Tuesday, 1 July 2025

'सली' : हडसन नदीवरील चमत्कार.

 

'सली' : हडसन नदीवरील चमत्कार.

पक्षांच्या धडकेने विमानाला लागलेली आग 

"मेडेमेडेधिस इज कॅप्टन १५४९ स्पिकिंग. बर्ड स्ट्राईक मुळे आमच्या विमानाची दोनीही इंजिन्स निकामी झालेली आहेत. परिस्थिती अतिशय गंभीर आणि आणीबाणीची आहे.....''

अमेरिकेमधील न्यूयॉर्क मधील 'लगार्डिया' विमानतळावरील नियंत्रणकक्षा मधील अधिकाऱ्याच्या कानात हे शब्द तापलेल्या सळई सारखे घुसले. कोणत्याही विमानात प्रवासादरम्यान अपघातजन्य आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास 'मे - डे' हा शेवटचा आणि निर्वाणीचा सांकेतिक संदेश नियंत्रण कक्षेकडे पाठवला जातो. (नुकत्याच अहमदाबाद ते लंडन विमान अपघातामधील एअरइंडियाच्या पायलटने कॅप्टन सुमित सबरवाल यांनी देखील हा 'मे - डे' चा संदेश अहमदाबादच्या नियंत्रण कक्षा कडे पाठवला होता. पण दुर्दैवाने त्यांना खूप कमी वेळ मिळाला आणि उड्डाणानंतर केवळ ३० सेकंदातच हे विमान नागरी वस्तीत कोसळून कॅप्टन साबरवाल यांच्यासह सर्वच्या सर्व प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यु झाला.) लगार्डिया विमानतळाच्या नियंत्रण कक्षामध्ये एकच गोंधळ उडाला. विमानतळावरील सर्व सुरक्षा यंत्रणा आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाल्या. वास्तविक उड्डाणापूर्वी या विमानाची संपूर्ण तपासणी करण्यात आलेली होती. या विमानाचा प्रमुख वैमानिक कॅप्टन 'चेस्ली सलेनबर्गर' हा अतिशय अनुभवी होता. चेस्ली सलेनबर्गर हा 'सली' या टोपणनावाने प्रसिद्ध होता. 'सली' नागरी विमान सेवेत रुजू होण्या आधी यु.एस. एअरफोर्स मध्ये अनेक वर्षे कार्यरत होता. त्याला तब्बल ४० वर्षांचा विमान चालवण्याचा अनुभव होता. केवळ बर्ड स्ट्राईक म्हणजे पक्षांचा थवा विमानाला धडकल्यामुळे त्याच्या विमानाची दोनीही इंजिन्स बंद पडून आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती.

 


