Monday, 5 February 2018

विजेचे अपघात टाळण्यासाठी सतर्कता आवश्यक...




विजेचे अपघात टाळण्यासाठी सतर्कता आवश्यक...


अपघात...  मग तो कसलाही असो, कोणालाच नको असतो. अतिरेक्यांचा अपवाद सोडला तर कोणीही जाणून बुजून दुसऱ्याला इजा करण्यासाठी अपघात घडवून आणत नाही. अपघात हे न कळत अचानक घडतात. रोज कुठे ना कुठेतरी अपघात घडतच असतात. प्राणहानी आणि वित्तहानीही होत असते. त्यातही विजेच्या असुरक्षित वापराने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण आणि त्यामुळे होणाऱ्या प्राणहानीचे प्रमाण प्रचंड जास्त आहे. विजेच्या अपघाताची मूळ कारणे म्हणजे असुरक्षित परिस्थितीत विजेची कामे करणे, अतिआत्मविश्वासाने आणि त्यामुळे योग्य काळजी न घेता विजेची कामे करणे किंवा वीज उपकरणे हाताळणे ही होय. एकूण अपघातांचं विशलेषण केलं तर असं आढळून येईल की ९५ टक्के अपघात हे असुरक्षित कृती (Unsafe Act) मुळे घडतात.

विजेच्या चुकीच्या हाताळणी मुळे होणारे अपघात वेगवेगळ्या पातळ्यांवर होतात. उच्चदाब असणाऱ्या विजेच्या पायाभूत सुविधांमध्ये होणारे अपघात हे तिथं प्रत्यक्ष काम करणाऱ्या  ठरू शकतात. मोठ्या प्रमाणावर वित्तहानी होणे. उच्चदाब व लघुदाबच्या पायाभूत सुविधा नागरी वस्तीतून असतात उदा. वीजवाहिन्या, रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर्स), व संबंधित उपकरणे यांची उभारणी व देखभाल वीज वितरण कंपन्या करीत असतात. या अवाढव्य व दूरवर पसरलेल्या वीजयंत्रणांची देखभाल करणे सोपे नसते. अपुऱ्या माणूसबळामुळे या देखभालीमध्ये कधी कधी दुर्लक्ष किंवा हलगर्जीपणा होतो आणि अपघात घडतात.

सर्वसामान्य नागरिकांना लघुदाब प्रकारचा वीजपुरवठा केला जातो. ही वीज वापरताना नागरिकांनी योग्य ती काळजी घेतली नाही तर अपघात घडू शकतात. आपल्या घरातील विजेची उपकरणे वापरताना सतर्कता बाळगायला हवी. असे छोटेमोठे विद्युत अपघात टाळण्यासाठी पुढील टिप्स निश्चितपणे उपयोगी ठरू शकतील.

१) वायरिंग किंवा कोणतीही विद्युत संच मांडणीची कामे मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदांरांकडून (लायसेन्सड इलेक्ट्रिकल काँट्रॅक्टर्स) करून घ्यावीत. ते कायद्याने बंधनकारक आहे. कोणत्याही अपघातानंतर पोलीस चौकशी दरम्यान 'विजेचे काम करणाऱ्या व्यक्तीकडे शासकीय परवाना होता काय ?' याची चौकशी केली जाते. 
२) वायरिंग चे काम करणाऱ्या कामगारांकडे (वायरमन) कडे शासनाचा परवाना (तारतंत्री परवाना) आहे का ते तपासूनच त्याला काम सुरु करू द्या.
३) वायरिंग चे साहित्य (उदा. वायर्स, केबल्स, पीव्हीसी पाईप्स, स्विचेस, सर्किटब्रेकर्स इत्यादि.) दर्जेदार आणि आयएसआय प्रमाणित असलेलेच वापरावे.
४) इलेक्ट्रिकल लोड नुसार योग्य क्षमतेचे फ्युज, वायर्स, स्विच चा वापर करा. 
५) विजेचे पंखे, फ्रिज, एसी मिक्सर अशी उपकरणे स्टार रेटिंगचीच (उदा. थ्री, फोर, फाईव्ह स्टार) असावीत. जितके स्टार रेटिंग जास्त तितका विजेचा वापर कमी. स्वाभाविकच सुरक्षे बरोबर विज बिलातही बचत.
६) वायरिंग करून घेताना धातूचे आवरण असलेल्या सर्व उपकरणांची जोडणी थ्री पिन सॉकेट द्वारेच करावी. प्लेग सॉकेट्स शटर्ड पद्धतीनेच वापरावेत. म्हणजे लहान मुले त्यात बोटे घालून होणाऱ्या अपघातापासून सुरक्षित राहतील.
७) विजेचा शॉक बसून होणारे अपघात टाळण्यासाठी 'अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर' (इएलसीबी) चा वापर करावा. इएलसीबी चा वापर देखील कायद्याने बंधनकारक आहे.
८) एका उपकरणांसाठी एकच प्लेग सॉकेट वापरावे. एकापेक्षा अधिक उपकरणे एकाच सॉकेट मध्ये जोडल्याने सॉकेट गरम होऊन अपघात होण्याची शक्यता असते.
९) तात्पुरत्या प्रकारचे वायरिंग करू नये, तसेच वायर्स ना जोड (जाईंट्स) देणे टाळावे. जुने झालेले वायरिंग बदलावे.
१०) ओल्या हाताने विद्युत उपकरणे हाताळू नये. बाथरूम मधील वॉटर हिटर्स, गिझर्स चालू बंद करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
११) मोठी घरे, बंगले, व्यावसायिक दुकाने, कार्यालये, कारखाने ई. ची वार्षिक तपासणी (एनर्जी ऑडिट) करावी. दहा वर्षांपूर्वीपेक्षा जास्त जुन्या वायरिंग ची तपासणी परवानाधारक विद्युत ठेकेदाराकडून करून घ्यावी व या तपासणी चा अहवाल (टेस्ट रिपोर्ट) त्यांच्याकडून न विसरता मागून घ्या.


