Thursday, 23 March 2017

थरकाप करणारा इतिहास - पॉम्पे (पोम्पाई)

थरकाप करणारा इतिहास - पॉम्पे (पोम्पाई)



दि. ६ : दक्षिण इटलीमधील नेपल्स (स्थानिक नाव नापोली) पासून ४० मिनिटात रेल्वेने पोम्पेइ या २००० वर्षापूर्वीच्या आणि अचानक २५० वर्षापूर्वी शोध लागलेल्या शहरामध्ये आम्ही आज गेलो. पोम्पाई उर्फ पॉम्पे ला जाण्यासाठी आम्ही नेपल्स च्या रेल्वे स्टेशनवर आलो. पॉम्पे चे तिकीट काढून आम्ही प्रवासास सुरवात केली. प्रवासात सुरवातीपासून व्हेसुव्हियस हा ज्वालामुखी पर्वत सतत दिसत होता. हाच तो भयंकर, प्रलयंकारी भयानक पर्वत ज्याने पॉम्पे आणि व्हर्क्युलियम या शहरांमध्ये २००० वर्षांपूर्वी मृत्यूचे तांडव मांडले होते. काहीश्या गूढ दिसणाऱ्या या दैत्याकडे बघत बघत आम्ही प्रवास करत होतो. तेव्हढ्यात दोन तरुण मधल्या एका स्टेशन वर आमच्या डब्यात चढले. त्यापैकी एकाच्या हातात अकॉर्डियन आणि दुसऱ्याच्या हातात आपल्याकडील डफा सारखे दिसणारे तालवाद्य होते. दोघेही अतिशय सुंदरतेने व सहजतेने वाद्ये वाजवून प्रवाशांची करमणूक करीत होते. काही प्रवासी खुश होऊन त्यांना पैसे देत होते. आमचाही वेळ चान जात होता. कुठल्याशा मधल्याच स्टेशन वर हे दोघे गाडीतून उतरले. साधारणपणे दीड तासाने आम्ही पॉम्पे स्टेशनवर उतरलो.

पॉम्पे स्टेशन वर समोरच एक मोठा लांबलचक रस्ता होता. त्याच्या दोन्ही बाजूना स्मरणवस्तू , चित्रे, फोटो, पुतळे, कपडे, भेटकार्डे, वगै. वस्तूंनी गच्च भरलेली दुकाने होती.  मोठ्या मोठ्या पिवळ्याधमक लिंबाच्या (इड्लींबू ) रसाची, सरबताची दुकाने लक्ष वेधून घेत होती. काही ठिकाणी संत्र्याच्या रसाची दुकानेही होती. जाळीदार पिशव्यातून फळे टांगून ठेवली होती. उन्हाच तडाखा होताच ! पर्यटकांची या दुकानामध्ये झुंबड उडाली होती. आम्हीही लिंबाचा रस घेऊन पॉम्पे च्या वेशी कडे उत्सुकतेने वळलो.
पॉम्पे च्या वेशी वर आम्ही उभे होतो. माझ्या मनात विचारांचे काहूर माजले होते. पलीकडच्या बाजूला वरून टवका उडालेला व्हेसुव्हियस पर्वत दिसत होता. पॉम्पे बघण्या साठी मी अधीर झालो होतो. पॉम्पे मध्ये जाण्यासाठी १० युरो तिकीट होते. आम्ही एका मोठ्या रांगेत उभे राहिलो. रांगेत उभे असताना एक मध्यमवयीन स्पानिश बाई माझ्याशी काहीतरी बोलायला लागल्या. मी इंग्रजीतून त्यांना सांगितले कि मला स्पानिश येत नाही, तुम्ही इंग्रजीत बोला.  दुर्दैवाने त्यांना इंग्रजी येत नव्हते. माझ्या मागे रांगेत उभ्या असलेल्या हर्षवर्धनच्या हा गोंधळ लक्षात आला. त्याला स्पानिश भाषा उत्तम येत असल्याने त्याने पुढे होवून प्रश्न सोडवला. थोडा वेळ मला टेन्शन आले होते. हा उडालेला गोंधळ म्हणजे एक मजेशीर अनुभव होता. रांगेतून पॉम्पे च्या वेशीच्या आतील शहराचे भग्नावशेष थोडे थोडे दिसत होते.  इथे पूरातत्व खात्याने गाईड ची चांगली व्यवस्था केलेली होती. इथे हा ‘फोन गाईड’ नावाचा एक छान प्रकार होता. एक हेड फोन कानाला लावायचा व हातातल्या रिमोट कंट्रोल वरील दाबायचे कि आगदी तुमच्या कानात ह्यातील गाईड पार्श्व संगीतासह सर्व माहिती सांगायचा.  आपण ज्या ठिकाणी जाऊ तेथील दर्शनी भागावर एक नंबर दिसायचा, रिमोट कंट्रोल वर हा नंबर दाबला कि त्या स्थळाची माहिती सुरु… आम्ही काही पैसे भरून 'फोन गाईड' घेतला.

