‘द हंट’: द राजीव गांधी असॅसिनेशन केस.
१९९१ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकांची धामधूम सुरु होती. सर्वच पक्षांचे नेते निवडणुकीतील आपले मुद्दे मांडण्यासाठी अनेक रॅलीज आणि सभांमध्ये व्यस्त होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि तामिळनाडू काँग्रेस समिती यांच्या वतीने भूतपूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या दक्षिणेकडील राज्यात धडाकेबाज प्रचार करत होते. २१ मे’ हा तो दिवस देखील राजीव गांधी यांच्यासाठी खूप धावपळीचा होता. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम आणि चेन्नई येथील प्रचार सभेनंतर त्यांची तामिळनाडू येथील श्रीपेरंबुदूर येथे संध्याकाळी सभा आयोजित करण्यात आली होती. तिथेच श्रीपेरंबुदूर मध्ये त्याचा मुक्काम देखील होता. चेन्नई मधील दुपारच्या प्रचारसभेनंतर संध्याकाळी राजीव गांधी पांढऱ्या अँबॅसिडर कार मधून श्रीपेरंबुदूर येथे रवाना झाला. वाटेतील काही निवडणूक प्रचारस्थळावर त्यांना थांबावे लागले. त्यामुळे राजीव गांधी यांना श्रीपेरंबुदूरयेथील सभास्थळी पोहोचायला बराचसा उशीरच झाला. कार मध्ये त्यांच्याबरोबर काँग्रेस चे स्थानिक उमेदवार, न्यूज रिपोर्टर वगैरे होते.
![]() |
घटनास्थळी हरिबाबू ह्या छायाचित्रकाराने काढलेल्या कॅमेऱ्यातील शेवटचा फोटो. |
तपासाचे आव्हान:
हे हत्याकांड झाले त्यावेळी घटनास्थळावर कोणताही पुरावा सापडणे शक्यच नव्हते. आपली स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीम (SIT) घटनास्थळी पोहोचली तेंव्हा 'तिथं नेमकं
काय घडलं असावं? हे शोधणं त्यांच्यासाठी एक मोठं आव्हानच होतं. हे कृत्य कुणी केलं होतं ह्याचा अंदाज येत नव्हता.
मात्र स्फोटात इतस्ततः पडलेल्या वस्तूंमध्ये एक कॅमेरा आश्चर्यकारक पद्धतीने चांगल्या अवस्थेत सापडला. आणि मग ह्या तपासाला एक दिशा सापडली. राजीव गांधी यांच्या पायातला एक बूट सापडल्यामुळे त्यांच्या छिन्नविछिन्न मृतदेहाची ओळख पटली. राजीव गांधींच्या ह्या हत्येमध्ये श्रीलंकेमधील 'लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम' (LTTE) ह्या दहशतवादी संघटनेचा हात आहे असे तपासात पुढे आले. तामिळ लोकांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी करणाऱ्या ह्या संघटनेचा 'प्रभाकर' हा प्रमुख होता. तामिळ लोकांसाठी स्वतंत्र राज्य मागण्यासाठी LTTE चा श्रीलंकन सरकारबरोबर संघर्ष सुरु होता. या संघर्षात LTTE या संघटनेला निष्प्रभ करण्यासाठी राजीव गांधी यांनी 'भारतीय शांती सेना' श्रीलंकेत पाठवली होती. त्यामुळे LTTE राजीव गांधी यांच्यावर नाराज होती. त्याचे पर्यवसन राजीव गांधी यांच्या हत्येत झाले.
![]() |
सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन टीम |
भारतीय इतिहासातील सर्वात काळ्याकुट्ट अश्या ह्या घटनेचा तपास कुणी करायचा? कसा करायचा? तपासाची दिशा काय असणार? यावर तातडीने उच्चस्तरीय बैठक सुरु झाल्या. यातून एक नाव समोर आलं ते म्हणजे 'डी.आर. कार्तिकेयन'! कार्तिकेयन तेंव्हा हैद्राबाद मध्ये आंध्रप्रदेशच्या सी.आर.पी.एफ. (सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स) चे आय.जी. (इन्स्पेक्टर जनरल) या पदावर कार्यरत होते. त्यांना तात्काळ बोलावण्यात आले आणि ह्या हत्याकांडाच्या तपासाची सूत्रे त्यांच्याकडे सोपवण्यात आली. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली एक एस.आय.टी. (सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन टीम) स्थापन करण्यात आली. तपास सुरु झाला. या घटनेच्या मुळाशी जाताना हरिबाबू या छायाचित्रकाराचा कॅमेऱ्यातून सुस्थितीत मिळालेल्या काही फोटोज मधून गोष्टींचा उलघडा होत गेला. एस.आय.टीम ने अथक मेहेनत घेऊन ९० दिवसात हत्येचा उलघडा करून 'या हत्येत श्रीलंकेतील लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम (LTTE) या दहशदवादी संघटनेचा हात आहे' असे सांगितले. श्रीलंकास्थित 'प्रभाकरन' हा LTTE चा प्रमुख होता. राजीव गांधी यांची हत्या करण्याचे ठरल्यावर प्रभाकरन ने 'शिवरासन' ह्याच्यावर ही जबाबदारी सोपवली. शिवरासन आणि त्याच्या टीम ने ह्या हत्येची जबाबदारी स्वीकारून ती प्रत्यक्षात आणली. ज्या आत्मघातकी महिलेने ही हत्या घडवून आणलीती अर्थातच या स्फोटात मरण पावली होती. तथापि राजीव गांधी यांच्या हत्याकांडाला मदत करणाऱ्या सात जणांना पकडून न्यायालयाने दोषी ठरवले. या मध्ये श्रीहरन उर्फ मुरुगन, एस. नलिनी (मुरुगन याची पत्नी), संथन, रॉबर्ट पायस (श्रीलंकन नागरिक), जयकुमार, रविचंद्रन, ए.जी. पेरारीवलन याचा समावेश होता. या हत्याकांडाचे मास्टर माईंड शिवरासन, शुभा यांनी तपासादरम्यान आत्महत्या करून स्वतःला संपवले.
