तुरुंगवास भोगलेल्या एका भूतपूर्व आय.पी. एस. अधिकाऱ्याची डायरी
'तुरुंगरंग'
लेखक: ऍड. रवींद्रनाथ पाटील.
(मला आवडलेलं पुस्तक)
मध्यंतरी रविवार, दि. १३ ऑक्टोबर २०२४ या दिवशी होणाऱ्या एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण मिळालं. नवीपेठेतील पत्रकार भवनामध्ये रवींद्रनाथ पाटील यांनी लिहिलेल्या 'तुरुंगरंग' ह्या पुस्तकाचे प्रकाशन होते. मी अर्थातच ह्या कार्यक्रमाला हजेरी लावली. हा प्रकाशन सोहळा अतिशय नेटका झाला. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती
अंबादास जोशी यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुणे माजी आय.पी.एस. अधिकारी आणि कारागृह विभागाचे निवृत्त डि.आय.जी. श्री रवींद्र केदारी यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात माजी आय.ए.एस. अधिकारी डॉ. विजय पिंगळे यांनी तुरुंगरग या पुस्तकाचे लेखक रवींद्रनाथ पाटील यांची मुलाखत घेतली. सर्वच मान्यवरांचे ओघवते विचार ऐकणे ही सर्वांसाठी एक मेजवानीच होती. सुमारे अडीच तीन तास कसे गेले ते कळलेच नाही. कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती. गच्च भरलेल्या पत्रकार भवनाच्या प्रेक्षागृहात पाठीमागे आणि जागा मिळेल तिथे श्रोते उभे होते. तुरुंग, न्यायव्यवस्था यांतील बारकाव्यांनिशी तपशील, यंत्रणेतील त्रुटी अश्या वेगळ्याच विषयांवरील विचार ऐकताना कधीही न अनुभवलेल्या अनुभूतीतून मी जात होतो. प्रकाशनाचा कार्यक्रम संपल्यावर मी अर्थातच उत्सुकतेने 'तुरुंगरंग' हे पुस्तक विकत घेतले. हे पुस्तक 'मनोविकास प्रकाशन' या संस्थेने प्रकाशित केलं आहे. मनोविकास चा देखील तिथे एक स्टॉल होता. मनोविकासने आत्तापर्यंत प्रकाशित केलेली अनेक पुस्तके तिथे विक्रीसाठी उपलब्ध होती. खूप वेगळ्या विषयावरची पुस्तके होती. त्यातील दोन तीन पुस्तके देखील मी विकत घेतली.
घरी येऊन मी लगेचच ‘तुरुंगरंग' वाचायला घेतलं. तब्बल ४२३ पानांचं हे जाडजूड पुस्तक मी हातात घेतल्यावर सुरवातीला माझ्या छातीत धडकीच भरली. वाटलं एव्हडे मोठं पुस्तक मी कधी वाचणार? पण सुरवातीलाच असलेली जेष्ठ बांधकाम व्यावसायिक श्री डी. एस. कुलकर्णी त्यांची प्रस्तावना आणि पुस्तकाचे लेखक श्री रवींद्रनाथ पाटील यांचे मनोगत वाचताना माझ्या लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं पुस्तक आहे. आपल्याला पूर्णपणे अनभिज्ञ असलेला विषय समजावून घेता घेता मी माझ्याही न कळत पुस्तकाची पाने उलटू लागलो. थोड्या वेळाने मी अक्षरशः अधाशासारखा वाचू लागलो. पुस्तकात पार गुंतून गेलो. पुढील काही दिवसात पुस्तकाचा पार फडशाच पडला. पुस्तक वाचून संपल्यावर आलेला माझ्या मनाचा सुन्नपणा अजून जात नाहीये.
