Saturday, 1 November 2025

'स्थळ' : अस्वस्थ करणाऱ्या लग्नाची वेगळी गोष्ट

 

'स्थळ' : अस्वस्थ करणाऱ्या लग्नाची वेगळी गोष्ट

 


 उंबराच्या फळामध्ये असंख्य किडे वळवळत असतात. छोटंसं उंबराचं फळ हेच त्या किड्यांचं विश्व असतं. त्यांना कल्पनाच नसते की आपल्या विश्वाच्या बाहेर देखील एक भलं मोठं विश्व आहे. आपल्या शहरी लोकांचं ना उंबराच्या फळातील छोट्या किड्यांसारखं झालंय. आपल्या शहराच्या बाहेर पलीकडे ग्रामीण भागात एक प्रचंड मोठं विश्व सामावलेलं आहे. शहरातल्या अडचणींपेक्षा ग्रामीण भागात खूप जास्त अडचणी असतात, याची आपल्यासारख्या शहरी लोकांना जाणीवही नसते. काळ पुढे गेला असला तरी ग्रामीण भागातली विचारसरणी, रूढी आणि परंपरा यातच अडकलेली आहे. ग्रामीण भागातील स्त्री ला आजही समाजात, कुटुंबात दुय्यम वागणूक दिली जाते. कधी एकदा घरातली मुलगी सज्ञान होते आणि कधी एकदा मुळीच लग्न करून टाकतो असं मुलीच्या आईवडिलांना वाटत असतं. या लग्नाच्या घाईमध्ये मुलीचं शिक्षण, तिच्या आकांक्षा, स्वप्ने याला तिलांजली दिली जाते. ग्रामीण भागातील मुलींना एखाद्या मुलाशी बोलायची देखील परवानगी नसते. तुलनेने शहरातील मात्र ही परिस्थिती झालेत्याने बदलत आहे. काळानुसार आणि शिक्षणामुळे मुली आपला जोडीदार कसा असावा? याबद्दल आपले मत, अपेक्षा आईवडिलांसमोर मांडू लागल्या आहेत. स्वतः देखील सांगून आलेल्या मुलाला पारखू लागल्या आहेत. शहरी भागात आता प्रेमविवाह होऊ लागले आहेत. या ही पुढे जाऊन 'लिव्ह इन रिलेशनशिप हे नवीन संकल्पना पाश्चिमात्य देशांकडून येऊन आपल्या संस्कृतीत हळू हळू स्थिरावू लागली आहे. पण हे प्रामुख्याने शहरी भागात दिसते. ग्रामीण भागात अजूनही मुलींना आईवडिलांच्या इच्छेनुसारच एकामागून एक येणारी स्थळे खाली मान (?) घालून पाहावी लागतात. मुलांकडून येणार नकार देखील पचवावा लागतो. ग्रामीण भागातल्या याच समस्येवर मार्च २०२५ मध्ये प्रदर्शित झालेला 'स्थळ' हा चित्रपट फार प्रभावीपणे भाष्य करतो. आणि प्रेक्षकांना विशेषतः शहरी लोकांना विचारप्रवृत्त करतो, अस्वस्थ करतो. पारंपरिक लग्न पद्धतीवर तीव्र टीका करतो. ग्रामीण भागातील इतरही प्रश्नांवर प्रकाश टाकतो.