![]() |
कार्तिकेयन यांची भूमिका साकारणारे 'अमित सियाल' |
एखाद्या रहस्यकथेतील रहस्य उलघडणे कसे हृदयाचा ठोका चुकवणारे, थरारक असते तसेच काहीसे असणारा हा तपासाचा प्रवास होता. या हत्याकांडाच्या तपशिलातील तथ्यांशी प्रामाणिक राहून सोनी लिव्ह या ओ.टी. टी. प्लॅटफॉर्मवर 'द हंट: द राजीव गांधी असॅसिनेशन केस' ही वेब सिरीज प्रदर्शित करण्यात आली आहे. तपासाशी राखलेला सच्चेपणा हे या मालिकेचे वैशिष्ठ्य आहे. एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज बनवायची असेल तर प्रत्येक वेळी मारधाड किंवा भडक प्रसंग दाखवायची गरज नसते हे सिद्ध करणारी ही मालिका आहे. ही सात भागांची मालिका इंडिया टुडे चे प्रसिद्ध पत्रकार 'अनिरुद्ध मित्रां' यांच्या 'नाईंटी डेज' या पुस्तकावर बेतलेली आहे. या वेब सिरीज च्या संपूर्ण यशाचे श्रेय दिग्दर्शक 'नागेश कुकुनूर' यांना द्यावे लागेल. पटकथा लेखक 'रोहित बनवालीकर' आणि संकलक 'श्रीराम राजन' यांच्यामुळे ही मालिका बरीचशी वेगवान आणि उत्कठावर्धक झाली आहे. या मंडळींमुळे ही मालिका डॉक्युमेंटरी न वाटता एखाद्या रहस्यकथेप्रमाणे झाली आहे. संपूर्ण मालिकेतील पार्श्वसंगीत देखील फार भडक न वापरता तणावपूर्ण दक्षिणी तालवाद्यांचे मिश्रण असलेले आहे. पार्श्वसंगीताचा वापर केवळ प्रसंगांचा तणाव वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक वापरलेले आहे. 'एखादी व्यक्ती किंवा संघटना, जी कुणासाठी हिरोसमान किंवा उदात्त असते ती दुसऱ्या कुणासाठी खलनायक किंवा अतिरेकी असू शकते' अशी या मालिकेतील वाक्ये प्रेक्षकांना अंतर्मुख होऊन विचारप्रवृत्त करतात. हे वाक्य ऐकताना माझ्या मनात विचार आला की, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांसाठी देवासमान असणारे आपले स्वातंत्र्यसैनिक इंग्रजांसाठी अतिरेकीच असतील ना? हाच निकष लावायचा तर LTTE चे अतिरेकी बऱ्याचशा तामिळ लोकांसाठी स्वातंत्र्यसैनिकच होते. त्यामुळे अनेक भारतीय आणि श्रीलंकन तामिळ लोकांची राजीव गांधींच्या मारेकऱ्यांप्रती सहानभूती होती. त्यामुळे देखील राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना शोधणे खूप आव्हानात्मक होते. अशा परिस्थितीत गुन्हेगारांना शोधून काढण्याची कथा या मालिकेतून रंजक पद्धतीने उलघडते.
