विजेचे अपघात टाळण्यासाठी सतर्कता आवश्यक...
अपघात... मग तो कसलाही असो, कोणालाच नको असतो. अतिरेक्यांचा अपवाद सोडला तर कोणीही जाणून बुजून दुसऱ्याला इजा करण्यासाठी अपघात घडवून आणत नाही. अपघात हे न कळत अचानक घडतात. रोज कुठे ना कुठेतरी अपघात घडतच असतात. प्राणहानी आणि वित्तहानीही होत असते. त्यातही विजेच्या असुरक्षित वापराने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण आणि त्यामुळे होणाऱ्या प्राणहानीचे प्रमाण प्रचंड जास्त आहे. विजेच्या अपघाताची मूळ कारणे म्हणजे असुरक्षित परिस्थितीत विजेची कामे करणे, अतिआत्मविश्वासाने आणि त्यामुळे योग्य काळजी न घेता विजेची कामे करणे किंवा वीज उपकरणे हाताळणे ही होय. एकूण अपघातांचं विशलेषण केलं तर असं आढळून येईल की ९५ टक्के अपघात हे असुरक्षित कृती (Unsafe Act) मुळे घडतात.
विजेच्या चुकीच्या हाताळणी मुळे होणारे अपघात वेगवेगळ्या पातळ्यांवर होतात. उच्चदाब असणाऱ्या विजेच्या पायाभूत सुविधांमध्ये होणारे अपघात हे तिथं प्रत्यक्ष काम करणाऱ्या ठरू शकतात. मोठ्या प्रमाणावर वित्तहानी होणे. उच्चदाब व लघुदाबच्या पायाभूत सुविधा नागरी वस्तीतून असतात उदा. वीजवाहिन्या, रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर्स), व संबंधित उपकरणे यांची उभारणी व देखभाल वीज वितरण कंपन्या करीत असतात. या अवाढव्य व दूरवर पसरलेल्या वीजयंत्रणांची देखभाल करणे सोपे नसते. अपुऱ्या माणूसबळामुळे या देखभालीमध्ये कधी कधी दुर्लक्ष किंवा हलगर्जीपणा होतो आणि अपघात घडतात.
सर्वसामान्य नागरिकांना लघुदाब प्रकारचा वीजपुरवठा केला जातो. ही वीज वापरताना नागरिकांनी योग्य ती काळजी घेतली नाही तर अपघात घडू शकतात. आपल्या घरातील विजेची उपकरणे वापरताना सतर्कता बाळगायला हवी. असे छोटेमोठे विद्युत अपघात टाळण्यासाठी पुढील टिप्स निश्चितपणे उपयोगी ठरू शकतील.
१) वायरिंग किंवा कोणतीही विद्युत संच मांडणीची कामे मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदांरांकडून (लायसेन्सड इलेक्ट्रिकल काँट्रॅक्टर्स) करून घ्यावीत. ते कायद्याने बंधनकारक आहे. कोणत्याही अपघातानंतर पोलीस चौकशी दरम्यान 'विजेचे काम करणाऱ्या व्यक्तीकडे शासकीय परवाना होता काय ?' याची चौकशी केली जाते.
२) वायरिंग चे काम करणाऱ्या कामगारांकडे (वायरमन) कडे शासनाचा परवाना (तारतंत्री परवाना) आहे का ते तपासूनच त्याला काम सुरु करू द्या.
३) वायरिंग चे साहित्य (उदा. वायर्स, केबल्स, पीव्हीसी पाईप्स, स्विचेस, सर्किटब्रेकर्स इत्यादि.) दर्जेदार आणि आयएसआय प्रमाणित असलेलेच वापरावे.
४) इलेक्ट्रिकल लोड नुसार योग्य क्षमतेचे फ्युज, वायर्स, स्विच चा वापर करा.
५) विजेचे पंखे, फ्रिज, एसी मिक्सर अशी उपकरणे स्टार रेटिंगचीच (उदा. थ्री, फोर, फाईव्ह स्टार) असावीत. जितके स्टार रेटिंग जास्त तितका विजेचा वापर कमी. स्वाभाविकच सुरक्षे बरोबर विज बिलातही बचत.
६) वायरिंग करून घेताना धातूचे आवरण असलेल्या सर्व उपकरणांची जोडणी थ्री पिन सॉकेट द्वारेच करावी. प्लेग सॉकेट्स शटर्ड पद्धतीनेच वापरावेत. म्हणजे लहान मुले त्यात बोटे घालून होणाऱ्या अपघातापासून सुरक्षित राहतील.
७) विजेचा शॉक बसून होणारे अपघात टाळण्यासाठी 'अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर' (इएलसीबी) चा वापर करावा. इएलसीबी चा वापर देखील कायद्याने बंधनकारक आहे.
८) एका उपकरणांसाठी एकच प्लेग सॉकेट वापरावे. एकापेक्षा अधिक उपकरणे एकाच सॉकेट मध्ये जोडल्याने सॉकेट गरम होऊन अपघात होण्याची शक्यता असते.
९) तात्पुरत्या प्रकारचे वायरिंग करू नये, तसेच वायर्स ना जोड (जाईंट्स) देणे टाळावे. जुने झालेले वायरिंग बदलावे.
१०) ओल्या हाताने विद्युत उपकरणे हाताळू नये. बाथरूम मधील वॉटर हिटर्स, गिझर्स चालू बंद करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
११) मोठी घरे, बंगले, व्यावसायिक दुकाने, कार्यालये, कारखाने ई. ची वार्षिक तपासणी (एनर्जी ऑडिट) करावी. दहा वर्षांपूर्वीपेक्षा जास्त जुन्या वायरिंग ची तपासणी परवानाधारक विद्युत ठेकेदाराकडून करून घ्यावी व या तपासणी चा अहवाल (टेस्ट रिपोर्ट) त्यांच्याकडून न विसरता मागून घ्या.
वीज संच मांडणीतील 'अर्थिंग' हा सर्वात महत्वाचा भाग असतो. दुर्दैवाने या अर्थिंग कडे दुर्लक्ष झाल्यामुळे अपघात घडतात. औद्योगिक वीज संच मांडणीची वार्षिक तपासणी करण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. पण निवासी इमारतीच्या अर्थिंग ची तपासणी कधीच केली जात नाही. त्यामुळे घरगुती किंवा निवासी इमारतीच्या वायरिंग ची आणि अर्थिंग ची वार्षिक तपासणी कायद्याने बंधनकारक किंवा सक्तीची करणे आवश्यक आहे.
आपण जागतिक महासत्तेच्या दिशेने आगेकूच करत असताना छोट्या छोट्या चांगल्या सवयी अंगी बनल्या पाहिजेत. अपघात कोणतेही असोत, योग्य सतर्कता प्रत्येकाने दाखवली तर भारत अपघात मुक्त महासत्ता होऊ शकेल.
राजीव जतकर.
इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन
ऑफ महाराष्ट्र-पुणे विभाग
No comments:
Post a Comment