Friday, 26 October 2018

'डंकर्क' मधून यशस्वी माघार - 'ऑपरेशन डायनॅमो'


'डंकर्क' मधून यशस्वी माघार - 'ऑपरेशन डायनॅमो'

'भविष्यात विजयश्री खेचून आणायची असेल तर कधी कधी प्रसंगी माघारही घ्यावी लागते' हे व्यावहारिक सत्य दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांनी योजलेल्या 'ऑपरेशन डायनॅमो' मुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले. युद्ध भूमी सोडून मागे पलायन करणे किंवा माघार घेणे ही काही अभिमानाची किंवा आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट नव्हे. पण कधी कधी युद्धभूमीवरून एक पाउल माघारी घेणे मुत्सद्दीपणाचे ठरते. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. ब्रिटिश सेनेच्या दुसऱ्या महायुद्धातील फ्रान्समधील डंकर्क शहराच्या किनारपट्टीवरून घेतलेल्या माघारीचा रंजक इतिहास त्यापैकीच एक !  ब्रिटिशांच्या या ऐतिहासिक माघारीची कहाणी अतिशय रंजक, अद्भुत आणि हृदयाचे ठोके वाढवणारी आहे.



एप्रिल १९४० पर्यंत हिटलरने हॉलंड आणि बेल्जीयम मधील लढाई जिंकून, उत्तरेकडून फ्रान्सच्या दिशेने आपल्या सैन्याचा रेटा वाढवला होता. जर्मनीतून म्यूस खाडी आणि अर्देन्स चे जंगल ओलांडत फ्रान्सच्या सीमेवर असलेल्या सेडान शहराच्या दिशेने जर्मन सेनेने मुसंडी मारली होती. या बाजूने जर्मन सैन्याचा लोंढा पुढे येईल याची यत्किंचितही कल्पना नसलेले ब्रिटिशांचे आणि फ्रान्सचे सैन्य काहीसे बेसावध होते. शिवाय संख्येनेही ते कमी होते. त्यामुळे तिथे झालेल्या धुमश्चक्रीत दोस्त राष्ट्रांच्या फळीत सेडान येथे मोठे खिंडार पडले आणि मोहोळातून माश्या सुटाव्यात त्याप्रमाणे जर्मन चिलखती सैन्य फ्रान्सचा प्रदेश जिंकत इंग्लिश खाडीच्या दिशेने झेपावत होते. हिटलरचे आक्रमक सेनानी गुडेरिन, जनरल कुचलेर आणि जनरल मॅनस्टीन यांनी तीनही बाजूंनी ब्रिटिश आणि फ्रेंच फौजांना कोंडीत पकडले.. आता सुटकेचा एकच मार्ग उरला होता तो म्हणजे फ्रांसच्या इंग्लिश खाडीवरचा अंदाजे दहा मैल लांबीचा ‘डंकर्क’चा सागरी किनारा...

    
नुकतेच पंतप्रधानपदाची जबाबदारी अंगावर पडलेले सहासष्ट वर्षाचे युध्दधुरंधर ‘विस्टन चर्चिल’ डंकर्क मध्ये ओढवलेल्या संकटाने चक्रावले. चाणाक्ष चर्चिल यांच्या लक्षात आले की आता ब्रिटिश सैन्याने माघार घेतली नाही तर आपले कंबरडेच मोडेल. पुढे भविष्यात जर विजय मिळवायचा असेल तर आता डंकर्क मधून माघार घ्यावीच लागेल. त्यांनी तातडीने आपल्या सैन्याच्या माघारीची योजना आखली. 'ऑपरेशन डायनॅमो' असे ब्रिटिश आणि फ्रेंच फौजांना डंकर्क मधून बाहेर काढण्याच्या योजनेचे परवलीचे नामकरण करण्यात आले. तातडीने ८५० ब्रिटिश जहाजांचा ताफा या योजने अंतर्गत तैनात करण्यात आला, आणि डंकर्क च्या बंदरातुन ब्रिटिशांची आरमारी दले झपाट्याने जहाजे भरभरून ब्रिटिश आणि फ्रेंच सैनिकांना बाहेर काढू लागली. २७ ते ३० मे या चार दिवसात जवळजवळ दीड लाख ब्रिटिश सैन्य डंकर्क मधून निसटले आणि इंग्लिश खाडीतून इंग्लंड च्या किनाऱ्यावर सुखरूप पोहोचले. पण ३० मे ला या 'ऑपरेशन डायनॅमो' चा सुगावा जर्मनांना लागला.

