Saturday, 24 October 2020

अंतरंग काळ्या आणि निळ्या पाण्याचे : 'अंदमान'

 

अंतरंग काळ्या आणि निळ्या पाण्याचे : 'अंदमान'



या दिवाळीत खरंतर आम्ही प्राचीन अशा ऐतिहासिक वारसा असलेल्या 'ग्रीस' देशाला भेट देण्याचे ठरवले होते. पण काही अपरिहार्य कारणांमुळे आमची ग्रीस ची सहल रद्द झाली. मग आम्ही आमची सहलीची बकेट लिस्ट उघडली. या बकेट मध्ये अनेक देश, ठिकाणे आमची वाट बघत होती. त्यातील अनेक चिठ्यांमधून आम्ही अंदमान ची चिठ्ठी बाहेर काढली. अंदमान निकोबार द्वीपसमूह बघण्याची आमची बरेच दिवसांची इच्छा होती. त्याला दोन महत्वाची कारणे होती. एक म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात लढणाऱ्या क्रांतिकारकांनी हालअपेष्टा सोसलेल्या अंदमानातल्या सेल्युलर जेलमध्ये जाऊन त्या असंख्य क्रांतिकारकांच्या स्मृतिपुढे नतमस्तक होणे, आणि एकापेक्षा एक सरस अश्या तिथल्या निसर्गाने नटलेल्या किमान काही बेटांना भेट देणे. इथले रमणीय सागरकिनारे अवघ्या जगात अव्वल समजले जातात. येथील समुद्राच्या अंतरंगात निसर्गातील असंख्य दुर्मिळ गोष्टी दिसतात. ऐतिहासिक वारसा आणि संस्कृती जपणारं अंदमान बघायला आम्ही उत्सुक होतो. 

 

अंदाजे दोनतीन महिने आधीच आम्ही पूजा हॉलिडेज च्या पूजा पायगुडे यांच्याकडून आमच्या अंदमान सफारीचा आठ दिवसांचा कार्यक्रम ठरवून विमानांची तिकिटे, हॉटेल्सची बुकिंग्ज वगैरे नक्की केले. या वर्षीचा लांबलेला पावसाळा आम्हाला काळजीत टाकत होता. लहरी हवामानामुळे दोनतीन वेळा विमाने रद्द होऊन त्यांचे रिशेड्यूलिंग करावे लागले. अर्थात पूजाने ती सर्व काळजी घेतली. दि. २६ ऑक्टोबर ला संध्याकाळी स्पाईसजेट च्या विमानाने आम्ही पुण्याहून बेंगलोरला निघालो. हे स्पाईसजेट चे विमान भलतेच लहान होते. विमानात चढतानाचा छोटा जिना केवळ चार पायऱ्यांचा होता. थोड्या मोठ्या मारुती कारमध्ये बसल्याचा भास होत होता. दोन तासांनी बंगलोर गाठले. बेंगलोर ते चेन्नई असा पुन्हा तासभराचा प्रवास करून चेन्नई ला आलो. चेन्नईचा अंतरराष्ट्रीय विमानतळ बऱ्यापैकी मोठा आहे. आमचा पुढील प्रवास चेन्नईहून पोर्ट ब्लेअर असा होता. सुमारे पाच सहा तासानंतर इंडिगो कंपनीच्या विमानाने आम्ही पोर्ट ब्लेअर ला जाणार होतो. मग मधल्या वेळात चेन्नईचे भव्य विमानतळ बघत बरोबर आणलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत होतो. दिवाळी सुरु झाल्यामुळे बरोबरच्या लाडू, चिवडा, चकल्या वगैरे सुरूच होते. विमानतळावर वेळ कसा गेला ते कळलंच नाही. 

 


पोर्ट ब्लेअर ला जाणारे इंडिगोचे आमचे हे विमान मात्र थोडे मोठे होते. पहाटेची वेळ असल्याने सुरवातीला विमानातून खाली काहीच दिसत नव्हते. जसजसे अंदमान जवळ येऊ लागले, तसतसे उजाडू लागले. कापसासारख्या पांढऱ्याशुभ्र ढगांच्या पुंजक्यांमधून मधूनच कधीतरी निळाशार समुद्र दिसू लागला. केशरी, लालबुंद सूर्यनारायण देखील किरणे आसमंतात उधळीत वर येऊ लागला. सकाळचे साडेसहा सात वाजले असावेत. विमानाच्या कॅप्टनने 'अंदमान जवळ आले असून,आपण आता 'वीर सावरकर' अंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत आहोत' असे सांगितले अन मी विमानाच्या खिडकीतून उत्सुकतेने खाली पाहू लागलो. निळ्या समुद्राचा अथांगपणा जाणवत होता. तेवढ्यात अचानक आमच्या विमानाने एक वळण घेतले. वळताना ते डावीकडे झुकले. तिरपे झाले, आणि अचानक अंदमानच्या द्वीपसमूहापैकी काही बेटे दिसू लागली. छोटी छोटी दिसणारी ती बेटे गर्द हिरव्यागार झाडीने गच्च भरली होती. मात्र झाडी नंतर या बेटांना फारसे मोठे वाळूचे किनारे नव्हतेच. हिरव्यागार झाडीनंतर दीडदोन किलोमीटरच्या उथळ किनाऱ्याने प्रत्येक बेट वेढलेले दिसत होते. हा उथळ समुद्रकिनारा फिक्कट हिरव्या, पोपटी रंगाचा दिसत होता. त्यानंतरचा खोल समुद्र गडद्द निळा रंग ल्यालेला. हिरव्या, फिक्कट हिरव्या आणि गडद्द निळ्या रंगांची ही छोटी छोटी अनेक बेटं विमानातून उंचावरून बघणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता. पण ही अनुभूती काही वेळंच टिकली. विमान सरळ झाले आणि पुन्हा दूरवर अथांग समुद्र. पण ह्या बेटांच्या क्षणभराच्या दर्शनाने 'आता आपण काहीतरी अद्वितीय पाहणार आहोत याचा अंदाज मात्र आला.   

 



दिवस पहिला:           

सकाळी साडेसात वाजता आम्ही पोर्ट ब्लेअर च्या वीर सावरकर अंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो. विमानतळ तास लहानच होता. पोर्ट ब्लेअर मधील सेल्युलर जेल मध्ये सावरकरांनी तब्बल अकरा वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भोगली होती. अत्याचार सहन केले होते. त्या जागेला प्रत्यक्ष भेट द्यायला आता आम्हाला मिळणार होते. मनामध्ये  वेगळ्याच भावनांचे तरंग जाणवत होते. उत्सुकता शिगेला पोहोचली होती. विमानतळाच्या बाहेर आल्यावर आमच्या नावाची पाटी हातात धरलेला आमच्या हॉटेलचा एक माणूस दिसला. त्याच्या गाडीतून आम्ही पोर्ट ब्लेअर मधील 'नॉर्थ रीफ' नावाच्या एका मस्त हॉटेल मध्ये विसावलो. सकाळचा नाष्टा-अंघोळी करून, थोडी विश्रांती घेऊन सुमारे अकरा वाजता पोर्टब्लेअर मध्ये भटकायला बाहेर पडलो. पोर्ट ब्लेअर मधील थोड्यावेळाच्या भटकंतीनंतर आम्ही लगेचच जवळच्याच 'नार्थ बे' आणि 'रॉस' आयलंड्स ला जाणार होतो.

 

 पोर्ट ब्लेअर:    पोर्ट ब्लेअर ही अंदमान निकोबार या द्वीपसमूहाची राजधानी. तसं छोटेखानीच शहर. लोकसंख्या अवघी दोनतीन लाख आणि भारतातल्या इतर लहान शहरांसारखच आहे हे शहर. छोट्यामोठ्या काँक्रीटच्या इमारती, पर्यटकांच्या सोयीसाठी अद्ययावत उत्कृष्ठ हॉटेल्स, डांबरी रस्ते, शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल्स, टॅक्सींची सुविधा वगैरे गोष्टींनी परिपूर्ण शहर. शहरातील रस्ते काहीसे चढ उतारांचे असून सार्वजनिक स्वच्छता देखील बऱ्यापैकी आहे. २००४ साली आलेल्या त्सुनामी मुळे या शहराचे बरेच नुकसान झाले आहे.  तथापि आता ते पुन्हा उभे राहत आहे. इथे वास्तव्य असलेले लोक मुख्यतः सरकारी नोकरी किंवा सैन्यदलाशी संबंधित नोकऱ्या करणाऱ्यांपैकी आहेत. इथे आजूबाजूला असलेल्या अनेक छोट्या बेटांवर जसे लिटिल अंदमान, निकोबार बेटं, रॉस, नॉर्थ बे, नील आयलंड येथे प्रवासी मालवाहतुकीसाठी बोटसेवा देणाऱ्या जेटी आहेत. जेटी मोठ्या बोटी समुद्रात उभारण्यासाठी जमिनीपासून खोल समुद्रापर्यंत बांधलेला मार्ग किंवा पूल. थोडक्यात जमिनीवर जसे बसस्थानक, रेल्वेस्टेशन्स असतात तसे समुद्रातील बोटींसाठी असलेली स्थानके! यात चार जेटी प्रमुख आहेत, हाडो जेटी, चॅथम जेटी, फिनिक्स बे जेटी, आणि मरीन जेटी. याशिवाय स्थानिक लोकांच्या सोयीसाठी बंदरांतर्गत यातायात करण्यासाठी जंगली घाट आणि अबर्डीन या छोट्या जेटी देखील आहेत.

 


आमच्या गाडीचा ड्रायव्हर कम गाईड 'नासिरभाई' भरपूर गप्पिष्ठ होता. पोर्ट ब्लेअर भटकताना तो भरपूर माहिती देत होता. पोर्ट ब्लेअर मध्ये बघण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. समुद्रिका (नेव्हल मरिन म्युझियम), अँथ्रोपोलॉजिकल किंवा मानव विज्ञान संग्रहालय, मरिना पार्क, शहराच्या हडो भागात असलेलं मिनी झू प्राणिसंग्रहालय, चॅथम सॉ मिल वगैरे ठिकाणे आम्ही पुढील पाचसहा दिवसात बघणार होतो. आता नॉर्थ बे आणि रॉस बेटांवर जायचे होते, आणि आजचे सर्वात महत्वाचे आकर्षण असलेला इथला सेल्युलर जेलमधील संध्याकाळचा 'लाईट अँड साउंड शो' आम्ही बघणार होतो.

 

नार्थ बे आयलंड :   थोड्यावेळाने नासिरभाईने आम्हाला अबर्डीन जेटीवर आणून सोडले. जेटीवर नॉर्थ बे आणि रॉस आयलंड वर जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी उसळली होती. या जेटीवर स्वर्गीय राजीव गांधी यांचा अतिशय भव्य आणि देखणा पुतळा उभा आहे. समुद्रात अनेक छोट्या मोटारबोटी डुलत, हिंदकळत होत्या. आमच्यासाठी एका छोट्या मोटारबोटीची व्यवस्था करण्यात आली होती. आमची मोटारबोट येईपर्यंत समुद्रावरचा भन्नाट वारा, गप्पा, फोटो, सेल्फीज वगैरे चालू होतेच. फक्त दहा प्रवासी बसण्याची क्षमता असलेल्या छोट्या मोटारबोटीतून आम्ह नॉर्थ बे आयलँडकडे निघालो. आम्हा सर्वांना लाईफजॅकेट्स घालण्यात आली होती. बऱ्यापैकी वेगात जाणारी आमची बोट समुद्रातील लाटांना धडकत चालली होती. त्यामुळे लाटांच्या पाण्याचे तुषार आमच्यावर उडत होते. सुमारे वीसपंचवीस मिनिटांच्या प्रवासानंतर आम्ही नॉर्थ बे आयलंडवर पोहोचलो. या बेटावर जाताना एक दीपगृह देखील दिसते.  

 



नार्थ बे च्या किनाऱ्यावर उतरल्यावर मला प्रकर्षाने जाणवला तो पांढऱ्या रंगाच्या मऊ-मुलायम वाळूचा हवाहवासा वाटणारा स्पर्श. अंदमानातल्या सर्वच सागरकिनाऱ्यावर अशा प्रकारची पांढरी आणि मऊसूत वाळू असते. ही वाळू पटकन गरम होत नसल्यामुळे त्यावरून सहज चालता येते. सर्वच बेटांप्रमाणे इथला देखील दीडदोन कि.मी. पर्यंतचा समुद्र उथळ आहे. या उथळ भागातील समुद्राचे तापमान काहीसे उबदार असते. अशा वातावरणात या उथळ समुद्रात कोरल्स ची किंवा प्रवाळांची चांगली वाढ होते. या प्रवाळांपासून इथली वाळू तयार होते. या उथळ समुद्रकिनाऱ्यावरचे पाणी अतिशय स्वच्छ आणि पारदर्शक असते. उथळ समुद्राच्या तळाशी असलेल्या पांढऱ्या वाळूवरून सूर्यकिरणांचे परावर्तन तात्काळ होते. पांढऱ्या रेतीमुळे, नद्यांनी गाळ आणल्यामुळे आणि मर्यादित मानवी हस्तक्षेपामुळे अंदमानातल्या सर्वच बेटांच्या किनाऱ्यावरच्या पाण्याचा निताळपणा पारदर्शकता कमालीची वाढते. अचूक कोनातून सूर्यकिरण पाण्यावर पडल्यामुळे पाण्याच्या आतील दृश्यता (Visiblity) वाढते. एका जर्मन पर्यटकाने जगातल्या असंख्य सागरकिनाऱ्यांची पाहणी केली. अनेक निकष लावून किनाऱ्यांची क्रमवारी ठरवली. अंदमानचे सागरकिनारे जगातील पहिल्या दहा सुंदर किनाऱ्यांमध्ये समाविष्ट होतात.

 


इथं आम्ही 'डाल्फिन' नावाच्या एका मोठ्या बोटीत बसलो. या बोटीच्या तळाशी एक भलीमोठी काच बसवली होती. वरच्या बाजूला पर्यटकांना बसून समुद्रतळ बघण्याची सोय होती. ही बोट किनाऱ्यालगतच्या उथळ समुद्रातून फिरू लागली. बोटीच्या तळाशी असलेल्या काचेतून वेगवेगळ्या प्रकारचे कोरल्स, रंगीबेरंगी मासे, स्टारफिश, सी कुकुम्बर, सी अर्चिन असे वेगवेगळे जलचर, सागरी शेवाळी यांची अद्भुत दुनिया बघणे अतिशय रोमांचकारी होतं.  स्वच्छ पाण्यातून जाणारी सूर्यकिरणे प्रवाळ  खडकांना प्रकाशित करत होती. या बोटीचा आकार देखील काहीसा डाल्फिन माशासारखा होता



खूप धमाल आली. या बेटावर स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग यासारखे धाडसी समुद्री खेळ देखील करता येतात. या खेळांचा आनंद घेणारे काही पर्यटक या किनाऱ्याच्या एका बाजूला दिसत होते. किनाऱ्यावर भटकत भटकत आम्ही नारळाच्या गोड पाण्याचा आणि त्यातील लुसलुशीत खोबऱ्याचा आस्वाद घेत होतो. किनाऱ्याच्या लगेचच मागच्या बाजूला असलेल्या एका छोट्या पण उंच टेकडीवर चढून जाऊन तिथं असलेलं दीपगृह देखील पाहिलं. उंचावरून अथांग सागराचे विलोभनीय दृश्य दिसत होते. समोरच दूरवर रॉस आयलंड चा छोटा ठिपका दिसला. थोड्या वेळाने आम्हाला तिकडेच जायचे होतं. टेकडीवरून उतरून पुन्हा किनाऱ्यावर येऊन आम्ही आमच्या छोट्या मोटारबोटीत बसून रॉस आयलंड कडे निघालो...

 

 रॉस आयलंड :      सुमारे दीडशे वर्षांपूर्वी 'डॅनियल रॉस' नावाच्या ब्रिटिश मरीन सर्व्हेअरने अंदमानच्या अनेक बेटांचे सर्वेक्षण केले होते. त्यामुळे पोर्ट ब्लेअरच्या उत्तरेला असलेल्या या छोट्याश्या म्हणजे सुमारे २०० एकराच्या बेटाचे नाव रॉस आयलंड असे ठेवण्यात आले. या बेटाचे पूर्वपश्चिम अशा एका भिंतीने दोन भाग केले आहेत. एका भागात एकेकाळी गुन्हेगार कैद्यांना ठेवले जाई. ब्रिटिश शासनकर्त्यांच्या अनेक देखण्या इमारतींचे आता केवळ भग्नावशेष इथं बघायला मिळतात. या पडझड झालेल्या इमारतींमध्ये एक चर्च देखील दिसते. आझाद हिंद सेनेचे प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वास्तव्य लाभलेली चीफ कमांडर्स हाऊस ची इमारत, युरोपियन सैन्याच्या बराकी, ब्रिटिश अधिकाऱ्यांची आलिशान निवासस्थाने, स्टीम बॉयलरची इमारत, जनरल हॉस्पिटल वगैरे इमारतींची आता पार पडझड झालेली आहे. या भग्न वास्तूंवर झाडांचं जंगल माजलेलं आहे. काही इमारती तर वडाच्या पारंब्यांनी पार झाकून गेल्या आहेत.

 


सुरवातीला अंदमानच्या ब्रिटिश राजवटीची राजधानी रॉस आयलंड येथेच होती. सर्व सरकारी कार्यालये देखील याच छोट्या बेटावर होती. तथापि १९४१ मध्ये रॉस आयलंड आणि आजूबाजूच्या प्रदेशात एक भयानक मोठा भूकंप झाला. या भूकंपामुळे येथील इमारतींची अपरिमित हानी झाली. बेटाच्या उत्तर टोकावर असलेल्या दीपगृहाची पडझड झाली. याच सुमारास 'रॉस बेट हे दरवर्षी दोन ते तीन सेन्टिमीटर या वेगाने समुद्रात खचत आहे' असा अहवाल काही संशोधकांनी दिला. त्यामुळे या बेटावरील प्रशासकीय केंद्र पोर्ट ब्लेअरच्या अबर्डीन येथे हलवण्यात आले. जे ब्रिटिश राज्यकर्ते १८५८ पासून ज्या रॉस बेटावरून राज्यकारभार करत होते,  त्या बेटावरच्या पडझड झालेल्या इमारती टिकवण्यासाठी, तिथं घडलेल्या इतिहासात ब्रिटिश शासनकर्त्यांना आता काडीचा रस राहिला नव्हता. त्यामुळे तिथलं सर्व वर्षानुवर्षे तसंच पडून राहिलं. मात्र फक्त नाविक दलाला दळणवळणासाठी उपयुक्त आणि आवश्यक असलेलं दीपगृह पुन्हा नीट उभारलं गेलं. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देखील या बेटाकडे दुर्लक्षच झालं. या रॉस बेटावरील स्थानिकांनी अंदमानात इतरत्र स्थलांतरित होताना स्वतःच्या घराबरोबरच इतर इमारतीमधील लाकडी तावदानं, दारे, खिडक्या, नक्षीकाम केलेली छते, खांब असे जे काही लांबवता येईल ते नेलं. त्यामुळे पडक्या इमारती अधिकच भकास दिसू लागल्या. अनास्था आणि दुर्लक्ष यामुळे एकेकाळी राजेशाही, वैभवसंपन्न असणारं हे बेट आता इतिहासाचा एक भग्न साक्षीदार बनून राहिलं आहे.    

 

निसर्गकन्या अनुराधा राव :   आम्ही नॉर्थ बे आयलंडवरून निघून वीसपंचवीस मिनिटांच्या सागरी मार्गाने रॉस आयलंडवर पोहोचलो. रॉस आयलंडवर एक खोल समुद्रात घुसलेली एक जेटी आहे. तिथं मोठ्या बोटी लागतात. आम्ही मोटारबोटीने गेल्यामुळे बेटाच्या किनाऱ्यापर्यंत गेलो. प्रवासाला निघतानाच पूजा हॉलिडेज च्या पूजा पायगुडेंनी आम्हाला रॉस आयलंड वर गेल्यानंतर तेथील 'अनुराधा राव' यांना नक्की भेटा असं सांगितलं होतं. त्यामुळे अनुराधाबाईंना भेटण्याची आम्हाला उत्सुकता होती. खरं तर सर्वच पर्यटकांना या पन्नाशी उलटलेल्या अनुराधाबाईंना भेटायचेच असते. आम्ही नॉर्थ बे वर थोडे रेंगाळल्यामुळे या रॉस आयलंडवर यायला आम्हाला थोडा उशीर झाला होता. रॉस बेटावर पोहोचताच आम्ही अनुराधाबाईंना फोन करून त्यांना भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली. पण त्या नुकत्याच घरी गेल्या होत्या. त्या काहीश्या थकल्या होत्या. शिवाय दिवाळीचा दिवस होता. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. आम्ही त्यामुळे हिरमुसलो.

 


२००४ च्या त्सुनामी मध्ये संपूर्ण रॉस आयलँडची पूर्ण वाताहत झाली. या वाताहातीमध्ये अनुराधाबाईंचं सारं कुटुंब दुरावलं. आता एकाकी असलेल्या अनुराधाबाई रॉस बेटावरील निसर्ग आणि वन्यप्राणी हेच आपलं कुटुंब मानलंय. इथंच राहणाऱ्या अनुराधाबाई या बेटावरच्या वन्य प्राण्यांची काळजी घेतात. शिकाऱ्यांपासून वन्यजीवांचा जीव वाचवण्याचं त्यांनी जणू ध्यासच घेतलाय. त्यांचा जन्म याच बेटावरचा आणि बालपण देखील इथंच व्यतित झालेलं. या बेटावरची वस्ती निरनिराळ्या कारणांनी जशी कमी होत गेली तसतसे इथले वन्य प्राणी शिकाऱ्यांना बळी पडू लागले. मग इथले वन्यजीव वाचवणे हे अनुराधाबाईंच्या जीवनाचे ध्येयच झाले. त्यात त्यांना खूप अडचणी आल्या. पण त्यांनी घेतला वसा  सोडला नाही. इथं असणाऱ्या हरणांशी, मोरांशी त्यांची मैत्रीच झालेली आहे. त्या या प्राण्यांशी छान गप्पा मारतात. त्यांना प्रेमाने खाऊ घालतात. त्यांचे बोलणे या मूक प्राण्यांना जणू कळतेच. हे प्राणी देखील त्या सांगतील तसे वागतात. रॉस बेटावर  येणाऱ्या पर्यटकांना त्या इथल्या इतिहासाची माहिती देतात. त्यांना आता अधिकृत मार्गदर्शक किंवा गाईड म्हणून मान्यताही मिळालेली आहे. पण त्या पर्यटकांची अडवणूक करून पैसे मागत नाहीत. अशा या अनुराधाबाईंची आमच्याबरोबर भेट होऊ शकली नाही याची कायमची खंत आम्हाला राहील... 

 


रॉस आयलंडवर फेरफटका मारण्यासाठी इथे बॅटरीवर चालणाऱ्या छोट्या गाड्यांची सुंदर सोय आहे. ही बेटं प्रदूषणमुक्त राहण्यासाठी आपल्या सरकारने बरीच काळजी घेतलेली आहे. या छोट्या गाडीने फेरफटका मारताना पडके चर्च अनेक इमारतींचे भग्नावशेष दुतर्फा दिसत होते. या पडक्या इमारतींना प्रचंड वृक्षांच्या मुळांनी जणू गिळंकृतच केले होते. याच गाडीने आम्ही बेटाच्या उत्तर टोकावर असलेल्या दिपगृहाला भेट दिली. दीपगृहावरून समोर अथांग पसरलेला निळा सागर आणि दूरवर नॉर्थ बे आयलंड दिसत होतं.

 



 सेल्युलर जेल मधील ध्वनी प्रकाश कार्यक्रम:  



  आता सूर्य मावळतीकडे झुकू लागला होता. आजच संध्याकाळी पोर्ट ब्लेअरमध्ये सेल्युलर जेल मधील लाईट अँड साऊंड शो बघायला जायचे होते. आम्ही रॉस आयलँडवरून पुन्हा मोटारबोटीने पोर्ट ब्लेअरला आलो. नासिरभाई आमची वाट बघतच होते. जेटीवरून तडक सेल्युलर जेल कडे निघालो. सेल्युलर जेल मध्ये रोज संध्याकाळी लाईट अँड साऊंड शो चे दोन कार्यक्रम होतात. संध्याकाळचा सहा वाजताच हिंदी भाषेतला कार्यक्रम आम्ही बुक केला होता. हिंदी कार्यक्रमानंतर इंग्रजीतला कार्यक्रम असतो. सेल्युलर जेलच्या बाहेर या शो ची तिकिटे काढलेल्या पर्यटकांची भली मोठी रांग होती. आतमध्ये गेल्यावर सुस्थितीत असलेल्या सहाव्या आणि सातव्या जेलच्या इमारतींच्या मध्ये पर्यटकांसाठी खुर्च्या मांडल्या होत्या. आम्ही आमच्या आसनांवर स्थानापन्न झालो. आता बऱ्यापैकी अंधारून आले होते. उजव्या बाजूच्या सातव्या विंगच्या तिसऱ्या मजल्यावरील सर्वात शेवटची म्हणजे १२३ क्रमांकाची कोठडी (जिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांना ठेवले होते) दिसत होती. कोठडीकडे पाहताना अंगावर सरसरून काटा आला. मनात असंख्य विचार दाटून आले. काय यातना झाल्या असतील सावरकरांना. एक नव्हे दोन नव्हे तब्बल ११ वर्षे तुरुंगवास... बापरे...!  

 


हळूहळू दिड दोनशे प्रेक्षक स्थानापन्न झाल्यावर कार्यक्रम सुरु झाला. सुरवात राष्ट्रगीताने झाली. तुरुंगातील आसमंतात ओम पुरी, नसरुद्दीन शाह, जलाल आगा, टॉम अल्टर इत्यादी दिग्गजांच्या धीरगंभीर आवाजात तुरुंगाचा इतिहास प्रेक्षकांसमोर उलघडू लागला. आम्ही बसलो होतो त्याच्या डाव्या बाजूला एक जुने पिंपळाचे झाड होते. या जेलच्या निर्मितीपासूनच्या काळातील हे झाड आहे. आता तो जुना इतिहासाचा साक्षीदार असलेला पिंपळवृक्ष बोलू लागला. प्रकाश योजना आपले काम करू लागली. क्रांतिकारकांच्या 'इन्कलाब जिंदाबाद' च्या घोषणांनी सर्व तुरुंगाचा आसमंत दुमदुमला. क्रांतिकारी कैद्यांच्या पाठीवर ओढलया जाणाऱ्या आसुडाचे आवाज, क्रांतिकारकांच्या किंकाळ्या, आक्रोश, आमच्या कानात घुसत होता. माझ्या अंगावर अक्षरशः काटा येत होता. हा शो इतका प्रभावी होता की माझा श्वास वाढला होता, डोळ्यात अश्रू तरळत होते. आजपर्यंत मी पाहिलेल्या अनेक लाईट अँड साउंड शो पैकी सर्वात प्रभावी आणि परिणामकारक असा हा शो होता. अतिशय जिवंत आणि हृदयस्पर्शी असलेला हा शो पाहून बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांच्या ओलावल्या पापण्या, गदगदून आलेला चेहेरा आणि काहीही बोलता बाहेर पडणे यातूनच या कार्यक्रमाच्या यशस्वितेची पावती मिळते. अंदमानला गेल्यावर हा कार्यक्रम चुकवताच येणार नाही. आमच्या हॉटेलवर जाताना आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो. रात्रीचे जेवण करून लगेचच झोपी गेलो, कारण उद्या अंदमानातील सुप्रसिद्ध हॅवलॉक आयलंडला आम्ही भेट देणार होतो. सकाळी लवकर निघायचे होते. आमच्या गाडीच्या ड्रायव्हरचा नासिरभाईंचा तसा आदेशच होता.  

 



दिवस दुसरा:  हॅवलॉक आयलंड.



सकाळी सात वाजता उठून आमच्या हॉटेलच्या डायनिंग हॉल मध्ये जाऊन नाश्ता केला. नाश्त्याला कॉर्नफ्लेक्स, उकडलेली अंडी, ब्रेड टोस्ट, छोलेपुरी, इडली, फळे असे भरगच्च पदार्थ होते. हॉटेल बाहेर पडताच नासिरभाई गाडी घेऊन तयारच होते. आमचा हॅवलॉक बेटावर दोन दिवस मुक्काम असल्याने आम्ही आमचे सर्व सामान घेऊनच इथले हॉटेल सोडले. दहापंधरा मिनिटातच पोर्ट ब्लेअर च्या फिशरी जेटीवर आणून सोडले. विमातळावर जशी सर्व कागदपत्रांची तपासणी करतात तशी सर्व तपासणी झाली. हॅवलॉक हे बेट सर्व पर्यटकांचे आवडते असते त्यामुळे भरपूर गर्दी होती. प्रवाशांचे सामान 'मेरीक्रूझ' नावाच्या प्रचंड बोटीत चढवले गेले. आम्ही देखील बोटीत चढलो. सुमारे तीनचारशे पर्यटक बसतील अशी ही भलीमोठी बोट होती. प्रत्येकाच्या तिकिटावर सीट नंबर्स होते. आम्ही आपआपल्या सीटवर बसल्यावर बोट सुरु झाली. समोर सर्व प्रवाशांना सहज दिसेल असा एक भव्य एलईडी स्क्रीन लावला होता त्यावर अंदमानातील बेटांची माहिती, इथले सागरकिनारे, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग यासारख्या करमणुकीच्या विविध सागरी खेळांची माहिती दाखवणे सुरु होते. क्रूझच्या मध्यभागी एक छोटेसे रेस्टोरंट देखील होते. क्रूझच्या कडेच्या काचांमधून बाहेरच्या समुद्राचा नजरा दिसत होता. आम्ही हॅवलॉक च्या दिशेने निघालो.   

