'ऑपरेशन डे ब्रेक' - क्रूरकर्मा 'रीनहार्ड हायड्रीच' चा खातमा
१९७६ ते १९८० हा माझ्या कॉलेज जीवनाचा काळ होता. या काळात पुण्यातील राहुल थिएटर मध्ये मित्रांच्या बरोबर विविध विषयावरील इंग्रजी चित्रपटांचा आस्वाद घेणे हा आमच्या आनंदाचा भाग होता. मॅकानाज गोल्ड, व्हेअर इगल्स डेअर, टॉवरिंग इन्फार्नो, गुड बॅड अग्ली, डर्टी डझन, माय नेम इज ट्रिनिटी, एअरपोर्ट चित्रपटांची साखळी, आईस स्टेशन झेब्रा, पॉसिडॉन्स ऍडव्हेंचर, फॉर फ्यु मोअर डॉलर, इटालियन जॉब (जुना), जेम्सबॉन्ड पट असे धमाल चित्रपट आणि त्यांची पारायणे आम्ही मित्रमंडळी करायचो. त्या काळात पाहिलेले युद्धपट मला विशेष आवडायचे. दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास मला नेहेमीच आकर्षित करतो. ‘गन्स ऑफ नॅव्हेरॉन, व्हॉन रेऑन्स एक्सप्रेस, ग्रेट एस्केप, अ ब्रिज टू फार, द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ हे आणि असे युद्धपट पाहताना भान हरपायचे. युद्धपटाच्या थराराची झिंग काही वेगळीच असते. त्या काळात पाहिलेल्या अनेक युद्धपटातील 'ऑपरेशन डे ब्रेक' हा चित्रपट मला विसरता येणे अवघड आहे.
दुसऱ्या
महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर जर्मनी लगत असलेल्या झकोस्लोवाकिया च्या राजधानीत म्हणजे 'प्राग' शहरात घडलेल्या सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट आहे. १९३९ ते १९४५ दरम्यान झालेल्या दुसऱ्या महायुद्धात प्रचंड नरसंहार झाला. सुरवातीला जर्मनीने सुडेटन लँड, ऑस्ट्रिया, झकोस्लोवाकिया या सारख्या छोट्या राष्ट्रांवर प्रत्यक्ष लढाई शिवाय, राजकारण करून मोठ्या मुत्सद्दीपणाने विजय मिळवून महायुद्धाची बीजे पेरली. पुढे पोलंड वरील स्वारीने प्रत्यक्ष युद्ध भडकले. मग उर्वरित युरोप जर्मनी ने पादाक्रांत करायला सुरवात केली. हे करत असताना जर्मनी चा हुकूमशहा हिटलर याने युद्धाचे, आक्रमणाचे सर्व आराखडे व्यवस्थित आखलेले होते, पण जिंकलेल्या प्रदेशात नवीन घडी बसवण्याचा आराखडा मात्र त्याच्याकडे नव्हता. त्यामुळे जिंकलेला प्रदेश योग्य प्रशासनाअभावी त्याच्या विकृत आणि राक्षसी वृत्तीच्या अनुयायांच्या हाती सोपवला गेला.