तो दुर्दैवी दिवस होता १५ जानेवारी २००९. त्या दिवशी विमान उड्डाणासाठी अतिशय योग्य असे हवामान होते. नेहेमीप्रमाणे प्रसन्न चेहेऱ्याने सली उर्फ चेस्ली  आणि को-पायलट 'जेफ्री स्काईल्स' यांनी विमानाच्या कॉकपीट मध्ये प्रवेश केला. विमान उड्डाणासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांच्या विमानाने आकाशात झेप घेतली. सर्व काही सुरळीत सुरु होते. अनपेक्षितपणे पक्षांचा एक थवा त्यांच्या विमानावर आदळला. काही पक्षी वैमानिकांच्या समोरच्या काचेवर आदळून काचेला तडे गेले. काही पक्षी विमानाच्या दोनीही बाजूला असलेल्या इंजिनात अडकल्यामुळे इंजिन्स बंद पडली. इंजिनामधे आग ही लागली. इंजिन्स बंद पडल्यामुळे विमान हळू हळू खाली येऊ लागले. ह्या धोकादायक परिस्थितीची कल्पना सलीने ताबडतोप नियंत्रणकक्षाला दिली. अतिशय शांत डोक्याने सली ने विमानावर नियंत्रण मिळवले. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत ज्या गोष्टी वैमानिकांनी करायच्या असतात त्या गोष्टी हे दोनीही वैमानिक करू लागले. सर्वप्रथम बंद पडलेल्या इंजिन्स ना पुनर्जीवित करण्यासाठी सली ने 'ऑक्सिलरी पॉवर युनिट' (APU) नावाचे उपकरण चालू केले. त्यामुळे बंद पडलेल्या इंजिन्स ना आणि इतरही यंत्रणांना काही काळ थोडीफार वीज मिळत राहते आणि वैमानिकांना विमानाचा अपघात होण्यापासून बचाव करण्याची संधी मिळते. त्यानंतर विमानातल्या प्रवासी कक्षेमध्ये येऊन सली ने येऊन घाबरलेल्या प्रवाशांना धीर देण्याचे महत्वाचे काम सुरु केले. सर्वांना परिस्थितीची कल्पना दिली. हा सर्व गोंधळ काही मिनिटातच घडला होता. सली ने आपले विमान पुन्हा परत वळवून विमानतळावर उतरवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पण त्याच्या लक्षात आले की विमान वेगाने खाली जात असल्याने विमानतळापर्यंत जाऊन विमान उतरवणे केवळ अशक्य आहे. मग त्याने एअर ट्राफिक कन्ट्रोल (ATC) कक्षाला कळवले की ''वेळ कमी असल्याने आणि न्यूयॉर्क शहरातील नागरी वस्तीमध्ये विमान कोसळण्याची शक्यता असल्याने मी माझे विमान समोर दिसणाऱ्या 'हडसन' नदीच्या पाण्यात उतरवत आहे".

 

हडसन नदीवर विमान उतरताना 

एखादे मोठे प्रवासी विमान नदीच्या पाण्यात उतरवणे हे खूप धोकादायक असते. त्यात जानेवारी महिन्यातल्या कडाक्याच्या थंडीमुळे (हडसन नदीच्या पाण्याचे तपमान प्रचंड गोठवणारे म्हणजे उणे चार ते पाच डिग्री इतके कमी होते) कुणी प्रवासी पाण्यात पडला तर गारठूनच त्याचा मृत्यू होण्याची शक्यता होती. विमान पाण्याच्या पृष्ठभागावर उतरवण्याच्या प्रक्रियेला एव्हिएशन च्या भाषेत डिचिंग असं म्हणतात. विमान पाण्याच्या पृष्ठभागाला समांतर करत विशिष्ठ कोनात उतरवावे लागते. विमान पाण्यावर उतरवताना विमानाला प्रचंड मोठा धक्का बसतो आणि झालेही तसेच. एका मोठ्या हादऱ्या बरोबर विमान नदीत उतरले. विमानातील प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ झाला. सुदैवाने सीटबेल्ट लावलेले असल्याने फारसे कुणी जखमी झाले नाही. सली च्या लक्षात आले की विमानाची देखील सुदैवाने फारशी हानी झालेली नव्हती. विमान पाण्यात उतरताच सली ने कॉकपीट बाहेर येऊन विमानातील कर्मचारी आणि सर्व प्रवाशांना गंभीरपणे सूचना दिली "ताबडतोप बाहेर पडा." विमानातील कर्मचाऱ्यांनी विमानाचे सर्व दरवाजे उघडले. पाण्यात तरंगणाऱ्या आणि वेगाने घसरत विमानाबाहेर पाडण्यासाठी असलेल्या स्वयंचलित यंत्रणा उघडल्या गेल्या. हवा भरलेल्या बोटीसारख्या दिसणाऱ्या या भागात अनेक प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. पण ही व्यवस्था पुरेशी नव्हती. मग या विमानाच्या दोनीही बाजूला असलेल्या विस्तीर्ण पंखावर प्रवाशांना उभे करण्यात आले. अपघातानंतर विमानामध्ये स्फोट होईल ह्या भीतीने काही प्रवासी पाण्यात उडी मारून पोहत विमानापासून लांब किनाऱ्याकडे जाऊ लागले. पण काही मिनिटातच गारठून गेल्यामुळे ते परत या अपघातग्रस्त विमानाकडे परत आले. या विमानात तब्बल १५५ प्रवासी होते. सर्वच जण वाचले होते आणि विमानाच्या पंखांवर भीतीने आणि थंडीने गारठून मदतीची वाट बघत उभे होते.

