कसोटीच्या क्षणांवर मात.
मात्र त्यातही काही प्रसंग ओढवतात की बुद्धी काम करेनाशी होते. पुढ्यातले सर्व मार्ग खुंटतात. मन निराश होतं. असं वाटतं की आपल्या कारकिर्दीचा हा बहुदा शेवटच असावा. पंधरा वीस वर्षांपूर्वी घडलेला एक प्रसंग मी विसरू शकत नाही. त्याचं असं झालं की एकदा मला एक निनावी फोन आला. फोन वर बोलणारी व्यक्ती मला म्हणाली की 'तुम्ही केलेल्या एका कामात झालेल्या घोटाळ्याची माहिती ग्राहकाला समजू द्यायची नसेल तर तुम्हाला मला पैसे द्यावे लागतील'. म्हणजे थोडक्यात ब्लॅकमेल. मला कळेना मी कोणता असा घोटाळा केला आहे? तो माणूस पुढे म्हणाला तुम्ही तुमच्या कामात काही चुका केल्या आहेत, तुम्ही पैसे दिले नाहीत तर मी तुमच्या ग्राहकाला सांगेन.' कोणतेही चुकीचे काम केलेले नसल्याने मी त्याला धुडकावून लावले आणि फोन ठेवला. पण त्यानंतर तो ब्लॅकमेलर मला पुन्हापुन्हा फोन करून त्रास देऊ लागला. मी पैसे देत नाही असे लक्षात आल्यावर तो धमकावू लागला. कसे कुणास ठाऊक पण त्याने माझी कौटुंबिक माहिती देखील शोधून काढली होती. त्यावरून देखील तो धमक्या देऊ लागला. मग मात्र मी धास्तावलो. हा धमक्या देणारा माणूस नेमक्या कोणत्या लेव्हल चा गुंड आहे याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे माझ्या मनातल्या भीतीची पातळी न कळत वाढत होती. मन धास्तावून गेलं. रात्रीची झोप लागेना. जेवण जाईनासे झाले. रोजच्या व्यावसायिक कामात लक्ष लागेनासे झाले. आयुष्य काहीसे थबकल्यासारखे झाले. पुढे मनावरचा ताण वाढल्यामुळे माझ्या छातीतही थोडे दुखू लागले. मी डॉक्टरांकडे गेलो. मी कुठल्या तरी तणावाखाली आहे हे त्यांनी लगेचच ओळखले. ते म्हणाले 'जोपर्यंत तुमच्या मनावरचा ताण कमी होत नाही तोपर्यंत कोणत्याही औषधाने तुम्हाला बरे वाटणार नाही.' थोडक्यात माझा प्रॉब्लेम सोडवणे माझ्याच काय पण डॉक्टरांच्या देखील हातात नव्हते.
असे किती दिवस हा त्रास सहन करायचा? काहीतरी मार्ग काढायलाच हवा होता. एका क्षणी मनातील भीती झटकून मी दोन निर्णय घेतले. एक म्हणजे माझ्या ग्राहकाला मी ही ब्लॅकमेलिंग ची घटना सांगायची ठरवली. तेंव्हा मला असे समजले की हा ब्लॅकमेलर माझ्या ग्राहकाकडून देखील पैसे उकलण्याचा प्रयत्न करीत होता. ग्राहकांपुढे सर्व गोष्टी मोकळेपणाने बोलल्यामुळे केल्याने माझ्या मनावरील बराचसा ताण कमी झाला. (या घटनेनंतर देखील माझ्या त्या गाहकाचा माझ्यावरील विश्वास कायम असल्याने मी अजूनही त्यांची कामे करतो.) मी दुसरा आणि महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे पोलिसात तक्रार करण्याचा. अर्थात पोलीस चौकीची पायरी चढायची म्हणजे वेगळ्या गोंधळाला आमंत्रण देण्यासारखेच होते. काय करावे ते कळत नव्हते. योगायोगाने माझ्या घरी एकदा माझे नातेवाईक असलेले सीआयडी इन्स्पेक्टर घरी आले होते. त्यांना मी सविस्तर घटनाक्रम सांगितला. माझ्या खांद्यावर हात टाकत हसून ते म्हणाले 'अरे हा कुणी फुटकळ गुंड दिसतोय. तुझ्या आजूबाजूला वावरणारा, तुझी इत्यंभूत माहिती असणारा, कदाचित कामगारांपैकी असेल हा माणूस. तू काही काळजी करू नकोस. आता फक्त एक काम कर. त्या गुंडाचा फोन आला तर त्याला चार सणसणीत शिव्या घाल. त्याच्याशी घाबरून न बोलता त्यालाच उलटा 'पोलिसात जाईन' असा दम दे. शिवाय मी तुझ्या ऑफिस शेजारच्या पोलीस चौकीतही सांगून ठेवतो. आता एकदम बिनधास्त राहायचं. आजिबात घाबरु नको'. माझ्या मनावरचा उरलासुरला ताण एकदम नाहीसा झाला. मी रिलॅक्स झालो. नेहेमीप्रमाणे ब्लॅकमेलर चा फोन आलाच. ठरल्याप्रमाणे ब्लॅकमेल करणाऱ्या गुंडाला मी यावेळी चढ्या आवाजात शिव्या घातल्या. परत फोन केलास तर परिणाम वाईट होतील वगैरे दम दिला. गंमत म्हणजे खरंच ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीचे फोन येणे बंद झाले ते आजतागायत.
ही पंधरा वीस वर्षांपूर्वीची घटना अजूनही मला विसरता येत नाही. या काळात माझ्या आजूबाजूला वावरणाऱ्या प्रत्येक अनोळखी व्यक्तीचा मला संशय यायचा. या घटनेमुळे मला बरंच काही शिकायला मिळालं हे देखील खरं. अंदाजे वीसपंचवीस दिवस हा थरार चालू होता. पण संयमाने आणि धीराने परिस्थिती हाताळली तर अवघड संकटावर मात केली जाते एव्हडे मात्र नक्की!
राजीव.
No comments:
Post a Comment