'ज्यूस': पुरुषप्रधान समाजात स्त्री ची होणारी घुसमट.
नुकतेच आम्ही मुलाकडे लंडन मध्ये दोन महिने राहून आलो. नुकतेच लग्न झालेल्या मुलाकडे आणि सुनेकडे ते ही लंडन मध्ये राहायला जाणे हा आनंदाचीच बाब होती. पाश्चात्य देशात आपल्या सारखी वर कामाला, धुणंभांडी करायला, स्वयंपाकाला माणसे मिळत नाहीत. सगळी रोजची कामे आपल्यालाच करावी लागतात. त्यामुळे माझ्या मुलाने आणि सुनेने घरातील सर्व कामे, जबाबदाऱ्या समसमान वाटून घेतलेल्या आहेत. स्वयंपाक देखील एक महिना मुलाकडे असतो, तर पुढचा महिना सुनेकडे असतो. मला हे थोडेसे नवीन होते. स्वयंपाकघरातील कामे पुरुषांनी करायची हे माझ्यासारख्या जुन्यापिढीतल्या पुरुषाला पचवणे जरा कठीणच होते. स्त्रीपुरुष समानता आमच्या घरात आहेच, पण तरी देखील घरातील पुरुषाने महिना महिना स्वयंपाक, धुणीभांडी करणे माझ्या पिढीत नव्हते हे मात्र खरे! पण नुकतेच यू-ट्यूब वर पाहिलेल्या 'ज्यूस' नावाच्या लघुपटाने (शॉर्टफिल्म) माझ्या मनाची कवाडे सताड उघडली. आपल्या समाजात असलेली, खोलवर रुजलेली स्त्री-पुरुष असमानता प्रकर्षाने जाणवू लागली. माझ्या मुलाप्रती आणि सुनेप्रती असलेला आदर खूप वाढला. 'ज्यूस' हा लघुपट बघून मी विचारमग्न झालो. स्त्री पुरुष असमानता असलेल्या आपल्या समाजाचा मी देखील एक भाग असल्याची एकप्रकारची अपराधीपणाची भावना मला टोचू लागली. आपल्याकडूनही आत्तापर्यंत बायकोला, किंवा घरातील स्त्रियांना कधी कमी लेखलं गेलंय का? याचा मी शोध घेऊ लागलो...
जगातील बहुतेक सर्व समाजात पुरुषाचे स्थान श्रेष्ठ आणि स्त्रियांचे पुरुषांपेक्षा काहीसे कनिष्ठ किंवा दुय्यम असते. कुटुंबात तर पुरुषाचे स्थान श्रेष्ठ असतेच, पण त्याबरोबर आर्थिक, सामाजिक सर्वच स्तरावर पुरुषप्रधान विचारांचे, आचारांचे वर्चस्व आढळून येते. उदाहरणार्थ लग्नानंतर सर्वांनाच मुलगा हवा असतो, तर मुलगी नकोच असते. समाजात मुलगी ही 'ओझे' मानले जाते. बलात्कार, हुंडाबळी, कुटुंबातील हिंसाचार या प्रकारात स्त्रीचीच होरपळ होते. स्त्रियांच्या कमाईवर पुरुषांचच नियंत्रण असते. 'स्त्रियांनी घरकाम केलेच पाहिजे, सर्वांच्या आवडीनिवडी जपल्या पाहिजेत' अशा पुरुष मंडळींच्या अपेक्षा असतात. मुलं किती आणि केंव्हा जन्माला घालायची, गर्भनिरोधक कुठलं वापरायचं याचे निर्णयदेखील पुरुषसत्ताच घेते. कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया बहुतेक वेळा स्त्रीचीच केली जाते. मुलगा 'हवासा' आणि मुलगी 'नकोशी' असल्याने अनेकदा मुलगा होईपर्यंत स्त्री वर बाळंतपणे लादली जातात. मुलं सांभाळणं ही देखील प्रामुख्याने स्त्रीचीच जबाबदारी मनाली जाते. अशी एक ना अनेक बंधने पुरुषप्रधान समाजरचनेतील स्त्रियांवर असतात. अशा परिस्थितीत जगताना स्त्रियांच्या मनाची काय घुसमट होत असेल? नेमका हाच विचारधागा पकडून ललित प्रेम शर्मा यांनी 'ज्युस' या लघुपटाची निर्मिती केलेली आहे. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ह्या लघुपटाचे दिग्दर्शन 'नीरज घायवान' यांनी केलेलं आहे.
