Monday, 9 July 2018

जातीयवादाचं भेदक वास्तव: 'फ़िराक़'



जातीयवादाचं भेदक वास्तव: 'फ़िराक़'


 परवाच ऍमेझॉन प्राईम व्हिडीओ वर 'फ़िराक़' नावाचा चित्रपट पाहण्यात आला आणि मी कळत भूतकाळात गेलो. मला आठवतंय माझ्या लहानपणी म्हणजे मी तिसरीचौथीत असताना आमच्या कडे 'हुसेन' नावाचा एक मुस्लिम ऑर्डरली ( पूर्वी सरकारी नोकरीत असलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हाताखाली एक ऑर्डरली नावाचा एक शिपाई तैनात असे. ऑर्डरली म्हणजे हरकाम्या ! सांगेल ते काम करणे ही त्याची ड्युटी.) कामाला होता. आजोबांच्या काळापासून आमच्या कुटुंबात आम्ही कधी जातपात पाळली नाही. (आमचे वडील म्हणायचे 'स्वतःच्या जाती धर्माचा अभिमान जरूर बाळगावा, पण दुसऱ्या धर्माला कधी कमी मानू नये. दुसऱ्या धर्माचा आदर करावा'.) हुसेन आणि आमचे संबंध उच्चनीचता, जातीधर्माच्या पलीकडचे होते. आजच्या इतका जातीधर्मातील कडवटपणा त्या काळात नव्हता. प्रत्येक वर्षी ईद ह्या मुस्लिम सणाला हुसेन आम्हाला सर्वांना शिरखुर्मा खायला त्याच्या घरी बोलवायचा. ईद सणाची आम्ही भावंडे वाट बघायचो. आम्ही देखील दिवाळीत फराळाचे खायला त्याला आणि त्याच्या कुटुंबाला आमंत्रित करायचो. दरवर्षी गणपतीच्या दिवसात उकडीचे मोदक हुसेन च्या घरी चुकता पोहोचते व्हायचे. नंतरच्या माझ्या व्यवसायाच्या काळात देखील माझ्या काही मुस्लिम कामगारांना दिवाळीत मिठाई, फराळ मी द्यायचो. आम्ही एकमेकांच्या आनंदात सहभागी व्हायचो.

 पण गेल्या पंचवीस तीस वर्षात जातीय वादाचं भूत आपल्या भारतीय समाजावर जरा जास्तच आरूढ झालंय. हिंदू मुस्लिम एकमेकांच्याकडे संशयानेच बघतात. हिंदू मुस्लिमांच सोडा, पण हिंदू समाजातील ब्राह्मण, मराठा, दलित असे घटक देखील एकमेकांना पाण्यात पाहू लागली आहेत. राजकारण्यांच्या डावपेचाला, मताच्या राजकारणाला आपला समाज बळी पडतोय हे दुर्दैव आहे. पुढील काळात आपल्यापुढे काय वाढून ठेवलं आहे ते तो ईश्वर, अल्लाच जाणे. असो... 

   'फ़िराक़' हा चित्रपट पाहताना कोणताही संवेदनशील माणूस अस्वस्थ होईल. २००२ मधील गुजराथ दंगलींच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट बेतला आहे. हा चित्रपट दंगलपीडित लोकांवर, दंगलीनंतर होणाऱ्या दाहक परिणामांचे (आफ्टर इफेक्ट्स) भेदक चित्रण करतो, आणि दंगलीची दाहकता, दंगल दाखवताही, आपल्या सारख्या कम्फर्ट झोन मध्ये राहणाऱ्या लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवतो. दंगली घडवणारे निरनिराळ्या कारणांसाठी दंगली घडवून आणतात खरे, पण दंगलींचा खोल आणि भयानक परिणाम समाज मनावर होतो. दंगलीत मारतात ते एका अर्थाने सुटतात बिचारे, पण जे दंगलग्रस्त मागे जिवंत राहतात त्यांचे जीवन मरणापेक्षा भयानक असते. 

