मला आवडलेलं पुस्तक
'धार्मिक'
लेखक: अनिल अवचट.
'धार्मिक' हे अनिल अवचटांचं पुस्तक मी खूप वर्षांपूर्वीच वाचलं होतं. 'द गॉड डिल्युजन' या पुस्तकाच्या वाचनानंतर मी धार्मिक पुन्हा वाचलं. खरं तर मी हे पुस्तक अनेकदा वाचलंय. देव, धर्म, जात-पात, श्रद्धा अंधश्रद्धा ह्याच विषयावरचं हे पुस्तक मला आवडण्याची अनेक कारणं आहेत. या पुस्तकावर काही लिहावं असं मला नेहमी वाटत असे. पण आज त्याला मुहूर्त लागला.
अनिल अवचट हे माझे आवडते लेखक. त्यांचं लिहिणं साधं, सोपं, सामान्यातल्या सामान्य वाचकाला ते कळावं असं होतं. त्यांची सगळीच पुस्तकं माझ्या संग्रही आहेत. अनिल अवचट हे समाजातील ज्वलंत विषयावर पोटतिडीकेने लिहीणारे लेखक होते. त्यांचं लिखाण एखाद्या साचेबद्ध चौकटीत मावणारं नव्हतं. कोणत्याही अडथळ्याला न भिता विषयाला बेधडक भिडणारे ते लेखक होते. वेगवेगळ्या विषयांवर लिहीताना एका-एका लेखासाठी त्यांनी प्रचंड भटकंती केली होती. सामाजिक प्रश्नांची मांडणी करण्यासाठी ते सामान्य लोकांत मिसळून जायचे. लोकांच्या घरात राहून त्यांचे प्रश्न समजाऊन घ्यायचे. अवचटांची पुस्तकं वाचताना ते आपल्याशी समोर बसून गप्पाच मारत आहेत असे वाटते. सामाजिक विषयांवर लिहिण्या व्यतिरिक्त
ते बासरी वाजवत असंत. ‘ओरिगामी’ ह्या कागदांच्या घड्या घालून विविध आकार तयार करण्याच्या जपानी कलेमध्ये रमत. सामाजिक प्रश्नांमध्ये अंधश्रद्धा, वेश्या वस्तीमधील स्त्रिया, आदिवासी, हमालांचे प्रश्न, दलित, व्यसनी लोकांच्या समस्या व अशा अनेक सामाजिक प्रश्नांवर त्यांनी अप्रतिम लेखन केलेय. विविध लोकांशी संवाद साधत, त्यांची सुखदुःखे जाणून घेत त्यांनी हे विपुल लेखन केलेय. सामाजिक समस्या, बासरी वादन, ओरिगामी, लाकडांच्या कलाकृती अशा अनेक गोष्टीतून ते आनंद मिळवत असंत. ते म्हणायचे "माध्यम कोणतेही असो, व्यक्त होणे महत्त्वाचे!"
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस या प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या अनिल अवचटांच्या 'धार्मिक' या पुस्तकात एकूण सहा प्रकरणे आहेत. पैकी 'बुवाबाई', 'शेखसल्ल्याचा उरूस', 'देवदासी- एक मागोवा', 'झपाटलेलं गाणगापूर', 'बुवा वाघमारे' या पाच लेखांमध्ये हिंदू मुस्लिम धर्मामधील अंधश्रद्धांवर भाष्य केले आहे. 'बुवाबाई' आणि 'बुवा वाघमारे' या लेखात निर्मलामाता आणि बुवा वाघमारे यांच्या भोंदुगिरी, अंधश्रद्धा आणि सामान्य माणसांच्या असहाय्यतेचा घेतला जाणारा गैरफायदा यावर अवचरांनी आपली निरीक्षणे नोंदवली आहेत. आजारपण, आर्थिक विवंचना, कौटुंबिक कलह आणि नैराश्य यामुळे खचलेली माणसे आधाराच्या शोधात बुवा-बाबांच्या कशी आहारी जातात हे सांगितले आहे. या बुवांच्या मागे धावणाऱ्या भक्तांच्या मानसिकतेचा वेधही अवचटांनी घेतलेला आहे. भक्तांच्या श्रद्धेचा आणि भीतीचा फायदा घेऊन हे बुवा बाई कसे स्वतःचे साम्राज्य उभे करतात, आणि सामान्य, असहाय माणसांची कशी लूट करतात हे अवचटांनी पुराव्यासकट मांडले आहे.