ज्यू आणि स्लाव्ह वंशाचे लोक कमी दर्जाचे असल्याने या वंशाचे लोक पृथ्वीतलावरून नाहीसे करण्याची गरज आहे असे हिटलर चे आणि नाझींचे ठाम मत होते. या दोन्हीही वंशाच्या जमातीत स्लाव्ह त्यातल्या त्यात सुधारण्याची शक्यता वाटत असल्याने हिटलर ने बऱ्याच स्लाव्ह लोकांना मजुरीची, मेहेनतीची कामे करून घेण्यासाठी जिवंत ठेवले. पण ज्यू जमात सुधारण्यापलीकडची आहे ह्या मानसिकतेमुळे लाखो ज्यू लोकांना त्याने यमसदनी धाडले. जिंकलेल्या प्रदेशातील ज्यूंना सामूहिकपणे मारण्यासाठी आणि दहशत निर्माण व्हावी यासाठी हिटलरने आणि त्याच्या अनुयायांनी मृत्यू-छावण्या (कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स) निर्माण केल्या. या सामूहिक कत्तली करण्यासाठी 'ऑसविच' नामक मोठाली स्नानगृहे बांधण्यात आली. स्त्रिया आणि मुलांना या स्नानगृहात अंघोळीसाठी नेऊन कोंडण्यात येई. सर्व बाजूंनी बंद असलेल्या या मोठ्या खोलीच्या छतातून विषारी वायू सोडण्यात येई. काही मिनिटातच नग्नावस्थेतील स्त्रिया, मुले रक्त ओकू लागत. एकाच वेळी दीडदोनशे स्त्रिया व मुलांच्या प्रेताचा खच पडत असे. या अशा मृत्यूच्या अंघोळी दिवस रात्र अव्याहत चालू असत. हा अशा प्रकारचा राक्षसी संहार मुख्यतः ज्यू लोकांच्या वाट्याला आला.
![]() |
ANTON DIFFRING (REINHARD HEYDRICH) |
अनेक ठिकाणच्या अश्या भयानक नरसंहाराचे कर्ते करविते होते हिटलरच्या अतिशय मर्जीतले प्रमुख लष्करी अधिकारी 'हेनरीच हिमलर' आणि 'रिनहार्ड हायड्रीच' हे महाभयंकर कर्दनकाळ ! यापैकी हायड्रीच हा जरा जास्तच क्रूर, निर्दयी, कठोर, दुष्ट होता. १९४१ मध्ये झेकोस्लोवाकिया मध्ये हा कार्यरत होता. झेक लोकांचा विरोध मोडून काढणे हे त्याचे काम होते. या कामासाठी लागणारे सर्व अधिकार त्याला होते. अधिकारावर येताच त्याने दहशत पसरवण्यासाठी ज्यू लोकांना निर्दयपणे फाशी द्यायला सुरवात केली. त्यामुळे तो फाशीवाला हायड्रीच (हँगमन हायड्रीच) म्हणूनच ओळखला जायचा. जनमानसात त्याच्याविषयी कमालीचा तिरस्कार होता. त्यामुळे दोन झेक तरुणांनी त्याला मारायचे ठरवले. झेकोस्लोवाकिया मधून कसेबसे सुटून ते इंग्लंड मध्ये गेले. या दोन तरुणांच्या मदतीने इंग्लंडच्या लष्कराने हायड्रीच ला मारण्यासाठी एक योजना आखली. या महत्वाच्या लष्करी कारवाईला नाव देण्यात आले... 'ऑपरेशन डे ब्रेक' !
*** एका
वादळी हिमवर्षाव सुरु असलेल्या सकाळी इंग्लंड मधून एक छोटे लष्करी विमान 'प्राग' च्या दिशेने रवाना होते. या विमानात जान क्युबीस (टिमोथी बॉटम्स), जोसेफ गॅबसिक (अँथनी अँड्र्यूज) आणि या दोघांच्या मदतीला कार्ल क्रुडा (मार्टिन शॉ) असे तिघे झेकोस्लोवाकियाच्या राजधानीत म्हणजे प्राग मध्ये पॅराशूट च्या साहायाने उतरतात. प्राग मध्ये नाझींना विरोध करणारे अनेक क्रांतिकारी लोक या तिघांना मदत करण्यासाठी उत्सुक असतात. या क्रांतिकारकांच्या मदतीने जान, जोसेफ आणि कार्ल हे हायड्रीच च्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेऊ लागतात. गुप्त बैठक, मसलती सुरूच असतात.
