'न्यूड' - तथाकथित संस्कृती रक्षकांना सणसणीत चपराक.
खूप कष्टपूर्वक बनवलेल्या सिनेकलाकृतींवर तथाकथित आणि स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांनी हल्ला करून चित्रपटांचे प्रदर्शन बंद पडण्याच्या अनेक घटना नजीकच्या काळात होऊन गेल्या. पारंपरिक विचारसरणीतून बाहेर पडून कलाकार, मग तो कोणत्याही कलाक्षेत्रातील असो, आपल्या संवेदनशील नजरेतून कलाकृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. कला ही जात, धर्म, स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत वगैरे बंधनात कधीच अडकून पडत नाही. अशाच विचारांच्या काहीश्या पार्श्वभूमीवर 'न्यूड' हा चित्रपट बेतलेला आहे. नग्नता हा विषय असून देखील चित्रपटात भिभत्सपणा कोठेही जाणवू न देता निर्माता दिग्दर्शक रवी जाधव यांनी हा चित्रपट सिनेरसिकांसाठी सादर केलाय. हा चित्रपट कोठेही सेक्सी किंवा बोल्ड न वाटता, प्रेक्षकांना तो नग्नतेकडे कलात्मक दृष्टीने बघायला शिकवतो.
चित्रपटाची कथा तशी साधीच आहे. एका खेडेगावातली यमुना (कल्याणी मुळे) आपल्या पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे आणि तो तिला करत असलेल्या मारहाणीमुळे कंटाळलेली असते. एकदा हे सर्व असह्य झाल्यामुळे आपल्या मुलाला लक्ष्मणला (मदन देवधर) घेऊन मुंबईला आपल्या मावशी चंद्राक्का कडे (छाया कदम) येते. यमुना मावशी कडे राहायला आल्यावर मुंबईत काम शोधायला लागते. तथापि तिला काम काही मिळत नाही. मावशीला एकदा ती विचारते की ‘ती कुठे काम करते’? मावशी उत्तर देताना काहीशी अडखळते. 'मावशी कुठे आणि कसले काम करते'? या उत्सुकतेपोटी यमुना चंद्राक्का मावशीचा हळूच पाठलाग करत सर जे.जे कला महाविद्यालयात पोहोचते. या महाविद्यालयात चंद्राक्का शिपायाचे काम करता करता न्यूड मॉडेल म्हणूनही काम करत असते. कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर चंद्राक्काला नग्नावस्थेत मॉडेल म्हणून बसलेले बघून यमुना नखशिखांत हादरते. चंद्राक्का वर ती खूप चिडते देखील. मग न्यूड मॉडेल्स ची असणारी कमतरता, शैक्षणिक आवश्यकता अशा गोष्टी समजावून घेतल्यावर ती थोडी शांत होते. पुढे यमुनेला काम मिळत नसल्याने 'तिनेही न्यूड मॉडेलचे काम करावे' असे चंद्राक्का सुचवते. मुलाच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशांसाठी यमुना नाईलाजाने हे काम करण्यास तयार होते. हे काम करताना मनाची होणारी घुसमट, घालमेल यमुनेचे काम करणाऱ्या 'कल्याणी मुळे' या अभिनेत्रीने मोठ्या ताकदीने दाखवली आहे. न्यूड मॉडेल झाल्यावर यमुनेच्या आयुष्यात कोणती स्थित्यंतरे येतात ते पडद्यावर पाहायला हवे.
‘छाया कदम’ आणि ‘कल्याणी मुळे’ या दोघीचाही मोकळाढाकळा अभिनय चित्रपटाची उंची कमालीची वाढवतो. या दोघींनी जीव ओतून काम केलंय. एम. एफ. हुसेन या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्तिरेखेशी साम्य असलेली 'मलिक साब' याची भूमिका नसरुद्दीन शहा यांनी साकारली आहे. या भूमिकेतून दिग्दर्शक कलाकाराची बाजू आपल्याला सांगतो. ओम भुतकर, नेहा जोशी, मदन देवधर, किशोर कदम, श्रीकांत यादव हे कसलेले कलाकार आपआपल्या भूमिकेचं सोनं करतात. सायली खरे यांच संगीत, पार्श्वसंगीत चित्रपटातील प्रसंगांना पूरक आहे, काहीसं वेगळं आहे.
हा चित्रपट पाहताना, विशेषतः शेवट पाहताना आपण प्रेक्षक सुन्न होऊन जातो. नंतर पुढे काही मिनिटे पडद्यावर काहीच नसते. पडद्यावर ना कुठले दृश्य, ना कसले संगीत... केवळ निःशब्द भयानक शांतता ! असतो तो फक्त विचारांचा कल्लोळ प्रेक्षकांच्या मनात...
प्रत्येक विचारक्षम प्रेक्षक सुन्न होऊन खुर्चीला खिळून राहतो. हा चित्रपट पाहून झाल्यावर मी देखील दोन तीन तास कुणाशी बोललो नाही, बोलू शकलो नाही. असाच सुन्न करणारा शेवट मी 'फॅन्ड्री' या चित्रपटातही अनुभवला होता. आपल्या सारख्या सामान्य सिनेरसिकांनी आपल्या कलाजाणिवा तसेच प्रगल्भता वाढवण्यासाठी असे चित्रपट पाहायलाच हवेत.
राजीव जतकर.