आरती 
*** या चित्रपटात कथा अशी नाही. हा चित्रपट म्हणजे २००२ मधील गुजराथ दंगलींनंतरच्या चोवीस तासांमधील घडणाऱ्या घटनांची एक मालिका आहे. या चित्रपटाच्या सुरवातीलाच एक भयानक दृश्य आपल्याला दिसते. दंगलीमध्ये मरण पावलेल्या व्यक्तींच्या प्रेतांना पुरण्यासाठी एक भला मोठा खड्डा केलेला असतो आणि प्रेतांना अक्षरशः ट्रक मधून आणून टाकले जात असते. संख्येने जास्त असलेल्या मुस्लिम प्रेतांमध्ये (जातीय दंगलीत अल्पसंख्यांक अधिक मरण पावतात ही वस्तुस्थिती असते) काही हिंदू माणसांची प्रेतं देखील असतात. प्रेतांची विल्हेवाट लावणारा एक मुस्लिम माणूस उद्वेगाने, आक्रोश करत एक हिंदू स्त्री (कपाळी कुंकू असते म्हणून हिंदू) च्या प्रेताला मारायला धावतो. जातीय विखार माणसाला किती खालच्या पातळीवर वागायला लावतो, या विचाराने आपल्या अंगावर सरसरून काटा येतो. 
आरती 
*** गुजराथी हिंदू कुटुंबातील नवरा संजयचे (परेश रावल) अत्याचार सहन करणारी बायको आरती (दीप्ती नवल) दंगली नंतर नैराश्याच्या आणि अपराधीपणाच्या खोल गर्तेत गेली आहे. एक अपराधीपणाची भावना सतत तिच्यात असते, कारण दंगल चालू असताना काही दंगलखोरांपासून स्वतःला वाचवण्यासाठी एका मुस्लिम स्त्री ने आरतीच्या घरात आश्रय मागितलेला असतो. पण नवऱ्याच्या भीतीने या मुस्लिम स्त्री ला आरती आश्रय देत नाही. एका निष्पाप मुस्लिम मुलाला देखील ती नवऱ्याच्या  भीतीने मदत करू शकत नाही. ह्या हिंदू गुजराथी महिलेची घालमेलदीप्ती नवल’ ह्या कसलेल्या अभिनेत्री ने आपल्या सुंदर अभिनयाने दाखवली आहे.  
  
 समीर अर्शद शेख-अनुराधा देसाई

*** समीर अर्शद शेख (संजय सूरी) या उच्चशिक्षित मुस्लिम तरुणाचे अनुराधा देसाई (टिस्का चोपडा) या हिंदू तरुणीशी प्रेमविवाह झालेला आहे. या दाम्पत्याचं दुकान दंगलीदरम्यान लुटलं गेलंय, उध्वस्त झालंय. निराश मनाने समीर आणि अनुराधा गुजरात सोडून दिल्लीला जाण्याचे ठरवतात. अनुराधा समीरचं आडनाव  पोलिसांपासून लपवून ठेवते, कारण नावावरून एखाद्याची जात, धर्म कळतो ना... 
  
मुनिरा आणि तिची हिंदू बालमैत्रीण ज्योती 

*** मुनिरा (शबाना गोस्वामी) या मुस्लिम महिलेचे घर दंगलीत जळालेलं असतं. मुनिरा आणि तिची हिंदू बालमैत्रीण ज्योती (अमृता सुभाष) जिवाभावाच्या मैत्रिणी असतात. पण 'ज्योतीच्या नवऱ्याचा आपले घर जाळण्यात हात आहे' असा मुनिराच्या मनात संशय असतो. दंगली नंतर संशयाच्या या धुक्यात दोघींची निरपेक्ष मैत्रीचा कस लागतो. एव्हड्या वर्षांच्या मैत्रीत धर्म आडवा येतो.

