'न्यूरेंबर्ग' चा अद्भुत खटला.
![]() |
| हर्मन गोअरिंग च्या भूमिकेतील 'रसेल क्रो' |
"इतिहासाचे नीट मनन किंवा चिंतन करणे यासारखा गुरु नाही. ज्याला आयुष्याचे तत्वज्ञान म्हणतात ते इतिहासाच्या वाचनानेच निर्माण होते."
-नेपोलियन बोनापार्ट.
'युद्धाने सर्व प्रश्न सुटतात का? राजकारणातले यश नेहेमीच डागाळलेले का असते? लोकशाही मृत्युशय्येवर कशी जाते? हुकूमशहा सत्तेवर का व कसे येतात?' या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी इतिहासाचा मागोवा घेणे आवश्यक असते. इतिहासातून शिकून भविष्यात होऊ शकणाऱ्या चुका टाळता येणे सहज शक्य असते. पण इतिहासातून आपण काहीच शिकत नाही हे वर्तमानातल्या घडणाऱ्या घटनांमधून सिद्ध होते. कारण तिसऱ्या महायुद्धाच्या टोकावर उभे आहोत. हुकूमशहा का व कसे निर्माण होतात? या प्रश्नाचे उत्तर शोधताना असे संभवते की माणसांना जगण्यासाठी कोणावर तरी मोठी श्रद्धा ठेवावी लागते. या विश्वावर राज्य करणारा तो परमेश्वर आणि देशावर राज्य करणारा तो राजा किंवा सर्वोच्च देवासमान असणारा नेता माणसे शोधात असतात. अशा देवासमान मानलेल्या नेत्यावर माणसे आंधळेप्रमाणे विश्वास ठेवू लागतात. त्यातूनच हिटलर सारखे हुकूमशहा निर्माण होण्याची शक्यता वाढते. हिटलर हा माझा आवडता खलनायक. त्याच्या अंगी असलेल्या अवगुणांना थोडे बाजूला ठेऊन विचार केला तर, त्याच्या अंगी दुर्दम्य इच्छाशक्ती, निर्णय क्षमता, असामान्य नेतृत्वगुण, प्रखर देशभक्ती, भारावून टाकणारे वक्तृत्व, धाडसी वृत्ती, परराष्ट्रीय राजकारणावरील त्याची असणारी आश्चर्यकारक पकड असे अनेक गुण देखील होते. अशा अनेक गुणांनी परिपूर्ण असलेला हा महाखलनायक माझ्या आकर्षणाचा विषय आहे. इतिहासातील प्रमुख घटनांची उजळणी करायची झाल्यास आणि त्यापासून काहीतरी शिकायचे झाल्यास पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातील घटनांचा आढावा घेणे आवश्यक ठरते.
मी नुकताच नेटफ्लिक्स'वर 'न्यूरेंबर्ग' नावाचा एक उत्कृष्ठ चित्रपट पाहिला. 'जॅक एल-हाय यांच्या २०१३ मध्ये प्रकाशित झालेल्या 'द नाझी अँड द सायकियाट्रिस्ट' या पुस्तकावर आधारित असलेला हा चित्रपट लेखक, दिग्दर्शक 'जेम्स वंडरबिल्ट' यांनी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित केला. हा चित्रपट दुसरे महायुद्ध संपल्यावर नाझींच्या पकडलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर दोस्त राष्ट्रांनी चालवलेल्या खटल्याचा मागोवा घेतो. या नाझी अधिकाऱ्यांची, लाखो