एक मस्त सकाळ…
आज पाहटे पाच वाजताच जाग आली. तसा माझा पहाटे साडेपाच चा गजर असतोच. पण आज लवकर जाग आली. अंथरुणातून उठताना जाणवले की आज कंबर, पाठ दुखत नाहीये. मस्त वाटले. ब्रश करून प्रातर्विधी उरकून नेहेमीप्रमाणे चहा टाकला. ताज्या दुधाची पिशवी उघडल्यामुळे चहाही भारी झाला होता. गरम गरम वाफाळलेल्या चहाचे घुटके घेत घेत टेरेस वर गेलो. कालच टेरेस स्वच्छ केलेली असल्याने छान वाटले. स्वच्छ , ताज्या मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घेतला. थंड हवेने छाती भरून घेतली. लक्षात आले कि आज आपल्या गच्चीतील बागेत मस्त फुले फुलली आहेत. आजची सकाळ खरच मस्त होती…
माझ्याबरोबर फिरायला येणारा माझा मित्र शिरीष आजून आला नव्हता, त्याला फोन केला तेव्हा कळले कि तो आज येणार नाही. आज अशा परिस्थितीत येणारे विचार म्हणजे "आज फिरायला जावे का नको ?" मनात आले नाहीत. आज काय झाले होते ते माहिती नाही, पण एक प्रकारचा उत्साह अंगात संचारला होता. मग एकटाच फिरायला बाहेर पडलो. आमच्या सोसायटीच्या गेट मधेच एक तक्रारखोर सभासद नेहेमी प्रमाणे काहीतरी तक्रार करू लागले. त्यांच्या तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्या. गंमत म्हणजे त्यांचा मला वैताग आला नाही. त्यांच्या तक्रारीचे निवारण लवकरच होईल असे त्यांना आश्वासन देऊन मी पुढे निघालो. खूप प्रसन्न वाटत होते. आजची सकाळ काहीतरी विशेष होती…
कोपऱ्यावर पोहोचताना दादांचे एक मित्र कुलकर्णी आजोबा गाठ पडले. एकटेच बिचारे हळू हळू चालले होते. त्यांच्याशी आवर्जून बोललो. त्यांच्याबरोबर गप्पा झाल्यामुळे त्यांना आनंद झाला असावा. मला ते म्हणाले " छान वाटले तुमच्याशी गप्पा मारून. आम्हा म्हाताऱ्या आजोबांबरोबर कुणाला वेळ नसतो." पण खरे तर मलाच त्यांच्याशी बोलून छान वाटले. खरच आजची सकाळ खूप मस्त होती…
मयुर कॉलनीत वळलो. आज उत्साही वाटत असल्याने विचार केले कि आज थोडे भरभर चालावे. छाती पुढे काढून खांदे मागे घेतले आणि हात जोरात हलवत वेगाने चालू लागलो. अशा विशिष्ठ प्रकारे चालल्यामुळे असेल पण त्यामुळे पाठीला एक वेगळा आराम वाटत होता. चालण्याचा एक वेगळाच आनंद वाटत होता. आजूबाजूला पाहत होतो. बरीच नेहेमीची मंडळी फिरताना दिसत होती. अचानक एके ठिकाणी सत्तरीतले एक जोडपे एक दिसले. त्यातील गृहस्थ चक्क महावितरणच्या एका फिडर पिलर चा उघडा दरवाजा लावताना दिसले. मला गंमत वाटली, त्याहीपेक्षा आश्चर्य वाटले. मी थोडी वाकडी वाट करून त्यांच्या कडे गेलो. त्यांची कुतूहलाने आवर्जून चौकशी केली. ते दोघेही जवळ जवळ पंधरा ते वीस मिनिटे 'सार्वजनिक सुरक्षितता, सार्वजनिक स्वच्छता या विषयावर पोटतिडीकीने बोलत होते. मी त्यांच्या सजगता आणि संवेदनशिलतेचे मनापासून कौतुक केले. 'समाजात अजूनही अशाप्रकारची माणसे आहेत' ह्या विचाराने एक प्रकारचा आशावाद मनात साठवून मी पुढे निघालो. आजची सकाळ खरोखर काहीशी वेगळीच होती.…
मयुर कॉलनीतल्या रस्त्यावरून कोथरूडच्या बागेत शिरलो. साधारण पाचशे मीटर लांबीच्या फिरण्यासाठी केलेल्या रस्त्यावरून (ट्रॅक) आज जास्तीजास्त चकरा भरभर मारायच्या असे ठरवून मी वेगाने चालू लागलो. आज कुठलेही नकारात्मक किंवा व्यावसाईक विचार मनात येत नव्हते. नेहेमीचे व्यावसाईक अडचणींचे विचार जणू नष्टच झाले होते. रोजच्या प्रमाणे बागेतील दत्ताच्या देवळाकडे लक्ष गेले. तिथे एक गृहस्थ खूप मोठ्या आवाजात हातवारे करीत कोणते तरी दत्ताचे स्तोत्र म्हणत होता. मला त्याची खूप गम्मत वाटली. मनात आले कि असे मोठ्याने स्तोत्र म्हणाल्याने नेमके काय मिळत असेल ? कदाचित अधिक पुण्य ? वास्तविक देव, धर्म, धार्मिक भावना ह्या सर्व गोष्टी पूर्णपणे खाजगी किंवा व्यक्तिगत असतात किंवा असाव्यात. प्रार्थना किंवा स्तोत्र म्हणताना ते इतरांना कशाला कळायला हवे ? क्षणभर मला त्याचे वागणे विचित्रच वाटले. पण मग मी माझे असले विचार क्षणार्धात झटकून टाकले व मनातल्या मनात म्हणालो ' त्या गृहस्थाला त्यामुळे आनंद
