विजेचा धक्का
( शॉक ) आणि प्रथमोपचार.
विजेचा धक्का आणि त्याचे परिणाम :
जेंव्हा काही कारणांमुळे (उदा. वीज उपकरणात होणारी गळती किंवा लिकेज, खराब वायर्स, वीज उपकरणे वापरताना केलेला निष्काळजीपणा) वीजप्रवाह आपल्या शरीरातून वाहून जमिनीत जातो, त्यावेळी आपल्या शरीराला विजेचा धक्का बसतो. थोडक्यात शरीरातून वीज वाहताना शरीरावर जो परिणाम होतो त्याला विजेचा धक्का किंवा शॉक म्हणतात. अशा वेळी शरीरात मोठया प्रमाणात कंपने (थरथर) येतात. शरीरात मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. शरीरातील मज्जातंतूवर या विजेचा खूप परिणाम होतो. विजेचा धक्का बसलेली व्यक्ती खूप घाबरते व किंचाळते. विजेचा संपर्क झालेल्या उपकरणापासून दूर होण्याचा प्रयत्न करते. यात जण यश आले तर धोका काहीसा टाळतो. पण वीजगळती असलेल्या उपकरणापासून दूर होता आले नाही तर ती व्यक्ती उपकरणाला तशीच चिकटलेल्या अवस्थेत राहते. अशा वेळी मात्र धोका कित्येक पटीने वाढतो व प्राणघातक ही ठरतो.
विजेच्या धक्क्याची तीव्रता :
विजेच्या धक्क्याची तीव्रता बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. जसे...
- व्यक्तिपरत्वे शरीराकडून विजेच्या प्रवाहाला होणारा विरोध (रेझिस्टन्स) वेगवेगळा असतो. लहान मुलांच्या तुलनेत मोठ्या व्यक्तींचा बॉडी रेझिस्टन्स अधिक (साधारणपणे १००० ओहम्स) असतो.
-त्वचेच्या ओलसरपणावर ही विजेच्या धक्क्याची तीव्रता अवलंबून असते. कोरड्या त्वचेचा रेझिस्टन्स जास्त तर ओलसर त्वचेचा रेझिस्टन्स कमी असतो. म्हणूनच ओल्या हाताने विद्युत उपकरणे हाताळणे किंवा स्विच चालू बंद करणे टाळावे.
-व्यक्तीचा जमिनीशी संपर्क आल्यामुळे विजेचा धक्का बसतो. पायात रबरी बूट, चप्पल घातलेल्या व्यक्तीचा विजेशी संपर्क आल्यास वीज प्रवाह जमिनीत जाऊ शकत नाही आणि शॉक बसत नाही, पण पाय जमिनीस टेकल्यास विजेचा धक्का बसतो. म्हणून विजेची कामे करताना हातात रबरी हॅन्ड ग्लोव्हज, पायात रबरी बूट घालावेत, किंवा कोरड्या लाकडी पाटावर अथवा स्टुलावर उभे राहून काम करावे.
-शरीरातून वाहणाऱ्या विजेचे प्रमाण आणि संपर्कांचा कालावधी ह्यावरही विजेच्या ढाक्याची तीव्रता अवलंबून असते. साधारणपणे ३० मिली अम्पियर एव्हढा वीजप्रवाह ३० मिलिसेकंद इतक्या कालावधीसाठी शरीरातून वाहिल्यास तो धोकादायक ठरू शकतो. म्हणून अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर ( इ एल सी बी ) यासारखी उपकरणे घरात बसवल्यास शॉक बसण्याचा धोका पूर्णपणे टाळला जातो. कारण हा 'इ.एल.सी.बी.' व्यक्तीला शॉक बसताच ३० मिलिसेकंदात विद्युत प्रवाह खंडित करतो आणि व्यक्ती पूर्ण सुरक्षित राहाते.
प्रथमोपचार :
भारतीय विद्युत नियमाप्रमाणे कारखान्यात किंवा कामाच्या जागी प्रथमोपचार पेटी ठेवणे बंधनकारक आहे. या प्रथमोपचार पेटीत प्रथमोचारासाठी आवश्यक असणारी औषधे, बँडेज, कापूस, आयोडीन, बर्नोल सारखी मलमे इत्यादी साहित्य ठेवणे आवश्यक असते. तसेच हि प्रथमोपचारपेटी सर्वांना दिसेल अशा ठिकाणे ठेवणेही गरजेचे आहे.