    
मग जर्मनीच्या लुफ्तवाफ या वायुदलाच्या लढाऊ विमानांनी डंकर्कच्या समुद्रातून माघार घेणाऱ्या सैन्याच्या जहाजांवर आकाशातून हल्ले करायला सुरवात केली. ब्रिटिश आरमाराच्या ८५० पैकी २४३ जहाजे जर्मनांनी बुडवली. यात असंख्य ब्रिटिश सैनिकांना वीरमरण आले. लुफ्तवाफचा सामना करण्यासाठी ब्रिटिश विमाने देखील आकाशात झेपावली. १ जून १९४९ या दिवशी डंकर्कच्या आकाशात मोठे रणकंदन झाले. जवळ जवळ ३० विमाने ब्रिटिशांची तर तेव्हडीच विमाने जर्मनांनी गमावली. आकाशातील या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर खालून समुद्रातून अक्षरशः जीव मुठीत धरून ब्रिटिश सैन्य पळ काढत होते. आता प्रत्यक्ष डंकर्कच्या भूमीवर युद्ध सुरु झाले होते. जर्मन सेना सर्व बाजूंनी पुढे सरकल्या होत्या. इकडे डंकर्कच्या किनाऱ्यावरून ब्रिटीश सैन्याचे पलायन सुरूच होते.


'ऑपरेशन डायनॅमो' या ब्रिटीश सरकारच्या योजनेतील ब्रिटीश आरमाराची कामगिरी फार महत्वाची होती, पण त्याबरोबर छोट्या छोट्या ब्रिटीश मच्छिमार नौकांचे योगदान खुप मोठे होते. लाखो सैनिकांना डंकर्क मधुन परत आणण्यासाठी स्थानिक मच्छिमारांना एकत्र करणे हे काही सोपे काम नव्हते. पण तात्कालीन ब्रिटीश पंतप्रधान विस्टन चर्चिल यांनी हे आव्हान स्वीकारले. आपल्या देशाच्या सैनिकांना सोडवण्यासाठी शेकडो सर्वसामान्य देशप्रेमी मच्छिमारांनी आपल्या होड्या, गलबतं बेधडक सागरात लोटल्या. जर्मन विमानांचे आकाशातुन होणारे हल्ले चुकवत चुकवत या सामान्य मच्छिमारांनी लाखो सैनिकांना आपल्या देशाच्या किनाऱ्यावर सुखरूप आणुन सोडले. ‘माघार घेणाऱ्या ब्रिटिश सैन्याला नेस्तनाबुत करा’ असा हिटलरचा आदेश येईपर्यंत चार दिवसात तीन लाखाहुन अधिक ब्रिटिश सैनिक आपापल्या घरी पोहोचले होते.


४ मे पर्यंत तब्बल साडेतीन लाख सैनिक ब्रिटीश आरमाराने बाहेर काढले खरे, पण त्यांचे रणगाडे, दारुगोळा, शस्त्रास्त्रे जर्मनांच्या हातात पडली होती. पण काहीका असेना पुढील युद्धासाठी आवश्यक असलेले साडेतीन लाख सैनिकांचे मनुष्यबळ वाचवण्यात इंग्लडचे विस्टन चर्चिल यशस्वी झाले होते. ह्या डंकर्कच्या यशस्वी माघारीचे रूपांतर पुढे ब्रिटिशांच्या विजयश्रीत झाले.

‘ऑपरेशन डायनॅमो’च्या याच रणधुमाळीवर आधारीत जुलै २०१७ मध्ये ‘क्रिस्तोफर नोलान’ या दिग्दर्शकाने 'डंकर्क' नावाचा अफाट युध्दपट पडद्यावर आणला. नोलानचे इन्सेप्शन, इंटरस्टोलर, बॅटमन, दि डार्क नाईट, मॅन ऑफ दि स्टील असे एकसे एक सुपरहीट चित्रपट पूर्वीच पडद्यावर धुमाकुळ घालुन गेलेत. पण त्याचा 'डंकर्क' हा अफलातुन युद्धपट आपल्याला प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव देतो. हा चित्रपट अवघ्या ११० मिनिटांचा... पण युद्धचा थरार देऊन जाणारा.
.