होत असेल तर माझी त्याला का हरकत असावी ?' मला माझीही गंमत वाटली. आज मी चक्क छान विचार करतोय कि… वा ! आजची सकाळ काही न्यारीच होती…
बागेतून
फिरताना तशी नेहेमीचीच माणसे दिसत होती. बहुतांशी तरुण मंडळी आपली जाडी कमी करण्यासाठीच फिरत असावीत. वयस्क व्यक्ती बहुदा गुढगेदुखी, किंवा मधुमेह वगैरे कारणांसाठी फिरत असणार. प्रत्येकाकडे पाहताना मला आज एक चाळाच लागला होता. 'का बरे व्यायाम करत असेल हा ?' बागेच्या मध्यभागातील हिरवळीवर हास्यक्लब मधील मंडळी मोठ्यामोठ्याने आणि हातवारे करीत हसत होती. मनात विचार आला कि 'खरच आपणही कितीतरी दिवसात असे मोकळेपणाने हसलो आहोत का? कधीतरी का होईना खूप हसायला हवे.' विचार करत करत मी चालताना ट्रॅक वरून चालणाऱ्या इतर माणसांना न्याहाळत होतो. जाड स्त्री, पुरुष आपआपल्या ढेऱ्या सांभाळत, घाम पुसत भराभरा चालायचा प्रयत्न करताना बघून हसू येत होते.( मनात आले मी खरच नशीबवान आहे, कारण माझी जाडी कधीच वाढत नाही.) काही व्यक्ती बाजूच्या बाकावर बसून प्राणायाम करीत होत्या. काही मंडळी गप्पाटप्पा करून उगीचच वेळ काढत होती. एक तरुण सुंदरी कानात इयर फोन घालून चालता चालता फोनवर कुणाशीतरी बोलत वेळ सत्कारणी लावत होती. ( तिच्या हावभावावरून ती नक्कीच तिच्या प्रियकराशी बोलत असणार… हा आपला माझा अंदाज.) पण व्यायाम करीत होती हे महत्वाचे !
तेव्हड्यात जवळ जवळ पंचाऐंशी वयाचे एक वृद्ध आजोबा अक्षरशः मुंगीच्या पावलांनी चालत येताना दिसले. खरे तर त्यांना चालताच येत नाही, पण खूप प्रयत्नपूर्वक चालून ते नेहेमी व्यायाम करतात. इतक्या वृद्धावस्थेत त्यांचा चालण्याचा मनोनिग्रह मला नेहेमीच अचंबित करतो. तसे ते मला नेहेमी दिसतात. पण आज मी त्यांच्याकडे बघून न कळत हसलो. त्यानाही बरे वाटले असावे. त्यांनीही छानसे हसून मला प्रतिसाद दिला. खरच आजची सकाळ भारी होती.…
ट्रॅक वरून पुढे जाताना पोहोण्याच्या तलावाजवळून जाताना पाण्याचा विशिष्ठ वास जाणवला. मधून मधून पोहायला जायला हवे, असे मनात आले. आतापर्यंत चक्क आठ ते दहा चकरा मारून झाल्या होत्या, म्हणजे अंदाजे पाच किलोमीटर चालणे झाले, ते हि भराभर… मस्त घाम आला होता. त्यामुळे सकाळची हवा आणखीनच थंड आणि आल्हाददायक वाटत होती. बागेतून बाहेर पडता पडता मोगऱ्याची फुले विकायला बसलेल्या म्हाताऱ्या आजी बाईंच्या कडे लक्ष गेले. त्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना फुले घेण्याचा आग्रह करीत होत्या. तसे मी त्यांना रोजच बघतो. पण आज काय वाटले कुणास ठाऊक, त्यांच्याकडून मी ओंजळ भर फुले घेतली. बहुतेक मी त्यांचा आजच पहिला ग्राहक असणार कारण, मी दिलेल्या पैशांना आजीबाई नी नमस्कार केला आणि पैसे कमरेच्या कुंची मध्ये ठेवले. पैसे कनवटीला बांधताना 'झाली बाई एकदाची भोवनी' असेच काहीसे त्या पुटपुटल्या. मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध मी छातीत भरून मी घराकडे निघालो. आजची सकाळ खरोखर भन्नाट होती…
कधी नव्हे ते मी मोगऱ्याची फुले आणलेली पाहून बायको माझ्याकडे (कधी नव्हे ते) बघून छानसे हसली व पुन्हा सकाळच्या कामाच्या रगाड्यात गुंतून गेली. मी दुसरा चहा घेत घेत वर्तमानपत्रे चाळली. रेडीओ वर भैरव रागावर आधारित कुठले तरी भजन लागलेले होते. मस्त वातावरण तयार झाले होते. तेव्हड्यात माझा मोबाइल कर्कश्यपणे वाजला. माझ्या ऑफिस मधील माझी सहायक मुलगी 'आजारी असल्याने येणार नाही' असे सांगत होती. लागोपाठ दुसऱ्यांदा पुन्हा फोन केकाटला. साईट वर काहीतरी प्रोब्लेम झाला होता. मी खाडकन वास्तवात आलो. ताबडतोप निघायला हवे होते.
पण काहीही म्हणा आजची सकाळ मस्तच होती…
राजीव जतकर
मोबाईल : ९८२२० ३३९७४.
इमेल :
electroline4929@gmail.com
No comments:
Post a Comment