Saturday, 11 December 2021

साधी, सोपी, लोभस ... 'सायकल'

 

साधी, सोपी, लोभस... 'सायकल'



आज नेटफ्लिक्स वर 'सायकल' नावाचा अप्रतिम चित्रपट पाहिला आणि कळत मी भूतकाळात गेलो. कॉलेज मध्ये गेल्यावर मला वडिलांनी एक जुनी सायकल दिली आणि ते म्हणाले "तुझुआ आजोबांनी मला दिलेली त्यांची सायकल मी तुला देतोय. तुझ्यासाठी नवीन सायकल घेणे मला शक्य नाही. ही सायकल जुनी असली तरी खूप छान आहे वापर... तुला आवडेल". मी काहीश्या नाखुशीनेच आजोबांची ती जुनाट सायकल घेतली आणि वापरु लागलो. कालांतराने मला त्या जुन्या सायकलीची सवय झाली. माझ्या सायकलीवरून मी शहरभर भटकायचो. कित्येकवेळा सिंहगडावर देखील घेऊन जायचो. मग माझ्या सायकल बरोबर भावनिक बंध जुळले. पुढे अनेक वर्षाच्या वापरानंतर काळाच्या ओघात कधीतरी ती सायकल हरवली, बहुदा ती चोरीला गेली. आणि ती मला कधीच दिसली नाही. माझी सायकल हरवून आता जवळपास चाळीस वर्ष उलटली, पण तिची आठवण झाली की अजूनही मन कातर होतं.

 

नेमकी अशीच काहीशी पार्श्वभूमी असलेला सायकल हा चित्रपट पाहून मनात हुरहूर दाटून आली. प्रत्येकाच्याच आयुष्यात अशी एखादी खास वस्तू असतेच, जिच्यावर आपले मनापासून प्रेम असते. या चित्रपटाच्या नायकाचे केशवचे (हृषीकेश जोशी) देखील त्याच्या जुन्या सायकल वर नितांत प्रेम असते. केशवच्या आजोबांना इंग्रज अधिकाऱ्याने भारत सोडून जाताना ही सायकल भेट दिलेली असते. आजोबा ही सायकल त्यांच्या मुलाला म्हणजे केशवच्या वडिलांना देता नातवाला म्हणजे केशवाला देतात. केशवचे या सायकल बरोबर एक अतूटसे भावनिक नाते तयार झालेले असते. या सायकलला कुणी हात लावलेला देखील त्याला आवडत नसे. केशव एकवेळ आपलं काळीज काढून देईल, पण सायकलला कुणाला हात लावू देणं अशक्यच !  या जगावेगळ्या सायकल प्रेमामुळे केशवची सायकल साऱ्या पंचक्रोशीत प्रसिद्ध असते. 

 

गजा (प्रियदर्शन जाधव) आणि मंग्या (भाऊ कदम)

एकदा केशवच्या गावात चोरी होते. गजा (प्रियदर्शन जाधव) आणि मंग्या (भाऊ कदम) हे चोर गावातील एका घरातून बरेच दागिने आणि सोने पळवून घेऊन जाताना त्यांना केशव च्या घरासमोर सायकल दिसते. सायकलच्या मदतीने वेगाने पळून जात येईल या उद्देशाने ते केशवची सायकल देखील पळवतात. केशवच्या डोक्यावर दुःखाचा डोंगराचं कोसळतो. चोरीला गेलेल्या दागिन्यांऐवजी केशवच्या सायकलचीच चौकशी करायला सारा गाव केशवच्या घरी जमा होतो. कारण केशव आणि त्याच्या अनोख्या सायकलचं प्रेम जगजाहीर असतं. इकडे गजा आणि मंग्या पळून जातात खरे पण आजूबाजूच्या गावातून पाड्यातून जाताना सगळेच गावकरी केशव आणि त्याची सायकल ओळखत असतात. मग चोरी लपवण्यासाठी एका खोट्यातून दुसरे खोटे बोलताना गजा मंग्याची तारांबळ होत असते. या दोन चोरांची झालेली जी त्रेद्धातिरपीट उडते ती सिनेमा बघूनच अनुभवायला हवी. केशवाला त्याची सायकल परत मिळते का? गजा आणि मंग्याचं पुढं काय होतं? वगैरे प्रश्नांची उत्तरे हा चित्रपट पाहूनच मिळवण्यातच गंमत आहे.

 


 सायकलला केंद्रस्थानी ठेऊन गुंफण्यात आलेली ही कथा 'आउट ऑफ बॉक्स' आहे. सायकल या चित्रपटाची संपूर्ण कथा केशव आणि त्याच्या सायकल  फिरते. ही कथा १९५०-५२ च्या काळात म्हणजे साथ सत्तर वर्षांपूर्वी घडते. या काळात आपुलकी, जिव्हाळा, या शब्दांना महत्व होतं. मानवी व्यवहारात एकमेकांप्रती प्रेम होतं कथा, पटकथा, संवाद लेखक आदिती मोघे आणि दिग्दर्शक प्रशांत कुंटे यांनी या कथेतील प्रत्येक घटना, पात्रं, त्यांच्यातील भावबंध अतिशय सहज, सोपी, नैसर्गिक ठेवले आहेत. त्यामुळे आपण या कथेच्या प्रेमातच पडतो. वास्तविक कथा अतिशय छोटी आहे. मात्र या कथेची मांडणी अतिशय तरल आणि लोभस पद्धतीने साकारलेली आहे. आजकाल आपल्या जगण्यावागण्यातली निरागसता हरवत चाललेली आहे, आणि तीच निरागसता या चित्रपटात पकडण्यात आलेली आहे.   

 

 हृषीकेश जोशी (केशव)

या चित्रपटातील पात्रे अतिशय निरागस आहेत. निरागसपणा प्रत्येक अभिनेत्याने आपल्या अभिनयात नेमका पकडला आहे. सायकलची कथा कोकणातल्या एका छोट्या गावात घडते, त्यामुळे कोकणातली नैसर्गिक समृद्धी या कथेतल्या माणसांमध्ये देखील उतरलेली आहे. या चित्रपटाचं छायाचित्रण गुहागर, सावंतवाडी या सारख्या निसर्गरम्य परिसरात झालेलं आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर 'अमलेंदू चौधरी' यांचं अप्रतिम आणि नेत्रसुखद छायाचित्रण आपल्या मनात कितीतरी काळ साठून राहतं. उत्तम आणि तगडी स्टारकास्ट ही देखील या चित्रपटाची जमेची बाजू. भाऊ कदम आणि प्रियदर्शन जाधव ही जोडी त्यांच्या सयंत विनोदी ढंगाने चित्रपटात धमाल आणतात.  हृषीकेश जोशी यांनी कोकणातल्या मध्यमवर्गीय सज्जन केशवची भूमिका नेहेमीप्रमाणे लाजवाब वठवली आहे. मैथिली पटवर्धन या लहानग्या मुलीची भूमिका अतिशय गोड आणि लक्षात राहण्यासारखी आहे. अभिनयातील सहजता हे या चित्रपटाचं महत्वाचं वैशिष्टय सर्वच कलाकारांनी जपलं आहे. कथेतली वेगळेपण, अभिनयातील सहजता आणि निसर्गरम्य कोकण अनुभवण्यासाठी 'सायकल' सहकुटुंब बघायलाच हवा.

 

राजीव जतकर.

११ डिसेंबर २०२१.    

No comments:

Post a Comment