Friday, 19 August 2016

आपण आपल्या इमारतीचे 'अर्थिंग' (कधी) तपासले आहे ?

आपण आपल्या इमारतीचे  'अर्थिंग' (कधी) तपासले आहे ?

(प्रसिद्धी : दै. लोकसत्ता १५ एप्रिल २०१७. अग्निसुरक्षा विशेष पुरवणीअंक.)

(प्रसिद्धी: 'महाराष्ट्र टाइम्स'  दि. सोमवार, १४ जानेवारी, २०१९.)

आपण आपली सदनिका / फ्लॅट घेताना अनेक गोष्टी पाहून घेतो. उदाहरणार्थ 'जागा हवेशीर आहे का ?, इमारतीच्या जवळ शाळा,कॉलेज, मंडई जवळ आहे का ? लिफ्ट ची सोय आहे का ?' वगैरे. परंतु दुर्दैवाने आपण त्या इमारतीमधील अतिशय महत्वाची असलेली वीज यंत्रणा योग्य पद्धतीची आहे का नाही याची साधी चौकशी सुद्धा करत नाही. इमारतीमध्ये केलेले वायरिंग योग्य प्रकारचे आहे कि नाही ?, वायरिंग मध्ये सुरक्षेसाठी योग्य उपकरणे (जसे एमसीबी, ईएलसीबी) वापरली आहेत का नाहीत ?, 'अर्थिंग' कशा प्रकारे केले आहे याचीही माहिती आपण घेणे अतिशय आवश्यक असते.

शॉक आणि अर्थिंग :


वीज गळतीस अनेक करणे असतात. जुन्या दीर्घकाळ वापरल्याने वायर्सचे बाह्य आवरण (इन्शुलेशन) खराब होण्याने देखील वीज गळती होते. वीज उपकरणे अयोग्य पद्धतीने वापरल्याने देखील वीज गळती होऊन शॉक बसतो. आजकाल बऱ्याच वीज उपकरणांचे बाह्य आवरण प्लास्टिक चे असते.  त्यामुळे शॉक बसण्याचा धोका नसतो. पण काही उपकरणे धातूची असतात. या धातूच्या उपकरणांमध्ये वीज गळती होते. काही कारणाने वीजप्रवाह गळती (लिकेज) मुळे या उपकरणाच्या धातूच्या बाह्य आवरणामध्ये उतरतो. आणि दुर्दैवाने या वीज गळती असलेल्या उपकरणाशी आपला संपर्क आला कि विजेचा धक्का किंवा शॉक बसतो. वीज उपकरणाचे योग्य प्रकारे अर्थिंग केले असेल तर आपले विजेच्या धक्क्यापासून संरक्षण होऊ शकते. म्हणून औद्योगिक असो किंवा घरगुती उपकरणांना अर्थिंग जोडणे गरजेचे असते. ही अर्थिंग ची जोडणी अतिशय कमी किंवा नगण्य अवरोध (रेझिस्टन्स) असलेल्या तारेने जमिनीशी केलेली असते. जेंव्हा वीजगळती असलेल्या उपकरणाशी एखाद्या व्यक्तीचा संपर्क होतो, तेंव्हा गळती होणाऱ्या विजेच्या प्रवाहाला जमिनीकडे जाण्यासाठी दोन मार्ग उपलब्ध असतात. एक मार्ग म्हणजे ज्या व्यक्तीचा उपकरणाशी संपर्क झाला आहे  त्या व्यक्तीचे शरीर आणि दुसरा मार्ग म्हणजे उपकरणास जोडलेल्या अर्थिंग च्या तारेतून !


    पाणी जसे उताराकडे वाहते, तसे वीज नेहेमी कमी अवरोध (रेझिस्टन्स) असलेल्या माध्यमातून जमिनीकडे जाते. त्यामुळे उपकरणाला जोडलेली अर्थिंगच्या तारेचा किंवा जमिनीतील अर्थिंग चा अवरोध (रेझिस्टन्स) उपकरणाच्या संपर्कात आलेल्या व्यकीतीपेक्षा जास्त असेल (सोप्या भाषेत अर्थिंग चांगले नसेल) तर अर्थातच वीज कमी अवरोध असलेल्या व्यक्तीच्या शरीरातून जमिनीत जाईल. यालाच शॉक बसणे असे म्हणतात. याच्याच उलट अवस्थेत म्हणजे विजेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या शरीराच्या अवरोधापेक्षा अर्थिंग चा अवरोध कमी असेल (म्हणजेच अर्थिंग चांगले असेल) तर गाळणारा वीज प्रवाह (लिकेज करंट) व्यक्तीच्या शरीरातून जाण्या ऐवजी अर्थिंग च्या तारेतून जमिनीकडे जातो आणि व्यक्ती सुरक्षित राहाते.

अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर (. एल. सी. बी.) विद्युत सुरक्षेसाठी वरदान :


. एल. सी. बी. नावाचे एक महत्वाचे सुरक्षा उपकरण वायरिंग मधील सर्किट मध्ये जोडल्याने आपण विजेच्या धक्क्यापासून सुरक्षित राहू शकतो. मानवी जीवनाला अतिशय वरदान ठरलेले हे उपकरण बसवणे कायद्याने देखील अनिवार्य केलेले आहे. विद्युत सर्किट म्हणजे काय हे आपण समजावून घेऊ. वीज फेज वायर मधून निघून काही एक काम करते ( म्हणजे एखादा दिवा लावणे, वीज उपकरण चालवणे वगैरे.) आणि न्यूट्रल वायर मार्फत परत जाते पुढे महावितरण च्या रोहित्रा जवळ केलेल्या अर्थिंग मार्फत जमिनीत जाते, आणि सर्किट पूर्ण होते. सामान्यपणे जेंव्हा सर्किट पूर्ण होते तेंव्हा फेज आणि न्यूट्रल मधून वाहणारा वीजप्रवाह समान असतो. पण जेंव्हा सर्किट मध्ये गळती होते तेंव्हा न्यूट्रल मधून जमिनीकडे जाणारा वीज प्रवाह अर्थिंग 
च्या तारेतून किंवा माणसाच्या शरीरातून वाहायला लागतो. त्यामुळे न्यूट्रल मधील वीजप्रवाह गळतीच्या प्रमाणात कमी होतो. म्हणजेच फेज आणि न्यूट्रल मधील सामान प्रवाहाचे प्रमाण बिघडते. हा फेज आणि न्यूटल मधील वीजप्रवाहात झालेला बदल इ. एल. सी. बी या सुरक्षा उपकरणाला लगेच जाणवतो व हा  इ. एल. सी. बी ताबडतोप म्हणजे एका सेकंदाच्या आत सर्किट बंद करतो व आपण सुरक्षित राहतो.
  
अर्थिंग कसे करावे :


सोबतच्या चित्रात दाखवल्या प्रमाणे साधारण प्रतीच्या जमिनीत किमान दोन मीटर खोल आणि खडकाळ प्रकारच्या जमिनीत सुमारे तीन मीटर खोल असा खड्डा करावा. त्यामध्ये भारतीय मानकानुसार ६० सें. मी. x ६० सें. मी. x  .३५ मी.मी. जाड अशा आकाराची G. I. प्लेट (ज्याला अर्थ इलेक्ट्रोड असे म्हणतात) टाकून तिला २५ x मी.मी. या जाडीची G. I. पट्टी जोडून तिचे टोक जमिनीलगत आणावी. त्यानंतर अर्थ इलेक्ट्रोड घातलेला अर्थिंग चा खड्डा खडे मीठ आणि दगडी कोळसा यांचे थर मातीसोबत टाकून भरून टाकावा. तत्पूर्वी हा खड्डा ओलसर राहावा म्हणून छोटी छिद्रे पडलेला पाईप ठेऊन त्याचे तोंड जमिनीवर काढून ठेवावे. अधून मधून खड्ड्यात पाणी घालण्यासाठी याचा उपयोग होतो. मीठ, कोळसा आजूबाजूच्या जमिनीतून पाणी शोषून घेत असल्यामुळे खड्डा ओलसर राहून अर्थिंग चा अवरोध (रेझिस्टन्स) कमी होण्यात मदत होते. (अर्थिंग अनेक प्रकाराने केले जाते. प्लेट टाईप अर्थिंग, पाईप टाईप अर्थिंग, देखभाल विरहित केमिकल अर्थिंग, ग्रीड टाईप अर्थिंग असे निरनिराळ्या प्रकारचे अर्थिंग निरनिराळ्या वीजयंत्रणांना वापरले जाते.)

