Wednesday, 2 October 2024

आय.सी. ८१४ - विमान अपहरण.

 

आपण खरंच जिंकलो?

 आय.सी. ८१४ - विमान अपहरण.


काही काही चित्रपट किंवा वेब सिरीजचा प्रभाव प्रेक्षकांच्या मनावर बऱ्याच काळापर्यंत कायम रहातो. जसे तापसी पन्नूचा 'थप्पड', बाल्तासार कोर्माकुरचा 'ऍड्रिफ्ट', रॉबर्ट रेडफ़ोर्टचा 'ऑल इज लॉस्ट', सुमित्रा भावेंचे 'एक काप च्या', 'कासव', 'गाभ्रीचा पाऊस' असे अनेक चित्रपट संवेदनशील प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतात. नुकतीच २९ ऑक्टोबरला २०२४ या दिवशी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली आय.सी. ८१४ - कंदहार हायजॅक' ही सहा भागांची छोटी वेब सिरीज माझ्या पाहण्यात आली, आणि मी सुन्न झालो. ही वेबसीरीज भारताच्या विमान वाहतूक इतिहासातील सर्वात वाईट आणि दुर्दैवी अशा घडलेल्या सत्य घटनेवर आधारलेली आहे. ही वेब सिरीज भारतापुढे असलेली राजनैतिक आव्हाने, देशाच्या सुरक्षेप्रती असलेल्या अडचणी, भारताची आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी, त्यातील मर्यादा, अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकते. डिसेंबर १९९९ ला इस्लामिक दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाईन्स चे विमान क्र. आय.सी. ८१४ चे अपहरण केले होते. सर्वसाधारणपणे सर्वच भारतीयांना ही घटना माहिती आहेच. मला देखील माहिती होती. पण ही बेबी सिरीज बघताना या अपहरणातल्या घटनेचे गांभीर्य मला नव्याने जाणवले. या भयंकर विमान अपहरणादरम्यान नेमके काय घडले? अपहरण झालेल्या विमानातील १८० भारतीय प्रवाशांना आठ दिवस कोणत्या तणावाखाली राहावे लागले? प्रवाशांना काय अडचणी आल्या? भारताच्या तत्कालीन पंतप्रधानांना म्हणजे अटलबिहारी वाजपेयी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला कोणत्या तणावातून जावे लागले? याची तपशीलवार माहिती या वेब सिरीज मधून मिळते. विमान अपहरणाचा प्रत्यक्ष भयंकर अनुभव घ्यायचा असेल तर ही वेब सिरीज बघायलाच हवी. 

 


२४ डिसेंबर १९९९ रोजी नेपाळमधील काठमांडूमधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळाकडे जाणाऱ्या विमानाचे मुस्लिम कट्टरपंथीय दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. विमानाचे प्रमुख चालक कॅप्टन देवी शरण आपल्या नेहेमीच्या शैलीत शांतपणे आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने विमानाचे सारथ्य करत होते. अचानकपणे चेहेऱ्यावर बुरखे घातलेल्या पाच अतिरेक्यांनी विमानाचा ताबा घेतला. विमानातील प्रवाशांमध्ये एकाच गोंधळ उडाला. थोड्याच वेळात काठमांडू विमानतळावर विमानाच्या अपहरणाची बातमी पोहोचली. तेथील विमानतळावरील अधिकाऱ्यांनी आपलया असंवेदनशील वृत्तीचे दर्शन घडवले. ते म्हणाले 'विमान भारताचे आहे, दिल्लीला चाललेले आहे. त्यांचे ते बघून घेतील.' इकडे दिल्ली विमानतळावर देखील अपहरणाची बातमी पोहोचली. सर्व भारतीय यंत्रणा कामाला लागल्या. 'रॉ' (रिसर्च अँड अनॅलिसिस विंग) तसेच आय.बी.(इंटेलिजन्स ब्युरो), एम. . . (मिनिस्टर ऑफ फॉरेन अफेअर्स) वगैरे खात्यातील वरिष्ठ अधिकारी एकत्रीत येऊन ह्या विमानाच्या अपहरणाच्या आपत्तीचे कसे निवारण करता येईल? ह्यावर खलबतं करू लागली. दिल्ली विमानतळावर पत्रकार मंडळी जमू लागली. पत्रकारांना अशा प्रक्षोभक बातम्यांची गरज असतेच. टीव्हीवर ह्या विमान अपहरणाच्या बातम्या प्रसारित होऊ लागल्या. अपहरण झालेल्या विमानातल्या प्रवाशांचे नातेवाईक विमानतळावर गर्दी करू लागले. आक्रोश करू लागले. एकच गोंधळ उडाला होता.

