Friday, 11 July 2025

 

पुन्हा एक स्वप्नवत धाड: 'रेड '

मनोहर धनकर उर्फ दादाभाई (रितेश देशमुख) आणि अमेय पटनायक (अजय देवगण

२०१८ साली प्रदर्शित झालेल्या 'रेड' चा 'रेड हा सिक्वेल नुकताच नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झालाय. मात्र रेड प्रमाणे हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित नाही. 'रेड ' हा चित्रपट देखील आधीच्या रेड प्रमाणेच स्वप्नवतच आहे. आता ना अशा चित्रपटातील नायकासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी असतात, ना आदर्श राजकारणी असतात. प्राप्तिकर चुकवणे हे देखील सर्रास सुरु असते. राजकारण्यांबद्दल तर बोलायलाच नको. मला बऱ्याचदा असं वाटतं की 'भ्रष्टाचार हा सर्वांच्याच सोयीचा असतो की काय?'. कारण भ्रष्टाचारासारख्या समाजाला लागलेलया रोगावर फारसे कुणी इलाज करताना दिसत नाही. भ्रष्टाचार ही गुंतागुंतीची गोष्ट आहे. चिरीमिरी देऊन आपापली कामे करून घेण्यात आपल्यासारखे सामान्य नागरिक धन्यता मानतात. भ्रष्टाचाराला विरोध करण्याचे धाडस कुणी करत नाही. त्यामुळे भ्रष्टाचार आपल्या समाजामध्ये सर्वमान्य असा गुन्हा आहे. राजकारण्यांपासून सामान्य लोकांपर्यंत झिरपलेला भ्रष्टाचार फार चिंतेची बाब आहे. निवडून आलेले बहुसंख्य राजकारणी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी आपल्या पदाचा, अधिकारांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करताना दिसतात. त्यातूनच खंडणी मागणे किंवा लाच घेणे किंवा देणे वगैरे सुरु होते. मते मिळवण्यासाठी बेहिशोबी संपत्ती जमा करून ती निवडणुकीमध्ये वापरताना ही मंडळी सर्रास दिसतात. नेमका हाच धागा पकडून 'रेड ' ची चित्रपटरुपी धाड प्रेक्षकांवर पुन्हा एकदा पडते.

 

अमेय पटनायक (अजय देवगण

२०१८ साली प्रदर्शित झालेल्या 'रेड' प्रमाणेच या ही चित्रपटात नायक अमेय पटनायक (अजय देवगण) ह्या आयकर विभागाच्या अति प्रामाणिक अधिकाऱ्या विरुद्ध मनोहर धनकर उर्फ दादाभाई (रितेश देशमुख) ह्या भ्रष्ट राजकाररण्याबरोबर चा संघर्ष दाखवला आहे. मात्र ज्या प्रभावी पणे हा संघर्ष जुन्या रेड मध्ये मांडण्यात आलेला होता, तेवढा 'रेड ' ह्या चित्रपटात दिसत नाही. एक नक्की की हा चित्रपट पाहताना जुना रेड आठवल्या शिवाय राहात नाही. स्वाभाविक पणे दोनीही चित्रपटांची तुलना होते आणि 'रेड ' हा चित्रपट कमी मार्कांनी कसाबसा काठावर पास होतो. अर्थात हा चित्रपट अगदीच वाईट नाहीये. अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. का कुणास ठाऊक अजय देवगण हा अभिनेता मला फारसा आवडत नाही. त्याचे अपवादात्मक चित्रपट सोडले तर तो मला कधी आवडला नाही. 'रेड २' या चित्रपटात (अजय देवगांच्या चाहत्यांची माफी मागून) अजय देवगण मला कायम झोपेतून उठलेला, अर्धवट डोळे उघडे ठेवत आणि अति गंभीरपणे, उगाचच अति खर्जात बोलताना दिसतो. बऱ्याच प्रसंगात तर तो मला पारोसा किंवा अंघोळ करताच वावरताना दिसला. त्याचा अभिनय संपूर्ण चित्रपटात एकसारखाच वाटतो. आधीच्या रेड मध्ये तसा तो बरा वाटला होता.

