Wednesday, 4 December 2024

नॉस्टॅलजिया

 

नॉस्टॅलजिया


आज
सोशल मीडियावर एक व्हिडीओ पहिला आणि माझ्या पूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. १९७४/७५ साल असावं. नुकतीच माझी ११वी (जुनी एस.एस.सी ची शेवटची बॅच) होती. वडील रेव्हेन्यू खात्यात नोकरीला असल्याने दरवर्षी बदली ठरलेलीच. मात्र त्यावर्षी मात्र कहरच झाला. मी इस्लामपूर कॉलेज मध्ये असताना मधेच आमची सांगलीला बदली झाली. मग इस्लामपूर कॉलेज आणि विलिंग्डन या कॉलेज मधील अभ्यासक्रमातील प्रचंड तफावतीमुळे मी वडिलांशी चर्चा करून त्या वर्षी शिक्षणातून गॅप घ्यायची ठरवली.

 


पण शिक्षण नाही, कॉलेज नाही तर मग करायचं तरी काय? मग चांगला वेळ घालवण्यासाठी सकाळचे भरपूर फिरणे, व्यायाम वगैरे सुरु केले. इंग्रजी भाषेचा संपर्क राहण्यासाठी सांगली गावभागातल्या सांभारे गणपतीच्या जवळ रानडे नावाच्या इंग्रजी भाषा तज्ज्ञांकडे शिकवणी लावली. मला लहानपणापासूनच संगीताची आवड असल्याने वडिलांनी तिसरी चौथी पासूनच तबल्याचे शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले होते. त्यामुळे तबल्याचे शिक्षण सुरु ठेवले होते. मला लहानपणापासून फोटोग्राफी चे विशेष आकर्षण होते. मला या वर्षीच्या शिक्षणातील गॅप मुळे फोटोग्राफीचा छंद जोपासण्याची नामी संधीच चालून आली होती. आमच्या परिचयातील एका फोटोग्राफरच्या स्टुडिओमध्ये मी जाऊ लागलो. या फोटोग्राफरच्या कामात मदत करता करता मी फोटोग्राफीमधील धडे घेऊ लागलो. रोज सांगली आणि आजूबाजूच्या परिसरातील फोटो काढून त्या फोटोफिल्म वर प्रक्रिया करत माझा छंद जोपासू लागलो. त्याकाळी डिजिटल जमाना नव्हता. फोटो काढून झाल्यावर डार्करूम मधील अंधारात कॅमेऱ्यातील फिल्म काढून त्यावर त्यावर रासायनिक प्रक्रिया करावी लागे. डेव्हलप केलेल्या फिल्म च्या प्रिंट काढणे हे एक कौशल्याचे काम असे.  फिल्म डेव्हलप करताना आणि प्रिंट काढताना फिल्मला काही सेकंदांचा लाईट द्यावा लागत असे. या टायमिंग मध्ये थोडी जरी चूक झाली तरी प्रिंट बिघडे. मी घरीच लाकडाच्या फळ्यांचा वापर करून एक प्रिंटर केला होता. चादरींचा वापर करून कॉटखाली मी माझी घरगुती डार्करूम देखील केली होती. अशाप्रकारे त्या वर्षातला रिकामा वेळ सत्कारणी लावण्यासाठी मी छन्द जोपासले होते, पण तरी देखील बराच रिकामा वेळ असे.

 


आम्ही त्याकाळी सांगलीतील गाव भागातल्या संभारे गणपती जवळच्या जोशी वाड्यात राहत होतो. एकदा मी आणि वडील जवळच असलेल्या मारुती मंदिरात गेलो होतो. या मंदिराच्या भोवती अनेक छोटी छोटी दुकाने होती. त्यातील एका घड्याळाच्या दुकानात आम्ही गेलो. तिथे एक वयस्क घड्याळजी बसलेले होते. ते वडिलांचे परिचित होते. बोलता बोलता मी त्यांना विचारले 'मला घड्याळाची दुरुस्ती आणि देखभाल कशी करायची ते शिकवाल का? शिकता शिकता मी तुम्हाला तुमच्या कामात मदत करेन.  त्यासाठी मला कसल्याही पैशांची अपेक्षा नाही.' त्या घड्याळजी आजोबांनी मला आनंदाने होकार दिला. त्या दिवसापासून माझे घड्याळ दुरुस्तीचे प्रशिक्षण सुरु झाले. घड्याळाची अंतर्गत रचना अतिशय क्लिष्ट, नाजूक आणि अतिशय बारीक असते. त्यातही मनगटावरील (रिस्टवॉच) घड्याळाची रचना अति सूक्ष्मच असते. डोळ्याला भिंग लावल्याशिवाय दुरुस्ती करताच येत नाही. दुरुस्तीची अवजारे देखील छोटीच असतात. सुमारे वर्षभर मी हे काम करत असे. ह्या कामात कमालीची एकाग्रता लागायची. मनगटावरील घड्याळे, त्यातही लेडीज घड्याळे दुरुस्त करताना मान मोडून यायची. या मनगटी घड्याळाचे छोटे छोटे भाग मी पूर्णपणे वेगळे करून ते पुन्हा जोडण्याचे कसब शिकलो होतो. माझ्या ह्या घड्याळ दुरुस्तीच्या शिक्षणाबरोबर दुकानाच्या वयस्कर मालकांच्या कामात हातभार लावताना मला विलक्षण समाधान मिळत असे.

 


पुढे शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात आलो. शिक्षणानंतर वेगळाच व्यवसाय सुरु केला आणि पैसे मिळवण्याच्या भानगडीत माझे सर्वच छंद मागे पडले. आता ह्या आठवणी बऱ्याचशा धूसर झाल्या आहेत. आता ५० वर्षांपूर्वीचे माझे फोटोग्राफी आणि घड्याळ दुरुस्तीचे काम शिकवणाऱ्या माझ्या गुरूंची नावेही माझ्या विस्मरणात गेली आहेत. आपलं आयुष्य समृद्ध करणाऱ्यांची आठवण झाली की मन काहीसं हळवं होतं.   

 

 राजीव जतकर

१९ नोव्हेंबर २०२४   

No comments:

Post a Comment