोग्याची निवड करता येणं शक्य आहे".

 

जे अमेरिकेत राहात आहेत, किंवा ज्यांना अमेरिकेत जायचं आहे त्यांना या पुस्तकातून काहीतरी वेगळं सापडेल. भरपूर किस्से, प्रसंग, अनुभव यांनी हे पुस्तक मनोरंजक झाले आहे. प्रत्येक भारतीयाने हे पुस्तक नक्की वाचायलाच हवे. 'मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस' या प्रकाशन संस्थेने १९९२ साली प्रकाशित केलेल्या लेखक अनिल अवचट यांच्या 'अमेरिका या पुस्तकाच्या एकूण ११ आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत.

 

राजीव जतकर.

२७ जानेवारी २०२६

 

 

No comments:

Post a Comment