'कोर्ट
कचेरी': पिता पुत्राचे नाते खोलवर उलघडणारा कोर्टरूम ड्रामा
नुकतेच १३ ऑगस्ट ला 'सोनी लिव्ह' वर प्रदर्शित झालेली 'कोर्ट कचेरी' ही पाच भागांची छोटी, पण अफलातून वेब मालिका बघण्यात आली. मला कोर्टरूम ड्रामा या प्रकारातील चित्रपट, वेब मालिका बघायला आवडतात. या प्रकारातील अमिताभ बच्चनचा 'पिंक', सिर्फ एक बंद काफी है!, सेक्शन ३७५, क्रिमिनल जस्टीस, युअर ऑनर, इल्लिगल, जॉली एलएलबी वगैरे चित्रपट आणि वेब मालिका माझ्या आवडत्या! यातील 'सेक्शन ३७५' हा चित्रपट भारतीय दंड संहितेच्या कलम ३७५ वर आधारित आहे. 'क्रिमिनल जस्टीस' ही वेब मालिका अशीच उत्कंठा वाढवणारी आहे. मनोज वाजपेयी यांचा 'एक बंद काफी है!' हा चित्रपट बाल लैंगिक शोषणावर आधारित असून मनोज वाजपेयी ह्याच्या जबरदस्त अभिनयासाठी बघायलाच हवा. 'मामला लीगल है!' ही वकिलांच्या जीवनावर आधारित असलेल्या मजेदार घटनांवर आधारित आणि विनोदी अंगाने फुलत जाणारी वेब मालिका आहे. कोर्टातील तीव्र कायदेशीर लढाया, गुंतागुंतीची पात्रे, आकर्षक कथानके हे या वेब मालिकांची किंवा चित्रपटांची महत्वाची अंगे आहेत. स्वाभाविकपणे हे कोर्टरूम ड्रामे प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवतात. फौजदारी खटल्यांपासून ते कौटुंबिक वादांपर्यंत हे कोर्टरूम ड्रामे कायद्याच्या गुंतागुंतीतून मार्ग काढताना वकील, न्यायाधीश आणि अर्थातच पक्षकार यांना येणाऱ्या आव्हानांची झलक दाखवतात. आकर्षक कथानके आणि चांगल्याप्रकारे रचलेल्या पात्राद्वारे अशा वेब मालिका प्रेक्षकांना चांगलेच गुंतवून ठेवतात. मी निकाचीच पाहिलेली अनेक ड्राम्यांपैकी 'कोर्ट कचेरी' ही पाच भागांची वेब मालिका मला अनेक कारणांनी आवडली.
'कोर्ट कचेरी' हा केवळ कोर्टरूम ड्रामा नसून पिता पुत्रा मधील तणावपूर्ण संबंधावर खोलवर भाष्य करणारी मालिका आहे. पिता पुत्राचे नाते प्रेमाचे तर असतेच, पण बऱ्याच वेळेला ते तणावपूर्ण देखील असते. वडिलांच्या मुलाकडून स्वाभाविकपणे काही अपेक्षा असतात. आपल्या मुलाने आयुष्यात काय बनावे? हे बहुतेक वडील आधीच ठरवून टाकतात. त्यात एखादा यशस्वी व्यावसायिक आपल्या मुलाने आपल्या नंतर आपला व्यवसाय पुढे चालवावा असे ठरवतो. मुलाला मात्र वडिलांच्या व्यवसायात रस नसतो. त्याला आपली स्वतःची स्वतंत्र ओळख किंवा आयडेंटिटी बनवायची असते. मग अशावेळी पिता पुत्राच्या नात्यात तणाव निर्माण होतो. नेमका हाच धागा पकडून 'कोर्ट कचेरी' या बेब मालिकेची निर्मिती केली गेलेली आहे.
हरिष माथूर (पवन मल्होत्रा) हे अतिशय अनुभवी आणि प्रतिथयश असे जेष्ठ वकील असतात. आपल्या मुलाने पवन माथूर (आशिष वर्मा) याने देखील आपल्यासारखेच यशस्वी वकील व्हावे अशी त्यांची रास्त अपेक्षा असते. आपल्या जम बसलेल्या वकिलीच्या व्यवसायात पवन याने वकिली करून यशस्वी व्हावे अशी या प्रेमळ पित्याची अपेक्षा असते. पवन ला मात्र वडिलांचा आणि त्यांच्या वकिली पेशाचा तिटकाराच असतो. या मालिकेच्या सुरवातीच्या भागातच पवन ला वकिलीचा पेशा आवडत नाही हे स्पष्ट होते. हरीश माथुरांचा दीर्घकाळ सहाय्यक असलेला शिकाऊ वकील सुरज बेरिया (पुनीत बत्रा) अनेक वर्षांपासून अजूनही स्वतंत्रपणे स्वतःचा असा एखादा खटला हाताळण्याची वाट बघतो आहे. पवन आपल्या वडिलांचा व्यवसायाचा वारसा चालवण्याच्या कल्पनेने प्रचंड तणावाखाली आहे, तर सहाय्यक वकील सुरज हरीश माथूर यांचा वारसा पुढे नेण्यासाठी उत्सुक आहे. एका छोट्या शहरातील न्यायालयाच्या गोंधळात माथूर पिता पुत्र आणि सहाय्यक सुरज आपल्या आयुष्यात कसा मार्ग काढतात हा या कथेचा केंद्रबिंदू आहे. वकिली पेशातील खोटेपणा, भ्रष्टाचार याचा उबग येऊन परम आपले भविष्य आजमावयाला कॅनडा येथे जाण्याचा घाट घालतो. त्याला वाटत असतं की त्याचे वडील न्यायासाठी लढत नाहीत तर पैसे कमावण्यासाठी कोर्टात लढत असतात. त्यामुळे एका केसमध्ये तो गुप्तपणे विरोधी पक्षकाराची बाजू घेतो. कथेमध्ये पुढे अनेक वळणे येतात. पुढे पिता पुत्रामधील तणाव संपतात का? परम कॅनडाला जाण्यात यशस्वी होतो का? वगैरे प्रश्नांची उत्तरे 'कोर्टकचेरी' ही वेब मालिका बघून मिळवण्यात खरी मजा आहे.
