Wednesday, 11 January 2017

स्मार्ट वीज पुरवठ्यासाठी 'लोकसहभाग' आवश्यक.

            स्मार्ट वीज पुरवठ्यासाठी 'लोकसहभाग' आवश्यक.
(पूर्वप्रसिद्धी : सकाळ, रविवार, १५ जानेवारी २०१७.)



 सर्वसाधारण पणे विचार केला तर आपल्या लक्षात येईल की भारतात किंवा महाराष्ट्रात प्रामुख्याने पारंपरिक पध्द्त्तीने म्हणजे पाण्यापासून ( Hydro Power ) किंवा कोळशापासून ( Thermal Power ) वीज निर्मिती केली जाते. तथापी पाणी असो किंवा कोळसा हे वीज निर्मितीचे स्रोत आता कमी पडु लागले आहेत. त्यातच  महाराष्ट्रातील कोळशाचा दर हा छत्तीसगड मधे मिळणाऱ्या कोळशा पेक्षा जास्त असल्यामुळे वीज निर्मिती महाग होत चालली आहे . पाण्यापासुन वीज निर्मिती करताना पावसाच्या अनियमित पणामुळे  निर्मितीवर बंधने येतात . निर्मिती प्रक्रियेत च महाग झालेली वीज ग्राहकांपर्यत पोहोचेपर्यंत आणखीनच महाग होते . वीज ग्राहकांपर्यत वाहुन नेताना अनेक , अवाढव्य अशा यंत्रणा उभ्या कराव्या लागतात , त्या पायाभुत सुविधांची सातत्याने देखभाल ही करावी लागते.        
         
  पुणे आणि पुणे जिल्ह्याचा विचार केला तर वीज ग्राहकांच्या संख्येच्या तुलनेत पायाभुत सुविधा वाढवणे अतिशय आवश्यक आहे. अर्थात  त्यासाठी महाराष्ट्र शासना बरोबर महानिर्मिती , महापारेषण आणि महावितरण   ह्या कंपन्या अतिशय योजना बद्ध रीतीने काम करीत असतात. पायाभूत सुविधांच्या जागेच्या उपलब्धते साठी पारेषण आणि महावितरण ला नाममात्र दरावर शासकीय जागा देण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र शासन हे देशात एकमेव राज्य आहे. पुणे जिल्ह्यासाठी राज्य शासनाने पायाभूत विकास आराखडा कार्यक्रम टप्पा -२ या योजने अंतर्गत सुमारे १४९० कोटी रुपयांची कामे हातात घेतली आहेत. या योजने अंतर्गत ५४ नवीन वीज उपकेंद्रे, २३ स्विचिंग स्टेशन्स, ५००० वितरण रोहित्रे (डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर)  आणि तब्बल ५००० किलोमीटर्स लांबीच्या उच्चदाब आणि लघुदाब वीजवाहिन्यांचे जाळे इत्यादी विकास कामे होत आहेत. केंद्र सरकारची 'एकात्मिक  ऊर्जा विकास योजना भाग -१' ( इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीम पार्ट-१) हि योजना देखील भविष्यात पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी अतिशय महत्वाची ठरणार आहे. या योजने अंतर्गत पुणे जिल्यातील पुणे शहराबरोबरच पिंपरी चिंचवड, तळेगाव दाभाडे, लोणावळा, आळंदी, जुन्नर, दौंड, सासवड, जेजुरी, भोर, बारामती, शिरूर, इंदापूर तसेच खडकी, देहूरोड, पुणे कॅंटोन्मेंट या भागातील वीजयंत्रणांचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया देखील पूर्णत्वाकडे जात आहे. तब्बल १४५ कोटींची कामे या योजने अंतर्गत पुणे जिल्ह्यातील शहरी भागांसाठी राबवण्यात येणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी शासनाची 'दीनदयाळ उपाध्याय ग्राम-ज्योती योजना ही भविष्यात फार महत्वाची ठरणार आहे. कृषी आणि बिगर कृषी वीजवाहिन्यांचे विलगीकरण, उपपारेषण व वितरण प्रणालीचे बळकटीकरण तसेच ग्रामीण भागासाठी नवीन वीज यंत्रणा उभारणी अशी कामे या योजने अंतर्गत योजली आहेत.