हेडफोन मधील गाईड चे शब्द आणि त्या मागे ऐकू येणाऱ्या भूकंपाच्या गडागडाच्या पार्श्व संगीताचा आवाज माझ्या कानात तप्त लाव्हारसाप्रमाणे शिरू लागला. माझ्या हेडफोन मधील गाईड त्याच्या धीरगंभीर आवाजात मला सांगत होता.…    
'पॉम्पे' चा पूर्व इतिहास खूपच प्राचीन आहे. इसवी सनापूर्वी जवळ जवळ आठ शतकं इटलीच्या मूळ रहिवाशांनी पॉम्पे हे शहर वसवलं. या नगराच्या विशिष्ठ भौगोलिक परिस्थितीमुळे एक सुरक्षित बंदर आणि व्यापारी केंद्र म्हणून त्याची भरभराट झाली. संपत्तीच्या लालसेने स्वाभाविकच पॉम्पे वर अनेक आक्रमणे झाली. प्रथम ग्रीकांनी पोम्पे जिंकले. त्यानंतर दोनशे वर्षांनी 'एत्रुस्कन' लोकांनी पॉम्पे वर ताबा मिळवून सत्ता गाजवली. आणखी शतकभरात सॅमनाईट लोक इथे आले. या काळात मात्र पॉम्पे ची सर्वात जास्त भरभराट झाली. इसवी सनापूर्वी तीनशे वर्ष रोमन लोकांनी पॉम्पे जिंकले आणि मग पुढील काळात पुढील तीन चार शतकात इथले रहिवासी हळू हळू रोमन बनून गेले. येथील जमीन अतिशय सुपीक असल्याने शेतीचे उत्पादन चांगले होत असे. समुद्रही जवळ असल्याने शेतमालाचा व्यापारही व्यापार जोरात होत असे. त्यामुळे पॉम्पे हे सधन व समृद्ध लोकाचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले होते.  

व्हेसुव्हियस पर्वताच्या छायेत असलेल्या व सर्वात जवळ असलेल्या शहरातील म्हणजे पॉम्पे, हर्क्युलीयम व त्या भागातील इतरही खेड्यापाड्यातून राहत असलेल्या लोकांना तसे छोटे मोठे भूकंप नेहेमीच जाणवायचे. येथील लोकांना भूकंपाची सवयच होती. इसवीसन ६२ मध्ये एक मोठा भूकंप इथल्या लोकांनी अनुभवला होता. त्यावेळी पॉम्पे मध्ये प्रचंड पडझड झाली होती. पण तो नुसताच भूकंप होता. त्यामुळे तिथल्या रहिवाश्यांनी पुन्हा घरे, इमारती, बाजारपेठा बांधल्या व पुन्हा जनजीवन सुरु झाले होते. पण त्यानंतर १७ वर्षांनी पुन्हा दुसरी आपत्ती पॉम्पे वर कोसळली. या आपत्तीने मात्र पॉम्पे होत्याचे नव्हते झाले. पॉम्पे बरोबरच जवळच असलेले हर्क्युलियम नावाचे शहरही नष्ट झाले. पॉम्पेवासीयांच्या दृष्टीने व्हेसुव्हियस हा पर्वत एखाद्या पोषणकर्त्या पित्यासमान, धीरगंभीर पणे त्यांच्या पाठीशी उभा होता. कारण या व्हेसुव्हियस वरील पर्वतावरील जमीन अतिशय सुपीक होती. त्यामुळे आगदी वर पर्यंत द्राक्षांची लागवड त्यावर व्हायची. त्या द्राक्षांपासून तयार होणारी व्हेसुव्हिनम नावाची वाइन इथली खासियत होती. या वाइन चा मोठा व्यापार येथून चाले. येथील लोक या पोषणकर्त्या व्हेसुव्हियस पर्वताची पूजा करायचे. पण या पोषणकर्त्या देवासमान पित्यानेच घात केला, तो काळा दिवस होता २४ ऑगस्ट ७९.

