Thursday, 4 February 2016

माझ्या परदेशी लेकी...

माझ्या परदेशी लेकी

(पूर्व प्रसिध्दी : सकाळ टुडे : ६ ऑक्टोबर २००९.


रोटरी इंटरनॅशनल या जागतिक सामाजिक संस्थेमार्फत अंदाजे आठ ते दहा हजार तरुण मुले मूली वेगवेगळ्या देशात जातात व येतात, त्याला इंटरनॅशनल युथ एक्सचेंज प्रोग्रॅम असे म्हणतात.  पंधरा ते पंचवीस या संवेदनाक्षम वयात मुलांना इतर देशातील संस्कृतीची ओळख झाली तर जागतिक मैत्री, व परिणामी जागतिक शांतता निर्माण होते.  अशा या बहुउपयोगी रोटरीच्या कार्यक्रमात माला चार पाच वर्षे काम करण्याची संधि मिळाली आणि अनेक अनुभवांनी मी समृध्द झालो.

आयुष्यात कधी कधी खूप वेगळ्या प्रकारचे कधी छान कधी वाईट अनुभव येत असतात. काही अनुभव आयुष्यभर लक्षात राहतात. काही अनुभव आयुष्याला वेगळेच वळण देऊन जातात. २००३ साली केवळ योगायोगाने मला एका 'क्रिस्तीना' नावाच्या एका ब्राझिलियन मुलीला माझ्या घरी तीन चार महिन्यांसाठी आणि 'सेसिलीया' नावाच्या आर्जेन्टिना मधून आलेल्या मुलीला एक वर्षभर सांभाळण्याचा प्रसंग आला होता. पूर्णपणे आगदी वेगळ्याच संस्कृती मधून आमच्या घरी आलेल्या या मुलींच्या सहवासाने आम्हा सर्व कुटुंबियांच्या आयुष्यात एक वेगळेच वळण येउन गेले.

'रोटरी इंटरनॅशनल' या जगव्यापी सामाजिक संस्थेमध्ये निरनिराळ्या विभागात काम करताना 'इंटरनॅशनल युथ एक्स्चेंज' या विभागाची महत्वाची जबाबदारी माझ्यावर २००३ मध्ये योगायोगानेच आली, आणि मी या विभागाच्या कामात कळत पुरता गुरफटून गेलो. डिस्ट्रिक्ट ३१३१ या विभागातील म्हणजे पुणे आणि रायगड जिल्ह्यातील तरुण मुलामुलींना परदेशात वर्षभरासाठी पाठवणे असे माझ्या कामाचे स्वरूप होते. परदेशात पाठवलेल्या आपल्या मुलांच्या बदली (एक्स्चेंज) आलेल्या परदेशी मुलामुलींना वर्षभर आपल्याला होस्ट करावे लागते. माझा मुलगा हर्षवर्धन या युथ एक्स्चेंज कार्यक्रमांतर्गत २००३ साली आर्जेन्टिना मध्ये गेला होता. त्याच्या एक्स्चेंज मध्ये या दोघी मुली माझ्याकडे राहून गेल्या. क्रिस्तीनाला मी जेंव्हा होस्ट करायचे ठरवले तेंव्हा माझ्या कुटुंबियांची प्रतिक्रिया काहीशी सावध, बरीचशी नकारात्मकच होती, कारण कोण कुठली परदेशी मुलगी, स्वभावाने कशी असेल ? घरात व्यवस्थित राहील का ? आपल्या घरातील रीतिरिवाजाप्रमाणे वागेल का ? तिच्या खाण्यापिण्याच्या सवई कशा असतील? तिच्याबरोबर इंग्रजीत बोलावे लागेल त्याचे काय ? एक ना अनेक प्रश्न आमच्या  सर्वांच्या मनात आले