वीज संच मांडणीतील 'अर्थिंग' हा सर्वात महत्वाचा भाग असतो. दुर्दैवाने या अर्थिंग कडे दुर्लक्ष झाल्यामुळे अपघात घडतात. औद्योगिक वीज संच मांडणीची वार्षिक तपासणी करण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. पण निवासी इमारतीच्या अर्थिंग ची तपासणी कधीच केली जात नाही. त्यामुळे घरगुती किंवा निवासी इमारतीच्या वायरिंग ची आणि अर्थिंग ची वार्षिक तपासणी कायद्याने बंधनकारक किंवा सक्तीची करणे आवश्यक आहे.
आपण जागतिक महासत्तेच्या दिशेने आगेकूच करत असताना छोट्या छोट्या चांगल्या सवयी अंगी बनल्या पाहिजेत. अपघात कोणतेही असोत, योग्य सतर्कता प्रत्येकाने दाखवली तर भारत अपघात मुक्त महासत्ता होऊ शकेल.

राजीव जतकर.
इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन

ऑफ महाराष्ट्र-पुणे विभाग     

Tuesday, 10 October 2017

अस्वस्थ मनाच्या लाटांचा घेतलेला वेध : 'कासव'

      अस्वस्थ मनाच्या लाटांचा घेतलेला वेध : 'कासव'


संकट आलं की कासव कसं शरीर आक्रसून आपल्या पाठीवरच्या कवचात घेतं, तसं आपलं मन आजारी असलं की ते स्वतःला आक्रसून घेऊन स्वतःच्याच कोषात बसतं कासवांसारखं ! काहीसे गूढ आणि अतर्क्य असलेलं मानवी मन जेंव्हा आजारी पडतं तेंव्हा मनाचा फारच गोंधळ उडतो. अगदी आपल्यासारख्या निरोगी मनाचा देखील कधी कधी गोंधळ उडतो. मनात निराशा दाटून येते. काहीच करावेसे वाटत नाही. पण मग त्यातून आपण स्वतःला सावरून घेत पुन्हा नव्या उमेदीनं भरभरून जगू लागतो. पण एखाद्याचे मन जेंव्हा जास्त आजारी पडते तेंव्हा त्या माणसाला औषधोपचाराबरोबरच बरोबरच्या आपल्या जवळच्या माणसांच्या मायेची गरज असते. आजूबाजूच्या जवळच्या माणसांनी या मनाने आजारी पडलेल्या व्यक्तीला मायेने सावरणे, गोंजाराने, प्रेम देणे आवश्यक असते, त्यामुळे ‘आजारी मन पुन्हा सावरू शकतं’, असाच काहीसा संदेश दिलाय ‘कासव’ नावाच्या सुंदर चित्रपटानं !

