Tuesday, 8 March 2016

' एका वेगळ्या लग्नाची गोष्ट '


' एका वेगळ्या लग्नाची गोष्ट '

कॉलेज मध्ये असताना आम्ही काही समविचारी मित्रांनी स्वतःचे लग्न नोंदणी  पद्धतीनेच करायचे असे ठरवले होते. अवास्तव खर्च, श्रीमंतीचा देखावा, मानपान, हुंडा,  भेटवस्तूंची देवाणघेवाण, अनेक अनावश्यक लग्नविधी, मानापमानाच्या निमित्ताने होणारे रुसवेफुगवे, पाय धुण्यासारख्या विचित्र प्रथा, जेवणावळी, त्यातील अन्नाची नासाडी, लग्नातील मिरवणुकी, मिरवणुकीतील भिभत्स नाचणे अशा अनेक गोष्टी आम्हा मित्रांना अस्वस्थ करीत. अतिशय तीव्रपणे आणि आक्रमक पद्धतीने आम्ही चुकीच्या लग्नपद्धती बद्दल मते मांडीत असायचो. पण प्रत्येकाची जेंव्हा स्वतःचे लग्न करायची वेळ आली तेंव्हा, एक एक करीत सारे ढेपाळले. कुणाला आईवडिलांची आज्ञा पाळायला लागली त, तर कुणाला समाज काय म्हणेल याची काळजी वाटू लागली आणि मग एक एक करून सगळ्यांची लग्ने धुमधडाक्यात झाली. मला मात्र माझ्याच विचारांची मुलगी मिळाल्यामुळे माझे लग्न मात्र फक्त पंचवीस जवळच्या नातेवाईकांच्या साक्षीने घराच्या घरी, अतिशय साधेपणाने झाले. आमच्या अशा विचारांमुळे आम्ही शक्यतो लग्नाला जाण्याचे टाळतोच, आणि जर अगदीच जावे लागले तर शक्यतो गर्दीपासुन दूर कुठेतरी मागेच असतो. असो…

सध्याच्या तद्दन श्रीमंतीचा देखावा करणाऱ्या लग्नात एका आगळ्या वेगळ्या लग्नाने मात्र आमचे लक्ष चांगलेच वेधले गेले. 'मानव्य' ह्या एच. आय. व्ही. बाधीत मुलांचे संगोपन करणाऱ्या संस्थेचे संचालक व माझे अतिशय जवळचे मित्र श्री. शिरीष लवाटे यांनी मला एकदा एका लग्नाचे आमंत्रण पाठवले. लग्न होते मानव्य मधेच लहानाची मोठी झालेल्या ‘सायलीचे’ आणि हडपसर जवळच्या एका छोट्या गावात राहणाऱ्या ‘श्रीकांतचे’ ! श्रीकांतही जन्मापासून एच.आय.व्ही. बाधीतच होता. श्रीकांतचे आई वडील त्याच्या लहानपणीच देवाघरी गेल्यामुळे श्रीकांतचा सांभाळ मोठ्या मनाच्या त्याच्या काका काकुनी केला. सायलीची अवस्था काहीशी अशीच होती. ह्या अश्या वेगळ्या लग्नाला जाण्याचे मी आणि अलकाने आवर्जून जायचे असे ठरवले.  कोणत्याही लग्नाला जायचा कंटाळा करणारे आम्ही दोघेही त्या दिवशी मात्र उत्साहाने निघालो. आदल्या दिवशी आम्ही या विशेष नव दाम्पत्यासाठी त्यांच्या संसाराला उपयोगी पडेल अशी छानशी भेटवस्तूही घेतली. पुण्या नजीक भूगांव येथी मानव्य संस्थेत आम्ही उत्सुकता, आश्चर्य, कौतुक अश्या संमिश्र भावनांनी भरलेल्या अवस्थेत दाखल झालो. 

प्रवेशद्वारातच संस्थेतीलच तीन चार मुलांनी आमचे हसतमुखाने स्वागत केले. संस्थेच्या दारात मुलांनी सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. सनई चे मंगलमयी सूर वातावरण प्रसन्न करीत होते. संस्थेतील सर्वच मुले काहीना काही कामात गुंतली होती. संस्थेतील शिक्षकांची सगळीकडे लगबग चालली होती. संस्थेतल्या मुलामुलींनीच काय पण शिक्षकांनी देखील हातावर मेंदी काढलेली दिसत होती. या सर्व गर्दीत चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या एक बाई विशेष धावपळीत दिसल्या. चौकशी केल्यावर असे समजले कि त्या संस्थेतील सर्वात जुन्या शिक्षिका होत्या. या लग्नाच्या तयारी साठी तीन चार दिवसापासून संस्थेत मुक्काम ठोकून होत्या म्हणे ! लग्नासाठी लाडू करणे, मानापमानाच्या साड्या, कपडे आणणे, कुणाला काय हवे नको ते बघणे वगैरे कामे त्या जातीने लक्ष घालून करीत होत्या. लग्नाची गर्दी मी न्याहाळत होतो. लग्नाला अनेक मान्यवर आलेले दिसत होते. गावातील काही पुढारी मंडळीही आलेली दिसत होती. नवऱ्या मुलाचा म्हणजे श्रीकांत चा मित्र परिवार चेष्टा मस्करीत गुंतला होता. तेव्हड्यात माझे लक्ष एका परदेशी तरुणाकडे गेले. अमेरिकेतील 'डेव्हिड यान्सी' हा तरुण आशिया खंडातल्या निरनिराळ्या सामाजिक संस्थाना भेटी देऊन त्यांचे कार्य समजून घेत होता म्हणे ! त्याने हि खास भारतीय पोशाख घातला होता.  या लग्नासाठी त्याने त्याचा पुण्यातील मुक्काम आठ दहा दिवसांनी वाढवला होता.

तेव्हड्यात कुठूनसे शिरीष व उज्वला लवाटे पतीपत्नी आले, त्यांनी  स्वागत  केले. 'मानव्य' ह्या एच.आय.व्ही. बाधित मुलांना सांभाळणाऱ्या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका कै. विजयाताई लवाटे यांचे कार्य त्यांचे चिरंजीव श्री. शिरीष व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उज्वला लवाटे यांनी समर्थपणे पेलले आहे. आमच्या गप्पांमधून या विशेष वेगळ्या लग्नाची गोष्ट उलघडत गेली. ते सांगत होते…
संस्थेतील मुलांना अशा समारंभांनी, घटनांनी एकप्रकारची 'कौटुंबिक सुरक्षिततेची' जाणीव होते. आपली संस्था लहानपणी आपले संगोपन तर करतेच, पण मोठे झाल्यावर आपल्याला वाऱ्यावर सोडून देत नाही असेही त्यांच्या लक्षात येते. मोठे झाल्यावर मुलांना नोकरी लाऊन देणे, मुला मुलींची लग्नं लाऊन त्यांचा संसार उभाकारून देणे अशी पुढील काळजी देखील संस्थेला घ्यावी लागते. सौ. लवाटे म्हणाल्या "आमची 'सायली' वयाच्या अंदाजे पाचव्या वर्षी मानव्य मध्ये दाखल झाली. ती अर्थातच एच.आय.व्ही. बाधित होती. अनाथही होती. महाराष्ट्र सरकारच्या 'बाल कल्याण समिती मध्ये अशा प्रकारची मुले दाखल होत असतात. हि संस्था या अशा मुलांची प्राथमिक चौकशी करून मानव्य सारख्या संस्थेत रवाना करतात. आज सायली सारखी चाळीस पन्नास मुले आनंदाने राहतात. पण आजचा दिवस खूप आनंदाचा आहे." सौ. लवाटे उत्साहाने पुढे म्हणाल्या "आमची सायली न स्वभावाने खूप छान आहे. ती उत्तम स्वैपाक देखील करते. तिला घरकामात अतिशय रस आहे." सौ. लवाटे त्यांच्या या मानस कन्येचे तोंडभरून कौतुक करीत होत्या. जणू आज त्यांच्याच मुलीचे लग्न होते.


"पण तुम्ही हे लग्न जमवले तरी कसे ? श्रीकांत चे स्थळ तुम्हाला कुठे व कसे मिळाले ?" माझे प्रश्न थांबत नव्हते. यावर शिरीष लवाटे यांनी खूप उद्बोधक माहिती दिली. ते म्हणाले "मानव्य प्रमाणे असे सामाजिक काम करणाऱ्या अनेक संस्थांशी आमचा संपर्क असतो. त्यातूनच अशी नाती सापडू शकतात. उदा. एन.पी.पी.+ (नेटवर्क ऑफ पिपल लिव्हिंग वुईथ एच.आय.व्ही.) हि संस्था एच.आय.व्ही. ग्रस्त लोकांसाठी खूप काम करते. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संस्थेचे सर्व पदाधिकारी एच.आय.व्ही. बाधित आहेत. दुसरी ए.आर.आय. म्हणजे अँटी रिट्रो व्हायरल ट्रीटमेंट इंस्टिट्यूट हि संस्था एच.आय.व्ही. बाधित लोकांच्या सर्व प्रकारच्या चाचण्या, तपासण्या करते, त्यांच्यावर उपचाराबरोबरच त्यांचे समुपदेशनाचे हि काम करते. अश्या प्रकारच्या अनेक संस्था एकत्र येउन एच.आय.व्ही. बाधितांचे पुनर्वसन करीत असतात. एव्हडेच काय पण एच.आय.व्ही बाधित उपवर मुलामुलींचे वधू वर मेळावेही घेतले जातात." या नवीन मिळालेल्या माहितीमुळे मी थक्क झालो. आम्ही पुढे उत्सुकतेने ऐकू लागलो… 

श्रीकांत ची माहिती आम्हाला ए.आर.आय. या संस्थेत मिळाली. मग आम्ही हडपसर जवळच्या त्याच्या गावात पोहोचलो. श्रीकांत चे आई वडील लहानपणीच वारल्यामुळे श्रीकांत चा सांभाळ त्याच्या मोठ्या मनाच्या काका काकुनी केला. श्रीकांत हा अतिशय प्रगल्भ मनाचा आहे. त्याला परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. त्याचा फुले विक्री चा छोटासा व्यवसाय आहे. श्रीकांत स्वतःच्या पायावर उभा आहे हे समजल्यावर आम्ही निश्चिंत झालो. निवारा या संस्थेत सायलीला दाखवण्याचा कार्यक्रम झाला. आगदी आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या घरी होतो तसाच ! आमची सायली छानच असल्यामुळे ती श्रीकांतला आणि तिच्या घरच्यांना पसंत पडली." तेव्हड्यात  अलकाने (माझ्यापत्नीने) विचारले "मानव्य संस्थेत वाढलेली मुलगी सासरी एका कुटुंबात राहायला जाणार म्हणजे अडचणी नाही का येणार?" सौ. लवाटे यांना कदाचित हा प्रश्न अपेक्षितच असावा. त्या हसून म्हणाल्या "आहो खूप अडचणी येतात आणि येण्याची शक्यता असते. सर्व शक्यतांचा विचार करून चक्क समुपदेशनही करावे लागते. सायलीला तिच्या सासरी कसे वागायचे धडे आम्ही दिलेले आहेत. आमच्या संस्थेतल्या गृहमातांनी ( गृहमाता म्हणजे संस्थेतील मुलांना सांभाळणाऱ्या शिक्षिका ) हि जबाबदारी फार उत्तम रीतीने सांभाळलेली आहे. आहो एव्हडेच काय पण श्रीकांत व त्याच्या कुटुंबियांना देखील अनेक गोष्टी समजून सांगाव्या लागल्या. बायको बरोबर कसे वागायचे याचे जावयाला प्रशिक्षण देणारी मी जगातील पहिलीच सासू असेन कदाचित !" सौ. लवाटे खळखळून हसत सुटल्या.

तेव्हड्यात लवाटे पतिपत्नींना कुणीतरी बोलावले, त्यामुळे ते दोघेही लगबगीने कुठेतरी गर्दीत निघून गेले. हाँल च्या उजव्या कोपऱ्यात  काहीशी जास्त गर्दी दिसली म्हणून आम्ही उत्सुकतेने तिकडे गेलो. त्य ठिकाणी छानसे रुखवत मांडले होते. नवदाम्पत्याच्या संसारासाठी उपयोगी अशी भांडी, मिक्सर, पंखा, इत्यादी वस्तूंची आकर्षक साजावटीसह तिथे मांडणी केली होती. हाँल च्या मध्यभागी लग्न विधी सुरु झाले होते. आगदी मोजकेच पण आवश्यक असे लाजाहोम, कन्यादान, सप्तपदी असे लग्नविधी पार पडले. कानपिळी हा लग्नातला विधी सुद्धा खूप गमतीशीर व लक्षवेधी होता. श्रीकांत चा कान मानव्य च्या तब्बल पंचेचाळीस मुलांनी पिळला. बिचारा श्रीकांत हव्या हव्याश्या वाटणाऱ्या या कानपिळीला हसून दाद देत होता. कान पिळणाऱ्या प्रत्येकाला श्रीकांतने यथाशक्ती भेटवस्तू हि दिली. प्रत्येक कानपिळीला हाँल मध्ये हास्याचे फवारे उडत होते. जणू काही स्वतःच्याच लेकीचे आपण कन्यादान करत आहोत अशा भावनेने लवाटे पतीपत्नी सर्व लग्नविधी पार पाडीत होते. नवरदेवाकडील प्रत्येक थोरामोठ्यांचे मानपान करीत होते. प्रत्येकाला आहेर करून वाकून पाय देखील पडत होते. नंतर साध्याच पण सुग्रास अशा जेवणाच्या पंगतीत प्रत्येकाला आग्रहाने वाढत होते.

शेवटी सायलीची सासरी पाठवणी करताना मात्र वातावरण काहीसे गंभीर झाले. 'सायालीताई आपल्याला आता सोडून तिच्या घरी सासरी जाणार' या कल्पनेने संस्थेतील इतर मुले मुली कावरीबावरी झाली. काही मुले सायलीच्या गळ्यात पडून रडत होती. गुहमातांचा कंठ दाटून आला होता. प्रत्येकजण सायलीला साश्रू नयनांनी निरोप देत होता. सायलीहि रडत होती. या सर्वांच्या गर्दीमागे दूरवर कुठेतरी लवाटे पतीपत्नी उभे होते. त्यांची काहीतरी चर्चा चाली होती. आम्ही त्यांच्या जवळ गेलो तर लक्षात आले कि सौ. लवाटे गहिवरल्या होत्या. आम्ही येताना पाहून त्या सावरल्या आणि म्हणाल्या "आहो असे रडत बसून कसे चालेल? मला अजून वीस मुली आहेत. त्यांचीही लग्ने, घरे  लाऊन  द्यायची आहेत, अजून बरीच कामे करायची आहेत. चला ! कामाला लागायला हवे…मी थक्क होऊन या जोडप्याकडे बघत राहिलो. कै. विजयाताई लवाटे यांचे संस्कार आणि कुठलीशी अज्ञात प्रेरणा हेच या जोडप्याचा उर्जास्त्रोत असणार !  आम्ही उभयता त्या दोघांचा निरोप घेऊन निघालो ते अतिशय अस्वस्थ मनाने व एका वेगळ्या लग्नाला उपस्थित राहिल्याच्या समाधानाने… 

राजीव जतकर. 
मोबाईल : ९८२२० ३३९७४.
इमेल : electroline4929@gmail.com


         

Wednesday, 24 February 2016

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही.…

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही.…

(पूर्व प्रसिध्दी : लोकसत्ता (वास्तुरंग) दि. १८ जानेवारी २०१४.)

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. पिंपळाच्या झाडावर लटकणारे वेताळाचे प्रेत खांद्यावर टाकून तो पुन्हा स्मशानाच्या दिशेने निघाला. वेताला स्मशानात पोहोचवताना मौनव्रत धारण करण्याची आत असल्याने तो न बोलता चालत होता. वेताळाला विक्रमादित्याचे मौनव्रत तोडायचे होते. विक्रमादित्या ला बोलते करण्यासाठी वेताळ म्हणाला " राजा… तुझ्या सहनशक्तीची व चिकाटीची खरच कमाल आहे. मला स्मशानात पोहोचवण्याच्या प्रयत्नात तुला कित्येकदा अपयश  येवूनही तू पुन्हा पुन्हा चिकाटीने प्रयत्न करतोस. तुला कंटाळा येऊ नये म्हणून तोपर्यंत मी तुला एक गोष्ट सांगतो व तुला काही प्रश्न विचारतो. तू माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकला नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायाशी लोळण घेऊ लागतील."
वेताळाने गोष्ट सांगायला सुरवात केली.… 