२४ ऑगस्ट ७९ साली ( म्हणजे १९७९ नव्हे नुसते ७९ साली, म्हणजे अंदाजे २००० वर्षापूर्वी  ) 'पोम्पेइ ' या शहरामधील नागरिकांचे नित्याचे नेहेमीप्रमाणे व्यवहार चालू होते. आज त्यांचा आयुष्याचा शेवटचा दिवस आहे याची अंधुकशी देखील कल्पना त्यांना नव्हती. व्हेसुव्हियस च्या डोंगरावर या घटनेच्या आधी त्याच्या माथ्यावर उंच टोकदार सुळका होता.  दुपारच्या सुमारास या मोठ्या शहराच्या जवळच असलेल्या 'व्हेसुवियस' या ज्वालामुखी पर्वतातून कसलासा मोठा आवाज येऊ लागला. या निद्रिस्त ज्वालामुखीचा रौद्र उद्रेक झाला. मोठ्या आवाजासह या ज्वालामुखीचे मुख आकाशात उंच भिरकावले गेले. या महाभयंकर उद्रेकामुळे नेपल्स खाडी चा उपसागरी भागही थरथर कापायला लागला. आगीचा जवळजवळ १० कि. मि. उंचीचा स्तंभ आकाशात उडू लागला. सतत १८ तास हे आगीचे तांडव सुरु होते. खडकांचा, राखेचा, धुळीचा एक अतिप्रचंड काळाकुट्टं ढग सबंध आसमंतात पसरला. भर दिवस दुपारी रात्रीसारखा अंधार दाटून आला. मोठ्या प्रमाणावर लाव्हारस व काळी राख आकाशात उंच उडून शेजारीच असलेल्या पॉम्पे या शहरावर पडू लागली. तेथील लोकांना काय होतंय ते कळेनासे झाले. ते जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. पण पळणार कुठे? जणू आभाळच फाटले होते.  आकाशातून आता मोठे मोठे दगडही पडू लागले होते. बघता बघता पॉम्पे शहरावर ५ ते ७ मीटर उंचीचे राखेचे ढीग साठले. अनेक लोक आहे त्या अवस्थेत या ढिगाऱ्याखाली गुदमरून मेले. सर्व होत्याचे नव्हते झाले.



मला असा प्रश्न पडला कि २००० वर्षापूर्वीची इतक्या तपशीलवार अशी हि माहिती आत्ता कशीकाय उपलब्ध असू शकते? माझ्या फोन गाईडला जणू ला ह्या प्रश्नाची अपेक्षाच असावी. फोन गाईड पुढे सांगू लागला…
खाडी पलीकडे नेपल्स शहराच्या जवळील 'मिसेनो' एका गावातील लोक दूरवरून हे भयानक दृश्य पाहत होते. आयुष्यात प्रथमच असली काहीतरी अर्तक्य, अविश्वसनिय घटना ते बघत असावेत. या मिसानो गावात 'प्लिनी' नावाचा एक वयस्क गृहस्थ राहत होता. हा नेपल्स राज्याच्या समुद्री आरमाराचा एक जबाबदार अधिकारी होता. त्याच्या लक्षात आले कि पॉम्पे आणि व्हर्क्युलियम हि शहरे धोक्यात आहेत. तो आपल्या सहकार्यांना बरोबर घेऊन जहाजातून आवश्यक ते मदतीचे समान घेऊन व्हर्क्युलियम आणि पॉम्पे कडे निघाला. परंतु ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे व भूकंपामुळे समुद्रात त्सुनामी सारख्या मोठ्या लाटा निर्माण झाल्या होत्या. विजांचा प्रचंड कडकडाट सुरु होताच. समुद्रात भीषण वादळ आले आणि या वादळात प्लिनी आणि त्याच्या सहकार्यांचा दुर्दैवी अंत झाला. या प्लिनी चा एक १७ वर्षाचा दत्तक मुलगा होता. ज्याला 'धाकटा प्लिनी' असे म्हणत. धाकटा प्लिनी आणि त्याची आई देखील हे निसर्गाचे तांडव विस्फारलेल्या नजरेने बघत होते.  या भयंकर घटनेचे हुबेहूब वर्णन असलेली दोन पत्रे धाकट्या प्लीनीने रोमन इतिहासकार 'टॅसीटस' याला लिहिली. ती आजही उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्याला ह्या घटनेची तपशीलवार माहिती मिळते. हि पत्रे इतिहासातील लेखी व विश्वासार्ह पुरावा मानली जातात.
जवळ जवळ तीन दिवस आणि तीन रात्री निसर्गाचे हे तांडव चालल्यानंतर व्हेस्युव्हियस पर्वत शांत झाला. सगळीकडे स्मशान शांतता पसरली. पॉम्पे आणि हर्क्युलीयम या शहरांसह आजूबाजूचा तीस चाळीस किलोमीटर चा परिसर बेचिराख झाला. कोणताही जिवंत प्राणी अथवा झाडे या प्रदेशात शिल्लक राहिली नाहीत. या सर्व प्रदेशावर जणू मृत्यूने राखेचे आणि लाव्हारसाचे जाड पांघरूणच घातले होते. या प्रदेशावर पुढे अनेक शतके (जवळजवळ सात शतके म्हणजे १७०० वर्ष) मृत्यूची काळझोप टिकली. बाकीच्या प्रदेशात पुन्हा वस्ती झाली, पण हि जागा शापित समजून लोक पॉम्पे पासून लांबच राहिले, आणि नंतर हि घटना काळाच्या ओघात विसरूनही गेली.  