अर्थिंग ची तपासणी :

वरील प्रमाणे योग्य पद्धतीने अर्थिंग केल्यास अर्थिंग च्या खड्ड्यातील ओलावा कायम ठेवल्यास अर्थिंग सर्व साधारणपणे ते वर्षे उत्तम राहू शकते. कालांतराने खड्ड्यातील अर्थ इलेक्ट्रोड म्हणजेच G. I. प्लेट खराब होऊ लागते. त्यामुळे अर्थिंग चा अवरोध वाढू लागतो, आणि विजेचे अपघात होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच  आपली इमारतीसाठी महत्वाच्या असलेल्या अशा अर्थिंग ची तपासणी अधूनमधून करून घेणे अनिवार्य ठरते. हि तपासणी आपण अनुज्ञप्ती (लायसेन्स) धारक विद्युत ठेकेदारांमार्फत करू शकतो. अर्थिंग व्हॅल्यू ओहम पेक्षा कमी असणे हे सुरक्षेच्या दृष्टीने आदर्श असते. त्यामुळे तपासणी करणाऱ्या विद्युत ठेकेदाराकडून अर्थींग तपासल्याचा टेस्ट रिपोर्ट घेणे हि आवश्यक आहे. फ्लॅट च्या अंतर्गत सजावटीकडे बारकाईने लक्ष देणारे आपण अर्थिंग सारख्या महत्वाच्या गोष्टीकडे मात्र दुर्लक्ष करतो.
 
विजेच्या धक्क्याचे विपरीत परिणाम :


विजेचा धक्का त्याचे विपरीत परिणाम बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतात. जसे विद्युत दाब, विद्युत प्रवाह, प्रवाह वाहण्याचा कालावधी, बाधित व्यक्तीच्या शरीराची अवस्था, त्याची मानसिकता, शरीराचा अवरोध इत्यादी. वीजप्रवाह मिली अँपियर पेक्षा कमी असेल तर फारश्या संवेदना जाणवत नाहीत.   मिली अँपियर पर्यंत थोडी संवेदना जाणवते. पण ते २० मिली अँपियर पर्यंत वीज प्रवाह शरीरातून वाहिल्यास विजेच्या झटक्याची संवेदना चांगलीच जाणवते. आणि ५० ते २०० मिली अँपियर एव्हड्या प्रवाहामुळे शरीराच्या विशेषतः हृदयाचे स्नायुंचे आकुंचन होऊन प्रसंगी मृत्यू ओढवतो

मानवी जीवनाला विजेपासून अतिशय सुरक्षित ठेवणाऱ्या अर्थिंग कडे नेहेमीच दुर्दैवाने दुर्लक्ष केले जाते. खरे तर याला आपल्या सारख्या वीजग्राहकांबरोबर इमारती बांधणारे बांधकाम व्यावसायिक, त्यात वीज यंत्रणांची उभारणी करणारे विदयुत ठेकेदार, वीजकामगार, आणि वीज यंत्रणांची उभारणी करताना त्यावर लक्ष ठेवणारे किंवा या यंत्रणांना परवानग्या देणारे शासकीय अधिकारी हे सर्वच घटक कमीजास्ती प्रमाणात जबाबदार असतात. त्यामुळेच 'अर्थिंग' बाबत काही मूलभूत या आवश्यक माहिती जागरूकपणे समजून घेऊन आपल्या मानसिकतेत बदल करणे हे या प्रत्येक घटकाने आपले कर्तव्य मानले पाहिजे, तरच भविष्यातील विजेचे अपघात आपल्या टाळता येतील.

राजीव जतकर.
मोबाईल : ९८२२० ३३९७४
electroline4929@gmail.com

                            प्रसिद्धी : दै. लोकसत्ता १५ एप्रिल २०१७. अग्निसुरक्षा विशेष पुरवणीअंक 

प्रसिद्धी: 'महाराष्ट्र टाइम्स'  दि. सोमवार, १४ जानेवारी, २०१९. 


No comments:

Post a Comment