 


  इकडे अपहरण झालेल्या विमानातील प्रवाशांमध्येही घबराट पसरली होती. विमानाचे पायलट कॅप्टन देवी शरण शांतपणे परिस्थिती हाताळत होते. अपहरणकर्त्यांनी पायलटला विमान काबुल कडे नेण्यास सांगितले. परंतु काबूल पर्यंत जाण्यासाठी लागणारे विमानातील इंधन अपुरे होते. कॅप्टन रवी शरण यांनी तशी कल्पना अतिरेक्यांना दिली. इंधन भरून घेण्यासाठी हे विमान अमृतसरला उतरवण्यात आले. ही संधी साधून भारतीय सैन्य दलातील कमांडोज ताबडतोप अमृतसर कडे रवाना झाले. तोपर्यंत अतिरेक्यांना चर्चेत गुंतवून वेळ काढण्याचा प्रयत्न सुरु झाला. पण विमानातील दहशतवाद्यांना इंधन भरण्यास वेळ काढला जातोय अशी शंका आली. त्यामुळे पेट्रोल भरताच विमान तातडीने पाकिस्तानातल्या लाहोरकडे नेण्यास अतिरेक्यांनी देवी शरण यांना भाग पाडले. पाकिस्तान ने सुरवातीला हे अपहरण झालेले विमान लाहोर विमानतळावर उतरवण्यास परवानगी नाकारली. इतकेच काय पण विमान उतरू नये म्हणून विमानतळावरील रन-वे वरील दिवे देखील बंद करण्यात आले. त्यामुळे पुन्हा आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. विमान लाहोर विमानतळावर आकाशातच घिरट्या घालू लागले. आता कोणत्याही क्षणी इंधनाअभावी विमान कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण सुदैवाने बऱ्याच मिनतवारी नंतर हे अपहृत विमान लाहोर विमानतळावर उतरवण्यास परवानगी मिळाली. 'पेट्रोल भरून झाल्यावर लगेचच ह्या विमानाने लाहोर विमानतळ सोडला पाहिजे' अशी अट कॅप्टन देवि शरण यांना घालण्यात आली. इंधन भरल्यावर अतिरेक्यांनी हे विमान दुबईला नेले. यूएई मधील अल-मिन्हाद विमान उतरवण्यात आले. या ठिकाणी विमानातील २७ प्रवाशांना अतिरेक्यांनी सोडून दिले. नंतर हे विमान अफ़गाणिस्तान मधील कंदहार येथे नेण्यात आले. अफ़गाणिस्तान मध्ये तालिबान्यांचे राज्य आहे. तालिबान्यांनी अपहरणकर्ते आणि भारत सरकार यांच्यात मध्यस्थी करायचे मान्य केले आणि वाटाघाटींचचा पुढचा अध्याय सुरु झाला. 