 


पोर्ट ब्लेअरच्या पूर्व किनाऱ्यापासून ईशान्येस असलेले हॅवलॉक हे बेट पर्यटकांसाठी एक स्वर्गासमान असलेले ठिकाण आहे. पोर्ट ब्लेअर पासून हॅवलॉकला येण्याजाण्यासाठी रोज सकाळ संध्याकाळ बोटसेवा असते.अंदमानच्या सहलीला आलेला प्रत्येक पर्यटक या बेटाला भेट देतोच. त्याशिवाय अंदमानची सहल पूर्णच होऊ शकत नाही. पोर्ट ब्लेअर पासून सागरी मार्गाने सुमारे ६५ कि.मी. अंतरावर हे बेट आहे. या देखण्या बेटाला घनदाट हिरव्या झाडीचं वैभव तर आहेच, पण मऊसूत पांढऱ्या वाळूचे हिरव्या निळ्या, स्वच्छ नितळ पाण्याचे देखणे समुद्रकिनारे देखील आहेत. या हॅवलॉक बेटावर आवर्जून भेट देण्यासारखे राधानगर, विजयनगर, काला पत्थर, इलेफंट हे सागर किनारे पर्यटकांनी गजबजलेले असतात. आम्ही अर्थातच इथे धमाल करणार होतो.  

 


हॅवलॉक जेटीपासून अक्षरशः चालत जाण्याच्या अंतरावर असलेले 'हॅवलॉक एन.के. रिझॉर्ट' नावाचे अप्रतिम हॉटेल आमच्या इथल्या राहण्याचे ठिकाण होते. या आमच्या हॉटेलच्या मध्यभागी एक प्रशस्त, स्वच्छ पाण्याचा निळाशार स्विमिंग पूल होता. या स्विमिंग पूल च्या चारीही बाजूंनी सर्व सोयींनी युक्त अश्या पर्यटकांसाठी वातानुकूलित खोल्या होत्या. पहिल्या मजल्यावर रेस्टोरंट होतं. मी तर हे हॉटेल बघून खूषच झालो. या हॅवलॉक मुक्कामी समुद्रात आणि स्विमिंग पूल मध्ये भरपूर पोहायचे असे मी ठरवूनच टाकले. हॉटेल मध्ये येऊन आम्ही स्थिरावलो तोच आमच्या इथल्या ड्रॉयव्हरने सांगितले की आता लगेचच आम्हाला स्कुबा डायव्हिंग करायला जायचंय.  

 





स्कुबा डायव्हिंगचा थरार:    स्कुबा डायव्हिंग करणे हे माझे बऱ्याच दिवसांचे स्वप्न होते आणि अंदमानला येण्याचे एक महत्वाचे कारण देखील. स्कुबा डायव्हिंगचं आकर्षण भल्याभल्यांना असतं तसं मलाही होतं. आपण राहतो त्या वातावरणात आजूबाजूला हवा असते. आजूबाजूला हवा नसलेली देखील दोन ठिकाणे आहेत. एक म्हणजे अंतराळ आणि दुसरी जागा म्हणजे पाण्याखालचं जग ! अंतराळात आणि पाण्याखालच्या जगात वावरण्यासाठी विशिष्ठ शिक्षणाची आवश्यकता असते. आपल्या सारख्या सामान्य माणसांना अंतराळात जाऊन तेथील अनुभव घेणे दुरापास्तच. ती शक्यता नाहीच ! पण पाण्या खालच्या जगाची अनुभूती घेण्यासाठी स्कुबा डायव्हिंग हा धाडसी पण अफाट प्रकार सहज शक्य आहे. स्कुबा डायव्हिंग करण्याची ६० वर्षांपुढील व्यक्तींना परवानगी नसते. खोल समुद्रात जाताना वयाची मर्यादा असते कारण या वयात डायबेटीस, ब्लडप्रेशर, अस्थमा यासारख्या व्याधी असण्याची शक्यता अधिक असते. मी माझ्या वयाची साठी नुकतीच पार केलेली होती. त्यामुळे मी हिरमुसलो. पण स्कुबाच्या ध्यासापोटी (आणि वयाचा दाखला मागितल्यामुळे) मी चक्क खोटं बोललो आणि माझं वय ५९ आहे असं सांगितलं. फॉर्म भरून घेणाऱ्या व्यक्तीने माझ्याकडे मिस्कील नजरेनं पहिलं आणि मला परवानगी मिळाली. अलका ला म्हणजे माझ्या पत्नीला पोहायला येत नव्हते. पण पाण्याखाली जाताना एक कुशल पोहोणारा पाणबुड्या सोबत असतो असे समजल्यावर तीही तयार झाली. अलका खूप घाबरलेली होती. मीही मनातून जरा टरकलोच होतो. पण चेहेऱ्यावर तसे दाखवता आम्ही एकमेकांना धीर देत होतो. आमचा हा पहिलाच अनुभव होता. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून आम्ही हॅवलॉक बेटावरच्या एका खाजगी समुद्रकिनाऱ्यावर गेलो. जाताना विशिष्ठ प्रकारचा ड्रेस आम्हाला घालण्यात आला आणि किनाऱ्यावरच आमचं ट्रेनिंग सुरु झालं.

 


स्कुबा हा शब्द 'सेल्फ कॅन्टेन्ड अंडरवॉटर ब्रिदींग अपरेटस' याचं संक्षिप्त रूप आहे. आम्हाला घालण्यात आलेल्या विशीष्ठ ड्रेस मध्ये हवा भरण्याची आणि काढण्याची बटणे होती. मग आमच्या पाठीवर एक प्राणवायूची टाकी (सिलेंडर) बसवली गेली. या प्राणवायूच्या सिलेंडरमधून एक नळी बाहेर आली होती. या नळीच्या बाहेरच्या टोकावर एक व्हॉल्व किंवा रेग्युलेटर बसवला होता, जो तोंडात घट्ट पकडून त्याद्वारे श्वासोच्छवास करायचा असतो. नंतर डोळ्यावर आणि नाकावर घट्ट बसेल असा एक मास्क आमच्या चेहेऱ्यावर चढवला गेला. मास्क लावल्यावर मात्र नाक पूर्णपणे बंद झाले. आता मात्र मी दचकलो... पाण्याखाली गेल्यावर  घायचाच नसतो. श्वास फक्त तोंडात पकडलेल्या रेग्युलेटरनेच घ्यायचा. नेमक्या याच प्रकारची आपल्याला सवय नसते. मग आमच्या ट्रेनरने उथळ पाण्यात उभे राहून पाण्यात तोंड बुडवून तोंडातल्या रेग्युलेटरने श्वासोच्छवास करायचा सराव आमच्याकडून करवून घेतला. आता मात्र  भीती वाटू लागली. कुणीकडून ह्या फंदात पडलो असं देखील एकदा वाटून गेलं. आमच्या ट्रेनरला आमच्या सारख्या नवोदित डायव्हर्सची ही घाबरलेली अवस्था नवीन नसावी. त्याने हसून आम्हाला धीर दिला. पाण्याखाली असताना काही अडचण आल्यास काय करायचे, अशावेळी एकमेकांशी कसा संवाद साधायचा, याबद्दलच्या खाणाखुणा कशा करायच्या याचे व्यवस्थित शिक्षण आमच्या ट्रेनर ने आम्हाला दिले. आमच्या ट्रेनर ने आम्हाला सांगितले कि "आपण जसजसे पाण्याखाली खोल जाऊ तसतसे आपल्या कानातल्या पडद्यावर पाण्याचा दाब वाढून कानाचे दडे बसतात. काही वेळा कान ठणकूही लागतात. अशावेळी घाबरता दीर्घ श्वासोच्छवास घेतल्याने पानावरचे दडपण कमी होईल". आता काय होणार होतं ते काय माहित? माझ्या छातीमधील धडधड मात्र वाढली होती.

 


प्रवाळांची दुनिया :   आणि खोल समुद्रात बुडी मारायची ती वेळ आलीच. माझ्या ट्रेनर ने मला किनाऱ्यापासून थोडे दूर खोल समुद्रात नेले आणि आम्ही दोहांनीही पाण्यात बुडी मारली. आम्ही दोघेही खोल समुद्रतळाशी जाऊ लागलो. पहिल्या पाचच मिनिटात मला तोंडाने श्वासोच्छवास करण्याचे तंत्र जमले. मनातली भीती पार पळाली आणि मी अभूतपूर्व अशाप्रकारच्या गोताखोरीचा आनंद घेऊ लागलो. थोड्याच वेळात आम्ही अंदाजे तीस फूट खोलीचा समुद्रतळ गाठला. समुद्रतळाशी गूढ अशी शांतता होती. समुद्राचे पाणी अतिशय स्वच्छ असल्याने आतील दृश्याता (व्हिजिब्लिटी) कमालीची चांगली होती. समुद्रतळाशी असलेली नानाविध रंगाची, आकाराची प्रवाळे (कोरल्स) स्पष्ट दिसत होती. ही प्रवाळे म्हणजे निडारियन जैविक समुदायातील सूक्ष्म प्राणीच असतात. या समुदायात प्रामुख्याने हायड्रा, जेलीफिश, समुद्री रंगीत फुले अशाप्रकारचे स्थिर स्वरूपाचे सूक्ष्म प्राणी असतात. समुद्रात तरंगणारे सूक्ष्म प्राणी, मासे हे त्यांचे खाद्य! ही प्रवाळे कळपांनी राहतात. त्यांच्या शरीरातून कॅल्शियम कार्बोनेटचा दाटसर स्त्राव वाहात असतो. तो थर प्रवाळांच्या समूहावर चिटकून राहातो, त्यांना संरक्षण देत असतो. ही प्रक्रिया शेकडो, हजारो वर्षे चालूच असते. या प्रवाळांचे विविध रंगांचे, आकारांचे घट्ट खडक बनतात. अनेक वेळा आधीच्या पिढीतील प्रवाळांच्या खडकावर पुढच्या पिढीची नवीन वसाहत बनते. असे होता होता हजारो वर्षांनंतर काही ठिकाणाचा समुद्रतळ चक्क वर उचलला जातो आणि प्रवाळ बेटे तयार होतात. प्रवाळांचे खडक विविध प्रकारच्या वनस्पतींना, प्राण्यांना आसरा देतात. त्यात अल्गी, स्पंज, सी स्लग, ऑयस्टर, क्रॅब्ज, श्रिम्पस, समुद्री किडे, स्टारफिश, सी अर्चिन इत्यादी प्राण्यांना इथं प्रवाळ खडकात आश्रय मिळतो. इथं अंदमानात फायर कोरल्स, पिंक मिलिपोरा, रोझलेस कोरल्स, ऑर्गन पाईन कोरल, ब्रेन कोरल, सी फॅन कोरल, असे विविध कोरल्स आढळतात. त्यातील काही कोरल्स आमचा ट्रेनर आम्हाला दाखवत होता.  मला माझा ट्रेनर वेगवेगळ्याप्रकारची कोरल्स, रंगीबेरंगी माशांच्या झुंडीच्या झुंडी दाखवत होता. मधेच एके ठिकाणी त्याने समुद्राच्या तळाशी पडलेली, पूर्णपणे गंजलेली 'यामा' कंपनीची मोटारसायकल दाखवली. ही मोटारसायकल इथे एखाद्या अपघातात खरंच बुडालेली होती की पर्यटकांना काहीतरी गम्मत दाखवायची म्हणून मुद्दाम बुडवून ठेवलेली होती देव जाणे.

 


 आता मी पूर्ण सरावलो होतो. भीती पार पळाली होती. मी आणि माझा ट्रेनर समुद्रतळाला समांतर आडवे होऊन समुद्राच्या आणखी खोल बाजूला जाऊ लागलो. आणखी खोल गेल्यावर मी सहज वर बघितलं. वरून येणाऱ्या सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी झालेली होती. आता खोल समुद्रात थोडा अंधार जाणवायला लागला होता. वर बघताना मी उच्छवासावाटे सोडलेल्या हवेचे बुडबुडे वर जात होते. सागराच्या पोटातल्या गूढ शांततेत ह्या बुडबुड्यांचा आवाज माझ्या दडे बसलेल्या कानात घुमत होता. रंगीबेरंगी माशांची संख्या आता वाढली होती. आते ते धिटाईने माझ्या अगदी जवळून जात होते. जणू 'हा कोण प्राणी आपल्या जगात आलाय?' अशा कुतूहलाने मासे माझ्या जवळ येऊन मला पाहत होते. मधेच लांबवर माझ्यासारखाच एक पर्यटक आणि त्याचा ट्रेनर दिसले. जवळजवळ अर्ध्यातासाने आम्ही पाण्याबाहेर आलो. खरं तर मला पाण्याबाहेर यावेसेच वाटत नव्हते. पण नाईलाज होता. बाहेर आल्यावर एक मात्र जाणवले की स्कुबा डायव्हिंग करताना आपल्याला खोल समुद्रात उपयोगी पडणाऱ्या उपकरणांवर, आपल्याला मदत करणाऱ्या ट्रेनर वर आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपला स्वतःवर विश्वास असायला हवा. थोडे धाडस, इच्छाशक्ती असल्यास हा धमाल अनुभव सहज घेता येतो. आयुष्यात प्रत्येकाने हा अनुभव एकदा तरी घ्यायलाच हवा.   

 



समुद्रातून बाहेर आल्यावर मात्र सपाटून भूक लागली होती. मग येताना एका साध्याच बंगाली रेस्टोरंट मध्ये बंगाली पद्धतीचं जेवण घेतलं. या जेवणातील बऱ्यापैकी मोठा असलेला मासा कमालीचा चविष्ठ होता. भरपूर भात, फिश करी, मासे असं धमाल जेवण करून आम्ही आमच्या हॉटेल वर येऊन थोडी विश्रांती घेतली, आणि 'राधानगर बीच' वर सनसेट बघण्यासाठी निघालो. आमच्या हॉटेलपासून सुमारे दहाबारा कि.मी. अंतरावर असलेला राधानगर सागरकिनारा पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. इथला सूर्यास्त बघून डोळ्याचे अक्षरशः पारणे फिटते. काही पर्यटक समुद्रस्नानाचा आनंद घेत होते. आम्ही मात्र स्कुबा डायव्हिंग केल्यामुळे पुन्हा समुद्रात जाण्याचं टाळलं. मात्र इथल्या मऊशार पांढऱ्या वाळूत बसून निवांत गप्पा मारल्या. संध्याकाळचे थंड समुद्री वारे मनाला, शरीराला सुखावत होते. शहाळ्याचं गोड पाणी पित मावळतीच्या सूर्याला आम्ही निरोप दिला. आता अंधार पडू लागला होता. इथं जवळच्याच एका रेस्टोरंट मध्ये आम्ही जेवलो. जेवणात मासे होते हे पुन्हा सांगायला नको. या हॉटेल मालकाने आम्हाला आधी ताजे मासे आणून दाखवले, मग आम्ही निवडलेल्या माशाचे कालवण करून भाता बरोबर वाढले. स्थानिक पद्धतीने बनवलेल्या माशावर आणि जेवणावर आम्ही ताव मारला. दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री आमच्या हॉटेलच्या वातानुकूलित रूम मधील गुबगुबीत बिछान्यात आम्हाला कधी झोप लागली ते कळलंच नाही...  

 




दिवस तिसरा :   इलेफंट बीच.

आज हॅवलॉक मधील दुसरा दिवस. सकाळचा भरपेट नाश्ता आमच्या हॉटेलमधूनच घेऊन आम्ही बाहेर पडलो. आज आम्ही हॅवलॉक च्या इलेफंट बीच ला भेट देणार होतो. या इलेफंट बीच ला भेट देता परत जाणारा पर्यटक विरळाच! त्याचं कारण म्हणजे अनेक प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स जसे स्नार्कलिंग, स्पिडबोट राइड्स, वॉटर सर्फिंग, बनाना बोट राईड, वगैरे समुद्रातील खेळ इथं करता येतात. या शिवाय हत्तीवरून समुद्रकिनाऱ्यावर सैर करता येते. अंदमानातल्या इतर सागरकिनाऱ्यांप्रमाणे मऊसूत पांढऱ्या वाळूचा प्रवाळांनी समृद्ध असलेला सागर किनारा, आणि रंगीबेरंगी माशांनी गजबजलेला इथला उथळ सागरतळ यामुळे हा बीच पर्यटकांनी कायम गजबजलेला असतो. सकाळी नाश्ता उरकून आम्ही हॅवलॉक जेटीवर आलो. जेटीच्या जवळच्या किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी उसळलेली होती. पर्यटकांना इलेफंट बीचवर घेऊन जाणाऱ्या बोटी तयारीतच होत्या. या छोट्या मोटार बोटीत दहाच माणसे बसण्याची मर्यादा असते. अंदमानातल्या प्रत्येक समुद्र सफरीमध्ये अशाच बोटी होत्या. सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट घालावे लागे. हॅवलॉक च्या किनाऱ्यापासून वीसपंचवीस मिनिटांच्या अंतरावर इलेफंट बीच आहे. समुद्रातून मोटारबोट वेगाने जात होती. बोटीचे पुढचे टोक लाटांना धडकत होते. त्याचे उडणारे पाणी आम्हाला पार भिजवून टाकत होते. इलेफंट बीच जवळ आल्यावर स्पिडबोटीवर धमाल करणारे पर्यटक दिसू लागले.  

 




तसा हा इलेफंट बीच लहानच आहे. मागे नारळाची, सुपारीची घनदाट जंगले, छोटासाच पांढऱ्या वाळूचा किनारा आणि लगेचच हिरवट निळ्या रंगाचा उथळ समुद्र. इथं पर्यटक मोठ्या संख्येने येत होते. किनाऱ्यावर छोटे छोटे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स होते. इथल्या स्टॉल्स मध्ये फळांचे स्टॉल्स लक्ष वेधून घेत होते. आपल्या नेहेमीच्या सफरचंद, सोनकेळी, पपई अशा फळांबरोबर काही स्थानिक फळेही दिसत होती. 'आमरा' आणि 'तामरा' नावाची दोन इथली स्थानिक फळे. ही दोन्हीही फळे आंबट गोड चवीची असतात. आम्ही अर्थातच ह्या फळांची एक प्लेट घेतली. या ताज्या फळांचा स्वाद घेत घेत आम्ही किनाऱ्यावर भटकू लागलो. अचानक सोसाट्याचा वारा सुटला. बघता बघता आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आणि काही कळायच्या आत जोरदार पावसाने कोसळायला सुरवात केली. कधी वादळ येऊन पाऊस कोसळेल ह्याचा नेम नाही. पर्यटकांची पळापळ झाली. आम्ही लगेचच एका मोठ्या झाडाचा आसरा घेतला. जवळजवळ अर्धा तास हा पाऊस कोसळत होता. थोड्या वेळाने पाऊस थांबला. वातावरणात अचानक होणारे बदल हे इथल्या हवामानाचं वैशिष्ठ्य. 

 




स्नॉर्कलिंगची धमाल:    अर्ध्या तासाने पाऊस जसा जादूसारखा अदृश्य झाला, तसे आडोशाला उभारलेले पर्यटक किनाऱ्यावर मजा करायला पुन्हा उधळले. लख्ख  ऊन पडले. आम्हाला स्नॉर्कलिंग करायचे होते. स्नार्कलिंग करायला ऊन असेल तर जास्त मजा येते. इथला सागर किनारा उथळ आहेच आणि विविध प्रवाळांनी समृद्ध आहे. त्यामुळे स्नॉर्कलिंग या प्रकारासाठी अतिशय अतिशय सोयीचा असा हा बीच आहे. स्नॉर्कलिंग म्हणजे उथळ समुद्राच्या मस्तक बुडवून पाण्याच्या आतील समुद्रतळाचे सौंदर्य न्याहाळणे.  स्नॉर्कलिंग म्हणजे काय, ते कसे करायचे याची काहीशी कल्पना मला होती. स्कुबा डायव्हिंग हा खोल  पाण्यात जाऊन समुद्राचा तळ निरखायचा प्रकार आहे, तर  स्नॉर्कलिंग हा समुद्राच्या पृष्ठभागावर पालथे तरंगत राहून उथळ समुद्राचा तळ अनुभवण्याचा प्रकार आहे. तुलनात्मक दृष्ट्या स्नॉर्कलिंग हा सोपा प्रकार आहे. स्कुबा डायव्हिंग ला सुरवातीला भीती वाटते. आम्ही कालच स्कुबा डायव्हिंग केलेले असल्याने आम्ही निर्धास्तपणे स्नॉर्कलिंग करायला समुद्रात उतरलो. इथेही एक ट्रेनर बरोबर होताच. इथेही वयाची मर्यादा होतीच. रीतसर खोटे बोलून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली होतीच.

 



सुरवातीला कंबरे एव्हढ्या पाण्यात उभे राहून माझ्या ट्रेनरने आवश्यक त्या सूचना दिल्या. मग माझ्या चेहेऱ्यावर बसेल एव्हडा एक मास्क चढवला गेला. या मास्क मधून वरच्या बाजूला हवेसाठी एक नळी बाहेर आली होती. ह्या नळीचे तोंड पाण्याबाहेर ठेऊन फक्त आपले तोंड पाण्यात घालून आणि आडवे पडून पोहत पोहत समुद्राचा उथळ तळ न्याहाळत फिरायचं असा हा धमाल प्रकार. ट्रेनर च्या सूचना संपल्या तसे मी माझं तोंड पाण्यात बुडवून आडवा झालो. पाण्यात तरंगू लागलो. माझा ट्रेनर किनाऱ्यापासून मला दूर घेऊन जाऊ लागला. वरून सूर्याची किरणे पाण्यात घुसून समुद्रतळ प्रकाशित करत होती. विस्फारित नजरेनं मी स्फटिकासारख्या नितळ निळ्याशार पाण्यात शिरलेला सूर्यप्रकाश पाहत होतो. सूर्यप्रकाशामुळे सर्वत्र फाकलेली स्वप्नाळू निळाई माझ्या डोळ्यात मावत नव्हती. कधीही पाहिलेले रंगीबेरंगी, चमचमणारे मासे सुळसुळत एकमेकांचा पाठलाग करत होते. माझी तर नजरच ठरत नव्हती. विविध आकाराच्या, प्रकारच्या प्रवाळ खडकांची, मऊमुलायम सोनपांढऱ्या वाळूची दुनिया कमालीची सुंदर होती. सुमारे दोनतीन मीटर खोलीपर्यंतचा आरस्पानी समुद्रतळ न्याहाळताना माझं समुद्रात आडवं पडून प्रत्येक लाटेबरोबर ते हिंदकाळणं मी विसरूच शकत नाही. हॅवलॉक बेटावरच्या ह्या इलेफंट सागर किनाऱ्याला भेट द्यायलाच हवी, तसं केल्यास पंढरीला जाऊन बिठोबाचं दर्शन घेतल्यासारखंच आहे. असो... 

 


स्नॉर्कलिंग नंतर आम्ही दीडदोन तास इथल्या शांत समुद्रात डुंबत होतो. नाईलाजानेच पाण्याबाहेर येऊन नारळपाण्याच्या स्टॉल कडे मोर्चा वळवला. अंदमानभर मिळणारी गोड पाण्याची शहाळी आम्ही मनसोक्त प्यायलो. शहाळ्यातील मलईदार लुसलुशीत खोबरंही खाल्लं. इलेफंट बीच वर हत्तीवरून फेरफटकाही मारता येतो असं ऐकलं होतं, पण मला तरी हत्ती दिसला नाही. बघता बघता चार वाजले. मग आम्ही पुन्हा मोटारबोटीने हॅवलॉक जेटीच्या दिशेने निघालो. हॅवलॉक वर पोहोचून रमतगमत आमच्या हॉटेल वर येऊन थोडी विश्रांती घेतली. आता आज दुसरीकडे कुठेही जायचे नव्हते. त्यामुळे विश्रांती नंतर आमच्या हॉटेलमधील निळ्या रंगाच्या स्विमिंग पूल मध्ये शिरलो. तासभर केलेल्या स्विमिंग मुळे मन, शरीर तरतरीत झाले. दिवस कसा गेला ते कळलंच नाही. उद्या सकाळी काला पत्थर नावाच्या बीचवर जायचं होतं, त्यानंतर पोर्टब्लेअर ला परतायचं होतं. आत्ता मात्र डोळ्यात झोप तरळत होती. रात्रीचं जेवण करून झोपी गेलो. 

 

दिवस चौथा :  काला पत्थर बीच.

खरं तर हॅवलॉक हे बेट पाण्यात उतरल्याशिवाय दिसतंच नाही. समुद्राच्या पाण्यातील असंख्य खेळ हे या बेटाचं खास वैशिष्ठ्य. तुम्हाला पाण्याची भीती वाटत नसेल, तुम्हाला पोहोता येत असेल तर हॅवलॉक आणि अंदमानातल्या इतर बेटांना भेट देऊन समुद्री जीवनाची मजा लुटायलाच हवी. नानाविध प्रकारचे प्रवाळखडक, रंगीत मासे जवळून बघण्यासाठी हे आदर्श ठिकाण आहे. हॅवलॉक येथील सर्व सागर किनाऱ्यांवर शंख शिंपल्यांचा अक्षरशः खच पडलेला असतो. हातात मावणार नाहीत एव्हडे मोठाल्ले शंख,आणि मखमली रंगाचे शिंपले पिशव्या भरभरून न्यावेत अशी इच्छा पर्यटकांना होणे स्वाभाविक असते. पण इथं मात्र मोह आवरावा लागतो. अंदमानातल्या कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावरून काहीही उचलायला इथं कायद्यानं बंदी आहे. ते योग्यही आहे. परतीच्या प्रवासात पर्यटकांच्या बॅगेत चुकूनही शंख शिंपल्यांसारख्या वस्तू सापडल्या तर मोठा दंड केला जातो. वस्तू विकत घेतल्या असतील तर पावती दाखवून विकत घेतल्याचा पुरावा दाखवावा लागतो. त्यामुळेच इथले समुद्रकिनारे इतके सुंदर राहू शकतात.   

 


उत्तम सहलीसाठी हॅवलॉक इतकी सुंदर जागा जगात शोधूनही सापडणार नाही. लाकडाचे सुंदर काम केलेले आलिशान रिसॉर्ट्स इथे आहेत. हॅवलॉक मधील रस्तेही तुरळक गर्दीचे आणि दुतर्फा हिरवाई असलेले आहेत. काही रिसॉर्ट्स मध्ये पर्यटकांना फिरण्यासाठी सायकली किंवा दुचाकी वाहने भाड्याने मिळतात. नवख्या मासे खाणाऱ्याला या पेक्षा दुसरी चांगली जागाच नाही. इथं येऊन मासे खाता परत जाणं म्हणजे गुन्हाच! मासे खाताना 'माशाचा वास येणं' म्हणजे काय हे इथं मासे खाल्यावर समजतं. इथल्या काही रेस्टोरंट मध्ये काउंटरवर विविध प्रकारचे मासे, मोठाल्ले प्रॉन्झ, लॉबस्टर, लहानमोठे जिवंत खेकडे वगैरे मांडून ठेवलेले असतात. आपल्या आवडीचा मासा किंवा खेकडा ऑर्डर केल्यावर पंधरा मिनिटात तुमच्या टेबलावर हजर होतो.    

 


काला पत्थर बीच:    सकाळचा नाश्ता घेऊन आम्ही काला पत्थर बीचवर निघालो. हॅवलॉक जेटीपासून कारने अर्ध्या तासाच्या अंतरावर हा बीच आहे. हॅवलॉक मध्ये प्रत्येक बीच हा दुसऱ्या बीचपेक्षा सुंदर भासतो. काला पत्थर बीचवर काळ्या रंगाचे मोठे खडक असल्याने या बीचला काला पत्थर असे नाव पडले असावे. या छोट्याश्या बीचवर वाळूचा किनारा फार मोठा असा नाही. मऊ, पांढऱ्या वाळूच्या छोट्या भागानंतर लगेचच निळा समुद्र सुरु होतो. किनाऱ्याला समांतर लागून असलेल्या डांबरी रस्त्याने आम्ही इथवर आलो. समुद्राची गाज ऐकू येत होती. किनाऱ्या लागत असलेल्या झाडीतच पर्यटकांना बसण्यासाठी काही गवताच्या झोपडया आहेत. डांबरी रस्त्याला लागूनच पर्यटकांसाठी छोट्या छोट्या भेटवस्तू, फळांची, शहाळ्याची दुकाने आहेत. स्थानिक लोकांनी बनवलेल्या वस्तू, आकर्षक शंखशिंपले, आदिवासी लोकांचे पारंपरिक दागिने देखील इथं मिळतात. थोडक्यात शॉपिंगचीही धमाल!  

 


इथला समुद्रही काहीसा खडकाळ आहे. या बीचवर समुद्राच्या पाण्याजवळ एक काळे वठलेले झाड आहे. समुद्राच्या निळाईच्या पार्श्वभूमीवर हे पर्णविरहित काळ्या रंगाचे झाड उठून दिसते. हे झाड २००४ मध्ये आलेल्या त्सुनामी मध्ये नष्ट झाले होते. पण या मृत झाडाचे कलेवर अजूनही या बीचवर त्सुनामीच्या महाभयंकर प्रलयाची आठवण करून देत उभं आहे. हा काला पत्थर बीचवरील लोकप्रिय सेल्फी पॉईंट. या झाडावर बसून, बाजूला उभे राहून सर्व पर्यटक हमखास फोटो काढतात. आम्हीही अर्थातच इथं फोटो काढले. समुद्रावरून येणार खारा थंड वारा जीव सुखावत होता. डोक्यावरचे ऊन जाणवत नव्हते. किनाऱ्यावर फेरफटका मारताना मी माझे बूट काढून हातात घेतले अनवाणी चालू लागलो. माझ्या अनवाणी पायांना मऊसूत पांढरी वाळू गुदगुल्या करत होती. माझ्यातला फोटोग्राफर जागा झाला. त्या अफाट आणि डोळ्यात मावणाऱ्या निसर्गाला मी माझ्या कॅमेऱ्यात पकडून ठेवायचं प्रयत्न करू लागलो. 

 


किनाऱ्यावर निवांतपणे भटकून आम्ही किनाऱ्यालगतच्या झोपडीत गप्पा मारत बसलो. नारळपाणी आणि खोबऱ्याचा खुराक चालूच होता. दोनतीन तास बीच चा आनंद घेतल्यावर आम्ही हॅवलॉक जेटीवर परतलो. जेटीवरच्या एका 'दक्षिण' नावाच्या रेस्टोरंट मध्ये साऊथ इंडियन पद्धतीचे जेवण घेतले. या जेवणातील 'रसम' इतकं मस्त होतं की मी ते किमान चारपाच वाट्या तरी प्यायलो असेन. जेवणात नेहेमीप्रमाणे ताजे मासे होते हे सांगायला नकोच. आम्ही आज सकाळीच आमचे हॉटेल सोडल्यामुळे आमचे सामान आमच्याबरोबरच होते. जेवताना इतके सामान कुठे ठेवावे असा प्रश्न पडला. हॉटेल मालकाने सांगितले की 'इथे बाहेरच्या फुटपाथवरच सामान ठेवा, कोणीही नेणार नाही. आमच्या इथे कुणीच चोरी करत नाही. निर्धास्तपणे सामान ठेवा.' आम्ही चक्रावलो. सामान बाहेर चक्क रस्त्यावर कडेला ठेवले. जेवताना मात्र निम्मे लक्ष बाहेर ठेवलेल्या आमच्या सामानाकडेच होते. आणखी चौकशी करता असं समजलं की खरंच अंदमानमध्ये गुन्हेगारी खूप कमी प्रमाणात आहे. इथे चोरीमारी नगण्यच. संध्याकाळी साडेचार वाजता पोर्ट ब्लेअर कडे जाणारी 'मेरीक्रूझ' बोट हॅवलॉक जेटीवर लागली. आमचा पोर्ट ब्लेअर च्या दिशेने प्रवास सुरु झाला. अंदमान मध्ये साडेपाच वाजताच सूर्यास्त होऊन अंधार पडायला सुरवात होते. हॅवलॉक ते पोर्ट ब्लेअर च्या प्रवासात समुद्रातून सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य दिसत होतं.  

 

पोर्ट ब्लेअर मध्ये आधी राहिलेल्या नॉर्थ रिफ हॉटेल मधेच आम्ही पुन्हा मुक्कामाला आलो. उद्याचा दिवस आमच्या या अंदमान सहलीचा सर्वात महत्वाचा दिवस होता. उद्या पोर्ट ब्लेअर मधील अनेक प्रेक्षणीय स्थळं बघणार होतो. त्यातील सर्वात महत्वाचे ठिकाण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या कोठडीत काळ्यापाण्याची शिक्षा भोगली ते सेल्युलर जेल आणि त्यातील त्यांची कोठडी! रात्रीचं जेवण घेऊन मनात सावरकरांविषयी विचार करीत झोपी गेलो.

 

दिवस पाचवा :  पुन्हा पोर्ट ब्लेअर.

आज हॉटेलमधील नाश्त्यामध्ये माझं लक्षच नव्हतं. शरीराची गरज म्हणून मी तो केला इतकंच. डोक्यात विचार सुरु होते ते सावरकरांचेच! नाश्ता उरकून हॉटेल बाहेर आलो तेंव्हा आमचा 'ड्रायव्हर कम आणि गाईड जादा' असलेल्या नासीरभाईंनी हसून आमचे स्वागत केले. आम्ही गाडीत बसलो. नासिरभाई म्हणाले आज आपण सुरवातीला चॅथम सॉ मिल बघायला जाऊ, त्यानंतर मानव विज्ञान संग्रहालय (अँथ्रोपोलॉजिकल म्युझियम),  त्यानंतर 'जलजीवशाला' नावाचे ऍक्वेरियम  आणि सर्वात शेवटी सेल्युलर जेल!' नासिरभाई पुढे हसून म्हणाले 'तुम्ही महाराष्ट्रीयन असल्यामुळे तुम्हाला सावरकरांची कोठडी पाहण्याची उत्सुकता असणार' ह्याचा मला कल्पना आहे'. चॅथम सॉ मिल च्या दिशेने आमची कार निघाली. वाटेत नासिरभाईंचं माहिती देण्याचं काम सुरूच होतं.

 

लाकडाची ऐतिहासिक वखार:  चॅथम सॉ मिल.



अंदमानच्या मुख्य बेटापासून अगदी जवळ चॅथम नावाचे छोटेसे बेट आहे. पोर्ट ब्लेअर पासून साधारणपणे चारपाच कि.मी. अंतरावरील चॅथम बेटावर इंग्रजांनी १८८३ साली सर्व प्रकारच्या लाकडी वस्तू, फर्निचर, छोट्या नावा, जहाजनिर्मिती साठी लाकडाची वखार सुरु केली. चॅथम नावाचं एक गांव ब्रिटन मध्ये आहे. त्यावरूनच या छोट्या बेटाला इंग्रजांनी चॅथम नाव दिलं. ब्रिटिशांच्या नजरेस जेंव्हा अंदमान निकोबारची बेटं, आणि इथली जंगलं, सागरसंपत्ती, खनिजं  पडली तेंव्हा त्यांनी ती लुटायची ठरवली, इंग्रजांचा साम्राज्यवाद लुटमारीसाठीच तर होता. अंदमानातील मोठ्या घेराचे, उंच वृक्ष कापण्यासाठी चॅथम बेटावर लाकूड कारखाना किंवा वखार उभी केली. अंदमानात 'पडौक' नावाचा वृक्ष मुबलक प्रमाणात आढळतो. या वृक्षाचे लाकूड आपल्याकडील सागवानी लाकडापेक्षाही मजबूत असते. या आणि अशाप्रकरच्या अफाट घेराच्या जुन्या वृक्षांना तोडून सागरी वाहतुकीने इथं आणून या वखारीत लाकडी फळ्या करणे, पातळ पापुद्र्यासारखे तक्ते तयार करणे अशी कामे येथील कारखान्यात केली जातात. आशिया खंडातली ही सर्वात जुनी आणि सर्वात मोठी लाकडाची वखार आहे. 

 


नासिरभाईंच्या गप्पा ऐकता ऐकता वीसपंचवीस मिनिटातच आम्ही एका पुलावर आलो. अंदमान बेटाच्या मुख्य भूमीला चॅथम बेट या पुलाने जोडलेले आहे. एके काळी चॅथम बेट स्वतंत्र बेट होते. पूल ओलांडून आम्ही चॅथम बेटावर आलो. पूल संपताच समोरच या ऐतिहासिक लाकडी कारखान्याचे प्रवेशद्वार आहे. आत गेल्यावर या चॅथम सॉ मिल चा इतिहास इतर माहिती देणारे मोठे फलक दिसतात.  या फलकामुळे देखील बरीच माहिती मिळते. दुसऱ्या महायुद्धात जपान्यांनी इथं केलेल्या विध्वंसाचे पुरावे इथं दिसतात. या सॉ मिलच्या आवारात दोन ठिकाणी जापनीज फायटर विमानांनी टाकलेल्या बॉम्ब मुळे पडलेले दोन प्रचंड आकाराचे खड्डे (बॉम्बपिट्स) इथे आहेत. ते बघून युद्धात झालेल्या नुकसानीची कल्पना येते.

 

बॉम्ब मुळे पडलेले ते अजस्त्र खड्डे बघून आम्ही प्रत्यक्ष लाकडाच्या त्या कारखान्यात शिरलो. अजस्त्र जुनी यंत्रे इथं धडधडत होती. लाकूड कापतानाचा कर्कश्श आवाज कानठळ्या बसवत होता. अवाढव्य यंत्रे, अजस्त्र लाकडी ओंडके आणि ते लीलया हाताळणारे भारतीय कामगार बघताना थक्क व्हायला होतं. १८८३ पासून लाकडं कापण्याचं, रंधण्याचं काम वर्षानुवर्षे अव्याहतपणे इथं चालू आहे. माझ्या मनात आलं... येथील बेटावरच्या वनसंपदेचा बाजार मांडून ब्रिटिशांनी चांगलीच दौलत कमावली. लंडन, न्यूयॉर्कच्या बाजारपेठांमध्ये इथून लाकूड जात असे. १८८३ साली ब्रिटिशांनी सुरु केलेला हा लाकडाचा कारखाना म्हणजे जणू अंदमान निकोबार मधील वनसंपत्तीचा कत्तलखानाच! ब्रिटिशांनी चोहोबाजूंनी भारताची लूट केली त्याचाच हा एक भाग होता. अंदमानातील निसर्ग विनाश होऊ नये म्हणून आता मलेशिया ब्रह्मदेश, म्यानमार, इंडोनेशिया अशा भागातल्या जंगलातून लाकूड आणले जाते असे समजले. लाकडात कोरीव छोट्या मोठ्या वस्तूही इथं विकत मिळतात. मोठे लाकडी ओंडके, फळ्या यांची ने आण करण्यासाठी इथं छोट्या रुळांची व्यवस्था आहे. युद्धकाळात स्वतःचा बचाव कारण्यासाठी तयार केलेली जमिनीखालील भुयारे किंवा बंकर्स इथं बघता येतात. तासदीड तासाने आम्ही इथून बाहेर पडलो आणि आमचा मोर्चा अँथ्रोपोलॉजिकल म्युसियम कडे वळवला.

 


मानव मानव विज्ञान संग्रहालय (अँथ्रोपोलॉजिकल म्युझियम):   नासिरभाईंनी आम्हालापोर्ट ब्लेअर बसस्टँड पासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील मानव विज्ञान संग्रहालयाजवळ आणून सोडले. बाहेरून छोटेखानी दिसणाऱ्या या संग्रहालयाची 'अँथ्रोपोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया' या संस्थेद्वारे काळजी घेतली जाते. या संग्रहालयाची दुमजली इमारत छोटी असली तरी त्याचा आवाका मात्र खूपच मोठा आहे. अंदमानातील मानव वंशशास्त्र दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या ग्रेट अंदमानी, जारवा, ओंगी, सेंटिनली इत्यादी मूळ रहिवाशांची शस्त्रे, त्यांच्या राहण्याच्या, जगण्याच्या पद्धती, त्यांच्या मासेमारी इतर प्रकारच्या शिकारीमध्ये वापरण्यात येणारी हत्यारे, सापळे वगैरेंची माहिती या संग्रहालयात मिळते. हे मूळ रहिवासी अंदमानात कसे आले? का आणि कधी आले? या बद्दल स्पष्ट माहिती नसल्याने हे संग्रहालय इथल्या मुळ आदिवासींच्या जमातींबद्दल प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करते. एकेकाळी हजारोंच्या संख्येने इथे असलेल्या इथल्या मूळ रहिवाश्यांनी संख्या आता केवळ काही शे एव्हडीच राहिलेली आहे. आपल्या या आदिवासी बांधवांबद्दल जाणून घेण्यासाठी अनेक अभ्यासक संशोधकांनी लिहिलेली पुस्तके, शोधनिबंध यांचं एक विक्रीदालन देखील या संग्रहालयात आहे.

 


सामुद्रिका (नेव्हल मरीन म्युझियम):   पोर्ट ब्लेअर च्या या भागात झुलॉजिकल म्युझियम, न्यू सर्किट हाऊस, मिनी झू, अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यातील सामुद्रिका हे संग्रहालय जरूर पाहण्यासारखे आहे. हे संग्रहालय भारतीय नौदलातर्फे चालवण्यात येते. इथल्या समुद्रात आढळणारी जैव विविधता, रंगीबेरंणगी विविध जातीचे मासे, शंख शिंपले यांची एकत्र माहिती मिळण्याचे हे ठिकाण आहे. या संग्रहालयात अनेक प्रकारची कोरल्स बघायला मिळतात. अंदमानातल्या समुद्रात आढळणारे शंख, शिंपले यांसारख्या जलचरांच्या कवचाचा समृद्ध संग्रह इथं आहे. इथल्या एका भागात 'जलजीवालय' अशा नावाचं एक ऍक्वेरियम आहे. यामध्ये आपण कधीही पाहिलेल्या विविध रंगाच्या माशांच्या जाती बघायला मिळतात. सागरी पर्यावरणाची आणि त्यातील जलजीवांची इथं उत्तम ओळख होते. दुपारचे दोन वाजत आले होते. कडकडून भूक लागली होती. आम्ही इथल्याच जवळच्या एका रेस्टोरंट मध्ये जेवण घेतले. आज चविष्ठ प्रॉन्झ वर ताव मारला. जेवणानंतर लगेचच सेल्युलर जेल बघायला जायचं होतं. जेवताना सेल्युलर जेल आणि सावरकरांचे विचार मनात येत होते.

 

सेल्युलर जेल :   सेल्युलर जेल ला भेट देणे हा आमच्या अंदमान सहलीचा महत्वाचा उद्देश होता. सेल्युलर जेलच्या प्रवेशद्वाराबाहेर एक विस्तीर्ण असा चौक आहे. चौकात उभारल्यावर मागच्या बाजूला एक बाग आहे. त्यात सहा क्रांतिवीरांचे पुतळे उभे आहेत. समोर जेलच्या परिसराला बंदिस्त करणारी सुमारे वीसपंचवीस फूट उंचीची भिंत आहे. या रुंद अशा भिंतीतच तुरुंग व्यवस्थापनेसाठी आवश्यक असलेली काही कार्यालये आहेत. प्रवेशद्वारालगत दुतर्फा असलेल्या दोन मोठ्या खोल्यांमधे १८५७ पासुनच्या अनेक स्वातंत्र्यवीरांचे दुर्मिळ फोट, त्यांची नावे वगैरे गोष्टींचे संग्रहालय आहे.

 

हे संग्रहालय बघून आम्ही आत आलो. आतल्या भागात डाव्या बाजूला रुग्णालयाची दुमजली इमारत होती. १९८५ साली मोडकळीस आलेल्या या रुग्णालयाच्या जागी हुतात्मा स्तंभाची उभारणी करण्यात आली. उजवीकडे समोरच या क्रांतिकारकांच्या अनन्वित छळाचा साक्षीदार असलेला एक पिंपळवृक्ष दिसतो. त्याच्या पलीकडे उजव्या बाजूला कैद्यांना फाशी देण्याची जागा आहे. एकाच वेळी तीन कैद्यांना फाशी देता येईल अशी येथे व्यवस्था आहे. या फाशीगृहा शेजारी कैद्यांसाठीच्या स्वैपाकगृहाची जागा आहे. त्याकाळी हिंदू मुस्लिम कैद्यांसाठी दोन स्वतंत्र स्वैपाकगृहांची व्यवस्था होती. फाशीगृहासमोरच कुप्रसिद्ध 'कोलू' च्या शिक्षेची जागा आहे. या जागेवर एक कोलू प्रातिनिधिक स्वरूपात ठेवला आहे. कोलू म्हणजे जात्याच्या दगडाला जसे टाके/टवके पडून त्याचा पृष्ठभाग खडबडीत केलेला असतो, अश्याच पण खोलगट दगडी भांड्याला एक लोखंडी दांडा असतो. या खोलगट कोलूच्या दगडी भांड्यात नारळाच्या वाट्या टाकून,लोखंडी दांडा गोलाकार फिरवत कैद्यांना नारळाचे तेल काढावे लागे. दणकट शक्तिवान माणसाला देखील घाम फुटेल असे हे कोलूचे काम. मग अर्धपोटी, अशक्त क्रांतिकाऱ्यांचं काय होत असेल? पुरेसं तेल काढता आलं नाही तर अशा कैद्यांना फटक्यांची शिक्षा मिळत असे. पलीकडेच असलेल्या एका त्रिकोणी लाकडी फ्रेम ला असलेल्या फळीला या कैद्यांना नग्न करून फळीच्या वरच्या बाजूला पालथे बांधले जायचे आणि त्यांच्या उघड्या पाठीवर आसुडाचे फटके मारले जायचे. मग तुरुंगाच्या आसमंतात कैद्यांच्या किंकाळ्या उमटायच्या. बरेचजण या असैह्य मारणे बेशुद्ध पडायचे. ज्या कैद्यांना अशा शिक्षा भोगायला लागत त्यांना तागापासून बनवलेल्या जाड्याभरड्या कापडाचा गणवेश घालावा लागे. असा एक गणवेश या दालनात बघायला मिळतो. कैद्यांना जेवणासाठी एक थाळी, वाटी, एक भांडे एव्हडेच सामान मिळे. दिवसभरासाठी फक्त दोन लिटर गोडं पाणी पिण्यासाठी मिळे, तर अंघोळीला चक्क समुद्राचं खारं पाणी. झोपायला एक पोतं आणि पांघरायला कांबळे !   

 

बैलगाडीच्या चाकाच्या आऱ्यांसारख्या कमीजास्त लांबीच्या सात तीन मजली इमारती इथं बांधल्या गेल्या होत्या. त्यात ६९६ खोल्याची/कोठड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. या साऱ्या सातही इमारतींना एका तीन माजली मध्यवर्ती मनोऱ्याने बांधून ठेवल्यासारखी या तुरूंगाची रचना आहे. सात इमारतींच्या मध्ये असलेल्या मनोऱ्यावरून ब्रिटिश पहारेकरी दुर्बिणीच्या साहाय्याने सातही बाजूला असलेल्या इमारतीमधील ६९६ कोठड्यांवर बारीक लक्ष ठेवायचे. या तुरुंगाच्या सात आऱ्यांपैकी , आणि या इमारती आता इथं दिसतात. उर्वरित इमारती दुसरे महायुद्ध आणि इथं आलेल्या  १९४१ च्या महाभयंकर भूकंपात नष्ट झाल्या. युद्धामध्ये मोडकळीस आलेल्या इमारती युद्धानंतर भुईसपाट करण्यात आल्या. 

 

कोठडी नव्हे गाभारा :   स्वातंत्र्यवीर सावरकरांना नंबरच्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरच्या १२३ क्रमांकाच्या कोठडीत ठेवलं होतं. आम्ही उत्सुकतेनं सात नंबरच्या इमारतीच्या पायऱ्या चढू लागलो. तिसऱ्या मजल्यावर गेल्यावर जिन्याच्या विरुद्ध बाजूला सर्वात शेवटी सावरकरांना ठेवलेल्या १२३ नंबरच्या कोठडीकडे जाताना डाव्या बाजूला असलेल्या अनेक कोठड्या आम्ही पार करत आम्ही चाललो होतो. प्रत्येक कोठडी लोखंडी जाळीदार दरवाज्याने बंद केलेली होती. या दरवाज्यांना दोन पद्धतीची कुलपे लावण्याची व्यवस्था होती. कुलूप लावण्याच्या कडी कोयंडाला कैद्यांचा हातही पोहोचणार नाही अशी व्यवस्था होती. कोठड्यांच्या समोर असलेल्या व्हरांड्यातून चालत चालत आम्ही शेवटच्या १२३ नंबरच्या कोठडीजवळ पोहोचलो. सावरकरांच्या या कोठडीला विशेष सुरक्षेसाठी दोन दरवाजे बसवण्यात आले होते. पहिला दरवाजा ओलांडून जाताना माझ्या छातीतली धडधड वाढली. ज्या सावरकरांविषयी आणि त्यांच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेविषयी इतकी वर्षं नुसते ऐकले होते, त्या सावरकरांचे पवित्र वास्तव्य लाभलेल्या कोठडीत प्रवेश करताना माझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. उणीपुरी १३ फूट लांब, फक्त फूट रुंद आणि फूट उंचीची ती छोटीशी खोली बघताना वाटले या अंधाऱ्या, कोंदट, छोट्याश्या कोठडीत सावरकरांनी तब्बल ११ वर्षे कशी काढली असतील? या अंधाऱ्या खोलीत त्यांना भयाण एकांताला सामोरं जावं लागलं होतं. डासा पिसवांच्या सांनिध्यात खालावलेल्या रात्री त्यांनी कशा काढल्या असतील? कोठडीच्या मागच्या भिंतीवर फूट लांबीची आणि फूट रुंदीची केवळ एकच खिडकी, ती देखील अशा उंचीवर की तिथवर चढून बाहेरचं जग बघणं केवळ अशक्यच ! दुसरा माणूस दृष्टीसही पडणार नाही अशी पुरेपूर व्यवस्था ! (या अंदमानातल्या सेल्युलर जेल मध्ये अंधार कोठडीत असताना सावरकरांचे सख्खे थोरले बंधू 'बाबाराव सावरकर' हे देखील जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. जवळजवळ दोन वर्षं सावरकरांना आपले थोरले बंधू याच तुरुंगात आहेत याची कल्पना नव्हती.)

 

आपला देश स्वतंत्र व्हावा, परक्या अत्याचारी ब्रिटिश सरकारचं दमनसत्र नष्ट व्हावं म्हणून तन मन धन अर्पून, प्राण पणाला लावून एक एक दिवस या काळकोठडीत सावरकरांनी आणि अन्य स्वात्रंत्र्यवीरांनी इथल्या हालअपेष्टा अशा सोसल्या असतील? मी निशःब्द झालो होतो. डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. आजूबाजूला वावरणाऱ्या पर्यटकांचे बोलणे, गोंधळ मला ऐकू येईनासा झाला. फक्त सावरकरांविषयी चे विचार आणि ती पवित्र शांतता आता माझ्या सोबतीला होती. थोड्या वेळाने मला माझ्या बायकोने अलकाने या भावसमाधितून जागे केले. कोठडीच्या मागील भिंतीवर असलेल्या सावरकरांच्या फोटो पुढे, कोठडीच्या पवित्र भूमीवर डोके ठेऊन मी नतमस्तक झालो. या वेळी मला पु. . देशपांडे यांचं एक वाक्य आठवलं. १८८३ साली पु. . देशपांड्यांनी जेंव्हा ह्या कोठडीला भेट दिली होती तेंव्हा ते म्हणाले होते.. “काळोख म्हणजे भय, काळोख म्हणजे अंधश्रद्धा, काळोख म्हणजे आंधळेपण. हा काळोख नष्ट करण्यासाठी सावरकरांनी आपली लेखणीचा नव्हे तर सगळी शरीरकायाच झिजवली. या खोलीचा आपण नेहेमी 'अंदमानातील अंधारकोठडी' असा उल्लेख करतो. पण ज्यावेळी एखाद्या कोठडीमध्ये प्रत्यक्ष तेज वस्तीला येतं, त्यावेळेला या कोठडीचा 'गाभारा' होतो.”

 

सावरकरांचा जन्मठेपेच्या आधीचा इतिहास :   अंदमानची ची सहल आम्ही जवळजवळ तीन महिने आधीच ठरवली होती. प्रत्यक्ष अंदमानला येईपर्यंतच्या तीन महिन्याच्या काळात अंदमान वरील काही पुस्तके वाचून माहिती मिळवली होतीच. यात धनंजय कीर यांचं 'स्वातंत्र्यवीर सावरकर', स्वतः सावरकरांनी लिहिलेलं 'माझी जन्मठेप' हे ग्रंथ वाचून काढलेले होते. या वाचनाने सावरकर आणि सेल्युलर जेल याची उद्बोधक माहिती मिळालेली होती. त्याचा फायदा मला अंदमान सहलीदरम्यान झाला. दोन तीन वर्षांपूर्वी माझ्या महिन्याभराच्या लंडन च्या वास्तव्यात सावरकरांच्या लंडन मधील निवासस्थानाला भेट दिली होती. त्याची आता आठवण झाली.

 

सावरकरांच्या जन्मठेपेचा पूर्वइतिहास जाणून घेणे खूप महत्वाचं आहे. उच्चशिक्षणासाठी जून १९०५ रोजी सावरकर लंडनला गेले होते. स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या अनेक मित्रांची साथसंगत त्यांना तिथं मिळाली. मदनलाल धिंग्रा या लंडनस्थित भारतीय मित्राला सावरकरांनी परदेशी बनवटीचं पिस्तूल मिळवून दिलं होतं. या पिस्तुलानेच धिंग्रांनी कर्झन वायलीला यमसदनास धाडले होते. लंडन मध्ये सावरकर आणि त्यांची स्वातंत्र्य प्रेमी मित्रमंडळी 'इंडिया हाऊस' या ठिकाणी जमत असंत. (याही ठिकाणाला मी भेट दिली आहे.) कर्झन वायलीच्या खुनामध्ये आणि हिंदुस्थानातील सशस्त्र हल्ल्यांमागे सावरकरांचा हात आहे असा संशय ब्रिटिशांच्या मनात होताच. सावरकरांना १३ मार्च १९१० रोजी रविवारी ब्रिटिशांनी लंडनच्या व्हिक्टोरिया स्टेशन वर अटक केली. सावरकरांवर खटला भरण्यात येऊन ब्रिटिशांनी त्यांना हिंदुस्थानात पाठवायचं ठरवलं.

 

सावरकरांची त्रिखंडात गाजलेली उडी :    लंडनहून जुलै १९१० या दिवशी मारिया नावाचं एक जहाज सावरकरांना घेऊन हिंदुस्थानात यायला निघालं. सात दिवसांच्या प्रवासानंतर म्हणजे जुलैला हे जहाज फ्रान्सच्या मार्सेलिस नावाच्या बंदराजवळ विश्रांतीसाठी थांबलं. या वेळी सावरकर 'इथून पळून कसं जात येईल' याचा विचार करीत होते. रात्रभराच्या विचारानंतर सावरकरांचा विचार पक्का झाला. जुलैला पहाटे प्रातर्विधीच्या निमित्ताने शौचालयात जाऊन शौचकूपाच्या (कमोड) वर असलेल्या छोट्याश्या अरुंद वेटोळ्या आकाराच्या खिडकीतून त्यांनी कसेबसे आपले अंग बाहेर काढले. बाहेर पडताना अंग सोलवटून निघाले. 'स्वातंत्र्यलक्ष्मीकी जय' असे स्वतःशीच म्हणंत त्यांनी बाहेरच्या अथांग समुद्रात उडी घेतली. तेव्हड्यात हे पहारेकऱ्यांच्या लक्षात येऊन त्यांनी पाण्यात पोहोणाऱ्या सावरकरांवर बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव केला. मोठया धीराने बंदुकीच्या गोळ्या चुकवत, सपासप पाणी कापत, मोठ्या लाटांशी झुंजत ते वेगाने मार्सेलिस बंदरावर पोहोचले. तोपर्यंत त्यांच्या मागावर असलेले ब्रिटिश पोलीस देखील बंदरावर पोहोचले. मार्सेलिसच्या किनाऱ्यावर पुढे सावरकर आणि मागे ब्रिटिश पोलीस असा पाठलाग, पळापळ सुरु झाली. पण दुर्दैवाने या सावरकरांच्या पलायनाला अपयश येऊन ब्रिटिश पोलिसांनी सावरकरांना पुन्हा पकडले. त्यांना पुन्हा बोटीवर आणण्यात आले आणि बोटीने सावरकरांना घेऊन पहाटेच मार्सेलिस बंदर सोडले. सावरकरांना भारतात आणण्यात आले. जुलै १९१० रोजी सावरकरांनी केलेला पलायनाचा पराक्रमी प्रयत्न साऱ्या त्रिखंडात गाजला. सर्व युरोपियन वृत्तपत्रांनी या पलायनाची बातमी छापली. ब्रिटिशांची जगभर नामुष्की झाली. छत्रपती शिवाजी महाराज, नेपोलियन, सुभाषचंद्र बोस यांच्या साहसी पलायनाची तुलना सावरकरांच्या पलायनाशी होऊ लागली.  

 

त्यानंतर सावरकरांवर भारतात खटला चालवला गेला. २४ डिसेंबर १९१० रोजी सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. ही शिक्षा कमी वाटली की काय म्हणून ब्रिटिश सरकारने ३० जानेवारी १९११ रोजी सावरकरांना दुसऱ्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अशा प्रकारे दोन जन्मठेपेची शिक्षा म्हणजे ५० वर्षांची काळया पाण्याची शिक्षा झालेल्या सावरकरांचे वय होते फक्त २७ वर्ष ! जुलै १९११ रोजी सावरकरांना अंदमानच्या सेल्युलर जेल मध्ये आणण्यात आले. त्यानंतर तब्बल १० वर्षांनी म्हणजे मे १०२१ रोजी विनायक सावरकर आणि त्यांचे बंधू बाबाराव सावरकर याची अंदमानच्या तुरुंगातून सुटका झाली. अर्थात अंदमानातून सुटका झाली म्हणजे शिक्षा संपली नव्हती. सावरकर बंधूंना अलीपूर तुरुंगात हलवले गेले. अलीपूर तुरुंगातून दोघा बंधूंची ताटातूट करण्यात आली. बाबारावांची तब्येत खालावल्यामुळे साबरमतीच्या तुरुंगातून त्यांची १९२२ च्या सप्टेंबर महिन्यात पूर्ण मुक्तता करण्यात आली. विनायक सावरकरांना मात्र पुढे काही काळ रत्नागिरीस आणि नंतर येरवड्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. सावरकरांच्या प्रदीर्घ तुरुंगवासाचा शेवट जानेवारी १९२४ या दिवशी झाला. सावरकर यांची मुक्तता करण्यात आली.

 

सेल्युलर जेल मध्ये फिरत असताना, सावरकरांच्या कोठडीत नतमस्तक होत असताना माझ्या मनात विचार आला.. 'गांधीजींच्या अहिंसेने लढलेल्या लढ्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले अशी विचारधारा असणाऱ्या भारतीयांना या अंदमानातल्या कारागृहात झिजत झिजत रक्त सांडणाऱ्या असंख्य वीरांचे, क्रांतिकारकांचे बलिदान दिसत नाही? केवळ राजकीय फायद्यासाठी सावरकर आणि सावरकरांच्या विचारांना विरोध करणाऱ्या सध्याच्या राजकारण्यांना आठवडाभर या अंदमानातल्या तुरुंगात डांबून, त्यांच्याकडून कोलू चालवून घेऊन, त्यांच्या उघड्या पाठीवर, कुल्ल्यांवर आसूडांचे फटके मारले पाहिजेत म्हणजे त्यांना सावरकरांच्या बलिदानाची जाणीव होईल'. असो... 

 

या तुरुंगातील इतरही इमारतींच्या मजल्यांवर आम्ही फिरलो. प्रत्येक कोठडीच्या समोर आल्यावर 'इथं कोणता क्रांतिकारक राहिला असेल?' असा विचार मनात यायचा. सावरकरांच्या कोठडीच्या समोर खालच्या बाजूला असलेले फाशीघर देखील पहिले. फाशीवर गेलेल्या क्रांतिकारकांचा मरणाला कवटाळताना त्यांनी केलेला आक्रोश, स्वातंत्र्य देवतेचा जयजयकार ऐकून सावरकरांना काय वाटले असेल? हे फाशीगृह दुमजली आहे. जमिनीलातच्या मजल्यावर तीन कैद्यांना फाशी देण्याची व्यवस्था होती. कैद्यांच्या पायाखालची फळी निघताच तळघरातल्या खोलीत हे कैदी लटकले जाऊन तडफडू लागत. काही क्षणात त्यांना मृत्यू येई. आम्ही या तळघरातल्या खोलीतही गेलो. खोलीत अंधारच होता. खिडकीही नसलेली खोली कोंदट होती. गूढ अशी शांतता असलेल्या या खोलीत माझा जीव गुदमरला. इथं फाशी गेलेल्या क्रांतिवीरांना नमन करून आम्ही तातडीने बाहेर पडलो. बाहेर आल्यावर मोकळा श्वास घेतला. अस्वस्थ मनानेच या ऐतिहासीक देशप्रेमाचे त्स्फुलींग चेतावणाऱ्या कारागृहाच्या आम्ही बाहेर पडलो. बराच वेळ सुन्न अवस्थेत होतो. इतरही पर्यटकांची अवस्था काहीशी अशीच असावी.

 

हॉटेलवर परत जाताना आम्ही पोर्ट ब्लेअर च्या दक्षिणेस असलेल्या 'कॉर्बिन कोव्ह' नावाच्या बीच वर गेलो. सेल्युलर जेल मध्ये जरा जास्तच रेंगाळयामुळे आता अंधार पडला होता. सूर्य कधीच अस्ताला गेला होता. पण मावळताना तो आपली लालसर प्रभा क्षितिजावर काही वेळ मागे ठेऊन गेला होता. अर्धचंद्राकृती मुलायम वाळूचा किनारा आणि शांत निळं पाणी इथं असल्यामुळे पर्यटकांमध्ये हा सागरकिनारा विशेष लोकप्रिय आहे. दुसऱ्या महायुद्धात जपान्यांनी बांधलेले बंकर्स देखील इथं पाहायला मिळतात. पण आमचा आज कशाचाच मूड नव्हता. राहून राहून क्रांतिकारकांचा त्याग आठवत होता. मग किनाऱ्यावर जाताच लांबूनच मावळतीची तांबूस प्रभा बघत आम्ही हॉटेल मध्ये परतलो. रात्री बराच वेळ झोप लागू शकली नाही. 

 

दिवस सहावा : अद्भुत बाराटांग.

आज पहाटे वाजताच उठून, यावरून आम्ही वाजता बाराटांग ला जाण्यासाठी आमच्या गाडीत बसलो. रात्री झोप अशी झालीच नाही. त्यामुळे सुमारे दोन तासांचा प्रवास झोपेतच झाला. पहाटे सहाच्या सुमारास आम्ही जिरकटांग येथे एका लांबच लांब गाड्यांच्या रांगेत येऊन थांबलो. आमच्या नंतरही आमच्या मागे पर्यटकांच्या अनेक गाड्या रांगेत येऊन उभ्या राहात होत्या. इथे रांगेत बराच वेळ आम्ही होतो. इथल्या टपरीवरचा वाफाळलेला चहा घेत आम्ही टाईमपास करत होतो. आमच्या नासिरभाईंनी आम्हाला या प्रदेशाची, इथल्या आदिवासी जमातीची माहिती देणे चालूच ठेवले होते.

 

जारवा : मूळ अंदमानवासी :    बाराटांगला जाण्यासाठी पोर्टब्लेअर पासून सुमारे ११० कि.मी. चा रस्ता घनदाट जंगल पार करावे लागते. इथवर आमचा प्रवास झोपेतच झाला होता. आत्ता आम्ही थांबलेले ठिकाण जिरकटांग गेट पासून बाराटांग सुमारे तासाभराच्या अंतरावर आहे. या प्रवासाचा टप्पा अंदमानचे मूळ रहिवासी असलेल्या 'जारवा' जमातीसाठी संरक्षित असलेल्या जंगलातून पार करावा लागतो. या संरक्षित जंगलाच्या पलीकडे एक गेट पार करून आपण बाराटांगला जातो. या पहिल्या गेट पाशी सुमारे शंभर एक गाड्या रांगेत होत्या. आदिवासी लोक पर्यटकांवर हल्ला करण्याची शक्यता असल्याने सुमारे शंभर गाड्यांच्या ताफ्याच्या पुढे आणि मागे सशस्त्र पोलिसांच्या गाड्या सुरक्षेसाठी होत्या. काही ठराविक वेळांनाच गेटमधून गाड्या सोडल्या जातात. आमचा शंभर एक गाड्यांचा काफिला पहिले गेट ओलांडून जारवांच्या घनदाट जंगलात घुसला.

 

अंदमानातील 'जारवा' जमातीच्या या संरक्षित प्रदेशातून जाणारा हा डांबरी रस्ता 'अंदमान ट्रॅक रोड' नावाने ओळखला जातो. जलवाहतूक काहीशी बेभरवशाची असल्याने लोक या जंगलातल्या मार्गानेच जाणे पसंत करतात. रस्त्याच्या दुतर्फा घनदाट हिरवाई दिसते. क्वचित प्रसंगी जारवा जमातीतले मूळ आदिवासी रहिवासी देखील दिसतात. या प्रवासात जारवांचं दर्शन जरी झालं तरी त्यांना खायला देणे, त्यांच्याशी संपर्क साधणे, त्यांचे फोटो काढणे अशा गोष्टींना इथं परवानगी नाही. नियमांच्या उल्लंघनाला कठोर आणि जबरी शिक्षा दिल्या जातात. गाडीतून जाताना मी चुकून सवयीने फोटोसाठी मोबाईल उचलला तर नेहेमी छान मैत्रीत बोलणारा नासिरभाई माझ्यावर चिडला. माझ्या हातातून मोबाईल हिसकावून घेऊन त्याने फोटो काढायला मनाई केली. (नंतर नासिरभाईने माझी माफीही मागितली) इथले स्थानिक नागरिक नियमांच्या बाबतीत किती गंभीर आहेत ते लक्षात येते. जंगलातील या संपूर्ण प्रवासात नासिरभाईंची सतत जारवा  जमातीची माहिती देण्यासाठी बडबड चालूच होती.

 

अंदमान बेटावर निग्रिटो वंशाचे अंदमानी, ओंगी, जारवा, सेंटिनली आणि निकोबार बेटसमूहात मंगोलियन निकोबारी शॉपेन्स अशा प्रमुख जमाती इथले मूळ रहिवासी मानले जातात. जंगलात राहून कंदमुळे-फळे गोळा करणे, शिकार करणे, मासेमारी करून उदरनिर्वाह करणे हेच यांचे जीवन ! अश्मयुगीन मानवाप्रमाणे उघडेनागडे राहणारे हे मूळ अंदमानी जारवा आदिवासी आता संख्येने केवळ काही शे इतकेच शिल्लक राहिलेत. निसर्गात राहून निसर्ग टिकवून त्यांनी आपली जमात  टिकवली आहे. अंदमानात वाढणारे भारतीयांचे प्रमाण, त्यांची जगण्याची आधुनिक जीवन शैली, जंगलातील नैसर्गिक संपत्तीची होणारी बेसुमार लयलूट यामुळे या आदिवासी जमाती पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अजूनही आपल्यासारख्या सुधारलेल्या लोकांमध्ये मिसळणे आवडणारे, रानावनात दिगंबरावस्थेत राहून शेती करता शिकार करून उपजीविका करणारे हे लोक आहेत. कंदमुळे, मध गोळा करणे, रानडुकराची शिकार करणे यातच त्यांचा दिवस संपतो. त्यांना लाल दोरे, लोक कपडे, रिबिनी यांचे खूप आकर्षण असते. आजमितीला या जंगलातील ३० ठिकाणी सुमारे तिन चारशेच जारवा लोक रहातात. आपल्या सारखे सुधारलेले लोक त्यांना आवडत नाहीत. कधीकधी वाहने अडवताना हे जारवा लोक दिसू शकतात. सुदैवाने आम्हाला या आदिवासींनी त्रास दिला नाही. आम्हाला वाटेत तीनचार वेळेला हे जारवा लोक दिसले. एक जारवा आदिवासी तर एका छोट्या रानडुकराची शिकार पाठीवर टाकून जाताना दिसला. सध्याच्या काळात भारत सरकार या जारवा जमातीला कपडे, धान्य देऊन मदत करते. सरकारी पातळीवर या आदिवासींना आपल्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. 

 

सुमारे अर्ध्या पाऊण तासाच्या या घनदाट, निबिड अरण्यातून आम्ही जंगलाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या गेटच्या बाहेर पडलो. गेटच्या लगेचच बाहेर बाराटांगची खाडी दिसली. या खाडीच्या पलीकडे दूरवर बाराटांग बेट दिसत होते. बाराटांग बेटावर जाण्यासाठी एका भल्यामोठ्या फेरी बोटीची व्यवस्था आहे. ही फेरी बोट शे दीडशे प्रवासी, चारपाच कार्स, आणि चक्क एखादुसरी मोठी बस घेऊन प्रवास करते. दहापंधरा मिनिटे वाट बघितल्यावर इथल्या जेटीवर फेरी बोट लागली. इथं रांग वगैरे काही पद्धत नसल्याने सर्व प्रवाशांनी बोटीवर चढण्यासाठी एकाच गर्दी केली. काहीसा गोंधळ उडाला. आम्हीही या गर्दीत सामील होऊन बोटीत चढलो. खूप रेटारेटी झाली. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही बाराटांग बेटावरच्या नीलांबरी नावाच्या जेटीवर उतरलो. या बेटावर परवानगीसाठी काही कागदपत्रे, ओळखपत्रे वगैरे दाखवण्याच्या प्रक्रिया कराव्या लागतात.

 

बाराटांग बेटावर चुनखडीच्या गुहा खूप प्रसिद्ध आहेत. या बेटावर मोठ्या प्रमाणात चुनखडीचे साठे आहेत. काही साठे जमिनीच्या वर थरांच्या स्वरूपात आढळतात, तर काही ठिकाणी चुनखडीच्या गुहा तयार झालेल्या आहेत. वर्षानुवर्षे समुद्रातील विविध जलचर प्रवाळांच्या कवच आणि सांगाड्यातील कॅल्शियम कार्बोनेट कॅल्साइट समुद्रतळाशी साचत जातो. या कॅल्साइट पासून चुनखडीचे खडक तयार होतात. वर्षानुवर्षे ही प्रक्रिया निसर्गात सुरु असते. लाखो वर्षांपूर्वी भूगर्भातील हालचालींमुळे हे समुद्रातळाशी असलेले चुनखडीचे साठे समुद्राच्या पृष्ठभागावर येऊन इथल्या किनाऱ्यावर टेकडीच्या स्वरूपात विसावले आहेत. अशा चुनखडीच्या टेकडीवर पावसाचे पाणी पडू लागले की या पावसाच्या पाण्यात हवेमधील कार्बन डाय ऑक्साईड वायू विरघळून सौम्य कार्बोनिक ऍसिड तयार होते. त्यात चुनखडीचा दगड विरघळतो. हे क्षारयुक्त पाणी इथल्या गुहांमधून थेंब थेंब पाझरू लागते. एकावर एक थेंब पडून या पाण्याचे विविध आकाराचे चुनखडीचे दगड बनतात. यातूनच बनतात या नैसर्गिक क्षार गुंफा किंवा चुनखडीच्या गुहा !   

 

बाराटांगच्या नीलांबरी जेटीवरूनच या चुनखडीच्या गुहांकडे जाण्यासाठी छोट्या मोटारबोटींची सोय आहे. या स्पिडबोटीतून गुहांपर्यंत जाण्यासाठी सुमारे अर्धा तास लागतो. या समुद्रखाडीच्या प्रवासात खाडीच्या दोन्ही किनाऱ्यावर सदाहरित दाट जंगल आहे. जंगलातून जाणारी ही खाडी आणि त्यामधून जाणारी आमची छोटी मोटारबोट हा प्रवास धमाल होता. पुढे पुढे ही खाडी खूप निमुळती होत जाते. एखाद्या गल्ली प्रमाणे भासणाऱ्या निमुळत्या खाडीच्या आजूबाजूला गर्द झाडी आहे. ही झाडे दोन्हीही बाजूनी उंच वाढून त्याची डोक्यावर जणू कमानच झालेली दिसत होती. किनाऱ्यावर उतरल्यावर इथल्या दलदलीसारख्या चिखलाच्या पाण्यावरून जाण्यासाठी तयार केलेल्या एका निमुळत्या लाकडी पुलावरून आम्ही निघालो. हा पूल पार केल्यावर गुहांकडे जाण्यासाठी पुन्हा घनदाट जंगलातून जावे लागते. या जंगलातील निसर्गवाटेवरून चालताना आजूबाजूला महाकाय वृक्ष दिसत होते. या वृक्षांवर त्यांची माहिती देणारे फलक दिसत होते. मधून मधून आपल्या कोकणात दिसतात तशी भातशेतीची हिरवी खाचरे डोळ्यांना सुखावत होती. या वाटेवरून चालताना इथल्या वेळीअवेळी येणाऱ्या पावसाने गाठलेच तर, पावसापासून बचाव करण्यासाठी गवतापासून, वाळलेल्या पानांपासून बनवलेल्या झोपड्यांमधे (एकोहट)आसरा घेता येतो. भर दुपारी देखील जमिनीवर फारसा सूर्यप्रकाश पोहोचू देणारे उंचच उंच वृक्ष असलेल्या जंगलातून जाणारी सुमारे दीड दोन कि.मी. लांबीची ही अद्भुत निसर्गवाट मनाला मोहवून टाकते. या निसर्गरम्य वाटेचा शेवट चुनखडीच्या गुहेपाशी संपतो.