या पुस्तकाचे लेखक ऍडव्होकेट रवींद्रनाथ पाटील हे माझ्या मित्रपरिवारातील एक उच्चशिक्षित व्यक्तिमत्व ! 'बी.इ', 'एल.एल.बी'., 'डिप्लोमा इन सायबर लॉ' असे चौफेर शिक्षण घेऊन त्यांनी टाटा इन्फोटेक या सॉफ्टवेअर कंपनीत संगणक अभियंता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. पुढील काळात चढत्या आलेखाने त्यांची कारकीर्द बहराला येऊ लागली. २००२ मध्ये भारतीय व्यापार सेवेत (आय.टी.एस.) अधिकारी म्हणून निवड झाली. २००४ मध्ये भारतीय पोलीस सेवेत 'आय.पी.एस.' अधिकारी म्हणून ते रुजू झाले. २०१० नंतर कॉर्पोरेट क्षेत्रात त्यांना देश-विदेशात काम करण्याची त्यांना संधी मिळाली. भोपाळ येथील नॅशनल ज्युडिशियल अकादमीत देशातील उच्चन्यायालयाच्या न्यायमूर्तींना सायबर तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देखील त्यांनी दिले. पुढे दुर्दैवाने प्रशासनाच्या एका तथाकथित आरोपामुळे या माजी आय.पी.एस. अधिकाऱ्याला मार्च २०२२ मध्ये अटक होऊन तब्बल १४ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. १९ मे २०२३ रोजी जामीन मिळून ते तुरुंगाबाहेर आले. त्यानंतर रवींद्रनाथ पाटील यांनी सहा महिने तुरुंगातील त्यांच्या अनुभवांवर आधारित लेखनामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं. सदर पुस्कासाठी आवश्यक असणारी कच्ची टिपणे, मुद्दे लेखकाने त्यांच्या तुरुंगातील वास्तव्यामध्येच लिहिलेली होती. त्यांनी तुरुंगातील मुक्कामात त्यांना जाणवलेली वास्तवे अतिशय धाडसाने आणि कुणाचाही मुलाहिजा न बाळगता स्पष्टपणे लिहिलेली आहेत. तुरुंगाबाहेर आल्यावर लेखकाने आपल्या कच्च्या लेखनाला पक्क्या मसुद्याचे स्वरूप दिले. या लेखकाच्या लेखनावर मनोविकास प्रकाशनाच्या श्री आशिष पाटकरांनी आणि सहकाऱ्यांनी पुस्तक निर्मितीसाठी आवश्यक असणारे योग्य ते संस्कार करत 'तुरुंगरंग' हे अप्रतिम पुस्तक प्रकाशित केलंय.
लेखक : श्री. रवींद्रनाथ पाटील. |
लेखक रवींद्रनाथ पाटील यांचे संपूर्ण लेखन अतिशय सहज, साध्या आणि सोप्या भाषेत आहे. लेखकाने हे पुस्तक लिहिताना कुठलाही साहित्यिक असल्याचा आव आणलेला दिसत नाही. किंबहुना या पुस्तकाद्वारे लेखकाला कुठेही साहित्यिक म्हणून प्रस्थापित व्हायचं नाहीये असं दिसतं. त्यामुळे त्यांच्या लिखाणात उगाचच अवघड शब्दांचं अवडंबर नाही. सदर पुस्तकात तुरुंगातील कैद्यांचे प्रश्न मांडताना लेखक 'पुस्तक मनोरंजक होईल' ह्याची देखील काळजी घेताना दिसतात. लेखकाच्या लेखनाची शैली इतकी प्रभावशाली आहे की हे पुस्तक वाचताना ‘मी जणू लेखकाच्या तुरुंगातील खोलीतल्या एका कोपऱ्यात बसून लेखकाबरोबर प्रत्यक्ष तुरुंगवास अनुभवतोय’ असा मला भास होत होता. तुरुंगात जाणे, मग ते कुठल्याही कारणाने असो, हा काही आनंददायी अनुभव नसतोच, तर तो एक जीवघेणा अनुभव असतो. आणि असा अनुभव घेताना सर्वसामान्य माणूस शाररिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या अक्षरशः कोलमडतोच. पण लेखक रवींद्रनाथ पाटील ह्यांनी मात्र या भयंकर अनुभवाला मोठ्या धैर्याने तोंड दिले, एवढेच काय पण ते आपली सर्जनशीलता, संवेदनशीलता जागृत ठेवत तुरुंगातल्या अनुभवांची शिदोरी तुरुंगाबाहेर येऊन मुद्देसूदपणे लिहून ठेवतात हे आश्चर्यकारक आहे. लेखकाची आकलनशक्ती, निरीक्षण करण्याची क्षमता अफाट आहे. तुरुंगातील अनेक बारकावे, कैद्यांची मानसिकता, कैद्यांची दिनश्चर्या, तुरुंगातील भिंती, तुरुंगाचा आराखडा, शौचालयाची दुरवस्था, कैद्यांचे आरोग्य व त्यातील समस्या, तृतीयपंथी कैद्यांच्या समस्या या आणि अश्या अनेक विषयांवर लेखक धाडसाने आणि स्पष्टपणे लिहितात.