अभिनयाच्या बाबतीत ही मालिका अप्रतिम आहे. हरीश माथूर यांच्या भूमिकेतील अनुभवी 'पवन मल्होत्रा' भाव खाऊन जातात. कोर्टात युक्तिवाद करताना ते कठोर असतात, पण त्यांच्या मुलाशी बोलताना ते कोमल आणि भावुक असतात. पवन मल्होत्रा हे माझे आवडते अभिनेते आहेत. 'जब वुई मेट', 'भाग मिल्खा भाग' हे त्यांचे गाजलेले चित्रपट. मध्यंतरी डिस्ने हॉटस्टार वर प्रदर्शित झालेल्या 'ग्रहण' या वेबमालिकेतील त्यांची भूमिका लक्षवेधी होती. ऐंशी च्या दशकातील सैद अख्तर मिर्झा यांच्या 'नुक्कड' या मालीकेतील पवन मल्होत्रा यांची भूमिका कोण विसरेल? नुक्कड मुळे पवन मल्होत्रा यांना चित्रपटसृष्टीत ओळख मिळाली. या कोर्टकचेरी मालिकेतील चौथ्या भागातील एक प्रसंग अभिनयाच्या दृष्टीने इतका आफाट चित्रित झालाय की या मालिकेला हा प्रसंग एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. या प्रसंगात पवन आपल्या वडिलांना आपल्या कॅनडाला जाण्याविषयी सांगतो तेंव्हा हरीश माथुरांना धक्काच बसतो. ते सुन्न होतात. पवन वडिलांसमोर आयुष्यभर न बोलता आलेल्या भावना तळमळीने उघड्या करत असतो. तो म्हणतो 'तुम्ही मला सगळ्या भौतिक गोष्टी दिल्यात खऱ्या, पण माझ्याबरोबर तुम्ही कधी वेळ घालवला का? तुमच्या व्यवसायामुळे मला माझे वडील कधीच वाट्याला आले नाहीत. तुम्ही माझ्यासाठी ऍडव्होकेट हरीश माथूर एवढेच होता. पवन या प्रसंगात वडिलांना विचारतो 'तुम्ही मला शेवटची मिठी कधी मारली होती हे तुम्हाला आठवतंय का?' मुलाच्या या तक्रारी नंतर वडिलांच्या भूमिकेतील पवन मल्होत्रा यांनी त्यांना अनपेक्षितपणे बसलेला धक्का, मुलावर न कळत झालेल्या अन्यायामुळे होणारा अपराधी भाव, तणाव अभिनयातून इतके प्रभावीपणे दाखवलंय की आपण निःशब्द होतो. वडील त्यांच्या जागी योग्यच असतात. ते म्हणतात 'तुला काही त्रास होऊ नये इतकाच मी प्रयत्न करत होतो. तुला वकिली पेशा आवडत नव्हता ह्याचा मला अंदाज आला होता, पण मी तुला आवडत नसेन तर पुढे मी काय बोलू?' याच प्रसंगात मुलाची भूमिका करणाऱ्या 'आशिष वर्मा' ह्या अभिनेत्याने आपल्या अभिनयात आपले सर्वस्व ओतले आहे. आयुष्यभर वडिलांच्या आधिपत्याखाली जगताना त्याचा झालेला कोंडमारा, होणारी घुसमट त्याने अप्रतिमपणे दाखवले आहे. कोणीही चित्रपटप्रेमी या प्रसंगावर जीव ओवाळून टाकेल. या प्रसंगातील पिता पुत्राचा नैसर्गिक अभिनय आणि अप्रतिम संवाद प्रेक्षकांची मने जिंकेल यात शंकाच नाही. हरीश माथूर यांच्या सहाय्यकाची भूमिका करणारा 'पुनीत बत्रा' आपल्या लक्षात राहतो. प्रीयशा भारद्वाज, किरण खोजे, आनंदेश्वर द्विवेदी या सहाय्यक कलाकारांनी त्यांच्या संबंधित भूमिका समरसून केलेल्या आहेत.
कोर्टकचेरी या मालिकेचे दिग्दर्शन 'रुचिर अरुण' यांनी केलंय, तर छायाचित्रणाची जबाबदारी 'अनिरुद्ध पाटणकर' यांनी उचलली आहे. या मालिकेची कथा 'अरुणाभ कुमार आणि पुनीत बत्रा' यांनी लिहिलेली असून त्यांनीच लिहिलेल्या पटकथेमुळे प्रेक्षकांना ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवते. ही मालिका भ्रष्ट न्यायव्यवस्थेबद्दल धाडसाने आणि प्रामाणिकपणे भाष्य करते, तसेच ही मालिका कोर्टातील रंगतदार प्रसंगांसोबत सामाजिक आणि भावनिक पैलूंना स्पर्श करते. त्यामुळे प्रेक्षक अंतर्मुख झाल्याशिवाय राहणार नाहीत. ही वेब मालिका जरूर बघण्यासारखी आहे. नक्की बघा.
राजीव जतकर
२२ ऑगस्ट २०२५.
No comments:
Post a Comment