देवाच्या किंवा आस्तिकतेच्या विरोधात बोलणाऱ्या डॉ. अनिल अवचट किंवा नरेंद्र दाभोळकर यांच्यासारख्या विचारवंतांच्या बाबतीत 'हे फक्त हिंदू धर्माविरोधातच बोलतात' असा आक्षेप घेतला जातो. पण हे खरे नाही. नरेंद्र दाभोळकर किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समिती असो किंवा लेखक अनिल अवचट असोत ही तर्कवादी मंडळी सर्वच धर्मातील अंधश्रद्धांबद्दल देखील बोलतात. हे मी पुरावे देऊन खात्रीने सांगू शकतो. अवचटांच्या 'धार्मिक' पुस्तकातील 'शेखसल्ल्याचा उरूस' या लेखामध्ये ते मुस्लिम धर्मातील चुकीच्या प्रथा, अंधश्रद्धा यावर ते स्पष्टपणे भाष्य करतात. पुण्यातील शेख सल्लाउद्दीन दर्ग्याच्या उरूसातील (उत्सावातील) निरीक्षणे त्यांनी नोंदवली आहेत. त्याचबरोबर ते वर्षानुवर्षे सुरू असलेल्या उत्सवातून हिंदू-मुस्लिम यांच्या सामाजिक ऐक्याचे संवेदनशील चित्रण करतात.
या पुस्तकातील 'देवदासी: एक मागोवा' या प्रकरणात लेखक देवदासी प्रथा, त्यांचे ‘जटा’ निर्मूलन, देवदासींचे पुनर्वसन अशा सामाजिक वास्तवाचा वस्तुनिष्ठ आढावा घेताना दिसतात. प्रत्यक्ष निरीक्षणे, अभ्यासपूर्ण संदर्भ आणि मानवी संवेदना यांच्या आधारे अवचटांनी हा विषय वाचकांसमोर मांडला आहे. धार्मिक आणि सामाजिक प्रथांच्या मुळाशी जाऊन त्यामागची कारणे व परिणाम तपासण्याची अवचटांची वृत्ती या लेखात ठळकपणे जाणवते. देवदासी प्रथेवरील हा लेख एका प्रथेची माहिती देण्यापुरता मर्यादित न राहता देवदासींच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला शासकीय प्रयत्नातील आव्हाने, त्याचबरोबर आपल्या समाजाची जबाबदारी अधोरेखित करतो.
'झपाटलेलं गाणगापूर' या लेखात गाणगापूर येथील दत्त मंदिरात येणाऱ्या झपाटलेल्या किंवा भूतबाधा झालेल्या लोकांचे व त्यांच्या नातेवाईकांचे सूक्ष्म निरीक्षण लेखकानं केलेलं आढळतं. आणि लेखक स्वतः डॉक्टर असल्याने केवळ धार्मिक किंवा पारंपरिक चष्म्यातून न पाहता, त्यामागील मानसशास्त्रीय कारणांचा ते अचूक वेध घेतात. अंगात येणाऱ्या किंवा झपाटलेल्या व्यक्तींमध्ये स्त्रियांचे प्रमाण का असते? याचा देखील शोध घेऊन सोप्या पद्धतीने समजावून सांगतात. यामागे कौटुंबिक दडपणे, अन्याय आणि व्यक्त होण्यासाठी नसलेली जागा ही कारणे कशी कारणीभूत ठरतात, हे ते हळुवारपणे उलगडून दाखवतात. गाणगापूरचा परिसर, तिथले वातावरण, भक्तांची धावपळ, त्यांचे अगतिक चेहरे, आरत्यांचा गोगाट याचे वर्णन पुस्तक वाचताना वाचकांच्या डोळ्यांसमोर उभे राहते. गाणगापूरला चालणारे कर्मकांड, मंत्रतंत्र आणि त्यातून होणारे आर्थिक आणि मानसिक शोषण यावर लेखकाने परखड भाष्य केलंय.
'बुवा वाघमारे' यांचं 'योनीपूजा' प्रकरण पुण्यात खूप गाजलं होतं. धार्मिकतेच्या नावाखाली चालणाऱ्या 'योनीपूजे'सारख्या गैरप्रकाराच्या मुळाशी कोणती मानसिकता दडलेली असते. याचं वास्तववादी लेखन अवचटांनी केलं आहे. या प्रकरणातील सुत्रधार माणिक वाघमारे, त्याच्या पापात साथ देणाऱ्या वहिनी, तसेच या प्रकरणाचा शोध घेणारे पोलीस, पत्रकार यांची देखील बाजू समजावून घेऊन अवचटांनी वाघमारेचं वास्तववादी लेखन केलं आहे.