पोम्पेइ च्या या विनाशा नंतर जवळ जवळ १७०० वर्षे पॉम्पे जमिनीत गाडलेल्या अवस्थेत होते. या विभागातल्या काही सुधारणा करण्यासाठी एक बोगदा करण्याचे काम सुरु असताना येथे काही शिलालेख सापडले. पण खाली एखादे संपूर्ण शहरच असेल याची कुणालाच कल्पना नव्हती. १७४८ साली खरे मोठ्या प्रमाणात उत्खादन करताना पॉम्पे हे शहर सापडले. हे खोदकाम करताना खूप काळजीपूर्वक करावे लागते. हे उत्खादानाचे काम अजूनही चालू आहे. म्हणजे २५० ते ३०० वर्षे अव्याहतपणे व काळजीपूर्वक काम करणाऱ्या पुराणवस्तू संशोधन खातातल्या लोकांच्या चिकाटीची आपण केवळ कल्पनाच करू शकतो.

या उत्खादन करणाऱ्या लोकांना राखेच्या ढिगाऱ्या मध्ये काही पोकळ्या आहेत असे जाणवले. मग या पोकळ्या मध्ये लिक्विड प्लास्टर ओतण्यात आले. प्लास्टर वाळल्यावर आजूबाजूची राख काढल्यावर या आकृत्या माणसांच्या आकाराच्या होत्या. त्यात स्त्रिया, लहान मुले सुद्धा होती. एके ठिकाणी लहान मुलाला खेळवताना ची एक स्त्री, धूर व राख जाऊ नये म्हणून दोन्ही हातानी नाक व चेहेरा झाकून घेतलेला माणूस, असे अनेक मानवी आकृत्या इथे मिळाल्या आहेत. या माणसांची बोटे, चेहेरे, एव्हडेच काय पण दात हि स्पष्टपणे दिसतात.


आज माझे बऱ्याच वर्षापासुनचे स्वप्न पूर्ण झाले.  लहानपणापासून मी ह्या पॉम्पे बद्दल ऐकून होतो. माझा वास्तुशिल्पी भाऊ शरद पॉम्पे बद्दल बऱ्याच वेळा सांगायचा. खूप उत्सुकता होती पॉम्पे बघायची. माझ्या वास्तुशिल्पी मुलाने हर्षवर्धन ने आम्हाला आज पॉम्पे सर्व बारीकसारीक माहिती देत दाखवले.


आमच्या दक्षिण इटलीच्या सफरीमध्ये पॉम्पे च्या २००० वर्षापूर्वीच्या इतिहासातून बाहेर पडणे सोपे नव्हते. ज्या दिवशी व्हेसुवियस ज्वालामुखीचा विनाशकारी उद्रेक झाला त्या दिवशी नेमके काय काय घडले असेल, इथे लोकांची पळापळ, स्त्रिया, मुलांचे आक्रोश ऐकू येत असणार. विचार करता करता मन सुन्न होते. २००० वर्षापूर्वी वातावरण कसे असेल? शरीराबरोबर मनही थकले.... रात्री उशिरापर्यंत झोप लागली नाही...