 


पाकिस्तानातल्या 'हरकत-उल-मुजाहिद्दीन' या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या ह्या पाच दहशतवाद्यांनी या विमानातल्या ओलीस धरलेल्या कर्मचाऱ्यांसहित १८० प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात भारतीय तुरुंगात असलेल्या ३६ दहशतवाद्यांना सोडण्याची मागणी केली. शिवाय २०० दशलक्ष डॉलर्स एवढ्या खंडणीची देखील मागणी केली. तालिबानने अपहरणकर्त्यांची खंडणीची मागणी मागे घेण्यासाठी मन वळवले. तसेच ३६ दहशदवाद्यांऐवजी अहमद उमर सैद शेख, मौलाना मसूद अजहर आणि मुश्ताक अहमद जरगर या फक्त तीन अतिरेक्यांची सुटका भारताने करावी अशी मध्यस्थी केली. विमानातल्या प्रवाशांच्या नातेवाईकांचा तीव्र दबाव, तसेच सरकारातील अंतर्गत वादा नंतर भारत सरकारने तीन अतिरेक्यांच्या सुटकेस सहमती दर्शवली. त्यावेळी अटलबिहारी वाजपयी ह्या वाटाघाटीस तयार नव्हते. पण सामाजिक आणि राजकीय दबावामुळे त्यांना हा निर्णय घेण्यास भाग पडले. तत्कालीन परराष्ट्र मंत्री 'जसवंत सिंह' ३० डिसेंबरच्या संध्याकाळी या तीन अतिरेक्यांना घेऊन एका स्वतंत्र विमानाने अफगाणिस्तानच्या कंदहारला रवाना झाले. तीन अतिरेकी आणि भारतीय ओलीस प्रवासी यांची देवाणघेवाण झाली. २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर या दिवसांच्या अपहरणाचे भयंकर नाट्य संपुष्टात आले.

 


या घटनेनंतर आय.सी. ८१४ विमानाचे वैमानिक कॅप्टन देवी शरण यांनी या थरारक घटनेतील त्यांना आलेल्या अनुभवांवर आधारित 'फ्लाईट इन टू फियर: कॅप्टन्स स्टोरी' हे पुस्तक लिहिले. ह्या पुस्तकावरून प्रेरित होऊन ही वेब सिरीज प्रदर्शित करण्यात आली आहे. या वेब सिरीज मध्ये कॅप्टन देवी शरण यांची भूमिका' विजय वर्मा' ह्या अभिनेत्याने केली आहे. या शिवाय मनोज पहावा, नसरुद्दीन शहा, कुमुद मिश्रा, दक्षिण चित्रसृष्टीतील अरविंद स्वामी, पंकज कपूर, दिया मिर्झा अशा अनेक तगड्या कलाकारांमुळे ही वेब सिरीज अफाट झाली आहे. या वेब सिरीजचे दिग्दर्शन 'अनुभव सिन्हा' यांनी केलं आहे. अनुभव सिन्हा हा माझा आवडता दिग्दर्शक आहे. त्याचे आर्टिकल १५, मुल्क, थप्पड या सारखे अनेक चित्रपट नोंद घ्यावी असे आहेत. 'आय.सी. ८१४' ही वेब सिरीज एकूण सहा भागांची आहे. सुरवातीचे भाग काहीसे संथ असले तरी जस जशी ही थरारक घटना पुढे सरकते तस तशी ही वेब सिरीज आपल्या मनाची पकड घेते. या वेब सिरीज मधील काही प्रसंगांचे चित्रण अफलातून आहे. पाकिस्तानातील लाहोर विमानतळावरील अपहृत विमान लॅण्ड होताना आपल्या हृदयाचा ठोका चुकतो. ह्या प्रसंगाचे चित्रण कमालीचे आकर्षक झालंय. ह्या सिरीज मधील संवाद देखील आपल्याला खिळवून ठेवतात. सात दिवसांच्या ह्या विमान अपहरणात अडकलेल्या भारतीय प्रवाशांची अवस्था काय झाली असेल? कोणत्या मानसिक अवस्थेतून ते गेले असतील? ह्याची पुरेपूर कल्पना आपल्याला येते. ह्या विमान अपहरणादरम्यान कोणत्याही प्रवाशाला बाहेर जाण्याची परवानगी नसते, तर कुणाला आत येण्याची. विमानाच्या आत असलेली टॉयलेट्स अक्षरशः भरून वाहायला लागलेली असतात. संपूर्ण विमानात दुर्गंधी पसरलेली असते. ह्या आणि अशा अनेक अडचणींचे चित्रण आपल्याला भावुक करून सोडते. अभिनयाच्या बाबतीत सर्वच कलाकार आपापली छाप सोडतात. त्यातही कॅप्टन देवी शरणच्या भूमिकेतील 'विजय वर्मा' आणि रॉ च्या रंजन मिश्रांची भूमिका करणारे 'मनोज पहावा' यांचा अभिनय आपल्या विशेष लक्षात राहातो. पाच अतिरेक्यांच्या भूमिकेतील कलाकार मात्र अभिनयात कमी पडतात. ते फारसे भीतीदायक किंवा क्रूर वाटतच नाहीत. यांचे कास्टिंग करताना काहीतरी चुकलंय असं वाटतं. असो... 