'इतस्ततः' हे या पुस्तकातील मला सर्वात आवडलेलं शेवटचं प्रकरण! एकुणातच या आधीच्या सर्व प्रकरणांचा गोषवारा म्हणजे 'इतस्ततः'! अवचटांचं हे 'स्वगत' म्हणता येईल. या शेवटच्या लेखातील काही वाक्यं मला खूप आवडली. जसे…
· अंधश्रद्धा ही अशिक्षितांमध्ये असते असा माझा पूर्वी समज होता. पण आता फिरायला लागल्यावर असं दिसतं, एक वेळ अशिक्षित परवडले अशी सुशिक्षितांमध्ये अंधश्रद्धा आहे. अडाण्यांना समजावून दिलं तर पटू शकतं. पण शहाण्यांना समजावायला गेलं तर तेच उलट विज्ञानाची परिभाषा वापरून आपल्याला समजावू लागतात.
· आपला सुशिक्षित मध्यमवर्ग 'गुरू' या प्रकाराच्या आहारी गेलेला दिसतो.
· अंधश्रद्धेसारखा खुळचटपणा फक्त हिंदू धर्मातच चालतो असे नाही, तर तो सर्वच धर्मात आहे. आधुनिक जगात रूढ असलेल्या ख्रिश्चन धर्मातही असा अंधश्रद्धेचा भरपूर मालमसाला भरलेला आहे.
· 'भविष्य' हे अजूनही एकुणच समाजाच्या डोक्यात असलेलं एक मोठं भूत आहे. या मागे खरोखरच काही शास्त्र आहे की नाही, शास्त्र म्हणायला कुठल्या परीक्षांमधून जावे लागते याचा काहीही विचार न करता लोक त्यावर लग्नासारखे किंवा मुलांना शिक्षणात कुठल्या शाखेत घालावे किंवा तत्सम अतिशय महत्त्वाचे निर्णय अवलंबून ठेवतात. जोतिष्याच्या सांगण्यावरून आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेतो याला काय म्हणावे?
· आपल्याकडच्या सुशिक्षित, बुद्धिजीवी वर्गास कणाच दिसत नाही. एखादा माणूस चुकीचं बोलू - लिहू लागला तर त्याला कुणी अडवतच नाही. 'असेल बूक त्यात काहीतरी' अशा वृत्तीने बहुतेकजण गप्प बसतात. त्यामुळे ती चुकीची गोष्ट रूढ होऊन बसते.
· लोक नुसते भविष्य बघून थांबत नाहीत, तर त्याही पुढे जाऊन भविष्य बदलायची हास्यास्पद खटपट करतात. शनी चांगला नाही, मग शनीला शांत करा. जोतिषीच सांगतात गुरूचा खडा घाला म्हणजे तो तुम्हाला लाभेल.
· गावात संडासाची सोय नाही, पण त्याच गावात संगमरवरी फरशा घातलेली, सोन्याचे कळस लावलेली देवळं मात्र असतात. याला काय म्हणावे?
· धर्म हा अवडंबर माजवूनही व्यक्त करता येतो आणि लोकोपयोगी कार्यातूनही व्यक्त होऊ शकतो. निवड आपण करायची आहे.
· जी श्रद्धा माणसाला व्यापक बनवते, धर्म, जात, देश या पलीकडे जाऊन माणसाकडे माणूस म्हणून बघायला शिकवते; एवढेच काय निसर्गातल्या प्राणी, वनस्पती यांसारख्या घटकांशी जुळवून घ्यायला शिकवते ती आवश्यक श्रद्धा! आणि या उलट जी श्रद्धा माणसाला संकुचित बनवत असेल ती घातक श्रद्धा किंवा अंधश्रद्धा.
या प्रकरणातील शेवटचे वाक्य फार महत्त्वाचे आहे.
· अंधश्रद्धेचा प्रभाव समाजात इतका जबरदस्त आहे की त्याविरुद्ध आवाज उठवणारी शक्ती अगदी क्षुल्लक आहे. पण अंधश्रद्धेविरुद्ध अजिबातच आवाज उठवला जात नाही अशा परिस्थितीपेक्षा क्षीण का होईना पण आवाज उठवला ही परिस्थिती जास्त बरी आहे.