माणसे मारताना नेमकी मानसिक मनस्थिती समजून घेणे, त्यादृष्टीने त्यांची तपासणी करण्याच्या प्रक्रियेवर हा चित्रपट प्रकाश टाकतो. या तपासण्या करण्यासाठी अमेरिकन सैन्यातील 'डॉ. डग्लस केली' (रामी मलेक) या मानसोपचार तज्ज्ञाला पाचारण करण्यात आलं होतं. डॉ. डग्लसचा नाझी कैद्यांची मानसिक तपासणी करण्याबरोबर एक अंतस्थ हेतू देखील होता, तो म्हणजे या विषयावर त्याला स्वतःचे लिहिलेले एक पुस्तक प्रकाशित करून पैसे कमवायचे होते. या संपूर्ण चित्रपटात या तपासणी दरम्यान हिटलर नंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेला महत्वाचा कैदी राईश मार्शल 'हर्मन गोअरिंग' आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. डग्लस यांच्या संवादाचा आढावा घेतला आहे. 'हर्मन गोअरिंग' हा हिटलरचा भावी उत्तराधिकारी असल्यामुळे त्याच्या तपासण्या डॉ. डग्लस यांच्या दृष्टीने आणि या खटल्याच्या दृष्टीने महत्वाच्या होत्या. डॉ. डग्लस यांना 'हर्मन गोअरिंग' याच्या बद्दल खूप उत्सुकता होती. हर्मन गोअरिंग व त्याच्या सहकाऱ्यांनी यांनी थंडपणे, आणि क्रूरपणे लाखो ज्यू लोकांना मारण्यामागे त्यांची नेमकी काय मानसिकता होती? हे समजावून घेताना या खटल्यादरम्यान डॉ. डग्लस आणि गोअरिंग यांच्या मध्ये एक भावनिक नातं निर्माण झालं होतं. त्यांच्यात मैत्री नसली तरी एकमेकांबद्दल आदर होता. ह्या मानसीक तपासण्या दरम्यान डॉ. डग्लस यांच्या असं लक्षात आलं की हे नाझी नेते मानसिक दृष्ट्या आजारी नव्हते. त्यांचं वर्तन एखाद्या सर्वसामान्य माणसांसारखंच होतं. त्यांच्यावर व्यवस्थेचा आणि तत्कालीन परिस्थितीचा प्रभाव होता. जो जगात कोणत्याही देशातल्या उच्चपदावर आढळू शकणाऱ्या व्यक्तींवर आढळू शकतो. डॉ डग्लस यांचा हा निष्कर्ष आपल्याला चित्रपट पाहिल्यावर विचारप्रवृत्त करतो. हिटलर असो किंवा गोअरिंग, ते वेडे होते का महत्वाकांक्षी? याची उत्तरं या चित्रपटातून घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. 'न्युरेंनबर्ग' हा चित्रपट डॉ. डग्लस आणि क्रूरकर्मा हर्मन गोअरिंग यांच्या संवादातून फुलंत जातो. या चित्रपटात युद्धाचे प्रसंग, मारधाड, ऍक्शन वगैरे असलं काही नाही. त्यामुळे हा चित्रपट ‘दुसरे महायुद्ध’ आणि ‘न्यूरेंबर्गचा खटला’ या संबंधित इतिहासाची माहिती नसलेल्या प्रेक्षकांसाठी बराचसा कंटाळवाणा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे चित्रपट पाहण्याआधी या खटल्याची पार्श्वभूमी समजावून घ्यावी लागेल.
