मला आवडलेलं पुस्तक
'द गॉड डिल्युजन'
लेखक: रिचर्ड डॉकिन्स.
मध्यंतरी गणेशउत्सवा दरम्यान 'विद्यानंद बापट' या व्यक्तिकडे सर्वच महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले. गणेशउत्सवाच्या काळात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाला विरोध करत 'डिजे' च्या वापरा विरोधात त्यांनी भूमिका मांडली. त्यांच्या प्रत्येक मुलाखती मध्ये त्यांनी त्यांची सामाजिक आणि वैचारिक भूमिका अतिशय स्पष्टपणे आणि निर्भयपणे मांडली. त्यावेळी बऱ्याच मुलाखतींमध्ये त्यांना त्यांच्या नास्तिक विचारसरणीबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आले. आपण नास्तिक कसे झालो, कधी झालो आणि यामागे कोणत्या विचारवंतांचा व पुस्तकांचा प्रभाव पडला, याचा त्यांनी सविस्तर खुलासा देखील केला. विद्यानंद बापट यांनी त्यांच्या नास्तिक विचारांना वैचारिक आधार मिळवून देण्यात सुप्रसिद्ध लेखक 'रिचर्ड डॉकिन्स' यांच्या 'द गॉड डिल्युजन' पुस्तकाची महत्त्वाची भूमिका आहे असे वारंवार सांगितले. तसेच विल्यम क्रेट आणि जॉन लेनॉन यांच्याही पुस्तकांचा आपल्या विचारांवर प्रभाव पडल्याचे सांगितले. 'द गॉड डिल्युजन' वाचल्यावर देव, श्रद्धा, नास्तिकता या बाबतच्या आपल्या विचारांमध्ये स्पष्टता आली असेही त्यांनी सांगितले. स्वाभाविकच 'द गॉड डिल्युजन' या पुस्तकाबद्दलची माझी उत्सुकता चाळवली गेली. 'मधुश्री प्रकाशना'ने प्रकाशित केलेले 'मुग्धा कर्णिक' यांनी भाषांतरीत केलेले 'द गॉड डिल्युजन' अर्थात 'देव नावाचा भ्रम' हे पुस्तक मी विकत घेऊन झपाटल्या सारखे वाचून काढले.
ऑक्सफर्ड विद्यापीठात विज्ञानाचे प्राध्यापक असलेल्या डॉ. रिचर्ड डॉकिन्स यांचे 'द गॉड डिल्युजन' हे पुस्तक सर्व धर्मांतील येशू, देव, इश्वर, अल्ला, परमेश्वर या कल्पनेला सुरुंग लावणारे आहे. सुमारे साडेचारशे पानांचे हे पुस्तक विज्ञानाच्या अंगाने प्रवास करते आणि आपल्यासारख्या सामान्य आणि गोंधळलेल्या मनातील 'देव' नावाचा भ्रम समूळ नष्ट करण्यास मदत करते. लेखक रिचर्ड डॉकिन्स हे पूर्णपणे नास्तिक विचारसरणीचे असून त्यांना जागतिक नास्तिक चळवळीचे अग्रणी मानले जाते. 'मानवी उक्रांती' या ही विषयात योगदान दिलेले ते एक प्रमुख व्यक्ती आहेत. "देवाच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा नसताना त्यावर विश्वास ठेवणे हा एक प्रकारचा मानसिक भ्रम आहे." असे ते आक्रमकपणे आणि कौशल्याने युक्तिवाद करत पटवून देतात. ते म्हणतात 'निसर्गातील आश्चर्य, निसर्गातील भव्यतेला, नैसर्गिक चमत्कारांना मानवाने देवा'ची उपमा दिली, पण पुढे देवाला एक अतिरंजित वलय दिले गेले. मग पुढे धर्माचे कोंदण आले. त्यात चुकीच्या गोष्टी शिरल्या. प्रारंभिक काळी मानव जगण्यासाठी सूर्य, ऊन, पाऊस, अग्नी, वारा या सारख्या नैसर्गिक शक्तींवर अवलंबून होता. या शक्तीमागे कोणतीतरी अदृश्य किंवा अलौकिक शक्ती आहे ह्या जाणिवेतून देवाची कल्पना आकाराला आली. देव ह्या संकल्पनेचा उगम प्रामुख्याने निसर्गातील ह्या अज्ञात शक्तीविषयीचे कुतूहल, भीती, आदर या भावनेतून झाला. देव या संकल्पनेवर श्रद्धा ठेवली जाऊ लागली. पुढे अतिरेकी श्रद्धेतून अंधश्रद्धा निर्माण झाली'.