कासव आणि त्याच्या आश्चर्यकारक जीवनक्रमाच्या प्रतीकात्मक पार्श्वभूमीचा चपखल वापर करीत दिग्दर्शक द्वयीने आपली कथा या चित्रपटात साकारली आहे. नैराश्याच्या गर्तेत गेलेला 'मानव' ( अलोक राजवाडे ) नावाचा एक सुशिक्षित तरुण भरकटलेल्या अवस्थेत शहरातून भटकताना चित्रपटाची सुरवात होते. हा तरुण मनाने आजारी आहे. नैराश्याचा आवेग प्रमाणाबाहेर वाढल्याने हा तरुण एका निर्मनुष्य पुलावर बसून आत्महत्येचा प्रयत्न करतो. कुणीतरी त्याला हॉस्पिटलात पोहोचवतं. शुद्धीवर आल्यावर हा तरुण तिथूनही पळून जातो. पुढे असाच भरकटलेल्या अवस्थेत हा तरुण कुठल्याश्या धाब्यावर मृतवत पडलेल्या अवस्थेत जानकी ( इरावती कर्वे ) ला सापडतो. जानकी कोकणातल्या गावी कासव संगोपन केंद्रात काही संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी जात असते. जानकी ह्या तरुणाला आपल्याबरोबर कोकणातल्या गावी घेऊन जाते. जानकी ला देखील आपल्या पूर्वायुष्यात अश्याच काहीश्या आजाराला सामोरे जावे लागलेले असल्यामुळेच की काय जानकी या तरुणाला आधार देते. त्याला समजावून घेते. त्याच्यावर औषधोपचार करते. जानकीच्या या प्रयत्नात तिचा ड्रायव्हर आणि तिच्या सर्व कामात मदत करणारा यदु ( किशोर कदम ), परशु ( ओंकार घाडी ), दत्ताभाऊ ( डॉ. मोहन आगाशे ), बाबल्या ( संतोष रेडकर ) यांचे योगदान फार महत्वाचे ठरते. कथेत पुढे काय होते ते पडद्यावर पाहणे च योग्य ठरेल.


हा चित्रपट अनेक पातळ्यांवर अप्रतिम आहे. सुमित्रा भावे आणि सुनील सुखटणकर या जोडीच्या दिग्दर्शन कौशल्यावर लिहावे तितके थोडेच आहे. त्यांच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणे किंबहुना त्याहूनही सरस असा हा चित्रपट ठरावा. त्यावर अनेक उत्तमोत्तम चित्रपट समीक्षक भरभरून लिहीतीलच, पण मला जास्त भावले ते चित्रपटातील अर्थपूर्ण संवाद !  जीवनविषयक तत्वज्ञान सहज सोप्या भाषेत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुमित्रा भावे यांच्या संवाद लेखनानं केलय. या माध्यमातूनच ‘दत्ताभाऊ’ जुन्या पिढीचे ‘मन निरोगी ठेवण्याचे रहस्य सतत कार्यमग्न राहण्यात आहे’ असे भाष्य करतात. आजारी मनाच्या माणसाला हाताळताना ‘यदु’ आपल्यासारख्या  सर्वसामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करतो.

मला सर्वात जास्त आकर्षित केलं ते बाबल्या आणि परशु यांच्या तोंडी असलेल्या संवादानं. या पैकी संतोष रेडकर हा दशावतारात काम करणारा स्थानिक कलाकार आहे. स्वतः अनाथ असणारा, हॉटेल मधील चहा वाटणाऱ्या पोऱ्याचे काम करणारा 'परशु' त्याच्या सहज अभिनयानं आणि संवादांनं प्रेक्षकांना जिंकतो. नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या मानव ला हा लहान पोऱ्या सोप्या भाषेत 'जीवनात कसे वागावे' ते सांगतो. तो एकदा मानव शी बोलताना सहज बोलून जातो "एकावेळी एकाच करुचा. भजी खाऊची तर भजी खाऊची, चाय पिउची तर चाय पिउची... आनी दोनी एकदम कोंबलं तर ठसको लागतलो." मनावर कमी ताण येण्यासाठी 'एकावेळी एकाच काम करावे' हे साधं सोपं तत्वज्ञान हा लहानगा सहज सांगून जातो. "कुटुंबाची व्याख्याच बदलायला हवी, कुटुंब हवंच आधाराला, पण मनाच्या नात्यांच, नुसत्या रक्ताच्या नात्यांनी कुटुंब आता ठरणार नाही." हे जानकीचं स्वगत प्रेक्षकांना अंतर्मुख करून जातं.

चित्रपट पाहताना धनंजय कुलकर्णी यांचं छायांकन मन प्रसन्न करतं. उसळणारा समुद्र, किनाऱ्याकडे फेसाळत येणाऱ्या समुद्र लाटा यांचं चित्रण अतिशय सुरेख आहे.  कोणताही चित्रपट पाहताना माझं लक्ष त्यातील संगीताकडे आणि पार्श्वसंगीताकडे जरा जास्तच असतं. साकेत कानेटकर यांनी संगीत देताना जपलेलं वेगळेपण जाणवतं. 'लेहेर समंदर रे' आणि 'अपनेही धून में' हि गाणी बरीचशी लोकसंगीताकडे झुकणारी, खूप वेगळी आणि मनाला थेट भिडणारी !

हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने पहिलाच पाहिजे. वेगळं काही पाहू इच्छिणाऱ्या चित्रपट रसिकांसाठी साठी तर हा चित्रपट म्हणजे पर्वणीच !

राजीव जतकर