'लालसिंग चड्ढा' - देखके भी दिल नही भरा... मैं की करां ?
![]() |
लालसिंग चड्ढा |
काही काही चित्रपट अतिशय दुर्दैवी असतात. कसदार अभिनय, नेत्रसुखद सिनेमॅटोग्राफी, कर्णमधुर संगीत, पार्श्वसंगीत, गीते, उत्तम लेखन अशी उत्कृष्ठ निर्मिती मूल्ये असलेला 'लालसिंग चड्ढा'
बॉक्स ऑफिसवर मात्र काहीसा अपयशी ठरला. अर्थात हा चित्रपट अपयशी ठरायला काही कारणे देखील आहेत जसे चित्रपटाची थोडी वाढलेली लांबी, चित्रपटाच्या विरोधात राबवली गेलेली बॉयकॉट मोहीम वगैरे.
त्यातही बॉयकॉट मोहिमेचा फटका चित्रपटाला अधिक बसला. सध्याच्या धार्मिक उन्मादी वातावरणामुळे आणि 'चित्रपट कितीही चांगला असला तरीही आम्ही तो बघणार नाही' अशी भूमिका बऱ्याच प्रेक्षकांनी
घेतल्यामुळे हा चांगला चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुरवातीला अपयशीच ठरला. हा चित्रपट जेंव्हा चित्रपटात प्रदर्शित झाला तेंव्हा
' ह्या चित्रपटात बहिष्कार घालण्यासारखं काय असावं' अशा विचाराने माझी उत्सुकता ताणली गेली होती. पण सोशल मीडिया वरील बॉयकॉट मोहिमे मुळे म्हणा, किंवा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर चित्रपटगृहा बाहेर बरीच आंदोलने वगैरे देखील होत होती, त्यामुळे म्हणा माझ्या सारख्या अनेक सामान्य प्रेक्षकांनी 'उगाच डोक्याला ताप नको' ह्या विचाराने चित्रपटगृहात जाणेच टाळले. कालांतराने हा चित्रपट नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झाला आणि मी तो लगेचच आवर्जून पहिला, आणि माझ्यासारख्या अनेकांनी देखील..
१९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ऑस्कर विजेत्या 'फॉरेस्ट गम्प' ह्या बॉलिवूड चित्रपटावर आधारित असलेला 'लालसिंग चड्ढा' हे फॉरेस्ट गम्प चे पूर्ण भारतीय रूप आहे, रिमेक आहे. फॉरेस्ट गम्प मी आधी पाहिलेला होताच, पण लालसिंग चड्ढा बघायच्या आधी तो पुन्हा बघितला आणि मग 'लालसिंग' बघायला बसलो. चित्रपटाच्या शीर्षक गीतापासूनच मी चित्रपटात गुंतत गेलो. सुरवातीलाच एक पांढरे शुभ्र पक्षाचे पीस अलगदपणे वाऱ्यावर उडत उडत ट्रेन मध्ये बसलेल्या लालसिंग चड्ढाच्या पायापाशी येऊन विसावते. लालसिंग हे मुलायम पीस अलगदपणे, हळुवारपणे आपल्या डायरीत ठेऊन देतो, आणि न कळत भूतकाळात जातो. प्रवासात त्याच्या भूतकाळातल्या आठवणी तो आपल्या सहप्रवाशांना सांगतो, आणि आपल्यापुढे फ्लॅशबॅक च्या माध्यमातून चित्रपटाचे कथानक उलघडत जाते.
![]() |
छोटा लालसिंग आणि रूपा |
लहानपणी लालसिंग पायात थोडा अधू असल्यामुळे त्याचे मित्र त्याला हिणवत असतात. त्याची चेष्टा मस्करी करत असतात. मात्र त्याच्या आईच्या (मोना सिंग) नजरेत लालसिंग सर्वोत्तम असतो. आई लालसिंग ला कायम स्वाभिमानाने जगण्याचा आत्मविश्वास देत असते. फारशी बौद्धिक गती नसलेल्या आणि पायाने अधू असलेल्या लालसिंग मध्ये स्वतःचे असे काही खास गुण देखील असतात. आपण विजेच्या वेगाने धावू शकतो हे लालसिंग ला एकदा अपघातानेच कळते. आईने आणि बालपणीच्या मैत्रिणीने (लहानपणीची 'हाफसा अश्रफ' आणि मोठेपणीची 'करीना कपूर') दिलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर तो पुढे त्याच्या जीवनप्रवासात यशस्वी होत जातो. १९८० च्या दशकापासून ते आत्ताच्या काळापर्यंतच्या भल्यामोठ्या घटनांची पार्श्वभूमी या कथेला आहे. कथेला सुरवात होते तो काळ असतो १९८३ च्या आसपासचा. १९८३ चा क्रिकेट विश्वकप मधील भारताचा विजय, अमृतसरच्या सुवर्ण मंदिर मधील लष्कराचा हस्तक्षेप, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या, त्यानंतर उसळलेल्या दंगली, लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा, बाबरी मशीद घटना, मुंबईमधील बॉम्ब स्फोटांची मालिका, कारगिल युद्धापासून ते आत्ताचे मोदी सरकार अशा घटनांच्या साक्षीने ही कथा घडत जाते..