![]() |
| 'द नाझी अँड द सायकियाट्रिस्ट' ह्या पुस्तकावर 'न्यूरेंबर्ग' हा चित्रपट आधारित आहे. |
दुसऱ्या महायुद्धात अनेक महत्वपूर्ण आणि अतर्क्य घटना घडल्या. त्यात 'न्यूरेंबर्गचा खटला' हे देखील एक महत्वाची घटना! १ सप्टेंबर १९३९ साली ला सुरु झालेले हे दुसरे महायुद्ध ८ मे १९४५ ला मध्यरात्री संपले. या नंतर पुढील सात आठ महिन्यांच्या काळात हिटलरच्या दुष्कृत्यात त्याला साथ देणाऱ्या
प्रमुख साथीदारांची मोठ्या प्रमाणात धरपकड करण्यात आली. काही नाझी अधिकारी शरण आले तर काहींनी आत्महत्या केल्या. पण पकडलेल्या एकवीस अधिकाऱ्यांना युद्ध गुन्हेगार म्हणून न्यूरेंबर्ग येथे आंतरराष्ट्रीय न्यायासनासमोर उभे करण्यात आले. या नाझी अधिकाऱ्यांनी ज्यू लोकांचा क्रूरपणे नरसंहार केला त्यांच्यावर खटले न भरता, न्यायालयीन सोपस्कारात वेळ न घालवता त्यांना गोळ्या घालून ठार करावे असा मोठ्या प्रमाणात मतप्रवाह होता. तथापि भविष्यकाळात आपल्यावर कुणीही 'सूडबुद्धीने या गुन्हेगारांना मारले' असा आरोप करू नये म्हणून अमेरिका, इंग्लंड, व इतर दोस्त राष्ट्रांनी या नाझी अधिकाऱ्यांवर न्यायालयीन मार्गाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून खटला चालवण्याचे ठरवले. शिवाय युद्धोत्तर काळात युरोपियन राष्ट्रांना पुन्हा उभे राहायचे असेल तर जर्मनी संपन्न आणि स्थिर असणे आवश्यक होतं. त्यामुळे पकडलेल्या नाझी नेत्यांवर रीतसर खटला चालवणं जर्मनीच्या पुनर्वसनासाठी आणि जर्मनांना परत आंतरराष्ट्रीय समुदायात सामावून घेण्याच्या दृष्टीनं हा खटला चालवणं दोस्त राष्ट्रांना आवश्यक वाटलं. शिवाय या खटल्याच्या निमित्ताने हिटलरच्या राजवटीचे इतर भयानक पैलू, आंतरराष्ट्रीय कटकारस्थाने जगासमोर यावीत हा देखील हा खटला चालवण्याचा उद्देश होता.
![]() |
| न्यूरेंबर्ग शहरातील 'पॅलेस ऑफ जस्टीस' व मागे असलेल्या तुरुंगाचा परिसर |
सुरवातीला हा खटला जर्मनीची राजधानी 'बर्लिन' येथे भरवण्याचा विचार झाला होता, तथापि युद्धामुळे बर्लिन मधील एकही इमारत धड उभी नव्हती. शिवाय खटल्यासाठी आवश्यक असलेले न्यायाधीश, वकील, पोलीस, पत्रकार या सगळ्यांची राहण्याची व्यवस्था बर्लिन मध्ये होणं जवळपास अश्यकच होतं. त्यामुळे तुलनेनं कमी हानी झालेल्या 'न्यूरेंबर्ग' या शहरात हा खटला चालवण्याचे ठरले. या शहरातील न्यायालयाची इमारत (पॅलेस ऑफ जस्टीस) सुस्थितीत होती. या न्यायालयाच्या जवळील एक मोठा तुरुंगही चांगल्या अवस्थेत होता. या न्यायालयानं आपलं कामकाज अधिकृतरीत्या १८ ऑक्टोबर १९४५ या दिवशी सुरु केलं. त्या आधी सर्व सगळे आरोपी न्यूरेंबर्ग च्या तुरुंगात आणले गेले होते. आरोपींवर आरोपांची निश्चिती झाल्यावर खटल्याचे कामकाज सुरु झाले.
![]() |
| प्रत्यक्षातले हर्मन गोअरिंग, रुडॉल्फ हेस, रिबेन्ट्रॉप, आल्फ्रेड रोझेनबर्ग वगैरे खटल्यातील सुनावणीला सामोरे जाताना. |
न्यूरेंबर्ग मधील तुरुंगाचा मुख्य अधिकारी अमेरिकन सैन्यातील कर्नल 'बर्टन अँड्रस' हा अतिशय शिस्तीचा होता.
