मेरा
अपना भी एक आसमां हो... 'थप्पड'.
अमृताच्या स्वत्वाला जागं करणारी 'थप्पड'
... नवऱ्याने थप्पड मारल्यामुळे घर सोडलेल्या अमृताला घरी परतण्यासाठी तिचा नवरा विक्रम कायदेशीर नोटीस पाठवतो. अमृता नेत्रा राजहंस नावाच्या वकिलांकडे जाते. अमृता आणि वकील नेत्रा यांच्यात संवाद होतो...
अमृता: मला सासरी जायचं नाहीये.
वकील नेत्रा : का?
अमृता : माझी इच्छा नाहीये.
वकील नेत्रा : कोर्टात तुला काय वाटतं, किंवा तुझ्या इच्छेचा विचार होत नसतो.. आणि 'नवऱ्याने फक्त एक थप्पड मारली' हे काही घर सोडून जायचं कारण होऊ शकत नाही. तुझं कुणाबरोबर प्रेमप्रकरण आहे?
अमृता : नाही.
वकील नेत्रा : मग नवऱ्याचं इतर कुणाबरोबर प्रेम वगैरे?
अमृता : नाही.
वकील नेत्रा : अजून काही कारण आहे का घर सोडून जायचं ?
अमृता : नाही.
वकील
नेत्रा : नवऱ्याने फक्त एक थप्पड मारली हे एव्हडेच कारण? हे योग्य नाही अमृता. काही लोकांना हे विचित्र, अवास्तव (अनरिझनेबल) वाटू शकतं.
अमृता : त्या लोकांना "नवऱ्याने थप्पड मारली' हे विचित्र वाटत नाही? त्या थपडेने मला माझा आत्मसन्मान गमावल्यासारखं वाटतंय. कोणत्याही कारणाने त्याने मला थप्पड मारणे हे अवास्तव (अनरिझनेबल) नाही का? आणि तुम्ही मला म्हणता 'फक्त एक थोबाडीत'? नाही... तो मला मारू शकत नाही.
वकील नेत्रा : तुला नेमकं काय हवंय ?
अमृता : मला खुश राहायचंय. आणि हो.. मी जेंव्हा म्हणेन 'मी खुश आहे" तेंव्हा ते खोटे वाटता काम नये.
वकील नेत्रा : मला वाटतं अमृता तुझ्यासाठी इतरही काही पर्याय आहेत. घटस्फोटा सारख्या कायदेशीर प्रक्रिया खूप गोंधळाच्या आहेत. खूप गुंतागुंतीच्या असतात. बहुदा म्हणूनच की काय आपण आपल्याशी खोटं बोलतो की 'आपण खुश आहोत'.
अमृता : मला खोटं बोलायचंच नाहीये. ना माझ्या नवऱ्याशी ... ना स्वतःशी.
वकील नेत्रा राजहंस (माया सारांव)
अमृता : मला घटस्फोटाव्यतिरिक्त काहीही नकोय.
वकील नेत्रा : अमृता आपण ही मागणी केली नाही तर तू आर्थिक दृष्ट्या अडचणीत येशील. तुला पुन्हा शून्यातून सुरवात करावी लागेल.
अमृता : माझे लग्न म्हणजे 'करार' नव्हता. आमचे प्रेम होते एकमेकांवर.
वकील नेत्रा : सर्व लग्नं म्हणजे 'करार'च असतात अमृता. दोन व्यकिमधील तो एक 'करार'च असतो. लग्नासाठी प्रेमाची गरज नसते. तुला काय वाटतं की जगातील सर्व लग्नं प्रेमासाठी आणि प्रेमावर निभावली जातात? लग्न म्हणजे सन्मान आणि सुरक्षिततेच्या गरजेसाठी असलेला अन्यायकारक व्यवहार असतो.
...शेवटच्या अश्याच एका प्रसंगात चित्रपटाचा दिग्दर्शक आणि लेखक बरेच काही सांगून जातात. अमृता अखेरचा निरोप घेताना दुःखद अंतःकरणाने आपल्या सासूला म्हणते "तुम्ही मला खूप प्रेम दिलंत, पण ते तुमच्या मुलाच्या बायकोसाठी होतं.. माझ्यासाठी नव्हतं. त्या रात्री नंतर मला भेटायला कुणीही आलं नाही. विक्रमची चूक आहे हे त्याला कुणीही सांगितलं नाही. सगळ्यांना वाटलं की जे विक्रमने केलं ते बरोबरच होतं. अमृताने झालं गेलं विसरून पुढे जायला हवं होतं. या साठी मी तुम्हाला सर्वांना माफ करणार नाही."
अमृताची सासू उत्तरादाखल गहिवरलेल्या आवाजात म्हणते "तुझी चूक नाही बाळा. चूक आमच्या सारख्या आईवडलांची आहे. बायको हा पुरुषांचा हक्क नाहीये. प्रत्येक वेळी बायकांनाच माघार घ्यावी लागते असे आम्ही मुलींना शिकवलं. आमच्या पिढीनेच नवीन पिढीला स्वतःचे स्वत्व आबादित ठेवायला शिकवलं नाही."