एखादी व्यक्ती विजेच्या संपर्कात येऊन शॉक बसल्यास सर्वप्रथम गळती असलेल्या वीज उपकरणाचा वीजपुरवठा बंद करावा किंवा मेनस्विच बंद करून टाकावा. प्लग सॉकेट मधून त्या उपकरणाचा पिन टॉप देखील काढून टाकावा. हे शक्य नसल्यास मदत करणाऱ्या व्यक्तीने कोरड्या लाकडी फळीवर किंवा सहज उपलब्ध असलेल्या वर्तमानपत्राच्या गठ्ठ्यावर उभे राहून लाकडी काठीने शॉक बाधित व्यक्तीला विद्युत उपकरणापासून दूर करावे. विजेचा शॉक बसलेली व्यक्ती घाबरलेली असते. त्यामुळे अशा व्यक्तीला प्रथम मानसिक धीर द्यावा. त्यामुळे बाधित व्यक्ती प्रथमोपचारांना चांगला प्रतिसाद देते. अपघात ग्रस्त व्यक्तीच्या भोवती गर्दी व गोंगाट करू नये. त्या व्यक्तीचे कपडे सैल करावेत. दुखापतीमुळे रक्त प्रवाह येत असल्यास तो त्वरित बंद करण्याचा प्रयत्न करावा. आजूबाजूला कोणी नसल्यास मदतीसाठी कुणाला तरी बोलवावे. डॉक्टरांना ही फोन करून बोलावून घ्यावे.
कृत्रीम श्वासोच्छवास :
विजेच्या तीव्र धक्क्याने बाधित व्यक्ती कधी कधी बेशुद्ध पडते. काही प्रसंगी त्या व्यक्तीचा श्वास बंद पडू लागतो. अशावेळी अपघात ग्रस्त व्यक्तीला कृत्रिम पद्धतीने श्वासोच्छवास सुरु करण्याचा उपचार सुरु करणे आवश्यक असते. विजेच्या धक्क्याने बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीचा श्वासोच्छवास चालू आहे का नाही हे छातीवर कान ठेऊन हृदयाचे ठोके ऐकणे, छातीची होणारी हालचाल, श्वासोच्छवासाचा आवाज ऐकणे, नाकासमोर बोट धरून श्वास तपासणे,अश्या सोप्या तपासण्या करून ही समजू शकते. श्वासोच्छवास आणि हृदय बंद पडले असल्यास त्वरित कृत्रिम श्वासोच्छवासाचा प्राथमिक उपचार सुरु करावा. हे काम कोणताही सर्वसामान्य माणूस ही करू शकतो, आणि डॉक्टर येईपर्यंत त्याला पर्यायही नसतो.
- सर्वप्रथम अपघातग्रस्त व्यक्तीला पाठीवर सरळ झोपवावे.
- मन किंचितशी मागे झुकण्यासाठी त्या व्यक्तीच्या खांद्याखाली एखादी उशी किंचा ब्लॅंकेटची घडी ठेवावी. वर्तमानपत्राचा गठ्ठा ही अशा वेळी उपयोगी पडू शकतो.
- चित्रात दाखवल्या प्रमाणे अपघातग्रस्त व्यक्तीच्या डोक्याच्या बाजूला उपचार करणाऱ्या व्यक्तीने बसावे आणि बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीच्या छातीच्या मध्यभागावर दोन्ही हाताने दाब द्यावा व काढावा. 'दाब देणे आणि पुन्हा काढणे' अशी क्रिया अपघात ग्रस्त व्यक्तीचा श्वास पुन्हा चालू होईपर्यंत चालू ठेवावी.
- अशाप्रकारे कृत्रिम श्वासोच्छवास देऊन बेशुद्ध व्यक्ती पुन्हा शुद्धीवर आल्यावर या व्यक्तीला चहा, कॉफी सारखे सौम्य उत्तेजक पेय द्यावे. व नंतर डॉक्टरांकडे नेऊन त्याची संपूर्ण तपासणी करणेही आवश्यक असते.
- हे झाले प्रथमोपचार किंवा उपचार पद्धती, परंतु मुळात शॉक बसूच नये यासाठी घेतलेली काळजी सर्वात महत्वाची !
राजीव जतकर.
मोबाईल
: ९८२२० ३३९७४.
ईमेल : electroline4929@gmail.com