फॉरेस्ट गम्प आणि लालसिंग चड्ढा ह्या दोन्हीही चित्रपटांची तुलना मी सुरवातीला करत होतो. पण नंतर मी तुलना करणे सोडून दिले, कारण दोन्हीही चित्रपटाची कथा जरी बऱ्यापैकी सारखी असली तरी त्यांची मांडणी पूर्णपणे वेगळी आहे. लालसिंग पूर्णपणे भारतीय चित्रपट आहे. फॉरेस्ट गम्प चे लालसिंग हे अंधानुकरण नक्कीच नाहीये. दोन्हीही चित्रपट आपापल्या जागी तितकेच सरस आहेत. एखाद्या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक करणे हे सोपे काम नाहीये. लेखक 'अतुल कुलकर्णी' याने हे आव्हान लीलया पेललं आहे. लालसिंग चड्ढाचे लेखन करून अतुल कुलकर्ण्यांनी त्यांच्या अंगी असलेला वेगळाच
कलाविष्कार यशस्वीपणे करून
दाखवलाय. अतुल कुलकर्ण्यांनी पटकथा लिहिताना फॉरेस्ट गम्प भारतीय रंगात अगदी बुचकळून काढलाय. दिग्दर्शक 'अद्वैत चंदन' याची कामगिरी देखील सरस आहे. त्याचा २०१७ साली आलेला 'सिक्रेट सुपरस्टार' हा चित्रपट देखील मला फार आवडला होता. (चित्रपट रसिकांनी तो जरूर पाहावा.)
लालसिंग चड्ढा या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची चळवळ योग्य होती का नव्हती हा वादाचा, चर्चेचा विषय आहे. ह्या वादात न पडता मी एवढेच म्हणेन की 'आता हा चित्रपट न बघणार्यांपेक्षा, बघणाऱ्यांची संख्या जास्त झालीये' ह्यात सगळं आलं. पूर्वी आमिरखान याने असाहिष्णुते वरून हिंदू धर्मियांचा अपमान केल्याचा आरोप त्याच्यावर होताच. त्यातच करीना कपूर हिने बॉयकॉट मोहिमे संदर्भात 'आमचा चित्रपट पाहायचा नसेल तर पाहू नका' असं वक्तव्य केलं आणि आगीत तेलंच पडलं. मग काय कुणीतरी ह्या सिनेमाला बॉयकॉट करण्याची फुसकुळी सोशल मीडियावर सोडून दिली. कट्टर धार्मिकांनी या फुसकुळीचं वादळात रूपांतर केलं आणि बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट बऱ्याच प्रेक्षकांनी पाठ फिरवली. पण झालं असं की बॉयकॉट वाल्यांना शिक्षा आमिरखान ला द्यायची होती, पण ती शिक्षा जास्त भोगली दिग्दर्शक अद्वैत चंदन, मराठमोळा लेखक अतुल कुलकर्णी, छायाचित्रकार सत्यजित पांडे, मोहमदभाई झालेला अभिनेता मानव वीज, छोट्या लाल, आणि रूपा ची भूमिका करणारे, गोड दिसणारे अहमद बीन उमर आणि हफसा अश्रफ, चित्रपट अप्रतिम करण्यासाठी चित्रपटात छोट्या छोट्या भूमिका करणारे, झटणारे सहकलाकार, स्पॉटबॉईज, लाईटमन, कॅमेरामन, संकलक, मेकअप आर्टिस्ट्स...
अश्या शेकडो कलाकारांनी !
माझं मात्र ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या बाबतीत असं झालं की...
तुमको पेहेली बार मैने देखा
बार बार फिर से देखा...
देखके भी दिल नाही भरा
मैं की करां ?
तर मुद्दा असा की मी चित्रपट पाहिला... तो मला त्यातील दोषांसकट आवडला. बात खतम !
राजीव जतकर
No comments:
Post a Comment