एक आटपाट नगर होते. 'पुणे' त्याचे नाव ! 'पुणे तेथे काय उणे' या उक्तीप्रमाणे पुण्याची सर्वांगीण प्रगतीकडे घोडदौड सुरु होती. या प्रगतीला आवश्यक असणारी वीज आणि त्याचे वितरण करणारी 'महावितरण' नावाची एकमेव संस्थाहि पुण्यात प्रगती पथावर होती. महावितरण चे काही अधिकारी स्वतःची विशेष प्रगती करून घेण्यासाठी प्रयत्नशील होते. पुण्यातील तमाम विद्युत ठेकेदार आपली कामे करून घेण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर सरपटत होते. हेलपाटे मारत होते. बिन पगारी शिपाया प्रमाणे या टेबला वरून त्या टेबला कडे कागदपत्रांची ने आण करीत होते.

एकदा एका विद्युत ठेकेदाराने दहा सदनिका असलेल्या एका इमारतीसाठी मीटर्स मिळण्याकरिता महावितरणच्या कार्यालयात आवश्यक ती कागदपत्रे सदर केली. महावितरण च्या सहाय्यक अभियंत्याने प्रत्यक्ष जागेची पाहणी करून सांगितले कि या भागातील ट्रान्सफॉर्मर मधून वीज पुरवठा करता येणार नाही त्यासाठी तुम्हाला काही इन्फ्रास्ट्रक्चरचे काम करावे लागेल. साधारणपणे दोनशे मीटर अंतरावरून तुम्हाला तीनशे स्क्वे. एम.एम. या आकाराची उच्च दाब केबल आणून स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसवायला लागेल. ( सदर केबल महापालिकेच्या रस्त्यावरून टाकायची असल्याने महापालिकेमध्ये भरावयाच्या रु. ५८००/- प्रती मीटर असा खर्च बिल्डरनेच म्हणजे ग्राहकानेच करायचा आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल ) थोडक्यात केवळ दहा सदनिका असलेल्या इमारतीसाठी अंदाजे वीस ते पंचवीस लाख रुपयांचे अवास्तव इन्फ्रास्ट्रक्चरचे काम करण्यास सांगण्यात आले. विद्युत ठेकेदार क्षणभर उडालाच !  ट्रान्सफॉर्मर व त्यासाठी लागणाऱ्या कामासाठी ७५ किलो वॉट इतकि किमान मागणी असावी लागते या नियमाची आठवण करून देत त्या विद्युत ठेकेदाराने या खर्चाला स्पष्ट नकार दिला.
   
विद्युत ठेकेदाराकडून आपले काम होणार नाही असे जाणवल्यामुळे ह्या महावितरणच्या अधिकाऱ्याने बिल्डर ला फोन करून बोलाऊन घेतले. त्यांच्यात काहीतरी  बोलणे (की मांडवली) झाले. आणि काय आश्चर्य ? दुसऱ्या दिवशीच महावितरणच्या अधिकाऱ्याचा त्या विद्युत ठेकेदाराला फोन आला व त्याला सांगण्यात आले  "तुमच्या इमारतीच्या गेट जवळ असलेल्या फिडर पिलर मधून ७० स्क्वे. एम.एम. ची केबल टाकून घ्या. तुमचे मीटर्स तयार आहेत ते घेऊन जा आणि बसवून टाका.” आपला विद्युत ठेकेदार थक्क !  राजा विक्रमादित्य वेताळाची हि गोष्ट लक्षपूर्वक ऐकत होता. वेताळ विक्रमादित्याला म्हणाला " राजा … मला ह्या घटनेमुळे काही प्रश्न पडले आहेत. त्याची उत्तरे तुला द्यावी लागतील.
१) महावितरणचा वीज ग्राहकांसाठी 'पॉइन्ट ऑफ सप्लाय' कोणता ? म्हणजे वीजपुरवठा वितरण कंपनीने कुठपर्यंत करायचा ? यासंदर्भातील नियम काय आहे ?
२) मांडवली करून तात्पुरता प्रश्न सुटला तरी 'काळ सोकावतो' हे बिल्डर्स च्या, विद्युत ठेकेदारांच्या किंवा ग्राहकांच्या लक्षात कसे येत नाही ?
३) 'वीज पुरवठा करताना अवास्तव इन्फ्रास्ट्रक्चर च्या कामाची महावितरण सक्ती करते ' हा प्रॉब्लेम विद्युत ठेकेदारांचा कि बिल्डर्सचा ? आणि हा प्रॉब्लेम बिल्डर्स चा असेल तर बिल्डर्स या प्रश्नाकडे गांभीर्याने का बघत नाहीत ?
४) ‘हा असा होणारा अवास्तव खर्च शेवटी सामान्य सदनिका धारकांच्याच माथी मारला जातो’ हे महावितरण, विद्युत ठेकेदार, बिल्डर्स यांना का समजू नये ?
५) महावितरणाच्या अडचणी सोडवण्यासाठी विद्युत ठेकेदार संघटीत का होत नाहीत ?
पुढे वेताळ म्हणाला "राजा बोल…! तुला माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील, नाहीतर तुला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. विक्रमादित्याने स्मितहास्य करीत उत्तर द्यायला सुरवात केली. तो म्हणाला "वेताळा तुझ्या प्रश्नांची उत्तरे खूप सोपी आणि खूप अवघड देखील आहेत. तरी देखील मी उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. ऐक… 