![]() |
डीएसपी राघोथमन साकारणारे 'भगवती पेरुमल' |
अभिनयाच्या बाबतीतही ही वेब मालिका उजवी आहे. या वेब मालिकेचे कास्टिंग अप्रतिम आहे. डी. आर. कार्तिकेयन यांची भूमिका साकारणारे 'अमित सियाल', डी.आय.जी. आमोद कांत च्या भूमिकेतील 'दानिश इक्बाल', डीएसपी राघोथमन साकारणारे 'भगवती पेरुमल', एसपीआई अमित वर्मा यांच्या भूमिकेतील 'साहिल वैद्य', डिआयजी राजू यांची भूमिका निभावलेले 'गिरीश शर्मा' या अभिनेत्यांनी एस.आय. टीम मधील अधिकाऱ्यांच्या भूमिका कमाल साकारल्या आहेत. त्यातही 'अमित सियाल' हे त्यांच्या संयमित अभिनयाने संपूर्ण मालिका व्यापून टाकतात. कमांडोच्या भूमिकेतील विद्युत गार्गी भाव खाऊन जातो. शिवरासन ची भूमिका करणारा 'शफिक मुस्तफा' आणि त्याची साथीदार शुभा हिची भूमिका साकारणारी 'गौरी पद्माकर' यांचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. शिवरासन याला पकडण्याची संधी असताना केवळ वरिष्ठांकडून 'गो अहेड' च्या निरोपाची वाट बघावी लागताना 'साहिल वैद्य' याने त्याच्या अभिनयातून दाखवलेली चिडचिड, घुसमट अफाट पद्धतीने साकार केलेली आहे. सरकारी लालफितीचा कारभार, दोषपूर्ण नोकरशाही यामुळे एस.आय.टी. च्या अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम, हताश अवस्था पाहण्यासारखी आहे. शेवटच्या दोन भागात ही मालिका वेग पकडते. या मालिकेत नायक किंवा नायिका नाहीत. कुठल्याही प्रसंगात नाट्यमयता वाढवण्यासाठी खोटे प्रसंग रचलेले नाहीत. उगीचच कर्णकर्कश्य संगीत नाही. कॅमेऱ्याचे चित्रविचित्र अँगल लावलेले नाहीत. यातील तपास आधिकारी, पोलीस, राजकारणी आणि गुन्हेगारही तुमच्या आमच्या सारखी माणसे आहेत. ज्या तपास अधिकाऱ्यांभोवती ही कथा फिरते, ते सगळेजण आपल्या व्यवस्थेच्या चौकटीत राहून राजकीय, सामाजिक दबाव झेलत आपली कर्तव्ये जमेल तितक्या प्रामाणिकपणे करतात.
![]() |
एसपीआय अमित वर्मा यांच्या भूमिकेतील 'साहिल वैद्य' |
राजीव गांधी यांचे हत्याकांड घडले तेंव्हा मी एकतीस/बत्तीस वर्षांचा होतो. मलाच काय पण सर्वच देशाला या घटनेने मोठा धक्का बसला होता. या हत्याकांडाच्या तपासाचे तपशील तेंव्हा मला समजले नव्हते. आजच्या नवीन पिढीला देखील या घटनेची फारशी माहिती असण्याची शक्यता नाही. त्यामुळे नवीन पिढीसाठी तर ही वेबसिरीज म्हणजे हत्याकांडाची घटना, त्यानंतर तपासाचा थरारक प्रवास, तत्कालीन राजकारणाचे संदर्भ जाणून घेण्याची सुसंधीच आहे. सध्या 'सोनी लिव्ह' वर ही वेब सिरीज खूप गाजतीये. सर्वांनीच सर्वांनी जरूर बघा.
राजीव जतकर
२४ जुलै २०२५.
अजून एक:
राजीव गांधींची हत्या करण्यापूर्वी LTTE ने या हत्येची रंगीत तालीम (ड्रेस रिहर्सल) देखील केली होती असे तपासादरम्यान समोर आले होते. LTTE च्या आत्मघातकी पथकाने त्यांच्या प्रशिक्षणाचा भाग म्हणून तत्कालीन प्रधानमंत्री व्ही.पी. सिंग यांचे सुरक्षा कडे तोडून त्यांना असाच हार घालून पायाला स्पर्श करण्याच्या बहाण्याने वाकून नमस्कार केला होता. LTTE प्रमुख प्रभाकरन यांना ह्या रंगीत तालमीचे चित्रण दाखवून आपण राजीव गांधी यांची हत्या करू शकतो अशाप्रकारची खात्री करून देण्यात आली होती. तथापि या ड्रेस रिहर्सल बद्दल ठोस पुरावे न मिळाल्यामुळे त्याची पुष्टी करण्यात आली नाही....
Excellent director Nagesh Kukunoor
ReplyDeleteNice post
खूप छान विश्लेषण 👌 आता web series नक्की पाहीन.
ReplyDeleteखुपच छान विश्लेषण...👌
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteअतिशय सुंदर वर्णन केले जतकर साहेब आपण, तुमची लिखाण शैली अगदी संपादकीय वाटते... अभिनंदन 🌹🌹वेब सिरीज बघण्या आधी विश्लेषण वाचून च आनंद मिळाला...😊🙏
ReplyDeleteखूप सुंदर विश्लेषण केले आहे सर...
ReplyDelete