सासू (तन्वी आझमी) आणि अमृता (तापसी पन्नू)
भारतीय समाजात स्त्रीवर तिच्या जन्मापासूनच परंपरा आणि रूढींचा दबाव टाकला जातो. 'स्त्रीने कायमच नमतं घेतलं पाहिजे', 'घर आणि मूल सांभाळणं ह्यातच स्त्रीने इतिकर्तव्यता मानली पाहिजे', स्त्री ने आदर्शच वागलं पाहिजे' अशा विचारांचे स्त्रीवर पिढ्यानपिढ्या संस्कार केले जातात. अशा विचारधारेच्या प्रभावाखाली असलेल्या मुली जन्मापासूनच कुटुंबातील पुरुषांचे पुरुषी वर्तन बघतच लहानाच्या मोठ्या होतात. आई मुलीची सासरी पाठवणी करताना सांगते " आता पती आणि सासरच तुझं जग. आता पती म्हणेल तीच पूर्व दिशा. लग्न म्हंटलं की तडजोडी आल्याच. त्या तुला कराव्याच लागतील. वगैरे.. वगैरे. मग अशा परिस्थितीत 'नवऱ्याने कधी हात उगारालाच तर तो त्याचा अधिकार आहे' असं मुलीला वाटल्यास नवल ते काय? दुर्दैवाने ही अशी शिकवण मुलीला तिच्या आई, सासू अशा स्त्री वर्गाकडूनच मिळते, हे विदारक सत्य सांगणारा हा चित्रपट आहे.
हे आणि असे अनेक प्रसंग 'थप्पड' या चित्रपटात आपल्या अंगावर अक्षरशः कोसळत रहातात. नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या, त्या नात्याला प्राधान्य देऊन आदर्श पत्नी बनण्यासाठी धडपड करणाऱ्या एका सुंदर, सुशिक्षित, विवाहित अमृताची (तापसी पन्नू) ही कथा. सुरळीत सुरु असलेल्या तिच्या आयुष्यात एक वादळ येतं. तिचा कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारा अतिशय महत्वाकांक्षी नवरा विक्रम (पॉवेल गुलाटी) कंपनीत प्रमोशन न मिळाल्याच्या रागात एका पार्टीत सर्वांसमोर, चारचौघात अमृताच्या कानाखाली मारतो. अमृता सुन्न होते. तिच्या स्वाभिमानाला धक्का बसतो. विक्रमला आणि खरं तर पार्टीतील उपस्थित सर्वांनाच या घटनेचे गांभीर्य वाटत नाही. 'इतक्या क्षुल्लक गोष्टीचा इतका बागुलबुवा कशाला करायचा अशी विक्रमाची भावना. अमृताला तिची आई, सासू, नवरा, भाऊ वगैरे सर्वचजण 'झालं गेलं विसरून जा' असा सल्ला देतात. 'एक थप्पड तर मारली त्यात काय बिघडलं' असंच सर्वांना वाटतं. मात्र नवऱ्याने मारलेली 'थप्पड' अमृताचे सर्व आयुष्यच उध्वस्त करते. तिच्या चेहेऱ्यावरचे हास्यच गायब होते. यातूनच अमृता घटस्फोट घेण्याचे ठरवते. घटस्फोटाच्या कायदेशीर अडचणींना अमृता कशी सामोरी जाते? नवरा बायकोच्या नात्यातून ती बाहेर पडते का? स्वत्व मिळवण्याच्या लढाईत अमृता जिंकते का? अशा अनेक प्रश्नांचा उलघडा आपल्याला 'अतिशय गंभीर सामाजिक विषयावर आधारलेल्या या चित्रपटातून मिळतो.
दिग्दर्शक 'अनुभव सिन्हा' यांचे या आधी मी 'मुल्क' आणि आर्टिकल १५ हे चित्रपट पाहिलेले आहेत. सामाजिक मुद्यांवर आधारित विषयांवर अतिशय संवेदनशील रीतीने ते सिनेमाच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. 'थप्पड' हा चित्रपट त्यांच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटात खूप उजवा ठरावा. या चित्रपटातील अतिशय परिणामकारक आणि अंगावर येणारे संवाद आणि पटकथा आहे 'मृण्मयी लागू' ही ची. मराठीतील सुप्रसिद्ध कलाकार विवेक लागू आणि दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांची ही मुलगी. चित्रपटातील संवाद आपल्याला कथेत पार गुंतवून टाकतात आणि विचार करायला प्रवृत्त करतात. कुठलाही मेलोड्रामा, कोर्टरूम ड्रामा नसलेला हा चित्रपट आपल्याशी शांतपणे बोलतो. कथेला अनुरूप 'एक तुकडा धूप' हे एकच गाणं या चित्रपटात आहे.