सक्षम पायाभूत यंत्रणा व देखभाल :
पुणे जिल्ह्यातील शहरी भागात सुमारे १९ लाख  २४ हजार ग्राहक आहेत , तर ग्रामीण भागात ११ लाख २८ हजार  ग्राहक आहेत. त्यामुळे सुमारे ३० लाख ५२ हजार  एव्हड्या वीज ग्राहकांना वीज पुरवठा करताना मोठया प्रमाणात यातायात करावी लागते. वाढते शहरीकरण, वाढती लोकसंख्या याचा विचार केला तर पुढील काळात दूरदृष्टी ठेऊन मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा वाढवणे गरजेचे आहे. पायाभूत सुविधांच्या विस्तार व बाळकटीकरणा बरोबरच या अवाढव्य वीजयंत्रणांची देखभालीकडे देखील भविष्यात लक्ष देणे गरजेचे आहे. सार्वजनिक जागी असलेल्या वीजयंत्रणांची दुरावस्था आपण नेहेमीच बघतो. भविष्यात वेगाने येणाऱ्या विकास गंगेत पायाभूत सुविधा अधिक सक्षम व सुरक्षित असायला हव्यात, म्हणजेच दूरदृष्टी असलेले स्मार्ट नियोजन हवे.

समन्वय आवश्यक:
वेगाने वाढणारा विकासाचा सामना करताना नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेऊन विविध शासकीय, निमशासकीय तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनी हातात हात घेऊन विकास कामात समन्वय ठेऊन काम करावे लागेल. सद्यपरिस्थितीत महानगरपालिका, पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड, महावितरण, औद्योगिक विकास प्राधिकरण यांच्यात समन्वयाचा आभाव कमालीचा जाणवतो.

नागरिकांकडून अपेक्षा:

'सर्व गोष्टीं शासनानेच कराव्या' अशी आम्हा नागरिकांची धारणा असते. शासन असो किंवा महावितरण हे त्यांच्या परीने कार्यरत असतातच, तथापि सजग नागरिक म्हणून आपलेही योगदान विकासगंगेत द्यायला हवे.. महावितरण ने मोठ्या प्रमाणात खर्च करून आपल्यासाठीच उभारलेल्या रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर), फिडरपिलर्स च्या जवळ आपण कचरा टाकतो, ज्यामुळे आगी लागतात व अपघात होतात. नागरिकांनी याची दखल घ्यायला हवी. नागरिकांनी वीज बिले वेळेवर भरणे आवश्यक असते. नागरिक वीज बिले वेळेवर भरत नसल्याने महावितरणला स्वतःची अवाढव्य यंत्रणा चालवण्यासाठी पैश्यांची कायम चणचण  भासत असते. नागरिकांच्या सहकार्या शिवाय महावितरण सक्षमपणे व पूर्ण ताकदीने काम करू शकत नाही, हे ही आपण लक्षात घ्यायला हवे. महावितरणला विजेची चोरी हि देखील एक डोकेदुखी असते. वीज बिल बुडवणारे नागरिक आणि वीजचोरीला आला घालण्यासाठी महावितरण चा मोठ्या प्रमाणात पैशांचा व वेळेचं अपव्यय होतो. नागरिकांनी जबाबदारीने वागल्यास महावितरण ह्या पैशांचा व वेळेचा सदुपयोग इतर विकास कामात करू शकेल. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून नागरिक महावितरण ला मदत करू शकतात. महावितरण च्या वेबसाईटवर आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती असते. ही माहिती नागरिकांनी पाहायला शिकले पाहिजे. मोबाईल ऍप वरून विज बिले भरणे, तक्रारी करणे अशी कामे करणे सहज शक्य आहे. लोकसहभागा शिवाय कोणताही विकास कधीच होत नसतो. थोडक्यात पुणे आणि पुणे जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाचा आढावा घेतला तर असेच म्हणावे लागेल ' थोडा है, थोडेकी जरुरत है.'

राजीव जतकर.
माजी अध्यक्ष,
इलेक्ट्रिकल काँट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र,
पुणे.
विद्युत सुरक्षा मंच - पुणे.

मोबाईल नं : ९८२२०३३९७४




प्रसिद्धी : सकाळ - रविवार, १५ जानेवारी २०१७. 

Friday, 19 August 2016

विजेचा धक्का ( शॉक ) आणि प्रथमोपचार.

विजेचा धक्का ( शॉक ) आणि प्रथमोपचार.