एकदा अशी बातमी मिळते की हिटलरला भेटायला हायड्रीच रेल्वेने बर्लिन ला जाणार असतो. या संधीचा फायदा घेऊन हायड्रीचला गोळीने उडवण्याची योजना आखली जाते. हिटलरचा उजवा हात असलेल्या हायड्रीच साठी एका स्वतंत्र आणि आलिशान रेल्वेच्या डब्याची सोया केलेली असते. प्रवासाचा दिवस उजाडतो. रेल्वे स्टेशन वर हायड्रीचला निरोप दिला जातो. हायड्रीच रेल्वेच्या त्याच्या डब्यात बसतो आणि रेल्वे सुरु होते. पुढे थोड्याच अंतरावर असलेल्या एक पडक्या घराच्या खिडकीत जान आणि जोसेफ बंदुकीच्या दुर्बिणीतून नेम धरून बसलेले असतात. हृदयाची धडधड वाढते. श्वास रोखला जातो. हायड्रीच चा डबा जान आणि जोसेफ च्या पुढ्यात येतो. बंदुकीच्या दुर्बिणीत हायड्रीच चा चेहेरा जान ला दिसतो. नेम धरून जान चे बोट बंदुकीचा ट्रिगर दाबणार... त्याच क्षणी अलीकडच्या रेल्वे ट्रॅक वरील दुसरी गाडी धडधड करीत जाते. त्यामुळे हा प्रयत्न साफ फसतो. दोघेही निराश होतात.
![]() |
ANTHONY ANDREWS (JOSEF GABCIK ) |
पण निराश होऊन कसं चालेल? पुन्हा हे क्रांतिकारक हायड्रीचच्या खुनाची नवीन योजना आखतात. २९ मे १९४२ रोजी हायड्रीच त्याच्या कामासाठी प्राग मधील एका रस्त्यावरून जाणार आहे अशी माहिती मिळते. रस्त्यावरच्या एका वळणावर हायड्रीच च्या गाडीचा वेग काहीसा कमी होणार असतो. इथेच या वळणावर हायड्रीचला गोळ्या घालायचे ठरते. वळणाच्या एका बाजूला जान उभे राहून हायड्रीच ची गाडी येताच वळणावरील दुसऱ्या बाजूला मशिनगन घेऊन उभ्या असलेला जोसेफला खूण करणार असतो. ठरलेल्या वेळी हायड्रीच ची गाडी दिसताच जान डोक्यावरील हॅट काढून खूण करतो. रस्त्यावरील त्या वळणावर हायड्रीच च्या गाडीचा वेग कमी होतो, त्याचक्षणी कोटाने झाकलेली मशिनगन सरसावत जोसेफ हायड्रीच च्या गाडी समोर उभा ठाकतो. मशीनगन चा ट्रिगर दाबतो. पण इथेही जान चे दुर्दैव आड येते. मशिनगन मधील काहीतरी बिघाडामुळे गन मधून गोळ्यांच सुटत नाहीत. क्षणभर कुणालाच काही समजत नाही. हायड्रीच देखील अवाक होतो. जोसेफ ला आता पळून जाण्याशिवाय पर्यायच नसतो. तो पळून जातो. इकडे जानही चक्रावतो, पण क्षणार्धात सावरतो आणि खिशात ठेवलेला हातबॉम्ब हायड्रीच च्या दिशेने भिरकावतो. मोठा धमाका होऊन हायड्रीच खूप जखमी होतो. गाडीच्या ठिकऱ्या उडतात. एका सायकलच्या मदतीने जानही तिथून पळून जाण्यात यशस्वी होतो. जखमी हायड्रीच पुढे पाच दिवसांनी म्हणजे ४ मे रोजी हॉस्पिटलमध्ये मरण पावल्याचे जाहीर होते.
हायड्रीच च्या खुनामुळे चिडलेले नाझी अधिकारी धरपकड सुरु करतात. अनेक निरपराध नागरिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाते. ज्या दिवशी हायड्रीच मरण पावलेला असतो म्हणजे ४ मे ला सूड म्हणून २०० नागरिकांना गोळ्या घालून मारण्यात आले. नाझींचे सूडचक्र सुरु झाले होते. नाझींच्या धरपकडीतून कसेबसे सुटून जान आणि जोसेफ प्राग मधील 'कार्लबोरोमीस' नावाच्या चर्च मध्ये आश्रय घेतात आणि भूमिगत होतात. या चर्च मध्ये अनेक क्रांतिकारक भूमिगत झालेले असतात. सुटकेच्या संधीची वाट बघत असतात.
![]() |
MARTIN SHAW (KAREL CURDA) |
या क्रांतिकारकांचे दुर्दैव पुन्हा आड येते. जान आणि जोसेफ बरोबर आलेला कार्ल जिवाच्या भीतीने आणि आपल्या बायको आणि मुलाला वाचवण्यासाठी गद्दारी करतो, आणि या 'ऑपरेशन डे ब्रेक' ची इत्यंभूत माहिती नाझींना देतो. पुढे नाझींनी ऑपरेशन डे ब्रेक चं काय केलं ? चर्च मध्ये लपलेल्या जान, जोसेफ चं काय झालं ? ते सुटले का ? या प्रश्नांची उत्तरे आणि या सत्यघटनेतील थरार चित्रपट बघूनच अनुभवावा लागेल.
![]() |
TIMOTHI BOTTOMS ( JAN KUBIS) |
दिग्दर्शक लुईस गिल्बर्ट यांचा १९७५ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची मांडणी थरारक तर आहेच, पण कलात्मकही आहे. विषयाला सोडून एकही प्रसंग यात नाही. सुरवातीपासून शेवटपर्यंत विषयाचे गांभीर्य टिकवले गेले आहे. 'अँटोन डफरिंग' या चतुरस्त्र अभिनेत्याने रिनहार्ड हायड्रीच चा क्रूरपणा, हुशारी, महत्वाकांक्षी बाणा, काळीज थिजवणारा थंडपणा त्याच्या अभिनयातून हुबेहूब उभा केला आहे. टिमोथी बॉटम्स, अँथनी अँड्रयूज, मार्टिन शॉ, कार्ल ड्युएरिन्ग, निकोला पॅगेट या सर्वच अभिनेत्यांनी अफाट कामं केली आहेत. या चित्रपटाचा थरार चित्रपटाच्या पार्श्वसंगीतामुळेच अंगावर येतो. सुरवातीपासूनच पार्श्वसंगीताचं वेगळेपण जाणवायला लागतं. हायड्रीचचा खून करण्याचे प्रयत्न करतानाचे जे प्रसंग आहेत त्यावेळी वापरले जाणारे विशिष्ठ पार्श्वसंगीत प्रसंगाची थरारकता प्रचंड वाढवते. त्यामुळे डेव्हिड हँटशेल या संगीतकाराला या चित्रपटाच्या यशाचे बरेचसे श्रेय जाते. दुसऱ्या महायुद्धात नेमके कसे वातावरण होते, जर्मनव्याप्त पराभूत युरोपीय देशांची परिस्थिती कशी होती, याची झलक या चित्रपटातून बघायला, अनुभवायला मिळते. चाळीस वर्षांपूर्वी मी पाहिलेला 'ऑपरेशन डे ब्रेक' हा चित्रपट मी अजूनही विसरू शकत नाही.
![]() |
LIDICE VILLAGE AFTER DETH OF HEYDRICH |
हायड्रीच च्या खुनानंतर सूड म्हणून नाझींनी प्राग शहराच्या जवळील २० किलोमीटर अंतरावरील 'लिडिसे' नावाचे खेडे नष्ट करायचे ठरवले. ९ जून १९४२ या दिवशी नाझी कॅप्टन रोस्टोक याच्या नेतृत्वाखाली नाझी सैनिक रणगाडे घेऊन या खेड्यात घुसले आणि सर्वच्या सर्व घरे नष्ट केली. गावातील सर्व पुरुषांना नाझी सैनिकांनी गोळ्या घालून ठार केले. स्त्रिया व मुलांना गॅस चेंबर मधून मारण्यात आले. लिडिसे होत्याचे नव्हते झाले, बेचिराख झाले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर युरोपातील अशा अनेक खेड्यांची पुनर्बांधणी करण्यात आली. या नवनिर्मित खेड्यांची नावेही बदलण्यात आली. जगाच्या नकाशावरून ती कायमची पुसली गेली. पण 'लिडिसे' हे गाव मात्र नकाशावरून अजूनही पुसलं गेलं नाही. 'लिडिसे' अजूनही जगाच्या नकाशावर ठळकपणे दिसते ते या 'ऑपरेशन डे ब्रेक' ची आठवण म्हणूनच...