 


या छोट्या वेब सिरीज मधील काही प्रसंग आपल्याला विचार करायला भाग पाडतात. तीन अतिरेकी आणि ओलीस ठेवलेले विमान प्रवासी यांची शेवटी देवाण घेवाण सुरु असते. त्याच वेळी अपहरणकर्त्यांबरोबर वाटाघाटींच्या प्रक्रियेत महत्वाची कामगिरी करणारे रॉ,आय.बी. आणि एम...(मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स) या विभागातील चार वरिष्ठ अधिकारी ही देवाणघेवाण बघत कंदहार विमानतळावर काहीसे लांबवर उभे असतात. गेले काही दिवस आपल्याला कोणकोणत्या दिव्यातून जावे लागले याचा ते विचार करत असतात. प्रत्येकाच्या मनात विचारांचे काहूर माजलेले असते. चौघेही निःशब्द असतात. अचानक त्यांच्यात छोटासा संवाद घडतो.

रॉ चे राजन मिश्रा: So We Won.. (अशाप्रकारे आपण जिंकलो)

एम... चे डीआरएस: Did We? (खरंच आपण जिंकलो?)

आय.बी. चे मुकुल मोहन: We Fought (पण आपण लढलो)

एम... चे डीआरएस: Did We? (खरंच आपण लढलो?)

चौघेही निःशब्द होऊन पुन्हा विचारात गढून जातात...

 

हा प्रसंग आपल्याला मात्र विचारात घेऊन जातो. माझ्या मनात विचार आला की भारता ऐवजी इस्राईल हा देश असता तर? त्यांनी हे प्रकरण कसे हाताळले असते? आपण तीन अतिरेक्यांना सोडून चूक तर केली नाही ना? कारण भारताने ह्या अपहरणाच्या नाट्यानंतर जे तीन अतिरेकी सोडले, त्यांनी पुढील काळात भारतभर अनेक दहशतवादी कारवाया केल्या, आणि शेकडो निरपराध भारतीयांचे बळी घेतले. 'मुश्ताक अहमद झरगर' ह्याने लगेचच २००१ मध्ये 'जैश महंमद' ह्या दहशदवादी संघटनेची स्थापना करून भारताच्या संसदेवर हल्ला केला. या शिवाय २००८ मुंबईतील दहशदवादी हल्ला, २०१६ मधील पठाणकोट मधील भारतीय हवाईदलाच्या तळावर झालेला हल्ला, २०१९ मधील पुलवामा हल्ला, ह्यात हे कंदहार विमान अपहरणाच्या सोडलेले दहशदवादी सामील होते. कंदहार विमान अपहरणाच्या वेळी तीन अतिरेकी सोडण्याच्या वाजपेयी सरकारच्या निर्णयावर अनेकांनी आक्षेप घेतला होता, टीका केली होती. पण १८० निरपराध नागरिकांना या अपहरणातून सोडवणे तितकेच महत्वाचे नव्हते काय? 

 

ही वेब सिरीज नेटफ्लक्सवर उपलब्ध आहे. 

 

राजीव जतकर

ऑक्टोबर २०२४.     

 

 

 

No comments:

Post a Comment