अमृता (तापसी पन्नू), दिग्दर्शक अनुभव सिन्हा आणि वकील नेत्रा राजहंस (माया सारांव)
थप्पड चित्रपटाची कथा फक्त अमृताची नाहीये. तिच्या शेजारणीची, नवऱ्याचा सतत मार खाणाऱ्या मोलकरणीची, कोर्टकेस मध्ये अमृताची कायदेशीर बाजू सांभाळणाऱ्या वकील नेत्राची, आईवडील, तसेच सासूसासरे यांच्या नात्यांची देखील आहे. या चित्रपटात इतर प्रत्येक पात्राची स्वतःची अशी एक कथा आहे. चित्रपट बघताना आपण न कळत या नातेसंबंधांची तुलना स्वतःशी, आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या आपल्या नातेवाईक, मित्रमंडळींशी करू लागतो. 'आपण आपल्या जोडीदाराबरोबर कधी अन्याय तर केला नाहीये ना?' असे चाचपू लागतो, हे या चित्रपटाचे सर्वात मोठे यश आहे. आपल्या नातेसंबंधात या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो, त्या गोष्टी खरोखरंच दुर्लक्षित केल्या पाहिजेत का? आपल्या नात्यात आपण एकमेकांचा किती आदर करतो आहोत? असे अनेक प्रश्न हा चित्रपट आपल्याला विचारतो. हा चित्रपट मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन आत्मपरीक्षण करायला लावतो.
अमृता (तापसी पन्नू) आणि वडील (कुमुद मिश्रा)
हा.. मैने अपने आंचल का अंबर बनाया है!
के कही गर मेरा रास्ता चहतों से अलग जो चले!
के कही गर मेरे सिनेमे सांस थोडी भी जो काम पडे!
मेरा आपण भी एक आसमां हो!
खुद्द को हर दिशां में बिखेरू, मुझको हार दिशेस बुलाना!
मैं गर फ़िरसे मिल भी जाऊं, मुझे पाश में भींच लेना!
मेरे आसमां को बहाकर मूझें सौंप देना, ता की तेरा भी एक आसमां हो!
और मेरा अपना भी एक आसमां हो... मेरा भी एक आसमां हो!
थांबतो... चित्रपट बघाच ! (प्राईम व्हिडिओवर आहे). माझी खात्री आहे तापसी पन्नू या अभिनेत्रीने साकारलेली अमृता तुम्हाला सहजासहजी विसरता येणार नाही. हे नक्की!
राजीव जतकर.
१८ डिसेंबर २०२१.
मी हा सिनेमा लॉकडाऊनच्या just आधी सिटी प्राईडला पाहिला होता. मला खूप भावला होता. हा वादग्रस्त विषय आहे तरी तू चित्रपटाचं अचूक परिक्षण केलं आहेस. या पार्श्वभूमीवर नुकतीच वाचनात आलेली ही धक्कादायक बातमी
ReplyDelete"The latest findings of the National Family Health Survey (NFHS) revealed that at least 30% of women respondents across 14 states and Union Territories justified women getting beaten by their husbands under certain circumstances."
On a lighter note - जे नवरा बायको एकमेकांवर हात उगारत असतील त्यांना हा प्रश्नंच येत नसेल!
अप्रतिम, खूप छान समीक्षण केले 👌👌👍👍💐💐
ReplyDeleteसर तुम्ही खूप सुंदर विश्लेषण केलय…नक्की बघणार👌👌👍👍
ReplyDeleteखूपच छान विश्लेषण..
ReplyDeleteराजीव खूप छान लिहिले आहेस. आणि तेही एवढे मोठे? भारी
ReplyDeleteApratim.Aapan cinema che key points perfect lihile aahet.
ReplyDeleteKhup sunder movie.
नेहमीप्रमाणे सहज आणि सुंदर लेखन झालं आहे. एखादी गोष्ट इतक्या एकाग्रपणे करणं आणि ते हि सिनेमाच्या बाबतीत म्हणजे ग्रेटच. ह्यापुढे कोणताही सिनेमा बघताना तुझी आठवण नक्की येईल. मी नक्कीच "थप्पड" बघीन. ज्या उत्कंठतेने तू लिहिले अहेस म्हणजे नक्कीच छान असणार त्यात वादच नाही.
ReplyDeleteपण हल्ली सगळीकडेच स्त्रीप्रधान चित्रपट होतात अशाच धर्तीवर एखादा पुरुषप्रधान चित्रपट असल्यास जारूर कळव कारण पुरुषाचा असतो तो अहंकार आणि स्त्रीचा असतो तो स्वाभिमान असेच चित्रपॅट हल्ली बघायला मिळतात
रवि.
राजू अतिशय सुंदर लिहिले आहेस. भारतीय स्त्रीच्या वेदना छान प्रकारे मांडल्या आहेत. या विषयावर इतकी छोटी प्रतिक्रिया देणं अशक्य आहे. लवकरच विस्तृत प्रतिक्रिया देईन.
ReplyDeleteशरद