या बर्टन अँड्रसने सगळ्या नाझी कैद्यांचा दिनक्रम अगदी काटेकोर पद्धतीने आखला होता. आपापल्या वकीलांशी चर्चेसाठीचा वेळ, दररोज अर्धातास व्यायाम, वगैरे गोष्टी कैद्यांसाठी ठरवल्या गेल्या होत्या. तरी देखील खटल्याच्या दरम्यान नाझी अधिकारी 'डॉ. रॉबर्ट ली' याने स्वतःच्या कपड्यांच्या मदतीने दोर तयार करून तुरुंगात आत्महत्या केली. त्यानंतर तुरुंगातील पहारा आणि कैद्यांचा दिनक्रम अजून कडक करण्यात आले. या पुढे एकही आत्महत्या होता कामा नये असा बर्टन अँड्रस चा कटाक्ष असे. जवळपास २३ देशांच्या प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी हा खटला कव्हर करायला न्यूरेंबर्ग येथे आले होते. न्युरेंनबर्गच्या नाझी गुन्हेगारांना शासन होणे महत्वाचे होतेच, पण त्यापेक्षा युद्धकाळात जर्मनीचे प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून या गुन्हेगारांची निवेदने व उलटतपासण्या इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचे होते. या खटल्यादरम्यान सर्व नाझी गुन्हेगारांना जर्मनीने उभ्या केलेल्या छळछावण्यांतील नरसंहार यंत्रणांची, प्रेतांच्या ढिगाऱ्यांची, छळ छावण्यांमधील प्रेतांचा खच, बुलडोझर ने प्रेतांची लावलेली विल्हेवाट, गॅस चेम्बरची रचना, भट्ट्यांमध्ये सापडलेले मृतदेह, जिवंत प्रेताप्रमाणे शरीराची चिपाडं झालेली ज्यू माणसे याची सुमारे ६००० फुटांची एक चित्रफीत दाखवण्यात आली. ही चित्रफीत पाहण्याचे हर्मन गोअरिंगने नाकारले. ही चित्रफीत पाहताना कुणी हुंदके देऊन रडू लागले. सर्व कैद्यांच्या चेहेऱ्यावर दुःखाची अवकळा पसरली. काही कैद्यांनी 'हे सर्व खोटे आहे' असे पुटपुटायला सुरवात केली. काही अधिकाऱ्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, पण बहुतेकांनी 'आम्ही हिटलरची आज्ञा पाळायचे काम केले. या नरसंहारात आमचा काही दोष नाही' असे निक्षून सांगितले. १ ऑक्टोबर १९४६ या दिवशी सर्व गुन्हेगारांना शिक्षा जाहीर झाल्या. या पैकी ११ जणांना देहांत शासन फर्मावण्यात आले तर उरलेल्यांना दीर्घ मुदतीच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या.
प्रथम फाशी जाण्याचा मान राईश मार्शल हर्मन गोअरिंग याला मिळाला होता. परंतु फाशी देण्या आधी त्याने सायनाईड हे विष घेऊन आत्महत्या केली. इतक्या कडेकोट बंदोबस्तात असूनही गोअरिंग ने सायनाईड हे जहाल विष कसे मिळवले? हे अखेर रहस्यच राहिले. शेवटी त्याला भेटायला आलेल्या पत्नीने त्याचे चुंबन घेताना सायनाईड ची काचेची गोळी गोअरिंगच्या मुखात सारली असावी असा निष्कर्ष काढला गेला. मृत्यूपूर्वी तुरुंग अधिकाऱ्याला लिहिलेल्या चिठ्ठीत गोअरिंगने लिहिले होते 'मला गोळ्या घालून मारण्यात यावे ही माझी मागणी नाकारली गेल्यामुळे मी आत्महत्या करत आहे.' १६ ऑक्टोबर १९४६ या दिवशी रात्री उर्वरित गुन्हेगारांची मान फाशीच्या दोरात अडकली आणि या अभूतपूर्व न्यूरेंबर्ग च्या खटल्याची सांगता झाली...