तसं पाहीलं तर या चित्रपटाला कथा अशी नाही. डंकर्क मधे इतिहासात घडलेल्या काही घटनांची ही साखळी आहे. ब्रिटीश सैनिकांनी युद्धाच्या दरम्यान पराभवाच्या छायेत जिवंत राहण्यासाठी जीव तोडुन केलेल्या प्रयत्नांचे यात थरारक चित्रण आहे. पाठीमागुन जर्मन सैन्याचा रेटा, आकाशातुन लुफ्तवाफ या जर्मन वायुदलाच्या विमानांमधुन होणारा बॉंम्ब वर्षाव आणि समोर इंग्लिश खाडीचा आक्राळ विक्राळ समुद्र अशा कोंडीत सापडलेल्या ब्रिटीश सैन्याची झालेली फरपट हीच या चित्रपटाची कथा म्हणता येईल. संवादाचा कमीत कमी वापर हे या चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यामुळेच की काय 'डंकर्क' अधिक प्रभावशाली झालेला आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान घडलेल्या ‘ऑपरेशन डायनॅमो’ ची माहीती आधी समजाउन घेऊन चित्रपट पाहीला तर चित्रपटाचा आनंद अधिक लुटता येइल. क्रिस्तोफर नोलाननं हा चित्रपट ऐतिहासिक घटनांचा वेध घेताना, तो  अतिशय कलात्मक पद्धतीने पेश केला आहे.


या ऑपरेशन डायनॅमो मुळे जे साडेतीन लाख ब्रिटीश सैनिक डंकर्क किनाऱ्यावरून यशश्री माघार घेऊन परत आले ते जनमानसात हिरो झाले. पण जवळ जवळ ४० हजार ब्रिटीश आणि तेव्हडेच फ्रेंच सैनिक जर्मनांच्या तावडीत सापडले. जर्मन सैन्याने या युद्ध कैद्यांचे अतोनात हाल केले. तथापी डंकर्कच्या कचाट्यातुन सोडवलेल्या आपल्या सैन्याच्या जोरावर हिटलर विरुद्धचे अंतिम युद्ध चर्चिल ने अखेर जिंकलेच…

राजीव जतकर.   
         
* 'डंकर्क' हा थरारक चित्रपट ऍमेझॉन प्राईम व्हिडीओ वर उपलब्ध आहे. नक्की बघा.

Saturday, 13 October 2018

कारवाँ : आयुष्यातील हलक्या फुलक्या क्षणांवर प्रेम करणाऱ्यांसाठी


कारवाँ : आयुष्यातील हलक्या फुलक्या क्षणांवर प्रेम करणाऱ्यांसाठी


वडील आणि मुलाचं नातं थोडंसं गुंतागुंतीचं किंवा कॉम्प्लेक्स असतं. लहानपणी नाईलाजानेच वडिलांच्या आज्ञेत असलेला मुलगा मोठा झाल्यावर मात्र बंड करून उठतो. वडिलांचे विचार त्याला जुने वाटू लागतात. इकडे वडिलांना देखील मुलाचे विचार पटत नाहीत. आयुष्यातील खाचखळग्यांना कष्टाने पार करत आलेल्या वडिलांना मुलाने आपण सांगितलेल्या वाटेने जावे असे वाटत असते. मुलाला मात्र त्याच्या आवडीच्या मार्गाने जायचे असते. खरे तर दोघांच्याही भूमिका  आपआपल्या ठिकाणी योग्यच असतात, पण संवादाच्या अभावामुळे दोघात अंतर पडत जातं.  दोघेही एकमेकांशी अगदी तुटकपणे वागू लागतात. कधी कधी आयुष्याच्या अगदी शेवटपर्यंत...

वडिलांशी असंच काहीसं गुंतागुंतीचं नातं असलेल्या अविनाशला (दूलकर सलमान) फोटोग्राफीत करियर करायचं असतं. पण वडिलांच्या हट्टाखातर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग चे शिक्षण घेऊन बेंगलोर मधील एका आय. टी. कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्या अविनाशला आयुष्य म्हणजे एक सजा वाटत असते. आपली स्वप्नं वडिलांनी उध्वस्त केली याचा राग मनात ठेऊन त्याने आपल्या वडिलांशी नातं पूर्णपणे तोडलेलं असतं. आवडणाऱ्या विषयातील रुक्ष नोकरी करताना कंटाळलेल्या आणि आतल्या आत कुढणाऱ्या अविनाशला एके दिवशी गंगोत्रीच्या यात्रेला गेलेल्या आपल्या वडिलांचे प्रवासादरम्यान अपघाती निधन झाल्याचा फोन येतो. वडिलांचा मृतदेह असलेली शवपेटी (कॉफीन) अविनाश ने कुरियर कंपनीतून घेऊन जावी असेही त्याला कळवण्यात येते. वडिलांच्या प्रति फारशी आत्मियता नसलेल्या अविनाशला या बातमी मुळे फारसा धक्का वगैरे काही बसत नाही. नाईलाजाने आणि कर्तव्य भावनेने अविनाश वडिलांच्या मृतदेहाला कुरियर कंपनीतून ताब्यात घेतो.