महावितरण ने वीजपुरवठा करताना त्यांचा 'पॉइन्ट ऑफ सप्लाय' कोणता ? हा एक मजेशीर व अनुत्तरीत प्रश्न आहे. या प्रश्नाचे नियमांच्या चौकटीत उत्तर द्यायचे झाले तर पुर्वीच्या १९५६ च्या भारतीय विद्युत नियमातील, उपनियम क्रमांक ५८ प्रमाणे वीजवितरण कंपन्यांनी ग्राहकाच्या इनकमिंग कटऑउट ( म्हणजे ग्राहकाच्या मेन स्विच किंवा एम. सी. बी ) पर्यंत वीजपुरवठा करणे आवश्यक आहे. २०१० साली प्रकाशित झालेल्या केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या (Central Electricity Authority) सुधारित नियमानुसारहि अशीच तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (एम.इ.आर.सी.) नियमानुसारही वीज वितरण कंपन्यांनी वर सांगितलेल्या 'पॉइन्ट ऑफ सप्लाय' पर्यंत वीज पुरवठा करणे बंधनकारक आहे. एव्हडेच काय हा वीजपुरवठा ठराविक वेळेत करणे देखील बंधनकारक आहे. केंद्रीय वीज कायदा २००३ च्या कलम क्र. ४३ अन्वये वीज वितरण कंपनीवर ग्राहकाने नवीन वीज पुरवठ्यासाठी अर्ज केल्यापासून एक महिन्याच्या आत ग्राहकाला वीज पुरवठा करणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या (MERC) २००५ च्या कृतीमानाकानुसार ( Standered of Performance-SOP ) जास्तीजास्त तीन महिन्याच्या आत ग्राहकाला वीज पुरवठा करणे बंधनकारक आहे.

तथापि दुर्दैवाने असे काहीच घडताना दिसत नाही. याला दोन कारणे आहेत. एक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई वगळता 'महावितरण' ही एकमेव वीजवितरण कंपनी कार्यरत आहे. वीजग्राहकांना वीज मिळवण्यासाठी दुसरा पर्याय नाही. (म्हणजे दुसरी पर्यायी वीजवितरण कंपनी नाही) त्यामुळे वीजवितरण व्यवस्था मनमानी कारभाराच्या अवस्थेकडे जाते तर ग्रहाव बराचसा अगतिक अवस्थेत जातो. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे बिल्डर्स, विद्युत ठेकेदार यांची फक्त स्वतःचाच फायदा बघण्याची मानसिकता ! सामान्य ग्राहकाला केंद्रस्थानी ठेऊन सर्वांनी कामे केली तर हा प्रश्न चुटकी सारखा सुटेल. पण हे करणार कोण ? प्रत्येक जण अवास्तव इन्फ्रास्ट्रक्चर च्या तापलेल्या तव्यावर स्वतःची पोळी कशी भाजली जाइल याच विचारात मशगुल !