  • या थरारक इतिहासावरील एक अतिशय सुंदर डॉक्युमेंटरी फिल्म (Pompeii: The Last Day (BBC) - YouTube) यु ट्यूब वर उपलब्ध आहे ती वाचकांनी जरूर बघावी म्हणजे त्य वेळी नक्की काय झाले असावे याचा अंदाज येईल.  

Friday, 10 March 2017

अंधश्रद्ध मी ?

अंधश्रद्ध मी ?


       
मागील महिन्यात एक ट्रान्सफॉर्मर चालू करायचा होता.  महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी त्यासाठी गुरुवारचा दिवस ठरवला होता. पण मी मात्र ठामपणे  'शनिवारच ट्रान्सफॉर्मर चालू करावा ' अशी आग्रहाची विनंती तेथील अधिकाऱ्यांना केली. सर्वांनाच आश्चर्य वाटले. 'शनिवार हा नाकर्त्याचा वार असून त्या दिवशी काहीतरी विघ्न येण्याची शक्यता असते ' असे मला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण मी हट्टाने 'शनिवारी' तो ट्रान्सफॉर्मर चालू करून घेतला. माझा हा विक्षिप्त हट्ट पाहून एक अधिकाऱ्याने हि 'शनिवारच ट्रान्सफॉर्मर चालू करण्याची काय भानगड आहे ?' असे उत्सुकतेने विचारले. मी खरे तर काही उत्तर देऊ शकलो नाही. पण मनाशीच विचार सुरु झाले की 'मी असे का वागतो आहे ?'.... ' मला समजत नव्हते की माझे असे का होतंय ?

                 विचार करता करता लक्षात आला तो १५ / २० वर्षांपूर्वीचा माझ्या साईटवरील पहिला ट्रान्सफॉर्मर चालू करतानाचा दिवस ! वरील प्रसंग जसाच्या तसा घडलेला. पुढे सुद्धा बऱ्याच वेळा या घटनांची पुनरावृत्ती झाली. ( योगायोगाने म्हणा अथवा माझ्या हट्टामुळे म्हणा माझ्या व्यावसायिक कारकिर्दीतील बहुतांश ट्रान्सफॉर्मर यंत्रणा ह्या नाकर्त्या वारी च म्हणजे शनिवारीच कार्यान्वीत झाल्या ) विचार सुरूच राहिले.

               आमच्या कुटुंबात, तसेच मित्र परिवारात मी थोडा नास्तिकच ! एकूणच धर्माबद्दल , देवदेवतांच्या संकल्पनेबद्दल , रूढी परंपरांच्याबद्दल माझी मते कुणालाही फारशी पटणारी विक्षिप्त वाटणारी आहेत असे सर्वांचे म्हणणे. हट्टाने टोकाला जाऊन रूढी तोडण्याची मला मनापासून आवड. समाजातील अंधश्रद्धा बघून मी जाम अस्वस्थ होतो. अशाच टोकाला जाऊन रूढी तोडण्याच्या मानसिकतेतून माझ्या वरील नमूद केलेल्या अंधश्रद्धा निर्माण झाल्या असाव्यात. मुळात श्रद्धा कोणती आणि अंधश्रद्धा कोणती हे कसे ओळखायचे? ह्या दोन्हीत नेमका फरक कोणता? मला वाटते. डोळस असते ती श्रद्धा आंधळेपणाने स्वीकारलेली ती अंधश्रद्धा ! जी माणसाला व्यापक बनवते, धर्म, जात ह्या पलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून पहायला शिकवते ती श्रद्धा! या उलट जी माणसाला संकुचित विचार करण्यास प्रवृत्त करते ती अंधश्रद्धा! मनात विचार येतच राहिले...

              श्रद्धेमुळे माणसाला मानसिक आधार नक्कीच मिळतो. प्रत्येकाची कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर श्रद्धा असते. श्रद्धेमुळे आत्मविश्वास वाढून माणूस ठाम पणे यशाकडे वाटचाल करतो. पण श्रद्धेला तर्काची दृष्टी नसली की  त्याची बनते अंधश्रद्धा. माणूस अंधश्रद्ध झाला कि त्याला स्वतःच्या शक्तीचा विसर पडू लागतो तो नैसर्गिक घटनांवर सुद्धा चुकीच्या पद्धतीने विश्वास ठेवू लागतो . मग त्यातूनच

- मांजर आडवी गेल्याने कामे होत नाहीत .
- दृष्ट लागणे किंवा कोणाची तरी वाईट नजर लागणे. (शनिवारी लक्ष्मी रोडवर चक्कर मारा... लिंबू मिरच्यांचा खच पडलेला असतो…)
- रात्री कुत्र्यांचे रडणे अशुभ असते.
- देवाला नवस बोलणे किंवा बोललेला नवस फेडला नाही तर देवाचा कोप ?
- दक्षिणेला घराचा अथवा ऑफिसचा दरवाजा असणे म्हणजे अशुभ. ( माझ्या ऑफिसचा दरवाजा गेली २५ वर्षे दक्षिणेलाच आहे. माझे उत्तम चालले आहे. )
- प्रत्येक गोष्टीचा शुभारंभ करताना उठ सुठ पूजा अर्चा करणे. ( मी माझ्या राहत्या घराची व ऑफिसची वास्तुशांती कधीही केली नाही )  नुकतीच वर्तमान पत्रात वाचलेली एक बातमी... मुठा नदीत पुष्पहार नारळ अर्पण करून, तसेच नदीच्या पात्रात पणत्या सोडून एका राजकीय पक्षाच्या कमिटी तर्फे नदी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली . (म्हणजे नदी स्वच्छतेची शपथ व शुभारंभ नदीचे पाणी घाण करूनच करण्यात आली.  आता बोला... )
- उठसुठ मुहूर्त बघून कामे करणे. वास्तविक सर्व वेळा, वार, दिवस जर देव नामक विश्वकर्त्याने बनवले असतील तर ते शुभ च असणार ना.
        
थोडक्यात आपली करत असलेल्या कामावर दृढनिष्ठा किंवा श्रद्धा असेल तर त्याची सुरवात करण्यासाठी कोणताही दिवस चांगलाच असतो, मग तो तथा कथित नाकर्त्याचा वार शनिवार असला तरीही...
      
विचार करताना असे लक्षात आले की माझी अजून एक विक्षिप्त अंधश्रद्धा आहे कि 'मांजर आडवे गेल्यावर माझी कामे नक्की होतात. हा... हा...  मला समजत नव्हते की माझे असे का होतंय ?

राजीव जतकर.



Saturday, 4 March 2017

एक मस्त सकाळ…

एक मस्त सकाळ


आज पाहटे पाच वाजताच जाग आली. तसा माझा पहाटे साडेपाच चा गजर असतोच. पण आज लवकर जाग आली. अंथरुणातून उठताना जाणवले की आज कंबर, पाठ दुखत नाहीये. मस्त वाटले. ब्रश करून प्रातर्विधी उरकून नेहेमीप्रमाणे चहा टाकला. ताज्या दुधाची पिशवी उघडल्यामुळे चहाही भारी झाला होता. गरम गरम वाफाळलेल्या चहाचे घुटके घेत घेत टेरेस वर गेलो. कालच टेरेस स्वच्छ केलेली असल्याने छान वाटले. स्वच्छ , ताज्या मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घेतला. थंड हवेने  छाती भरून घेतली. लक्षात आले कि आज आपल्या गच्चीतील बागेत मस्त फुले फुलली आहेत. आजची सकाळ खरच मस्त होती
   
माझ्याबरोबर फिरायला येणारा माझा मित्र शिरीष आजून आला नव्हता, त्याला फोन केला तेव्हा कळले कि तो आज येणार नाही. आज अशा परिस्थितीत येणारे विचार म्हणजे "आज फिरायला जावे का नको ?" मनात आले नाहीत. आज काय झाले होते ते माहिती नाही, पण एक प्रकारचा उत्साह अंगात संचारला होता. मग एकटाच फिरायला बाहेर पडलो. आमच्या सोसायटीच्या गेट मधेच एक तक्रारखोर सभासद नेहेमी प्रमाणे काहीतरी तक्रार करू लागले. त्यांच्या तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्या. गंमत म्हणजे त्यांचा मला वैताग आला नाही. त्यांच्या तक्रारीचे निवारण लवकरच होईल असे त्यांना आश्वासन देऊन मी पुढे निघालो. खूप प्रसन्न वाटत होते. आजची सकाळ काहीतरी विशेष होती

कोपऱ्यावर पोहोचताना दादांचे एक मित्र कुलकर्णी आजोबा गाठ पडले. एकटेच बिचारे हळू हळू चालले होते. त्यांच्याशी आवर्जून बोललो. त्यांच्याबरोबर गप्पा झाल्यामुळे त्यांना आनंद झाला असावा. मला ते म्हणाले " छान वाटले तुमच्याशी गप्पा मारून. आम्हा म्हाताऱ्या आजोबांबरोबर कुणाला वेळ नसतो." पण खरे तर मलाच त्यांच्याशी बोलून छान वाटले. खरच आजची सकाळ खूप मस्त होती