राजीव जतकर.
Ekdam maast kaka, Had never heard of this movie....
ReplyDeleteNakki baghen ne
वा ! सहज शैलीत चित्रपटाचा थरार, नाट्य आणि उत्कंठा आम्हां वाचकांपर्य॓त पोहोचवली आहे.
ReplyDeleteउत्तम चित्रपट जसा शेवटच्या क्षणापर्यंत, किंबहुना संपल्यावरसुद्धा प्रेक्षकाला खुर्चीला खिळवून ठेवतो, तसेच हे वर्णनही शेवटच्या शब्दापर्यंत वाचकाला बांधून ठेवते, अगदी माझ्यासारख्या सिनेनिरक्षरालाही!
आठवण ताजी झाली....
ReplyDeleteसुंदर मांडणी..
आठवण ताजी झाली...
ReplyDeleteसुंदर मांडणी....शब्दांकन
सुंदर.. मला ही आवडतात युद्ध पट पहायला.. मी काही मूवी USB मध्ये ठेवले आहेत,, मधुन मधुन पहातो.
Deleteछान लिहलेस.. कीप इट अप. 💐💐
मस्तच ... WWII माझा आवडीचा विषय... सुंदर आहे आजुन लिहीत रहा
ReplyDeleteWavv !!
ReplyDeleteRemembered once again. Very good Rajiv keep it up for old remembers.
अभय जोशी
ReplyDeleteचित्रपटाची गोष्ट फारच सुंदरपणे सांगितली आहे. शेवट कसा झाला हे न सांगितल्याने उत्कठआ वाढीस लागते. नाझीनी केलेल्या क्रूर आत्याचारांचे वर्णन अंगावर काटा अणनारे आहे. हा चित्रपट बघण्याची ओढ निश्चितच निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी झाला आहेत. तुमचा अनुभव आमच्या बरोबर share केल्या बद्दल धन्यवाद
Very nicely written...
ReplyDeleteExcellent written ....will definitely watch the movie
ReplyDelete
ReplyDeleteउत्तम चित्रपट जसा शेवटच्या क्षणापर्यंत, किंबहुना संपल्यावरसुद्धा प्रेक्षकाला खुर्चीला खिळवून ठेवतो, तसेच हे वर्णनही शेवटच्या शब्दापर्यंत वाचकाला बांधून ठेवते.
सुरेख मांडणी.यावरून चित्रपट बघणे आवश्यकच आहे.
राजू
ReplyDeleteकिती सुंदर लिहितोस रे. मग ते.लंडन डायरी असो किंवा चित्रपटाचा रसास्वाद...
डोळ्या समोर प्रसंग उभे करण्याची ताकत आहे तुझ्या लिखाणात. असेच लिहीत रहा.
Thanks.
DeleteMast
ReplyDeleteकाॕलेजच्या आठवणी जाग्या झाल्या.... लेखन शैली तर उत्तम आहेच...
ReplyDeleteAs usual Writing has Rajeev Touch! Great! If get chance,will definitely watch the movie.
ReplyDeleteNice, not seen the movie, but well written, anyone can understand.
ReplyDeleteराजीव, मी पाहिला होता हा युद्धपट पण तुमच्या या लेखामुळे परत पहावासा वाटला .. आता परत बघताना छान आस्वाद घेता येईल..
ReplyDeleteYour review has compelled me to watch the movie again..may be 5th time!
ReplyDelete