खरे तर अवास्तव इन्फ्रास्ट्रक्चर चा प्रॉब्लेम मुख्यतः बिल्डर्सचाच ! विद्युत ठेकेदारांना पुढे करून, त्यांच्यावर दबाव आणून, त्यांना मध्यस्थ म्हणून वापरून बिल्डर्स अशी कामे करून घेतात. मग हे विद्युत ठेकेदार किंवा मध्यस्थ परिस्थितीचा घेतील तर त्यात नवल ते काय ? परिणाम बिचाऱ्या सामान्य ग्राहकावर ! बर, हे सर्वच जण करीत असल्याने यात काही चुकीचे आहे असेही आता कुणाला वाटेनासे झाले आहे. थोडक्यात इथे कुणालाच कशाचीच काही पडलेली नाही…

वेताळा तुझ्या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर कसे द्यावे हेच मला समाजात नाहीये. विद्युत ठेकेदारीच्या व्यवसायात असंख्य अडचणी आहेत. इकडून बिल्डर्स तिकडून महावितारण ची सुस्त यंत्रणा अशा विचित्र कचाट्यात विद्युत ठेकेदार काम करीत असतात. वास्तविक वीज ग्राहक, बिल्डर्स आणि महावितरण यांच्यामधील महत्वाचा दुवा म्हणजे 'विद्युत ठेकेदार' ! पण या जमातीची अवस्था अतिशय वाईट आहे. पण दुर्दैवाने हि मंडळी एकत्र येत नाहीत. त्यामुळे विस्कळीत असलेल्या ह्या ठेकेदारांना अनेकांच्या दबावाखाली काम करावे लागते. आपल्यावर अन्याय होतोय हे ह्या विद्युत ठेकेदारांना समजतच नाही, किंवा अन्यायाची वाच्यता केल्यास महावितरण चे अधिकारी आपल्याला त्रास देतील, आपली पुढची कामे होणार नाहीत अशी त्यांना भीती वाटते.
         
परंतु संघटीत प्रयत्नांनी अनेक प्रश्न सुटू शकतात, हे त्यांना समजायला पाहिजे. विद्युत ठेकेदारांनी स्वतःचे महत्व ओळखून आत्मविश्वासाने, निर्भय पणे  कामें केली पाहिजेत. आपल्या अडचणी चव्हाट्यावर आणल्या पाहिजेत. परंतु त्यासाठी संघटीत होणे महत्वाचे ! अन्यथा विस्कळीत ठेकेदारांच्या अगतिकतेचा फायदा सर्व जण घेतील तर त्यात चुकीचे ते काय ? पैसे खाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बद्दल काय बोलणार ? त्यांना तर धडाच शिकवायला हवा. थोडक्यात अति पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी चांगले काय, वाईट काय हे ही न कळण्या इतकी  समाजातल्या आपल्या सर्वांची मने मुर्दाड झाली आहेत… असो ! वेताला मला वाटते कि तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुला मिळालेली असावीत."

वेताळ काहीसा गंभीर होऊन राजाचे उत्तर ऐकत होता. वेताळ म्हणाला "पण राजा, या परिस्थितीला उपाय काय ?" यावर विक्रमादित्य म्हणाला "वेताळा, यासाठी प्रत्येकाने प्रस्थापित वाईट प्रवृत्तींचा विरोध करायला सुरवात केली पाहिजे. संघटीत व्हायला हवे. आणि हो… मनाची सद्सद विवेकबुध्दी जागृत ठेवली पाहिजे, तरच चुकीच्या वृत्तीना आळा बसेल." वेताळ भानावर येउन म्हणाला "मित्रा… माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊन तू तुझे मौनव्रत मोडले आहेस. हा मी निघालो पुन्हा पिंपळाच्या झाडाकडे… हा… हा… हा… आणि अशाप्रकारे वेताळ पुन्हा पिंपळाच्या झाडावर जाऊन लटकू लागला.

राजा विक्रमादित्य निराश मनाने आपल्या राजवाड्याकडे निघाला, जाताना आपल्या हृदयावर हात ठेऊन तो तीनदा म्हणाला "'ऑल वुइल बी वेल...ऑल वुइल बी वेल...ऑल वुइल बी वेल"...  !

राजीव जतकर. 
मोबाईल : ९८२२० ३३९७४.

इमेल : electroline4929@gmail.com






(पूर्व प्रसिध्दी : लोकसत्ता (वास्तुरंग) दि. १८ जानेवारी २०१४.)