 मयुर कॉलनीत वळलो. आज उत्साही वाटत असल्याने विचार केले कि आज थोडे भरभर चालावे. छाती पुढे काढून खांदे मागे घेतले आणि हात जोरात हलवत वेगाने चालू लागलो. अशा विशिष्ठ प्रकारे चालल्यामुळे असेल पण त्यामुळे पाठीला एक वेगळा आराम वाटत होता. चालण्याचा एक वेगळाच आनंद वाटत होता. आजूबाजूला पाहत होतो. बरीच नेहेमीची मंडळी फिरताना दिसत होती. अचानक एके ठिकाणी सत्तरीतले एक जोडपे एक दिसले. त्यातील गृहस्थ चक्क महावितरणच्या एका फिडर पिलर चा उघडा दरवाजा लावताना दिसले. मला गंमत वाटली, त्याहीपेक्षा आश्चर्य वाटले. मी थोडी वाकडी वाट करून त्यांच्या कडे गेलो. त्यांची कुतूहलाने आवर्जून चौकशी केली. ते दोघेही जवळ जवळ पंधरा ते वीस मिनिटे 'सार्वजनिक सुरक्षितता, सार्वजनिक स्वच्छता या विषयावर पोटतिडीकीने बोलत होते. मी त्यांच्या सजगता आणि संवेदनशिलतेचे मनापासून कौतुक केले. 'समाजात अजूनही अशाप्रकारची माणसे आहेत' ह्या विचाराने एक प्रकारचा आशावाद मनात साठवून मी पुढे निघालो. आजची सकाळ खरोखर काहीशी वेगळीच होती.…
  
 मयुर कॉलनीतल्या रस्त्यावरून कोथरूडच्या बागेत शिरलो. साधारण पाचशे मीटर लांबीच्या फिरण्यासाठी केलेल्या रस्त्यावरून (ट्रॅक) आज जास्तीजास्त चकरा   भरभर मारायच्या असे ठरवून मी वेगाने चालू लागलो. आज कुठलेही नकारात्मक किंवा व्यावसाईक विचार मनात येत नव्हते. नेहेमीचे व्यावसाईक अडचणींचे विचार जणू नष्टच झाले होते. रोजच्या प्रमाणे बागेतील दत्ताच्या देवळाकडे लक्ष गेले. तिथे एक गृहस्थ खूप मोठ्या आवाजात हातवारे करीत कोणते तरी दत्ताचे स्तोत्र म्हणत होता. मला त्याची खूप गम्मत वाटली. मनात आले कि असे मोठ्याने स्तोत्र म्हणाल्याने नेमके काय मिळत असेल ? कदाचित अधिक पुण्य ? वास्तविक देव, धर्म, धार्मिक भावना ह्या सर्व गोष्टी पूर्णपणे खाजगी किंवा व्यक्तिगत असतात किंवा असाव्यात. प्रार्थना किंवा स्तोत्र म्हणताना ते इतरांना कशाला कळायला हवेक्षणभर मला त्याचे वागणे विचित्रच वाटले. पण मग मी माझे असले विचार क्षणार्धात झटकून टाकले मनातल्या मनात म्हणालो ' त्या गृहस्थाला त्यामुळे आनंद  होत असेल तर माझी त्याला का हरकत असावी ?'  मला माझीही गंमत वाटली. आज मी चक्क छान विचार करतोय कि वा ! आजची सकाळ काही न्यारीच होती