या लघुपटाची कथा एका सामान्य मध्यमवर्गीय अपार्टमेंट मध्ये घडते. या फ्लॅटमधील दिवाणखान्यात एका संध्याकाळी ब्रिजेश आणि त्याचे मित्र अपेयपान करत गप्पाटप्पा करीत, हसत खिदळत बसलेली असतात. ब्रिजेश आणि मंजू सिंग या कुटुंबाने मित्रांसमवेत पार्टी आयोजित केलेली असते. मंजू आणि ब्रिजेश च्या मित्रांच्या बायका आत अंधाऱ्या स्वयंपाकघरातील कोंदट आणि उकाड्यात बाहेरील पुरुषमंडळींसाठी स्वयंपाक बनवीत असतात. बाहेर ब्रिजेश आणि मित्र त्यांच्या विकृत विचारांनी आणि महिलांना कमी लेखत, खिदळत असतात. मंजू मात्र बाहेरच्या पुरुष मंडळींना काय हवं, काय नको बघताना वैतागलेली असते. ब्रिजेश कडून सतत होणाऱ्या काहीतरी मागण्या, उकाडा, मित्रांच्या गप्पांमधील स्त्रियांवर होणारी टीका यामुळे एका क्षणी मंजुची सहनशक्ती संपते. अचानक ती तिचे हातातले काम सोडून देते, आणि हातात ज्यूसने भरलेला ग्लास घेऊन दिवाणखान्यातील खिदळणाऱ्या पुरुषांसमोर कुलरच्या गार हवेत येऊन बसते. इथेच हा लघुपट प्रेक्षकांना प्रचंड वैचारिक धक्का देत, अस्वस्थता आणत संपतो.
हा लघुपट इतका प्रभावी आहे की केवळ पंधरा मिनिटात तो एका पूर्ण लांबीच्या चित्रपटापेक्षा जास्त काही सांगून जातो. अभिनयाच्या बाबतीत मंजू सिंगच्या भूमिकेतील 'शेफाली शाह' कमालीचा अभिनय करते. या लघुपटात शेफाली ला फारसे डायलॉग्ज नाहीत. शेफाली फारसे न बोलता तिच्या अभिनयातून बरंच काही बोलते, व्यक्त होते. शेवटच्या धक्कादायक प्रसंगात तिच्या पाणी तारळणाऱ्या डोळ्यातून तिची जळजळीत भेदक नजर कितीतरी वेळ प्रेक्षकांना अस्वस्थ करत राहते. मंजू जेंव्हा ज्यूस चा ग्लास घेऊन दिवाणखान्यात सर्व पुरुषांसमोर येऊन बसते, तेंव्हा तिच्याकडे सर्वच पुरुष अवघडून, अवाक होऊन बघत राहातात. नवरा ब्रिजेश रागाने धुसफुसत राहतो. नंतर थोडा शरमिंदा होतो. या प्रसंगात नवऱ्याची भूमिका करणाऱ्या मनीष चौधरी यांनी जान आणली आहे. ह्या लघुपटाने आपल्या पुरुषप्रधान समाजाच्या रोमारोमात भिनलेला स्त्रीद्वेष उघड केला आहे. आपल्या समाजातील कोणत्याही स्तरातील महिलांना त्यांच्या घरात कसे वागवले जाते यावर हा लघुपट मोठ्या धाडसाने भाष्य करतो. पुरुषांना आरसा दाखवतो. आपण कितीही प्रगतिशील असल्याचा दावा केला तरी आपल्या मध्ये खरं तर सर्वांमधेच स्त्री बद्दल दुय्यम भावना असते, याची धक्कादायक जाणीव आपल्याला होते. मोजून पंधरा मिनिटे लांबी असलेला हा लघुपट पाहून कोणताही प्रेक्षक विचारमग्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि ही या माध्यमाची ताकद आहे.
हा लघुपट वारंवार बघण्यासारखा आहे. जेवढ्या वेळा आपण हा लघुपट पाहू तेवढा हा लघुपट आपल्याला नव्याने जाणवतो. एखादी छोटी कथा अगदी थोडक्यात, पण अंगावर काटा येईल इतकी भेदकपणे कशी दाखवता येऊ शकते हे अनुभवण्यासाठी 'ज्यूस' हा लघुपट जरूर पहा.
- या लघुपटाची यू -ट्यूब लिंक खाली दिलीय. जरूर पहा.
https://youtu.be/R-Sk7fQGIjE?
राजीव जतकर
४ ऑक्टोबर २०२५.
No comments:
Post a Comment