विजेचा धक्का आणि त्याचे परिणाम :


जेंव्हा काही कारणांमुळे (उदा. वीज उपकरणात होणारी गळती किंवा लिकेज, खराब वायर्स, वीज उपकरणे वापरताना केलेला निष्काळजीपणा) वीजप्रवाह आपल्या शरीरातून वाहून जमिनीत जातो, त्यावेळी आपल्या शरीराला विजेचा धक्का बसतो. थोडक्यात शरीरातून वीज वाहताना शरीरावर जो परिणाम होतो त्याला विजेचा धक्का किंवा शॉक म्हणतात. अशा वेळी शरीरात मोठया प्रमाणात कंपने (थरथर) येतात. शरीरात मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. शरीरातील मज्जातंतूवर या विजेचा खूप परिणाम होतो. विजेचा धक्का बसलेली व्यक्ती खूप घाबरते व किंचाळते. विजेचा संपर्क झालेल्या उपकरणापासून दूर होण्याचा प्रयत्न करते. यात जण यश आले तर धोका काहीसा टाळतो. पण वीजगळती असलेल्या उपकरणापासून दूर होता आले नाही तर ती व्यक्ती उपकरणाला तशीच चिकटलेल्या अवस्थेत राहते. अशा वेळी मात्र धोका कित्येक पटीने वाढतो व प्राणघातक ही ठरतो.
विजेच्या धक्क्याची तीव्रता :
विजेच्या धक्क्याची तीव्रता बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. जसे...
- व्यक्तिपरत्वे शरीराकडून विजेच्या प्रवाहाला होणारा विरोध (रेझिस्टन्स) वेगवेगळा असतो. लहान मुलांच्या तुलनेत मोठ्या व्यक्तींचा बॉडी रेझिस्टन्स अधिक (साधारणपणे १००० ओहम्स) असतो.
-त्वचेच्या ओलसरपणावर ही विजेच्या धक्क्याची तीव्रता अवलंबून असते. कोरड्या त्वचेचा रेझिस्टन्स जास्त तर ओलसर त्वचेचा रेझिस्टन्स कमी असतो. म्हणूनच ओल्या हाताने विद्युत उपकरणे हाताळणे किंवा स्विच चालू बंद करणे टाळावे.

-व्यक्तीचा जमिनीशी संपर्क आल्यामुळे विजेचा धक्का बसतो. पायात रबरी बूट, चप्पल घातलेल्या व्यक्तीचा विजेशी संपर्क आल्यास वीज प्रवाह जमिनीत जाऊ शकत नाही आणि शॉक बसत नाही, पण पाय जमिनीस टेकल्यास विजेचा धक्का बसतो. म्हणून विजेची कामे करताना हातात रबरी हॅन्ड ग्लोव्हज, पायात रबरी बूट घालावेत, किंवा कोरड्या लाकडी पाटावर अथवा स्टुलावर उभे राहून काम करावे.
-शरीरातून वाहणाऱ्या विजेचे प्रमाण आणि संपर्कांचा कालावधी ह्यावरही विजेच्या ढाक्याची तीव्रता अवलंबून असते. साधारणपणे ३० मिली अम्पियर एव्हढा वीजप्रवाह ३० मिलिसेकंद इतक्या कालावधीसाठी शरीरातून वाहिल्यास तो धोकादायक ठरू शकतो. म्हणून अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर ( इ एल सी बी ) यासारखी उपकरणे घरात बसवल्यास शॉक बसण्याचा धोका पूर्णपणे टाळला जातो. कारण हा 'इ.एल.सी.बी.' व्यक्तीला शॉक बसताच ३० मिलिसेकंदात विद्युत प्रवाह खंडित करतो आणि व्यक्ती पूर्ण सुरक्षित राहाते.  
प्रथमोपचार :
भारतीय विद्युत नियमाप्रमाणे कारखान्यात किंवा कामाच्या जागी प्रथमोपचार पेटी ठेवणे बंधनकारक आहे. या प्रथमोपचार पेटीत प्रथमोचारासाठी आवश्यक असणारी औषधे, बँडेज, कापूस, आयोडीन, बर्नोल सारखी मलमे इत्यादी साहित्य ठेवणे आवश्यक असते. तसेच हि प्रथमोपचारपेटी सर्वांना दिसेल अशा ठिकाणे ठेवणेही गरजेचे आहे.  