लेखक : श्री. रवींद्रनाथ पाटील. |
हे पुस्तक वाचल्यावर कुठलाही संवेदनशील वाचक अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. वाचकांना विचारांच्या खोल गर्तेत घेऊन जाण्याची क्षमता रवींद्रनाथ पाटील यांच्या लिखाणात नक्कीच आहे. माझ्या मनात विचार आला की मुळात तुरुंग किंवा कारागृहाची संकल्पना का निर्माण झाली असावी? गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी तुरुंग किंवा कारागृहे निर्माण झाली. पण तेवढ्याच उद्देशाने कारागृहे चालवावीत का? तुरुंग हे कैद्यांच्या पुनर्वसनासाठी देखील वापरले गेले पाहिजेत. अशा विचाराने परदेशात अनेक ठिकाणी तुरुंग चालवले जातात. परदेशातच नव्हे पण अगदी महाराष्ट्रात देखील कैद्यांना सुधारण्याची संधी मिळावी असे प्रयत्न केले जातात पण क्वचितच ! या प्रयत्नातूनच १९३९ साली सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावाजवळ औंध संस्थानाच्या पंतप्रतिनिधींनी 'स्वतंत्रपूर' नावाची कैद्यांची मुक्त वसाहत स्थापन केली. (पुस्तक वाचताना ह्या स्वतंत्रपूर ची आठवण होण्याचे कारण म्हणजे मी लहानपणी ह्या स्वतंत्रपूरला गेलेलो आहे. माझे वडील आटपाडीचे तहसीलदार असताना मी आणि माझा भाऊ ह्या स्वतंत्रपूरच्या विहिरीत तेथील जन्मठेपेची शिक्षा झालेल्या खुंखार कैद्यांच्या मदतीने पोहायला शिकलेलो आहोत) कैद्यांवर मानवतेचे संस्कार घडवणे, त्यांना सुधारण्याची संधी देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. जन्मठेपेसारख्या दीर्घकालीन कैद्यांच्या शिक्षेतील शेवटची काही वर्षे स्वतंत्रपूर ह्या कैद्यांना मुक्त वसाहतीत ठेवले जाते. या कैद्यांना राहण्यासाठी छान घरे बांधलेली आहेत. येथील कैद्यांना त्यांच्या कुटुंबासमवेत राहण्याची मुभा असते. येथील कैद्यांना जमिनीचा एक तुकडा देऊन त्यांना इथे शेती देखील करता येते. त्यांनी शेतात पिकवलेला शेतमाल, भाजीपाला त्यांना जवळच असलेल्या आटपाडी गावातील बाजारपेठेत विकून अर्थार्जन देखील करता येते. ( सुप्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी या मुक्त वसाहतीच्या संकल्पनेतून 'दो आँखे बारह हाथ' हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटातील बरीच दृश्ये याच स्वतंत्रपूरच्या मुक्त तुरुंगात चित्रित केलेली आहेत) कैद्यांमध्ये सुधारणा करायच्या असतील तर अशा संकल्पना राबवल्या पाहिजेत नाही का?