बागेतून फिरताना तशी नेहेमीचीच माणसे दिसत होती. बहुतांशी तरुण मंडळी आपली जाडी कमी करण्यासाठीच फिरत असावीत. वयस्क व्यक्ती बहुदा गुढगेदुखी, किंवा मधुमेह वगैरे कारणांसाठी फिरत असणार. प्रत्येकाकडे पाहताना मला आज एक चाळाच लागला होता. 'का बरे व्यायाम करत असेल हा ?' बागेच्या मध्यभागातील हिरवळीवर हास्यक्लब मधील मंडळी मोठ्यामोठ्याने आणि हातवारे करीत हसत होती. मनात विचार आला कि 'खरच आपणही कितीतरी दिवसात असे मोकळेपणाने हसलो आहोत का? कधीतरी का होईना खूप हसायला हवे.' विचार करत करत मी चालताना ट्रॅक वरून चालणाऱ्या इतर माणसांना न्याहाळत होतो. जाड स्त्री, पुरुष आपआपल्या ढेऱ्या सांभाळत, घाम पुसत भराभरा चालायचा प्रयत्न करताना बघून हसू येत होते.( मनात आले मी खरच नशीबवान आहे, कारण माझी जाडी कधीच वाढत नाही.) काही व्यक्ती बाजूच्या बाकावर बसून प्राणायाम करीत होत्या. काही मंडळी गप्पाटप्पा करून उगीचच वेळ काढत होती. एक तरुण सुंदरी कानात इयर फोन घालून चालता चालता फोनवर कुणाशीतरी बोलत वेळ सत्कारणी लावत होती. ( तिच्या हावभावावरून ती नक्कीच तिच्या प्रियकराशी बोलत असणार हा आपला माझा अंदाज.) पण व्यायाम करीत होती हे  महत्वाचेतेव्हड्यात जवळ जवळ पंचाऐंशी वयाचे एक वृद्ध आजोबा अक्षरशः मुंगीच्या पावलांनी चालत येताना दिसलेखरे तर त्यांना चालताच येत नाही, पण खूप प्रयत्नपूर्वक चालून ते नेहेमी व्यायाम करतात. इतक्या वृद्धावस्थेत त्यांचा चालण्याचा मनोनिग्रह मला नेहेमीच अचंबित करतो. तसे ते मला नेहेमी दिसतात. पण आज मी त्यांच्याकडे बघून कळत हसलो. त्यानाही बरे वाटले असावे. त्यांनीही छानसे हसून मला प्रतिसाद दिला. खरच आजची सकाळ भारी होती.…
 
ट्रॅक वरून पुढे जाताना पोहोण्याच्या तलावाजवळून जाताना पाण्याचा विशिष्ठ वास जाणवला. मधून मधून पोहायला जायला हवे, असे मनात आले. आतापर्यंत चक्क आठ ते दहा चकरा मारून झाल्या होत्या, म्हणजे अंदाजे पाच किलोमीटर चालणे झाले, ते हि भराभर मस्त घाम आला होता. त्यामुळे सकाळची हवा आणखीनच थंड आणि आल्हाददायक वाटत होती. बागेतून बाहेर पडता पडता मोगऱ्याची फुले विकायला बसलेल्या म्हाताऱ्या आजी बाईंच्या कडे लक्ष गेले. त्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना फुले घेण्याचा आग्रह करीत होत्या. तसे मी त्यांना रोजच बघतो. पण आज काय वाटले कुणास ठाऊक, त्यांच्याकडून मी ओंजळ भर फुले घेतली. बहुतेक मी त्यांचा आजच पहिला ग्राहक असणार कारण, मी दिलेल्या पैशांना आजीबाई नी नमस्कार केला आणि पैसे कमरेच्या कुंची मध्ये ठेवले. पैसे कनवटीला बांधताना 'झाली बाई एकदाची भोवनी' असेच काहीसे त्या पुटपुटल्या. मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध मी छातीत भरून मी घराकडे निघालो. आजची सकाळ खरोखर भन्नाट होती

कधी नव्हे ते मी मोगऱ्याची फुले आणलेली पाहून बायको माझ्याकडे (कधी नव्हे ते) बघून छानसे हसली पुन्हा सकाळच्या कामाच्या रगाड्यात गुंतून गेली. मी दुसरा चहा घेत घेत वर्तमानपत्रे चाळली. रेडीओ वर भैरव रागावर आधारित कुठले तरी भजन लागलेले होते. मस्त वातावरण तयार झाले होते. तेव्हड्यात माझा मोबाइल कर्कश्यपणे वाजला. माझ्या ऑफिस मधील माझी सहायक मुलगी 'आजारी असल्याने येणार नाही' असे सांगत होतीलागोपाठ दुसऱ्यांदा पुन्हा फोन केकाटला. साईट वर काहीतरी प्रोब्लेम झाला होता. मी खाडकन वास्तवात आलो. ताबडतोप निघायला हवे होते.

पण काहीही म्हणा आजची सकाळ मस्तच होती

 राजीव जतकर
मोबाईल : ९८२२० ३३९७४.
इमेल :  electroline4929@gmail.com