 

मनोहर धनकर उर्फ दादाभाई (रितेश देशमुख)

रितेश देशमुख हा माझा आवडता अभिनेता. रेड मधील त्याची भूमिका नकारात्मक असूनही तो जास्त भाव खाऊन जातो. बेहिशोबी अमाप संपत्ती लपवून ठेवताना समाजासमोर अतिशय आदर्श राजकारण्यांच्या भूमिकेत तो दिसतो. अभिनयाच्या बाबतीत या चित्रपटात मी त्याला जास्त मार्क देईन. पूर्वीच्या रेड चित्रपटातील ताऊजी च्या भूमिकेतील अनुभवी अभिनेते 'सौरभ शुक्ला' यांचा अभिनय कोण विसरेल? हेच ताऊजी रेड ह्या चित्रपटात अधून मधून हजेरी लावतात. मात्र सौरभ शुक्ला यांच्यासारख्या दिग्गज कलाकाराचा वापर दिग्दर्शकाला करून घेता आला नाही. अमेय पटनायक ह्याच्या पत्नीच्या मालिनी पटनायक हिच्या भूमिकेतील 'वाणी कपूर' हीचा अभिनय ठीकच आहे, तथापि ती या चित्रपटात का आहे? असा मला प्रश्न पडलाय. सुप्रिया पाठक (दादाभाई यांची आईच्या भूमिकेत), लल्लन सुधीर (अमेय पटनाईक याच्या सहकाऱ्याची भूमिका साकारणारा) 'अमित सियाल', ब्रिजेंद्र काला, यशपाल शर्मा, रजतकपूर कौल (यांनी चीफ इनकम टॅक्स ऑफिसरची भूमिका केलीये) यांनी आपल्या भूमिका छान वठवल्या आहेत. त्यातही 'अमित सियाल' हे आपल्या लक्षात राहतात. त्यांच्या अभिनयाचं कौतुक करेल तितकं थोडच आहे.

 

अमित सियाल

या चित्रपटात अनेक त्रुटी असून देखील मध्यंतरानंतर उत्तरार्धात हा चित्रपट उत्कंठावर्धक आणि अनेक धक्कादायक वळणे घेत अपेक्षित शेवटाकडे येतो. या चित्रपटातील गाणी कंटाळवाणी आहेत. तमन्ना भाटिया हिचं आयटम सॉंग काहीही गरज नसताना घेतलंय (आंबटशौकीन प्रेक्षकांसाठी ते कदाचित आवश्यक असावं). मात्र सुधीर चौधरी यांचं छायाचित्रण झकास आहे. संदीप फ्रान्सिस यांच्या एडिटिंग मुळे आणि अमित त्रिवेदी यांच्या पार्श्वसंगीतामुळे चित्रपट बराचसा गतिमान झालाय. थोडक्यात 'रेड ' हा असा एक चित्रपट आहे की जो रितेश देशमुख, अमित सियाल, सौरभ शुक्ला यांच्या अभिनयासाठी, तसेच प्रामाणिकपणा विरुद्ध भ्रष्टाचार यांच्यातील थरारक लढाई अनुभवण्यासाठी एकदा जरूर बघण्यासारखा आहे. अजय देवगण यांचे चाहते तर हा चित्रपट बघतीलच. अजून एका कारणासाठी हा स्वप्नवत चित्रपट बघायला हरकत नाही. आपण सर्वसामान्य माणसे नेहेमी एक स्वप्न बघत असतो. 'आपल्या देशातून भ्रष्टाचार समूळ नष्ट झाला आहे, सर्व सरकारी अधिकारी अतिशय प्रामाणिकपणे, विना मोबदला (लाच), सर्व कामे वेळेत आणि नम्रपणे करत आहेत. गुंड राजकारण्यांची भीडभाड ठेवता, त्यांचा कोणताही दबाव मानता सर्व कर्तव्यदक्ष अधिकारी आपापले कर्तव्य पार पडत आहेत.' पण हे सर्व स्वप्नवतच ! वस्तुस्थिती मात्र नेमकी उलटी...

 

अशा स्वप्नात दोन तास रमायचं असेल तर रेड आणि रेड हे चित्रपट बघावेत. 'अशक्यप्राय गोष्टी सत्य आहेत' असा आभास निर्माण करून थोडा वेळ आनंद मिळवायला काय हरकत आहे? 'असे स्वप्नवत चित्रपट बघून दोन तास जीवाची करमणूक करून घेणे' एवढेच काय ते आपल्यासारख्याच्या सामान्यांच्या हातात राहाते. असो...  

 

राजीव जतकर.

जुलै २०२५.