‘द गॉड डिल्युजन’ ह्या पुस्तकात लेखक रिचर्ड डॉकिन्स वैज्ञानिक विचारसरणीला महत्त्वाचे मानतात. विज्ञानामध्ये एखादी गोष्ट खरी आहे असे मानण्यासाठी पुरावा, निरीक्षण आणि तर्क महत्त्वाचा असतो. धार्मिक श्रद्धेत किंवा देव मानणारे बऱ्याच गोष्टी पुराव्या शिवाय सत्य आहेत असे मानतात. या पुस्तकात एके ठिकाणी डॉकिन्स लिहितात "माणसाने आपल्या श्रद्धा तपासल्या पाहिजेत. प्रश्न विचारले पाहिजेत. पुराव्याची मागणी केली पाहिजे. धर्मात असलेल्या परंपरा आणि भीती पेक्षा तर्क आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला महत्त्व दिले पाहिजे." डॉकिन्स यांच्या मते देवाची गरज न मानताही जीवन अर्थपूर्ण, नैतिकतेला धरून आणि सुंदर असू शकते. थोडक्यात विश्व आणि जीवन समजून घेण्यासाठी देवाची संकल्पना गरजेची नाही. पुरावे, तर्क आणि उच्च कोटीच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून जीवन जगले पाहिजे. देव, धर्म आणि त्यातून निर्माण होणारे अविवेकी जगणे टाळले
पाहिजे. देव या संकल्पनेला नकार देऊन विवेकी नास्तिक्याचा आपण स्वीकार करायला हवा. असे ते आग्रही प्रतिपादन करतात. या पुस्तकात डॉकिन्स एके ठिकाणी म्हणतात "प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा विवेक आणि बुद्धी असून, त्याला कोणतीही समस्या सोडवण्यासाठी 'देवा' सारख्या मुळातच नसलेल्या अलौकिक शक्तीची अजिबात गरज नाही." अंधश्रद्धा, धार्मिक कट्टरतावाद आणि त्यातून होणाऱ्या सामाजिक संघर्षावर या पुस्तकात परखड विचार मांडले गेले आहेत. या पुस्तकाच्या जगभरात लाखो प्रती विकल्या गेल्या आणि जगातील अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले, ज्यामुळे धर्म आणि विज्ञान यांच्यातील संबंधावर जगभरात नव्याने चर्चा सुरू झाली. माणसाला चांगले वागण्यासाठी किंवा नैतिक मूल्ये जपण्यासाठी देवाची भीती किंवा धर्माची शिकवण आवश्यक नसते, हा विचार या पुस्तकात प्रकर्षाने मांडला आहे. या पुस्तकाने जगभरात एक वैचारिक घुसळण घडवून आणली. या पुस्तकाच्या विरोधात आणि समर्थनार्थ अनेक नवीन पुस्तके लिहिली गेली.
या सुंदर पुस्तकात नास्तिकतेची बाजू मांडताना ईश्वरी अस्तित्वाच्या बाजूने आतापर्यंत मांडण्यात आलेल्या युक्तिवादाचा देखील लेखकाने परामर्ष घेतलेला आहे. धर्माची मुळे, नैतिकता-अनैतिकता, डार्विनचा उत्क्रांतीवाद, धार्मिक कट्टरता, अशा अनेक विषयांवर सखोल, सविस्तर विचार मांडलेले आहेत. हे मूळ पुस्तक इंग्रजीत असून, लेखिका 'मुग्धा कर्णिक' यांनी अतिशय सोप्या मराठीत त्याचा अनुवाद केलेला असल्यामुळे मराठी वाचकांना त्याचा आनंद घेता येतो. 'मधुश्री पब्लिकेशन' ही प्रकाशन संस्था अशा प्रकारच्या इतर भाषेतील, परदेशस्थ लेखकांचे साहित्य अनुवादित करून जागतिक दर्जाच्या साहित्याला मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम करते. प्रतिथयश लेखकांच्या पुस्तक प्रकाशनाबरोबरच नवोदित, परंतु प्रतिभावान लेखकांना प्रोत्साहन देण्यातही मधुश्री प्रकाशनाने नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्या या एकूणच कामगिरीत रिचर्ड डॉकिन्स यांचे 'मुग्धा कर्णिक' अनुवादित 'द गॉड डिल्युजन म्हणजेच देव नावाचा भ्रम' हे पुस्तक मैलाचा दगड ठरावे असेच आहे. देवाचे अस्तित्व मानणाऱ्या आस्तिक वाचकांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे असे आहे.
- मला आवडलेल्या अनिल अवचटांच्या 'धार्मिक' पुस्तकावर पुन्हा कधीतरी...
राजीव जतकर.
२५ नोव्हेंबर २०२६.

No comments:
Post a Comment