माझ्या मते माणूस देवनिर्मित नसून देव मानवनिर्मित आहे. मानवाला सुचलेली, पण एका अर्थाने उपयुक्त कल्पना म्हणजे देव! आदिकाळात सुरुवातीला रानटी अवस्थेत माणूस भटक्या होता. स्वतःचं पोट भरणं आणि स्वसंरक्षण करणं या त्याच्या प्राथमिक गरजा होत्या. एकट्यानं राहण्यापेक्षा समुदायात म्हणजेच समाजात राहण्यानं पोट भरणं आणि संरक्षण करणं म्हणजेच जिवंत राहणं जास्त सोपं जातं अश्या विचाराने तो एकत्रित राहू लागला. परंतु एकत्र राहिल्यानं अनेक प्रश्न निर्माण झाले. मग समाज धरून ठेवण्यासाठी 'धर्म' या संकल्पनेचा उदय झाला. समाजातील श्रेष्ठ विचारवंतांनी एकत्र येऊन समाजात वागण्याचे नियम तयार केले. तेच म्हणजे धर्म. सगळ्या समाजासाठी चांगलं काम ते धर्म व समाजासाठी वाईट काम ते अधर्म. धर्माने जरी नीतीने वागणुकीचे नियम करून दिले असले तरी ते समाजातील सर्व लोक पाळतीलच असे म्हणता येत नाही. त्यांच्यावर वचक असावा म्हणून 'देव' या कल्पनेचा बागुलबुवा निर्माण केला गेला असावा. थोडक्यात माणसानं नीतीने वागावं यासाठी देवाची भीती दाखविली गेली. पूजाअर्चा करण्यासाठी कल्पनेतला अमूर्त देव मूर्तीरुपात अवतरला. त्याची मंदिरं झाली.
देव ह्या संकल्पनेचा एक महत्वाचा फायदा म्हणजे माणसाच्या अडचणीच्या किंवा संकटाच्या काळात त्याला जो मानसिक आधार हवा असतो तो काल्पनिक असलेल्या का होईना या देवा’कडून मिळतो. देवावर आपल्या अडचणी सोपवून माणूस निश्चिन्त राहून आलेल्या संकटांना सामोरे जातो. नास्तिकवादी विचारानुसार देव अस्तित्वात नाही. कारण त्याचं अस्तित्व कुठेच जाणवत नाही. तो पाप्यांना शिक्षा देत नाही किंवा पुण्यवंतांना बक्षीस देत नाही. उघड्या डोळ्यांनी तो अन्याय, अत्याचार बघतो. देव अस्तित्वात असता तर त्यानं हे सहन केलं असतं का?
देव आहे की नाही हे मानणं हे ज्याच्या त्याच्या वैचारिक कुवतीवर व भावनांवर अवलंबून असतं. मला मध्यंतरी सुप्रसिद्ध कवी संदीप खरे याची एका कार्यक्रमात मुलाखत घेण्याचा योग आला. त्या मुलाखती दरम्यान मी संदीपला ‘तो आस्तिक आहे का नास्तिक आहे?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्याने त्याच्या खास शैलीत कवितेतूनच माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले. तो म्हणाला...
ईश्वर आहे अथवा नाही मला विचारे कोणी...
विनम्र भावे उत्तर देतो हात जोडुनी दोन्ही.
ईश्वर आहे.. परंतु त्याची किमया विचित्रवाणी
तोच सुचवतो मला सारखी नास्तिकतेची गाणी...
कुसुमाग्रजांना एकदा कुणीतरी विचारलं होतं 'देव आहे का नाही?' त्यावर ते म्हणाले 'ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी तो आहे. ज्यांना गरज नाही त्यांच्यासाठी तो नाही'. इतकं साधं आणि सोपंय ते...
'धार्मिक' हे पुस्तक अशोक कोठावळे यांच्या 'मॅजेस्टिक प्रकाशनाने' प्रकाशित केलंय. या पुस्तकातील मुखपृष्ठ आणि अंतर्गत रेखाटने चित्रकार ‘सुभाष अवचटां’ची आहेत. सुमारे १७० पानी असलेले हे छोटेखानी पुस्तक वाचकांना विचार करायला भाग पाडते. श्रद्धा-अंधश्रद्धा, आस्तिक-नास्तिक, देवाचे अस्तित्व, धर्म-अधर्म हे सगळे फार घोटाळ्याचे विषय आहेत. या विषयी सर्वच मानव जमात खूप गोंधळलेली आहे. हे पुस्तक आस्तिक आणि नास्तिक दोनीही वाचकांनी आवर्जून वाचलं पाहिजे.
'द गॉड डिल्युजन' आणि 'धार्मिक' ह्या पुस्तकांची रसग्रहणे लिहिताना मी माझ्या एका मित्राशी गप्पा मारत होतो, त्याला हे सर्व विचार पटत नव्हते. देवाचे नसलेले अस्तित्व आणि नास्तिकता यावर चर्चा करण्याजोगे त्याचे मुद्दे संपल्यावर त्याने त्याच्या वैचारिक भात्यातला शेवटचा बाण काढला. तो म्हणाला, 'एकूण समाजातील जवळजवळ पंचाऐंशी टक्के लोक देव मानतात, ते आस्तिक असतात, ते काय मूर्ख असतात का?'
त्याच्या ह्या अजब तर्कावर आमची चर्चा संपली. असो... हे असंय सगळं.!
राजीव जतकर
६ डिसेंबर २०२६





No comments:
Post a Comment