आणि एका पहाटे 'क्रिस्तीना' मुंबई विमानतळावर उतरली. आम्ही तिचे स्वागत करायला गेलो होतो. 'क्रिस्तीना' ने तिच्या पहिल्याच दर्शनाने आम्हाला जिंकले. अतिशय हसरी, बडबडी होती क्रिस्तीना. मुंबई पुणे प्रवासात सारखे अनेक प्रश्न विचारत होती. घरी येतानाच्या प्रवासात आम्हा सर्वांच्या लक्षात आले होते कि तिचे इंग्रजी फारसे चांगले नव्हते. त्यामुळेच कि काय आम्हा सर्व कुटुंबियांची 'कॉन्फिडन्स लेव्हल' वाढली आणि तिच्याबरोबर बोलण्यात मोकळेपणा आला. आमच्या घरी क्रिस्तीना अतिशय आपलेपणाने, प्रेमाने राहिली. अलकाला ती स्वयंपाकात खूप मदत करीत असे. माझ्या आई वडिलांच्या बरोबर ती भारतीय संस्कृती, घरातल्या चालीरीती, भारतीय सण वगैरे विषयांवर तासंतास चर्चा करीत बसे. वडील देवपूजा करताना त्यांच्या शेजारी बसून क्रिस्तीना अनेक प्रश्न, शंका विचारून त्यांना भंडावून सोडत असे. पण दादा (माझे वडील) न कंटाळता तिचे शंकानिरसन करीत असत. माझी ऐंशी वर्षाच्या आई बरोबर क्रिस्तीनाच्या गप्पा म्हणजे तर एक आश्चर्यकारक आणि धमाल प्रकार होता. कारण दोघीनाही एकमेकिंच्या भाषांचा गंधही नव्हता. मग मी किंवा अलका दुभाषा म्हणून दोघींच्या मदतीला जायचो. तेंव्हा जाणवले कि खरच… संवाद घडायला भाषेची गरज लागतेच असे नाही. क्रिस्टीना बरोबर साजरा केलेला क्रिसमस म्हणजे आमच्या दृष्टीने एक अविस्मरणीय दिवस होता. त्याचे असे झाले… क्रिस्तीना क्रिसमस च्या आदल्या रात्री उशिरापर्यंत तिच्या खोलीचे दर लाऊन काहीतरी खाटखुट करीत बसली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघतो तो काय… दिवाणखान्यातील सोफ्यावर तिने प्रत्येकाच्या नावाने सुंदर सुंदर भेटवस्तू  ठेवल्या होत्या. आम्हाला त्या भेटवस्तू देताना क्रिस्तीना च्या चेहेर्यावरील आनंद आम्ही कधीही विसरू शकणार नाही. त्य प्रसंगी ती आम्हाला म्हणाली "तुमच्या रूपाने आज मला माझे ब्राझील मधील आई-बाबा भेटल्याचा आनंद होतोय… एरवी बिनधास्त असलेली क्रिस्तीना पुण्यातील रस्ते ओलांडताना मात्र जाम घाबरायची. 
सध्या क्रिस्तीना तिच्या कुरीतीबा (Kuritiba) नावाच्या ब्राझील मधील शहरात 'बेरनार्दो' नावाच्या सुंदर, कर्तुत्ववान तरुणाबरोबर (म्हणजे हा आमचा जावई बर का !) लग्न करून सुखात आहे. नेहेमी आमच्या संपर्कात असते.

'सेसिलीया' हि माझी दुसरी परदेशी लेक ! क्रिस्तीना ब्राझील ला परत गेल्यावर सेसिलीया आर्जेन्टिना मधील रेझीस्तांसिया या शहरातून आमच्या कडे एक वर्षासाठी राहायला आली.  क्रिस्तीना आणि सेसिलीया या दोघींच्या वयात आणि स्वभावात बराच फरक होता. क्रिस्तीना बावीस तेवीस वर्षाची, त्यामुळे स्वभावाने शांत, विचारांनी प्रगल्भ, समंजस होती तर सेसिलीया अठरा वर्षांची त्यामुळे थोडी अवखळ, बडबडी, थोडी खादाड, थोडी रागीट पण खूप प्रेमळ होती. खरे तर सेसिलीया जालन्यातील एका रोटेरियन कडे राहायला आली होती, पण जालन्यात खूप कंटाळलेली व माझ्याकडे 'मला पुण्यात राहायला यायचे आहे' असा हट्ट धरून बसलेली होती. मग तिच्या हट्टाला कंटाळून मी तिला पुण्यात माझ्याकडे राहायला घरी घेऊन आलो.  
        