![]() |
| प्रत्यक्षातला हर्मन गोअरिंग, त्याची पत्नी 'एमा' आणि मुलगी 'एड्डा' यांच्यासह |
'न्यूरेंबर्ग' या चित्रपटाचा खरा हिरो हर्मन गोअरिंगची भूमिका करणारा 'रसेल क्रो' हा आहे. २००० साली प्रदर्शित झालेल्या 'ग्लॅडिएटर' मधील त्याची भूमिका गाजली होती. गोअरिंग च्या स्वभावातील विविध पैलू त्याने न्यूरेंबर्ग या चित्रपटात खुबीनं दाखवले आहेत. डॉ. डग्लस केली यांची भूमिका साकारणारा 'रामी मलेक'
याने त्याला सुरेख साथ दिली आहे. या चित्रपटातील एका प्रसंगात चौकशी दरम्यान डॉ. डग्लस गोअरिंगला विचारतो 'तुम्ही लाखो ज्यू लोकांना मारलंत, याचं तुम्हाला वाईट कसं वाटलं नाही?' गोअरिंग या प्रश्नाला उत्तर देताना लगेच म्हणतो 'अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर अणुबॉम्ब टाकून लाखो माणसं मारली. हे कृत्य करताना तुम्हा अमेरिकनांना काहीच कसं वाटलं नाही? काय फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात? तुम्हीही तेच केलंत.' या चित्रपटात असे अनेक संवाद आहेत की जे अमेरिकेची दुसरी बाजू देखील मांडतात. न्युरेंनबर्ग हा चित्रपट निव्वळ कोर्टरूम ड्रामा नसून माणसाच्या मनाचा वेध घेत त्याची मानसिकता , त्याचं सुख-दुःख या पलीकडे जाऊन त्याच्या नैतिकतेवर भाष्य करतो. हा चित्रपट गुंतागुंतीचे प्रश्न मांडणारा, सोपी उत्तरं शोधायला नकार देणारा आणि प्रेक्षकांना विचारात पाडून दुसरे महायुद्ध आणि न्यूरेंबर्ग खटल्याची माहिती मिळवायला भाग पडणारा आहे. हा चित्रपट बघितल्यावर आणि मुख्य म्हणजे समजून घेतल्यावर आपल्याला सतत छळत राहतो...
राजीव जतकर
१ फेब्रुवारी २०२६.
पुन्हा एकदा:
हा चित्रपट ‘दुसरे महायुद्ध’ आणि ‘न्यूरेंबर्गचा खटला’ या संबंधित इतिहासाची माहिती नसलेल्या प्रेक्षकांसाठी बराचसा कंटाळवाणा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे चित्रपट पाहण्याआधी या खटल्याची पार्श्वभूमी समजावून घ्यावी लागेल. (ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर हिंदी भाषेत देखील हा चित्रपट पाहण्याची सोय आहे)






थोडक्यात आणि सोप्या भाषेत चित्रपटाची पार्श्वभूमी वर्णन केली आहेस. गुन्हेगाराची मानसिकता हा कुतुहलाचा आणि गुंतागुंतीचा विषय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींची मानसिकता या नाझी अधिकाऱ्यांनासारखीच असावी.सत्तेचा उन्माद हेच मुख्य किरण असावं.
ReplyDeleteइतिहासातून मानवी स्वभावाचे जितके भिन्न पैलू अभ्यासता येतात तितके ईतर कोठेच अभ्यासता येत नाहीत. कधी अत्युच्च नैतिक पातळी तर कधी रसातळाला पोचलेली नैतिकता अश्या बहुरंगी रूपात मनुष्यस्वभावाचे दर्शन होते. फारच छान व संक्षिप्त असे चित्रपटाचे रसग्रहण केले आहे. पुढील अवलोकनासाठी उत्तम चित्रपट सुचवल्याबद्दल धन्यवाद.
ReplyDelete