 

अपघातग्रस्त विमान 

हडसन नदी न्यूयॉर्क शहरातून वहात लगेचच अटलांटिक महासागराला मिळते. न्यूयॉर्क शहरातून वहातांना ती शहराच्या मधोमध वहात जाते. महासागराला जाऊन मिळताना साहजिकच तिचे पात्र विस्तीर्ण झाले आहे. ही नदी अमेरिकेच्या अतिशय महत्वाच्या व्यापारी दळणवळणाच्या जलमार्गांपैकी एक असल्याने अपघाताच्या वेळी या नदीत काही व्यापारी वहातुक करणाऱ्या बोटी होत्या. या जवळपासच्या बोटी अपघातग्रस्त विमानाच्या मदतीला धावल्या. इकडे एअर ट्राफिक कन्ट्रोल (ATS) ने सर्व आपत्कालीन यंत्रणांना सतर्क केले होतेच. या अपघातग्रस्त विमानातल्या प्रवाश्यांना वाचवण्यासाठी कोस्टगार्ड बोटी तसेच हेलिकॉप्टर्स यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सर्व च्या सर्व म्हणजे १५५ प्रवासी , विमानतळ कर्मचारीवर्ग आणि अर्थातच सर्वांचे प्राण वाचवणारे हिरो वैमानिक सली सालेनबर्गर आणि जेफ्री स्काईल्स ह्या दिव्यातून बचावले. या भयंकर अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. पण आश्चर्य म्हणजे सर्वजण जिवंत राहिले, त्यामुळे या घटनेला 'मिरॅकल ऑन हडसन' अर्थात हडसन नदीवरील चमत्कार असं संबोधलं जातं. सर्व प्रवासी आणि विमानातील कर्मचारी विमानाच्या बाहेर पडलेले आहेत याची खात्री करून विमानातून बाहेर पडणारी शेवटची व्यक्ती होती ती म्हणजे 'सली उर्फ चेस्ली सालेनबर्गर'...   

 

सली उर्फ 'चेस्ली सालेनबर्गर'

फ्लाईट सिम्युलेटर द्वारे चौकशी:

'सली सालेनबर्गर' हे अतिशय मितभाषी, काहीसे लाजाळू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत ते त्यांच्या शांत, संयमी स्वभावाची प्रसिद्ध होते. ह्या अपघाताला ते अतिशय धीराने सामोरे गेले. त्यांनी सर्व प्रवाश्यांचे प्राण वाचवलेले असले तरी त्यांच्या विमान नदीवर उतरवण्याच्या निर्णयाबद्दल शंका उपस्थित केली गेली. त्यामुळे सली आणि जेफ्री ह्या दोघांचीहि कसून चौकशी करण्यात आली. या अपघातातून वाचल्या नंतर या दोनीही वैमानिकांचा चौकशी दरम्यान खरा संघर्ष सुरु झाला. अपघाताच्या प्राथमिक तपासणी मध्ये पक्षांच्या धडकेमुळे विमानाचे इंजिन बंद पडलेले नसावे असा संशय व्यक्त करण्यात आला. आणि असे असेल तर विमान नदीत उतरवता जवळच्या विमानतळावर उतरवणे शक्य झाले असते, असाही निष्कर्ष काढण्यात आला. या चौकशी दरम्यान फ्लाईट सिम्युलेटर प्रणालीचा वापर करण्यात आला. या पद्धती मध्ये विमानाच्या कॉकपीट चे हुबेहूब मॉडेल तयार करण्यात येते. डिजिटल पद्धतीने विमानाबाहेर दिसणाऱ्या वातावरणाची देखील निर्मिती करण्यात येते. अपघाताच्या वेळी पक्षांची विमानाला बसलेली धडक, तसेच आपत्कालीन परिस्थिती हुबेहूब निर्माण केली जाते. या फ्लाईट सिम्युलेटर मधील कृत्रिम कॉकपीट मध्ये अनुभवी वैमानिक बसवले गेले. सर्व अनुभवी वैमानिकांनी या कृत्रिम कॉकपीट मध्ये बसून ठरलेल्या वेळेत विमान नदीत उतरवता जवळच्या विमानतळाच्या रन-वे वर व्यवस्थित उतरवले. त्यामुळे देखील सली आणि जेफ्री यांनी नदीवर विमान उतरवण्याच्या निर्णयावर संशयाचे ढग अधिकच दाटून आले. मात्र सली ने धीरगंभीरपणे परिस्थिती हाताळत सर्व प्रश्नांना, शंकांना उत्तरे दिली. तो म्हणाला "सिम्युलेटर मध्ये बसवलेले वैमानिक उत्तमच आहेत, तथापि ह्या सर्व अनुभवी वैमानिकांना सर्व आपत्कालीन परिस्थितीची आधीच कल्पना दिली गेली होती. पक्षांची धडक विमानाला बसणार आहे, त्यामुळे दोनीही इंजिने बंद पडणार आहेत ह्याची ह्या वैमानिकांना आधीच कल्पना होती, जी आम्हा दोघांनाही नव्हती. त्यामुळे अचानक घडणाऱ्या घटनांवर रिऍक्ट व्हायला आम्हाला काही सेकंद वेळ लागला असणार. पण एक मात्र नक्की आमचं विमान शेजारच्या विमानतळावर उतारावण्या इतका माझ्याकडे वेळ नव्हता. शिवाय माझं विमान नागरी वस्तीत जाऊन अपघातग्रस्त झालं असतं तर जास्त प्राणहानी होण्याची शक्यता होती, म्हणून मी हडसन नदीत विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. अनेक महिन्यांच्या तपासानंतर 'अपघातग्रस्त विमानाच्या दोनीही इंजिन्स मध्ये बिघाड झाला होता' असंही निष्पन्न झालं. सली आणि जेफ्री या दोनीही वैमानिकांना निर्दोष जाहीर करण्यात आलं. चौकशी करणाऱ्या समितीने असंही नमूद केलं की हडसन नदीवर विमान उतरवणे हा एक चमत्कारच आहे. चेस्ली सालेनबर्गर हे एक ‘हिरो’ समान आहेत.

 