   
 एखादी व्यक्ती विजेच्या संपर्कात येऊन शॉक बसल्यास सर्वप्रथम गळती असलेल्या वीज उपकरणाचा वीजपुरवठा बंद करावा किंवा मेनस्विच बंद करून टाकावा. प्लग सॉकेट मधून त्या उपकरणाचा पिन टॉप देखील काढून टाकावा. हे शक्य नसल्यास मदत करणाऱ्या व्यक्तीने कोरड्या लाकडी फळीवर किंवा सहज उपलब्ध असलेल्या वर्तमानपत्राच्या गठ्ठ्यावर उभे राहून लाकडी काठीने शॉक बाधित व्यक्तीला विद्युत उपकरणापासून दूर करावे. विजेचा शॉक बसलेली व्यक्ती घाबरलेली असते. त्यामुळे अशा व्यक्तीला प्रथम मानसिक धीर द्यावा. त्यामुळे बाधित व्यक्ती प्रथमोपचारांना चांगला प्रतिसाद देते. अपघात ग्रस्त व्यक्तीच्या भोवती गर्दी व गोंगाट करू नये. त्या व्यक्तीचे कपडे सैल करावेत. दुखापतीमुळे रक्त प्रवाह येत असल्यास तो त्वरित बंद करण्याचा प्रयत्न करावा. आजूबाजूला कोणी नसल्यास मदतीसाठी कुणाला तरी बोलवावे. डॉक्टरांना ही फोन करून बोलावून घ्यावे.
 कृत्रीम श्वासोच्छवास :
विजेच्या तीव्र धक्क्याने बाधित व्यक्ती कधी कधी बेशुद्ध पडते. काही प्रसंगी त्या व्यक्तीचा श्वास बंद पडू लागतो. अशावेळी अपघात ग्रस्त व्यक्तीला कृत्रिम पद्धतीने श्वासोच्छवास सुरु करण्याचा उपचार सुरु करणे आवश्यक असते. विजेच्या धक्क्याने बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीचा श्वासोच्छवास चालू आहे का नाही हे छातीवर कान ठेऊन हृदयाचे ठोके ऐकणे, छातीची होणारी हालचाल, श्वासोच्छवासाचा आवाज ऐकणे, नाकासमोर बोट धरून श्वास तपासणे,अश्या सोप्या तपासण्या करून ही समजू शकते. श्वासोच्छवास आणि हृदय बंद पडले असल्यास त्वरित कृत्रिम श्वासोच्छवासाचा प्राथमिक उपचार सुरु करावा. हे काम कोणताही सर्वसामान्य माणूस ही करू शकतो, आणि डॉक्टर येईपर्यंत त्याला पर्यायही नसतो.


- सर्वप्रथम अपघातग्रस्त व्यक्तीला पाठीवर सरळ झोपवावे.
- मन किंचितशी मागे झुकण्यासाठी त्या व्यक्तीच्या खांद्याखाली एखादी उशी किंचा ब्लॅंकेटची घडी ठेवावी. वर्तमानपत्राचा गठ्ठा ही अशा वेळी उपयोगी पडू शकतो.
- चित्रात दाखवल्या प्रमाणे अपघातग्रस्त व्यक्तीच्या डोक्याच्या बाजूला उपचार करणाऱ्या व्यक्तीने बसावे आणि बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीच्या छातीच्या मध्यभागावर दोन्ही हाताने दाब द्यावा व काढावा. 'दाब देणे आणि पुन्हा काढणे' अशी क्रिया अपघात ग्रस्त व्यक्तीचा श्वास पुन्हा चालू होईपर्यंत चालू ठेवावी.
- अशाप्रकारे कृत्रिम श्वासोच्छवास देऊन बेशुद्ध व्यक्ती पुन्हा शुद्धीवर आल्यावर या व्यक्तीला चहा, कॉफी सारखे सौम्य उत्तेजक पेय द्यावे. व नंतर डॉक्टरांकडे नेऊन त्याची संपूर्ण तपासणी करणेही आवश्यक असते.
  •  हे झाले प्रथमोपचार किंवा उपचार पद्धती, परंतु मुळात शॉक बसूच नये यासाठी घेतलेली काळजी सर्वात महत्वाची !


राजीव जतकर.
मोबाईल : ९८२२० ३३९७४.
ईमेल : electroline4929@gmail.com