 


या चित्रपटाची कथा तशी साधी, सोपी आणि सरळ आहे. विदर्भातील डोंगरगाव या छोट्याश्या खेडेगावात 'सविता' अर्थात सविता दौलतराव वांडरे (नंदिनी चिकटे) कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात समाजशास्त्राचा अभ्यास शिकत असते. बीए च्या तिसऱ्या वर्षात शिकताना ती एमपीएससी च्या परीक्षेची देखील तयारी करत असते. सविताचे वडील (तारानाथ खिरटकर) हे कापूस उत्पादक शेतकरी असून पिकावर होणाऱ्या कीटकांचा उपद्रव आणि कापसाच्या भावात होणाऱ्या चढउतारांशी झुंजत झुंजत दिवस दिवस रेटत असतात. त्यांचा मुलगा म्हणजे सविताचा भाऊ बेरोजगार असतो. त्यामुळे या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेमच असते. सविता दिसायला सर्वसामान्य असून उंचीने कमी आणि काळीसावळी असते. त्यामुळे तिला लग्नासाठी बघायला येणारी अनेक स्थळे नकार घंटा देत असतात. प्रत्येकवेळी सविताला दाखवण्याच्या कार्यक्रमात तोच तोच उसना आशावाद चेहेऱ्यावर बाळगत घरची मंडळी वावरत असतात. प्रत्येक दाखवण्याच्या कार्यक्रमात सविताला बसायला देण्यात येणारा तोच लाकडी स्टूल, विचारण्यात येणारे तेच तेच प्रश्न, तोच कांद्यापोह्यांचा कार्यक्रम याला सविता जाम वैतागलेली असते. सतत स्थळ पाहायला येणाऱ्यांना सामोरे जाऊन कंटाळलेल्या सवितासाठी तिचं महाविद्यालयीन विश्व, शिक्षण, तिच्या मैत्रिणी आणि तिच्याकडे आकर्षित होणारे तिचे तरुण शिक्षक 'खापणे सर' हाच काय तो तिच्या आयुष्यातला छोटा आनंदाचा कोपरा असतो. महाविद्यालयात दिले जाणारे स्त्री सशक्तीकरणाचे शिक्षण पाठ्यपुस्तकापुरतेच मर्यादित असते, प्रत्यक्ष आयुष्यात असं काही नसतं हे भयाण सत्य पचवणाऱ्या सविताची मूक अस्वस्थता, तिची घुसमट या सगळ्याची अतिशय अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे 'स्थळ' हा चित्रपट !    

 


हा चित्रपट मुख्यत्वे सविताच्या लग्नावर आधारित असला तरी त्याबरोबर सविताचे महाविद्यालयीन विश्व, आईवडिलांची अगतिकता, शिक्षक, मैत्रिणी  यांचं जगण्याचं वास्तव लेखक-दिग्दर्शक जयंत सोमळकर यांनी कमालीच्या सुंदर पद्धतीनं मांडलेलं आहे. जयंत सोमळकर ग्रामीण भागातल्या पारंपरिक लग्न प्रक्रियेवर आणि त्या निमित्ताने होणाऱ्या सामाजिक गोंधळावर प्रकाश टाकतात. लग्न प्रक्रियेबरोबरच हा चित्रपट प्रगतीच्या वाटेवर असलेल्या समाजाची अधोगती देखील दाखवतो. एकीकडे मुलीचे लग्न ठरवण्यासाठी शेतकरी वडिलांची धडपड, कापसाला योग्य भाव मिळत नसताना देखील फक्त हुंडा आणि लग्नखर्चासाठी कापूस विकण्याचा त्याने घेतलेला निर्णय आणि या अगतिकतेमधून त्यानं घेतलेलं आत्महत्येसारखं भयानक पाऊल... या सर्व गोष्टी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधून घेतात. ग्रामीण भागातील तरुणांची बेरोजगारीआणि व्यसनाधीनता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हुंडा अशा समाजातील अनेक विषयांना हा चित्रपट हात घालतो आणि आपल्याला अंतर्मुख करतो. दिग्दर्शक वर्णभेद, वर्गभेद या सारख्या समाजात खोलवर रुजलेल्या मुद्द्यावर कोणत्याही लाऊड किंवा बटबटीत पद्धतीने पद्धतीने व्यक्त होता शांतपणे समाजाला आरसा दाखवतात. हा चित्रपट कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती करत अंगावर येत नाही. पण प्रेक्षकांना मात्र तो सुन्न करतो.

 


या चित्रपटातील कलाकार जसे नंदिनी चिकटे, संगीत सोनकर, गौरी बडकी, संदीप सोमळकर, सुयोग्य धवस, तारनाथ खिवटकर, स्वाती उलमले कमालीचा  अभिनय करतात. यांचं वैशिष्ठ्य  असं की या आधी या सर्व कलाकारांनी कधीही चित्रपटामध्ये काम केलेलं नाहीये. तरी देखील त्यांच्या अभिनयामध्ये कुठल्याही प्रकारचा कृत्रिमपणा जाणवत नाही. या कलाकारांना कुठल्याही प्रकारचा साधा मेक-अप सुद्धा केलेला नाही. फिल्म, कॅमेरा कधीही पाहिलेल्या या कलाकारांनी अतिशय सराईतपणे अभिनय केलाय. त्यामुळे आपण हा एक चित्रपट पाहतोय असं आपल्याला वाटतच नाही, जणू काही सविताच्या घरातल्या एका कोपऱ्यात बसून आपण यातील घटना पाहतोय, अनुभवतोय असं जाणवत राहतं. त्याच त्याच यशस्वी कलाकारांना पाहण्याचा कंटाळा आला असेल तर, या नवीन कलाकारांचा 'स्थळ' हा चित्रपट आपल्याला नक्की आनंद देऊन जाईल. सचिन पिळगावकरांनी आणि जयंत सोमळकरांनी (ही दोनच नावे काय ती माझ्या ओळखीची) अनुक्रमे प्रस्तुत केलेला आणि लेखन - दिग्दर्शित केलेला 'स्थळ' या मराठी चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार, मानसन्मान मिळवले आहेत. या चित्रपटानं ४८ व्या टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (TIFF) सर्वोत्कृष्ठ आशिया पॅसिफिक चित्रपटासाठीचा प्रतिष्ठित NETPAC पुरस्कार मिळवला आहे. त्यानंतर हा चित्रपट २९ प्रमुख चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला आणि या चित्रपटाने १६ हुन अधिक पुरस्कार मिळवत चित्रपट सृष्टीत खळबळ उडवून दिली. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड यश मिळवलेल्या या चित्रपटाला आपल्या भारतीय किंवा अगदी महाराष्ट्रातील मराठी प्रेक्षकांनी मात्र दुर्दैवाने फार प्रतिसाद दिला नाही हे या चित्रपटाचं दुर्दैव!    

 

या चित्रपटाच्या शेवटी सविताला पुन्हा लाकडी स्टुलावर बसवून तिला दाखवण्याचा कार्यक्रम केला जातो आणि तिच्या मनस्तापाचा कडेलोट होतो. आपल्याला दाखवण्याचे कार्यक्रम काही संपणार नाहीत याची तिला तीव्र जाणीव होऊन तिच्यातल्या घुसमटीचा स्फोट होतो. विश्वास ठेवा.. पुढे काय होतं हे पाहण्यासाठी तुम्ही तयार नसणार याची मला खात्री आहे.  

 

हा चित्रपट आता प्रेक्षकांअभावी चित्रपटगृहात उपलब्ध नाही, पण ‘Zee 5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. नक्की बघा.

 

राजीव जतकर.

नोव्हेंबर २०२५.      

3 comments:

  1. खूप अस्वस्थ करणारी कथा आणि न संपणारी व्यथा दाखवली आहे या चित्रपटात. सुंदर परीक्षण.

    ReplyDelete
  2. नमस्कार सर
    गेल्याच रविवारी हा चित्रपट पाहिला. तुमची पोस्ट पाहिली या चित्रपटात नक्कीच काहीतरी वेगळा विषय असणार. म्हणून या चित्रपटावर लिहिल असणार ते वाचायच्या आधीच चित्रपट पाहिला.
    उत्तम परीक्षण केलत सर. 👌👍

    ReplyDelete