सेसिलीया माझ्या घरी आल्यावर आमच्या घरातले काहीसे गंभीर वातावरण एकदम बदलून गेले. माझा मुलगा हर्षवर्धन त्याच वेळी आर्जेन्टिना ला गेलेला असल्यामुळे निर्माण झालेली पोकळी या गोड आणि खोडकर मुलीने भरून काढली. हिला आम्ही  'सीस' असे संबोधायचो. सेसिलीयाला सुरवातीला तिखट पदार्थ  अजिबात चालायचे नाहीत पण नंतर ती तिखट खाण्यात इतकी तयार झाली कि नंतर नंतर मिरचीचा ठेचा मागायची. पावभाजी आणि मस्तानी साठी ती जीव टाकायचीती थोडी हट्टी देखील होती. एकदा एकदा ती मला म्हणाली 'बाबा, मला फिल्म इंडस्ट्री मध्ये हिरोइन चे काम मिळण्याची संधी चालून आली आहे'. तिचा इथला पुण्यातला एक मित्र म्हणे सिनेमात काम देणार होता.  मी तिला अर्थातच समजून सांगण्याचा प्रयत्न केला कि असे काही नसते. हे खूप धोकादायक आहे. तुला मी तसे करू देणार नाहि. माझी या गोष्टीला परवानगी नाही. पण ती हट्ट धरूनच बसली. मग मी तिला स्पष्ट भाषेत ठाम नकार दिला. झाले हि आमची लेक माझ्यावर रागावली. अखंड बडबड करणारी सेसिलीया माझ्याशी दोन तीन दिवस बोलली देखील नाही. माझा नाईलाज होता. मनात विचार आला मला जर मुलगी असती तर कदाचित अशीच वागली असती नाही का? मग कधीतरी तिचा राग पळाला. माझ्याशी परत पाहिल्यासारखे ती बोलू लागली. मला म्हणाली ' तुमचे बरोबर आहे , मी विचार केला,  माझ्यासारख्या इथे आलेल्या परदेशी मुलामुलींची तुमच्यावर जबाबदारी असते.'   सेसिलीयाला भारतीय संस्कृती खूप आवडायची. माझ्या कडे असे पर्यंत तिने कथक नृत्य आत्मसात केले. आम्ही तिचा रोटरी मध्ये एक कार्यक्रम देखील केला. नृत्य शिकण्यासाठी ती खूप मेहनत घ्यायची.

सेसिलीया एक वर्षानंतर परत तिच्या गावी आर्जेन्टिना ला जाताना त्या दिवशी खूप गप्प गप्प आणि काहीशी अस्वस्थ होती. विमानतळावर निरोप घेताना अचानक मला मिठी मारून ओक्साबोक्शी रडायला लागली आणि म्हणाली  'आता तुम्ही मला परत कधी भेटणार?' मला माझ्या पत्नीला हि गहिवरून आले. तिची कशी समजूत घालावी हे समजेना. मी तिच्या पाठीवरून हात फिरवीत राहिलो. आम्हाला मुलगी नसल्याने हा अनुभव नवीन होता. स्वतःची लेक सासरी पाठवताना आई-वडिलांची अवस्था काय होत असेल, ते आम्ही अनुभवले.

मुले परदेशातील असोत किंवा आपली स्वतःची असोत त्यांना सांभाळणे हि एक खरच कला आहे.परदेशी मुले आपली मुले यांच्यात संस्कृतीच फरक, चालीरीतीमधील बदल वगैरे गोष्टी जरूर असतात; पण भावना एकाच प्रकारच्या असतात. जसा सांस्कृतिक बदलाचा धक्का (कल्चरल शॉक) आपल्याला बसतो तसाच सांस्कृतिक धक्का परदेशी मुलानाही बसतो. आपल्या सर्व चाली रिती त्यांना विचित्र आश्चर्यकारक वाटतात. मग अशा वेळी कधी शिस्तीने, कधी समजुतीने, प्रेमाने सांगावे लागते. 'युथ एक्स्चेंज' मधील परदेशी मुले सांभाळणे हि एक अतिशय आनंददायी गोष्ट आहे. पण त्यासाठी आवश्यक आहे थोडी सहनशीलता, स्वतःला बदलण्याची लवचिकता, प्रबळ इच्छा आणि तोड निराळा सकारात्मक दृष्टीकोन !

राजीव जतकर
मोबाईल : ९८२२० ३३९७४.
इमेल : electroline4929@gmail.com


(पूर्व प्रसिध्दी : सकाळ टुडे : ६ ऑक्टोबर २००९.





रोटरी युथ एक्स्चेंज बद्दल अधिक माहितीसाठी संपर्क:

रोटेरियन दीपक बोधनी: ९४२३५८६१७१
रोटेरियन अशोक भंडारी: ९३७१०१६६५६
वेब साईट : rye3131.org

5 comments: