'सुई धागा' - कच्च्या पक्क्या धाग्यांची सुंदर वीण
ग्लॅमरस
अनुष्का शर्माच्या वेगळ्या भूमिकेचा 'सुईधागा'- मेड इन इंडिया हा थोडासा हटके पार्श्वभूमीवरील चित्रपट परवा पाहण्यात आला. या चित्रपटात करमणुकीचा मसाला असूनही दिग्दर्शक शरद कटारिया यांची काहीशी वेगळी हाताळणी आणि अनुष्का शर्माचा हटके लूक आणि अभिनय या मुळे 'सुई धागा' प्रेक्षणीय होतो. छोट्या गावातील अनेक तरुण, ज्यांच्यात स्वतःला सिद्ध करण्याची क्षमता असते, हुशारी असते, पण स्वतःच्या कोषातून बाहेर येऊन संघर्ष करण्याची त्यांची तयारी नसते. संघर्षानंतर यश मिळेलच याची देखील खात्री नसते. मग नैराश्याच्या दिव्यातून त्यांना जावे लागते. जीवनातील संघर्षाला सामोरे जात आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना प्रेरणादायी ठरावा असा हा चित्रपट आहे.
चित्रपटाची कथा कोणतेही अतिरेकी नाट्यमय प्रसंग न घडता पुढे सरकत राहते. ही कथा आहे ममता (अनुष्का शर्मा) आणि तिचा पती मौजी (वरूण धवन) या जोडप्याने जगण्यासाठी केलेल्या संघर्षाची. नुकतेच लग्न झालेली ममता प्रेमळ पती मौजी, सासू सासरे, दीर भावजय, अशा एकत्र कुटुंबात समरस झालेली असते. मौजीच्या हातात शिवणकलेचं कौशल्य असतं. ममताही विणकामात निष्णात असते. पण मौजीच्या आजोबांना हातमागाच्या व्यवसायात आलेल्या अपयशाने मौजी आणि त्याच्या वडिलांचा व्यवसायाप्रती आत्मविश्वास हरवलेला असतो. शिवणकामावर घर चालवणे शक्य नाही असा ठाम विश्वास असलेल्या मौजीच्या वडिलांनी (रघुवीर यादव) आयुष्यभर नोकरी करणेच पसंत केले. या टिपिकल मध्यमवर्गीय मानसिकतेनुसार आपल्या मुलाने म्हणजेच मौजी ने छोटी मोठी नोकरी करीत आपले आयुष्य व्यतीत करावे अशी त्यांची अपेक्षा ! आईवडिलांच्या अपेक्षेप्रमाणे कोणतीही महत्वाकांक्षा नसलेला मौजी कुठल्याश्या दुकानात मालकाचा अपमान सहन करीत नोकरी निभावत असतो. ह्या नोकरीत होणारा नवऱ्याचा अपमान मात्र स्वाभिमानी ममताला दुःखी करत असतो. एकदा मौजीवरील अपमानाचा कडेलोट झाल्यावर मात्र ममता आपल्या पतीला नोकरी सोडून स्वतःचा काहीतरी छोटा मोठा उद्योगधंदा करण्यासाठी प्रवृत्त करते. त्याच्यात एक स्फुल्लिंग पेटवते. पण स्वतःचा व्यवसाय करणे वाटते तितके सोपे नसते. मग सुरु होतो जीवनाचा संघर्ष ! घरात वारंवार आजारी पडणारी आई, वडिलांचे टोमणे, व्यवसायात अनुभव येणारी फसवणूक मौजी आणि ममताच्या वाट्याला येते. पुढे या संघर्षानंतर मौजी ममताला यश येते का? त्यांना झालेल्या फसवणुकीतून शहाणपण येते का? हे पडद्यावरच बघायला हवं.
या सरळ, साध्या कथा वीणेतील उभे आडवे धागे अधूनमधून मात्र कच्चे आहेत असे जाणवते. चित्रपटाची हाताळणी मधूनमधून थोडी संथ होते. सुरवातीपासून चढत्या क्रमाने फुलत जाणारी कथा मध्यंतरानंतर मात्र काहीशी ढेपाळते.
कथेचा पूर्वार्ध वास्तवतेशी नातं सांगणारा आहे, तर उत्तरार्ध काहीसा अवास्तव ! संघर्षानंतर येणार गोड शेवट तितकासा पटणारा नाही. शेवटच्या अर्ध्या तासात ममता आणि मौजी शेजाऱ्यांच्या मदतीने फॅशन परेड मध्ये ज्या पद्धतीने वावरतात ते वास्तवाच्या दूर नेणारे आहे. कथेतला तो भाग काहीसा अतिरंजित आहे. असे यश वास्तवात मिळणे अवघडच ! त्यामुळे सुरवातीपासून प्रेरणादायी वाटणारी ही गोष्ट शेवटच्या टप्प्यात काहीशी फिल्मी वाटू लागते.
वर उल्लेखल्याप्रमाणे कथेतील काही कच्च्या धाग्यांची काहीशी सैल वीण वगळता ह्या चित्रपटाला ‘थोड्याश्या कच्च्या आणि बऱ्याचश्या घट्ट वीणेचा सुंदर गालिचा’ म्हणता येईल. मारधाडीवाल्या मसाला चित्रपटापेक्षा काही वेगळं पाहू इच्छिणाऱ्या प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल.
राजीव जतकर.
After reading the blog, I am tempted to watch the movie... ..
ReplyDeleteSundar Parikshan