![]() |
सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावाजवळ 'स्वतंत्रपूर'चा मुक्त तुरुंग |
लेखक तुरुंगात असताना कैद्यांची होत असणारी परवड बघून अस्वस्थ होतात. कैद्यांना जगण्याचे मूलभूत हक्क आणि अधिकार हे मान्य करण्याइतपत आपली लोकशाही अद्याप प्रगल्भ झालेली नाही असे ते ठामपणे सांगतात. सर्वसामान्य कैद्यांच्या अंतर्मनातील आवाज तुरूंगाबाहेरच्या समाजापर्यंत पोहोचवण्याचा रवींद्रनाथ पाटील हे तुरुंगरंग पुस्तकातून तळमळीने प्रयत्न करताना दिसतात. तुरुंगात गेलेले सर्वच कैदी गुन्हेगारी वृत्तीचे नसतात. काहींच्या हातून न कळत गुन्हा घडलेला असतो. काही कैदी मानसिक रुग्ण असतात. मानसिक तणावातून त्यांच्या हातून गुन्हा घडतो. काही रागीट माणसे रागा रागात गुन्हा करून बसतात. काहीजण सूडाच्या भावनेने गुन्हा करतात. कच्च्या कैदेतले बरेच कैदी सुधारू शकतात. पण त्यांना प्रशासनाने सुधारण्याची संधी तर दिली पाहिजे ना? या उलट कैद्यांकडे गुन्हेगार म्हणून बघत त्यांच्यावर अत्याचाराचं केले जातात असा लेखकाला जेंव्हा अनुभव येतो तेंव्हा लेखक महोदय अस्वस्थपणे पुस्तकातून व्यक्त होतात. ते शेवटी एके ठिकाणी म्हणतात 'येरवडा जेल मध्ये ज्यांनी अहिंसेचा मंत्र जगाला दिला त्या पूज्य बापूजींच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या जागेत (येरवडा जेल मधील गांधी यार्डात) दहा-दहा पंधरा-पंधरा जेल अधिकारी आणि कर्मचारी बंद्यांना घेरून मारतात, त्यांचे हातपाय पकडून त्यांना तुडवतात. १९ मे २०२३ जेंव्हा मी जामिनावर सुटण्यासाठी सज्ज होत होतो त्या दिवशी देखील या गांधी यार्डात बंद्यांची धुलाई सुरूच होती. आतून बंद्यांचे विव्हळण्याचे आवाज ऐकू येत होते. कापताना बकरं जसं 'वराडतं' ना, तसे केविलवाणे आवाज ! विश्वाच्या इतिहासातलं सर्वात मोठं अहिंसात्मक जनआंदोलन उभारणारा तो महात्मा देखील या काळ्या इंग्रजांचे अमानुष अत्याचार पाहून विचार करत असेल की 'हेचि फळ काय मम तपाला ?'
ह्या पुस्तकाचे प्रकाशन 'मनोविकास प्रकाशन' या मान्यवर आणि सुप्रसिद्ध प्रकाशन संस्थेने केले आहे. लेखकाच्या लेखनाची सूत्रबद्ध मांडणी, लेखनावर सुयोग्य संस्कार करणे हे मुख्यतः प्रकाशकाचे काम ! हे काम प्रकाशकाने उत्तम केले आहे. पुस्तकाला आणि त्यातील विषयाला अनुसरून पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ श्री चंद्रमोहन कुलकर्णी यांनी चितारलेले आहे. मुखपृष्ठाचे आणि लेखनाचे मुद्रण, बांधणी अतिशय आकर्षक आहे. असं हे सर्वांगांनी परिपूर्ण असलेला पुस्तक तुमच्या आमच्या सारख्या सामान्य वाचकाला आवडेल ह्यात शंकाच नाही. माणूस गुन्हेगारीकडं का वळतो? तुरुंगात जाताना आणि तुरुंगात गेल्यावर गुन्हेगारांना कोणत्या दिव्यातुन जावं लागतं? तुरुंग कसे असतात? तुरुंगात काय काय घडामोडी घडत असतात? सर्वसामान्यांच्या अशा अनेक जिज्ञासा पूर्ण करणारं हे पुस्तक जरूर वाचायला हवं.
राजीव जतकर
२५ ऑक्टोबर २०२४