वडिलांच्या प्रति मुळीच प्रेम वाटत नसलेला अविनाश वडिलांचा मृतदेह ताब्यात घेतो खरा पण कॉफीन उघडताच आपल्या  जिवलग मित्राच्या शौकत च्या (इरफान खान) च्या मदतीने दहनासाठी स्मशानभूमीत घेऊन जातो. स्मशानभूमीत त्याच्या लक्षात येते की शवपेटीत चुकून एका भलत्याच स्त्री चा मृतदेह आलेला असतो. कुरियर कंपनीत चौकशी केल्यावर त्याला कळते की प्रेतांची अदलाबदल झालेली असते. कुरियर कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे अविनाशच्या वडिलांचा मृतदेह भलतीकडेच म्हणजे कोची मध्ये पाठवला गेलेला असतो. चुकून अदलाबदली झालेल्या स्त्रीचा मृतदेह कोची मधील तिच्या कुटुंबीयांकडे पोहोचता करून त्यांच्याकडील आपल्या वडिलांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी अविनाश आणि शौकत कोचीच्या प्रवासाला निघतो.

बेंगलोर ते कोची हा प्रवास शौकतच्या व्हॅन मधून सुरु होतो. प्रवासात अनेक गमती जमती घडतात. शौकत च्या व्हॅन वर लिहिलेले असते 'मै अकेलेही चला था जानिब--मंजिल मगर, लॉग जुडते गये और कारवाँ बनत गया' आणि घडते ही असेच. योगायोगाने अविनाशच्या बरोबर असलेली मृत स्त्रीची नात तान्या (मिथिला पालकर) या काराव्यात सामील होते. या प्रवासात तीन भिन्न स्वभावाच्या व्यक्तिरेखांना नशीब एकत्र आणतं. या प्रवासाच्या प्रत्येक वळणावर येणारे अनुभव या तिघांना शहाणपण शिकवून जातात. या प्रवासात घडणाऱ्या गमती प्रत्यक्ष चित्रपट पाहूनच अनुभव्या अशा आहेत.


या हलक्याफुलक्या, काहीशी विनोदी झालर असलेलया चित्रपटात लक्षात राहतो तो शौकत म्हणजे अर्थातच इरफान खान, आणि त्याचा सहजसुंदर अभिनय. हा शौकत स्वच्छंदी जगणारा, प्रत्येक गोष्टीकडे प्रॅक्टिकली बघणारा असा आहे. हा चित्रपट म्हणजे 'सबकुछ इरफान खान' असेच म्हणावे लागेल. इरफान खान ने साकारलेले शौकत चे पात्र या चित्रपटाचा केंद्रबिंदू ठरते. काहीसा स्पष्टवक्ता, पण प्रेमळ, सज्जन अशा आपल्या व्यक्तिरेखेचे पैलू इरफान ने विनोदी, मिस्कील पद्धतीने सादर केले आहेत. मल्याळम चित्रपट सृष्टीमधील सुपरहिट कलाकार 'दूलकर सलमान' याने या चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण केलय, ते ही यशस्वीपणे ! तान्या च्या भूमिकेतली मिथिला पालकर तिच्या अल्लड भूमिकेमुळे आणि सुंदर दिसण्यामुळे लक्षात राहते

  सुरवातीला हा चित्रपट थोडा संथ वाटतो खरा, पण जशी कथा पुढे सरकत जाते तशी ही पात्रे आपलीशी वाटू लागतात. या कथेत काही अशक्यप्राय वास्तवाशी संबंध नसलेली वळणे येतात, पण दिग्दर्शक 'आकर्ष खुराना' यांनी केलेल्या चित्रपटाच्या आकर्षक आणि सहजसुंदर मांडणी मुळे चित्रपटातील त्रुटींकडे फारसे लक्ष जात नाही. या प्रवासात तीनही व्यक्तिरेखा 'स्व' त्वाच्या शोधात स्वतः मध्ये हरवून गेलेल्या असतात. आपणही आपल्या आयुष्याच्या प्रवासात स्वतः ला शोधण्याचा प्रयत्न करत असतो नाही का?

राजीव जतकर.

टीप: हा चित्रपट ऍमेझॉन प्राईम व्हिडीओ वर उपलब्ध आहे.