शास्त्रीय गायक खानसाहेब (नसरुद्दीन शाह)

*** एक वृद्ध मुस्लिम संगीतकार आणि शास्त्रीय गायक खानसाहेब (नसरुद्दीन शाह) हिंदूमुस्लिम दंगली, हिंसाचाराने खूप दुःखी आणि अस्वस्थ आहेत. ह्या वृद्ध गायकाची भूमिका नसरुद्दीन शाह यांनी अफलातून केली आहे. ते करीममियाँ (रघुवीर यादव) नावाच्या केअरटेकर बरोबर संगीताची सेवा करत आपले जीवन व्यतीथ करत असतात. दंगली दरम्यान करीममियाँ वृद्ध खानसाहेबांना विचारतो 'खानसाहेब, बाहेर दंगलीत मुसलमानांना क्रूरपणे मारलं जातंय, याचं तुम्हाला दुःख कसं होत नाहीये?' त्यावर हा वृद्ध गायक उत्तरतो 'करीम मियाँ, हमारे कुछ मुस्लिम नौजवान हिंदू भाइयों का बदला लेनेकी तैयारी कर रहे है, ऐसा मैने सुना है! इन्सान इन्सानको मार रहा है, इसका मुझे बहोत जादा दुख है!'  छोट्या छोट्या प्रसंगातून, संवादातून खूप मोठा आशय सांगून जातो हा चित्रपट...

'मोहोसीन'
*** या चित्रपटात एका छोट्या 'मोहोसीन' (मोहोमद सामद) नावाच्या मुलाची देखील करुण कहाणी आहे. मोहोसीनचे आईवडील, नातेवाईक दंगलीत मारले गेलेले असतात. हा आपल्या आईवडिलांना भेदरलेल्या नजरेने शोधत रस्त्यावरून फिरत असतो. इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या संहारात या बिचाऱ्या मोहोसीनकडे कुणाचेच लक्ष नसते. मोहोमद सामद नावाच्या चिमुरडयाने केलेला अभिनय पाहून आपले हृदय पिळवटून जाते. चित्रपटाच्या शेवटी सारंगीच्या करून सुरांच्या पार्श्वभूमीवर मोहोसीनच्या डोळ्यांकडे बघताना आपल्या अंगावर सरसरून काटा येतो. हे मोहोसीन चे डोळे आपल्याला अनेक प्रश्न विचारत राहतात, ज्यांची उत्तरे आपल्याकडे नसतात. चित्रपट संपला तरी मोहोसीन चा  भेदरलेला चेहेरा, करुण डोळे आपल्याला आठवत राहतात. विचार करायला भाग पाडतात. आपला मेंदू कुरतडत राहतात... 
 
दिग्दर्शक: 'नंदिता दास

परसेप्ट पिक्चर कंपनीची निर्मिती असलेला फिराक हा चित्रपट 'नंदिता दास' यांनी दिग्दर्शित केलेला आहे. खरं तर नंदिता दास यांची सुरवातीची ओळख 'गुणी अभिनेत्री' अशीच आहे. त्यांनी निरनिराळ्या भाषेतील जवळ जवळ पस्तीस चाळीस चित्रपटामधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. पैकी मैलाचे दगड ठरणारे फायर (१९९६), अर्थ (१९९८), बवंडर (२०००) हे चित्रपट दखलपात्र आहेत. २००८ साली नंदिता दास यांनी दिग्दर्शित केलेल्या 'फ़िराक़' ह्या चित्रपटाला अनेक पारितोषिकांनी सन्मानित केलं गेलंय. एकूणच जबरदस्त स्टारकास्ट मुळे 'फ़िराक़' या चित्रपटाची अभिनयाची बाजू सर्वोत्तम आहेच, पण त्यामुळे दिग्दर्शकाला जे म्हणणे मांडायचे आहे ते प्रेक्षकांपर्यंत सहजपणे आणि थेट पोहोचते.