 

माणसाने मुद्दाम खोदून काढलेल्या गुहा वेगळ्या, त्यांना लेणी म्हणतात. पण या नैसर्गिक गुहा भूपृष्ठात किंवा डोंगराच्या कुशीत निसर्गतःच निर्माण झालेल्या आहेत. काही गुहा पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळीच तयार झालेल्या असतात. तर काही निसर्गातील वर्षानुवर्षे होणाऱ्या बदलांमुळे तयार होतात. इथल्या गुहा पृष्ठभागावरील पाणी चुनखडकांच्या भेगांमधून गुहेत झिरपून तयार झालेल्या आहेत. या नैसर्गिक गुहेत शिरताना सुरवातीपासूनच अंधार होता. अक्षरशः काळोख असलेल्या निमुळत्या पण लांब विस्तीर्ण गुहेच्या भिंती, छतावरून जमिनीकडे जणू झेपच घेणारे चुनखडीचे निमुळते होत जाणारे खडक अंधारात देखील त्यांच्या पांढुरक्या रंगामुळे चमकत होते. गुहेच्या छताला लटकणारी निरनिराळ्या आकाराची खडकांची झुंबरे, त्यांचे विविध आकार, त्यातून सतत ठिपकणारे थेंब थेंब पाणी या अनोख्या गुहांना गूढरम्य करतात. छताकडून जमिनीकडे वाढत जाणारे निमुळते सुळके आणि जमिनीतून वर येणाऱ्या गोलाकार घुमटांची पुढे कालांतराने गाठभेट होते, आणि त्यातून तयार झालेले नक्षीदार स्तंभ बघून मती गुंग होते. या स्तंभांना 'लवणस्तंभ' असेही म्हणतात. आत गेल्यावर पूर्ण अंधारामुळे टॉर्चच्या किंवा मोबाईल मधील दिव्याच्या प्रकाशातच हा निसर्गाचा अद्भुत अविष्कार अनुभवावा लागतो. या गुहांचा काळ लवणस्तंभांच्या वाढीच्या वेगावरून किंवा गुहेत मिळणाऱ्या जीवाश्मांवरून (फॉसिल्स) ठरवता येतो. या नैसर्गिक आकारात काही श्रद्धाळू पर्यटकांना गणपती, शिवलिंग वगैरे देवतांचे आकारही दिसतात. काही पर्यटक अशा आकारांना मनोभावे नमस्कारही करताना दिसत होते. मला मात्र हसू आले. असो...

 

ही चुनखडीची गुहा बघून आम्ही पुन्हा त्याच निसर्गावाटेने चालत आमच्या मोटारबोटीकडे आलो. इथल्या किनाऱ्यावर खारफुटीच्या जंगलातील झाडांची मुळे दलदलीच्या पाण्यातून बाहेर आलेली दिसत होती. खूप वेगळा नजारा दिसतो हा. आता दुपार उलटून गेली होती. मोटारबोटीतून पुन्हा निमुळत्या खाडीतून नीलांबरी जेटीवर परतलो. येतानाच्याच मार्गाने पुन्हा जारवांच्या संरक्षित जंगलातून पोर्टब्लेअरला पोहोचलो. येईपर्यंत साडेपाच सहा वाजले होते. अंधार पडू लागला होता. दिवसभर थकायला झाले होते. हॉटेलवर येऊन सामानाची आवराआवर केली. आजचा आमचा अंदमानातील शेवटचा दिवस होता. ट्रिप संपली म्हणून मनाला थोडी हुरहूर लागून राहिली होती. पण इलाज नव्हता. उद्याची सकाळची लवकरची चेन्नई फ्लाईट होती. रात्रीचं जेवण घेऊन झोपी गेलो. झोपलेल्या डोळ्यात अंदमानच्या अनुभवलेल्या दृश्यांचा चित्रपट बघता बघता कधी झोप लागली ते कळलंच नाही.   

 

दिवस सातवा : अचानक, अनपेक्षितपणे महाबलीपूरम.

सकाळी :३० वाजताचं आमचं विमान पोर्टब्लेअर वरून चेन्नईला ;३० वाजता पोहोचलं. चेन्नई वरून पुण्याला जाणारं विमान रात्री वाजता निघणार होतं. त्यामुळे तब्बल दहाबारा तास आम्हाला चेन्नई विमानतळावर बसून राहावं लागणार होतं. मग आम्ही हा दिवस सत्कारणी लावायचा ठरवला. चेन्नईमध्ये किंवा जवळपास बघण्यासारखे काय आहे याच गुगल वरून शोध घेतला. असं लक्षात आलं की चेन्नई पासून सुमारे ५५ कि.मी. अंतरावर असलेलं महाबलीपूरम बघण्यासारखं ऐतिहासिक स्थळ आहे. मग ते बघायचा ठरवून आम्ही विमानतळावरून बाहेर पडलो. एक ओला टॅक्सी बुक केली. दिवसभराचे भाडे ठरवून आम्ही महाबलीपूरम बघायला निघालो. आमच्या ठरलेल्या सहलींमधील हा अनपेक्षितपणे बोनस मिळाला होता. 

 

चेन्नई मधील रहदारीच्या रस्त्यावरून आम्ही निघालो. चेन्नई हे दक्षिण भारतातील एक प्रमुख शहर आहे. तामिळनाडू राज्याची राजधानी असलेलं हे महानगर बंगालच्या उपसागराच्या एका किनाऱ्यावर वसलेलं आहे. दक्षिण भारतातील हे सर्वात मोठं सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक आणि व्यापारी केंद्र आहे. लोकसंख्येच्या तुलनेत चेन्नई हे भारतातील सहाव्या क्रमांकाचं शहर आहे. या शहराचे पूर्वीचे 'मद्रास' हे नाव १९९६ साली अधिकृतपणे बदलण्यात येऊन 'चेन्नई असे करण्यात आले. आमच्या टॅक्सिचा ड्रायव्हर सुदैवाने बडबड्या होता. त्यामुळे आमचा वेळ छान जात होता. मात्र त्याचे इंग्रजी हिंदी यथातथाच होते. त्यामुळे त्याच्याबरोबरच्या संवादामध्ये अडचण होत होती. पण पठया प्रयत्नपूर्वक त्याच्या शहराबद्दल माहिती देत होता. 

 

सुमारे दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही महाबलीपूरम येथे पोहोचलो. ऊन रणरणत होतं. पण इलाज नव्हता. या ठिकाणाची माहिती नसल्याने आम्ही तिथं गेल्यावर एक गाईड घेतला. त्याचेही इंग्रजी फारसे चांगले नव्हतेच. त्याचे इंग्रजी उच्चार तामिळ भाषेत बुचकळून काढलेले. त्यामुळे कळायला जरा अवघड जात होते. पण गाईड बिचारा मन लावून माहिती देत होता. महाबलीपूरम हे ठिकाण समुद्रकिनाऱ्यावर असून येथे दगडात पाच पांडवांच्या नावाने पाच रथ कोरलेले आहेत. पैकी चार रथ एकाच दगडात कोरलेले आहेत. दुरून हे रथ म्हणजे मंदिरच आहेत असं भासतं. पांडवांमधील मोठा भाऊ धर्मराज याचा रथ सर्वात मोठा आहे. या रथांच्या समूह शिल्पांमध्ये एका हत्तीचे शिल्प मनाला भुरळ पाडते. वास्तविक दक्षिण भारतातील या ठिकाणी पांडव कधीच आलेले नव्हते, ना त्यांचे वास्तव्य इथं होतं. मग ही पांडवरथ लेणी, शिल्पे इथं का उभी केली गेली असतील असा प्रश्न पडतो.

 

महाबलीपूरम ला दोन हजार वर्षांपासूनची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे असे इतिहासकार सांगतात. या प्राचीन शहराचे नाव 'मामलपुरम' होते. सातव्या शतकातील पल्लव राजांची राजधानी म्हणून हे शहर ओळखले जाई. त्यामुळे सातव्या शतकात इथं या ठिकाणी अनेक शिल्पे निर्माण करण्यात आली. या परिसरात जशी मानवनिर्मित शिल्पे बघायला मिळतात, तशी काही नैसर्गिक आश्चर्ये देखील बघायला मिळतात. या पैकीच एक म्हणजे इथं जवळच एक प्रचंड आकाराचा अजस्त्र दगड डोंगराच्या उतारावर घरंगळत येऊन थांबला आहे. तो या डोंगर उतारावर कसा थांबला गेलाय ते कळत नाही. या ठिकाणाला 'बटर बॉल' असं म्हणतात. या बटरबॉल च्या शेजारी भीमाची गुहा, वराह गुहा, दगडात कोरलेलं सुंदर गणेश मंदिरही बघायला मिळतं. इथल्या गुहांमधून गोवर्धनधारी श्रीकृष्ण गोपगोपी यांची कलात्मक चित्रे कोरलेली आहेत. या शिल्पसमूहात २७ मीटर लांब आणि मीटर रुंद असे खडकावरचे एक शिल्प म्हणजे कलाकुसरीचा एक उत्तम नमुनाच आहे. या ठिकाणी अर्जुनाने तपस्या केली होती अशी समजूत आहे. इथले काही वृक्ष देखील निसर्गातील एक चमत्कारच आहेत असे म्हणता येईल. जमिनीलगत एखाद्या चंबू किंवा डेऱ्यासारखे असणारे झाडाचे खोड वर निमुळते होत गेले आहे. पांडव, पशुपक्षी, देवदेवता यांची एकत्रित असलेली ही शिल्पे पर्यटकांना खिळवून ठेवतात.  

 

इथून अगदी जवळ असलेलं आणखी एक आकर्षण म्हणजे इथल्या समुद्रकिनाऱ्यावरचं विष्णूचं मंदिर. या मंदिराला 'शोअर टेम्पल' असेही म्हणतात. अतिशय निसर्गसंपन्न सागराच्या पार्श्वभूमीवर उभारलेलं हे मंदिर आठव्या शतकातल्या 'नरसिंह वर्मन' नावाच्या राजाच्या काळात बांधलेलं आहे. हे मंदिर म्हणजे द्राविडी स्थापत्य शैलीचा अप्रतिम नमुना आहे. मंदिर बघून आम्ही शेजारीच असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर गेलो. दिवसभराच्या रणरणत्या उन्हात फिरल्यानंतर समुद्राचे थंड वारे मनाला आणि शरीराला उल्हसित करत होते. बघता बघता संध्याकाळही झाली. महाबलीपूरम येथे पर्यटकांसाठी राहण्याखाण्याची, वाहानांची चांगली सोय आहे. दक्षिण भारतातील हे ऐतिहासिक ठिकाण आवर्जून पाहायला हवे. चेन्नई पासून जवळ असल्याने महाबलीपूरमची ही सफर एका दिवसात आरामात पूर्ण करता येते.

 

आता आमच्या पुण्याला जाणाऱ्या विमानाची वेळ झाली होती. आम्ही परतीच्या वाटेने चेन्नईला निघालो. आमचा आजचा दिवस करणी लागला होता. महाबलीपूरम ची सहल अनपेक्षितपणे झाल्याने समाधान वाटत होते. पुण्यात परतताना माझं अंदमान बघण्याचं स्वप्न पूर्ण झालं याचं मनोमन समाधान वाट होतं, कारण अंदमान हे काही इतर पर्यटनस्थळांसारखं ठिकाण नाही. इथं देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या हुतात्म्यांचं रक्त सांडलं आहे. इथं अनेकांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आहे. त्यामुळे इथे आपल्या मनातून नष्ट होत चाललेली देशप्रेमाची भावना पुन्हा प्रज्वलित होते. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने कर्तव्य भावनेने अंदमानच्या सेल्युलर जेल मध्ये जाऊन शेकडो स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती जागवून नतमस्तक व्हायला हवे. त्याबरोबरच इथल्या निसर्गातील अथांग निळ्या पाण्याच्या जगतातील अंतरंग अनुभवायला हवे. अंदमान निकोबार द्वीपसमूहातील अजूनही अश्मयुगात जगणाऱ्या आदिवासी मानवसमूहांचा, येथील घनदाट जंगलांचा अभ्यास करायला हवा. जंगलात राहून नैसर्गिक स्रोतांचा वापर करून उपजीविका करणारे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 'काहीही साठणारे' हे वनमानव, आपल्यासारख्या तथाकथित सुधारलेल्या माणसांपेक्षा कितीतरी आनंदात इथं वास्तव्य करून जगात आहेत हे समजून घ्यायला हवे. विचारांच्या तंद्रीतच आम्ही रात्री उशिरा घरी पोहोचलो. सहलीतील आठवणींचा चलचित्रपट मिटल्या डोळ्यांनी बघत बघत रात्री कधीतरी झोपेच्या आधीन झालो...  

 

दुसऱ्या दिवशी जरा उशिरानेच उठलो. उठून हॉल मध्ये येऊन बघितले तर कोपऱ्यात ठेवलेली माझी प्रवासाची 'बकेटलीस्ट' मला खुणावत होती. 'व्यवसायातून वेळ मिळालाच, प्रकृतीने साथ दिलीच तर अंदमान ला मला पुन्हा नक्की जायला आवडेल' ह्या उद्देशाने मी त्या बकेट  जवळ जाऊन माझ्या खिशातली अंदमानची चिट्ठी पुन्हा बकेट च्या तळाशी खोल खाली सरकवून ठेवली. अंदमानची चिट्ठी आत सरकवून ठेवताना बकेटलीस्ट मधील इतर अनेक पर्यटनस्थळांच्या चिट्ठ्या वर खाली झाल्या. त्यातून थोडी खालच्या बाजूला असलेली एक चिठ्ठी वर आली, आणि दोन्ही हात वर करून माझ्याकडे बघत आर्जवपूर्ण शब्दात मला म्हणाली "आता मी" ! मी उत्सुकतेने त्या चिठ्ठीला हातात घेऊन उलघडून बघितले. माझे डोळे चमकले. मी आनंदाने मोठ्या आवाजात बायकोला सांगितले "आता कंबोडिया"!

राजीव जतकर.