चौकशी दरम्यान : टॉम आणि एरॉन

या घटनेनंतर चेस्ली सालेनबर्गर यांनी त्यांच्या को-पायलट जेफ्री स्काईल्स यांच्या मदतीने ह्या थरारक अनुभवांवर आधारित 'हायेस्ट ड्युटी' नावाचे एक पुस्तक लिहिले. २००९ मध्ये प्रसिद्ध झालेले हे पुस्तक 'बेस्ट सेलर' ठरले. या पुस्तकाच्या जगभरात लाखो प्रति विकल्या गेल्या. २०१६ मध्ये याच पुस्तकावर आधारित 'सली: मिरॅकल ऑन हडसन' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक हॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते 'क्लिंट ईस्टवुड' आहेत. क्लिंट ईस्टवूड यांनी जबरदस्त अभिनयाने अमेरिकन फिल्म इंडस्ट्री गाजवून सोडली होती. या पैकी ' फिस्टफुल ऑफ डॉलर्स' (१९६४), 'फॉर फ्यू डॉलर्स मोअर' (१९६५), ' गुड, बॅड अँड अग्ली' (१९६६), 'डर्टी हॅरी' (१९७१) हे चित्रपट क्लिंट इस्टवूड यांच्या अभिनयाने अजरामर झाले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी अकादमी पुरस्कार नामांकित असलेल्या ईस्टवुडने त्याच्या वेस्टर्न चित्रपट अनफर्गिव्हन (१९९२) आणि मिलियन डॉलर बेबी (२००४) या साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळवले. २०१४ मध्ये ईस्टवूडने इराक युद्धातील हिंसाचार आणि या युद्धातील एका सैनिकाच्या संघर्षावर आधारित 'अमेरिकन स्नायपर' निर्माण करून चित्ररसिकांचे कौतुक मिळवले. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी अकादमी पुरस्काराचे नामांकन देखील मिळाले. या चित्रपटाच्या यशामुळे ईस्टवुडने सत्य जीवनातील घटनांपासून चित्रपट तयार करण्याची प्रेरणा घेतली आणि 'सली:मिरॅकल हडसन' हा अफाट चित्रपट तयार झाला.

 

दिग्दर्शक: क्लिंट ईस्टवुड 

या चित्रपटाचा नायक 'टॉम हँक्स' याच्या बद्दल, काय आणि किती लिहावे तेवढे थोडेच आहे. मी त्याचा अभिनय सर्वप्रथम पहिला तो चित्रपट होता 'बिग'. तेंव्हापासून मी टॉम चा चाहता बनलो. या बिग चित्रपटाबद्दल मी पूर्वी काहीबाही लिहिलेले देखील आहे. १९९३ मधील 'फिलाडेल्फिया' आणि १९९४ मध्ये प्रदर्शित झालेला 'फॉरेस्ट गंप' हे टॉम चे चित्रपट विलक्षण लोकप्रिय ठरले. सलग दोन सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे ऑस्कर जिंकणारा पहिला अभिनेता बनला. त्याचे 'सेव्हिंग प्रायव्हेट रायन' (१९९८),'कास्ट अवे' (२०००), 'अपोलो १३' (१९९५), 'द ग्रीन माईल' (१९९९) असे अनेक चित्रपट लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. सली: मिरॅकल व हडसन ह्या चित्रपटात त्याने चेस्ली उर्फ सली या वैमानिकाच्या भूमिका केली आहे. ही भूमिका तो अक्षरशः जगला आहे.

 

टॉम हँक्स 

'एरॉन एकहार्ट' या गुणी अभिनेत्याने को-पायलट जेफ्री स्काईल्स ची भूमिका अतिशय समर्थपणे निभावली आहे. आता आपल्या विमानाला अपघात होणार हे निश्चित झाल्यावर टॉम आणि एरॉन यांनी त्यांच्या अभिनायातुन भीती, तणाव, प्रवाशांची काळजी वगैरे मानवी भावनांचे कमालीचे सुंदर आणि संयमित दर्शन घडवले आहे. प्रत्यक्ष विमान अपघात घडताना केलेले चित्रण आपल्याला खिळवून ठेवते. एकूणच चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम! या चित्रपटाचं अजून एक वैशिष्ठ्य आहे की प्रत्यक्ष विमान अपघाताचे प्रसंग कमी आणि आवश्यक तेव्हडेच दाखवलेले आहेत. मात्र अपघातानंतर दोनीही वैमानिकांनी कसून झालेल्या चौकशीवर दिग्दर्शकाने भर दिला आहे. हा चित्रपट बघण्यासाठी टॉम हँक्स चा अभिनय हे एक महत्वाचे कारण असू शकतं. हा चित्रपट टॉम च्या संयत आणि अफाट अभिनयासाठी बघायलाच हवा.

 


 राजीव जतकर

२४ जून २०२५.


  • हा चित्रपट प्राईम व्हिडीओ वर उपलब्ध आहे. 

No comments:

Post a Comment