२००२ च्या गुजरात दंगलीमध्ये अंदाजे ९०० मुसलमान तर ३०० च्या वर हिंदू मारले गेले. हजारो हिंदूमुस्लिम कुटुंबे बेघर झाली. या दंगलीमध्ये तुलनेने मुसलमान समाजाला जास्त झळ पोहोचली. (अल्पसंख्यांकांना अशा वेळी जास्त झळ बसते हे त्रिकालाबाधित सत्य आहे.) त्यामुळेच केवळ यातील बहुतांशी घटना, पात्रे मुस्लिम आहेत. अशा प्रकारच्या जातीय दंगलीत काही ठिकाणी हिंदू ही जास्त मारले गेले आहेत. तटस्थपणे विचार केला तर दंगलीची झळ कोणत्याही मुसलमानाला अथवा हिंदूला बसत नाही तर ती सर्वच समाजाला बसते. त्यातही गरीब जास्त होरपळतो.
 

 गंमत म्हणजे भारतीय समाजात जातीय दुही अथवा दुफळी (फ़िराक़) ही फक्त हिंदू मुस्लिमांमध्येच असते असे नाही. ही दुफळी हिंदू-मुसलमानांच्या पोटजातींमध्येही कमालीची तीव्र पणे निर्माण झालेली दिसते. परावाचंच उदाहरण सांगतो. एकदा मी कार घेऊन बाहेर पडलो. एका चौकात सिग्नल पडल्यावर डाव्या बाजूला वळलो. तेव्हड्यात समोरून रॉंग साईडने एक भली मोठी फॉर्च्युनर गाडी माझ्या समोर थांबली. सुरवातीला आम्ही दोघेही गाडी मागे घ्यायला तयार नव्हतो. फॉर्च्युनर गाडीतुन एक धिप्पाड, कपाळावर गंध लावलेला, गळ्यात जाड सोन्याच्या साखळ्या घातलेला माणूस उतरला, आणि वाद घालू लागला. थोड्या वेळाने नाईलाजाने मी माघार घेऊन गाडी मागे घेतली. मग विजयोन्मादाने भरदाव गाडी पुढे दामटवत हा गुंडासामान दिसणारा माणूस मला म्हणाला 'बामन ना रे तू? तुमची बामणांची साली जातच हलकट'. मी त्याच्या डोळ्यातील विखार बघून थक्क झालो. मला कळेना हा गुंड स्वतः रहदारीचे नियम मोडून मलाच ओरडत होता. नुसता मलाच ओरडत नव्हता तर समस्त ब्राह्मणांना शिव्या घालत होता. मला कळेना झाल्या घटनेत जातीधर्माच्या काय संबंध? (मी ब्राह्मण आहे हे त्या गावगुंडाला कसे कळले कुणास ठाऊक?) ना रंगरूपातून एखाद्याची जात कळते, ना वागण्यातूनमाझ्यासारखा सर्वसामान्य चारचौघांसारखा दिसणारा माणूस मुसलमानी पद्धतीची टोपी घालताच तो मुसलमान दिसू शकतो, तर गंध लावताच दिसतो हिंदूवास्तविक मी कधीच कर्मकांड, पूजाअर्चा करत नाही. मी पूर्णपणे नास्तिक आहे. मी माणूस म्हणून जगायचा मात्र आटोकाट प्रयत्न करतो. दुर्दैवाने आपल्या भारतीय समाजात जातीधर्मातील द्वेष, तेढ कमालीची तीव्र झालेली आहे. 'फ़िराक़' सारखे चित्रपट बघून जातीधर्मापलीकडे मानवतावादी दृष्टी ठेवणारी, तुमच्यामाझ्यासारखी मनं अस्वस्थ होतात ती त्यामुळेच...

राजीव जतकर.

1 comment: