Friday, 16 August 2024

विमानाच्या कॉकपीट मधील थरार... '७५००'

विमानाच्या कॉकपीट मधील थरार... '७५००'

विमान चालक टोबायस (जोसेफ गॉर्डन)

जर्मनी
मधील बर्लिन विमानतळावरील तो दिवस तसा नेहेमी प्रमाणे प्रवाशांनी गजबजलेला. वेळ संध्याकाळची साडेसहा सातची. बर्लिन ते पॅरिसला जाणारे प्रवासी विमान क्र ७५०० आकाशात उडण्यासाठी सज्ज झाले होते. या विमानातल्या प्रवाशांच्या इमिग्रेशन प्रक्रिया, सुरक्षा तपासण्या वगैरे सुरु होते. सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळावर लावलेल्या कॅमेऱ्यातून ही दृश्ये आपल्याला दिसतात. या विमानाचा जर्मन चालक कॅप्टन 'मायकल' (कार्लो किड्सलिंगर) त्याचा अमेरिकन सहकारी विमान चालक टोबायस (जोसेफ गॉर्डन) विमानाच्या कॉकपिटमध्ये येऊन आपापल्या जागेवर येऊन बसतात. एकमेकांशी गप्पा मारत विमानाच्या उड्डाणापूर्वी करायच्या तपासण्या, पॅरामीटर्स तपासू लागतात. विमानात कॉकपीटच्या दरवाज्यामागे लगेचच असलेल्या प्रवेशद्वारातून प्रवासी येऊ लागतात. विमानातल्या एअरहोस्टेस येणाऱ्या प्रवाशांचे हसतमुखाने स्वागत करू लागतात. जवळपास सर्व प्रवासी स्थानापन्न झालेले असताना अजून दोन प्रवासी विमानात अजून आलेले नाहीत असे कॅप्टन मायकल च्या लक्षात येते. त्यामुळे या दोन प्रवाशांसाठी थोडी वाट बघायचा निर्णय मायकल आणि टोबायस घेतात. तेवढ्यात उशिरा आलेले ते दोन लेट लतीफ प्रवासीही येतात, आणि काहीश्या उशिरानेच फ्लाईट ७५०० विमान आकाशात भरारी घेते.

 

थोड्याच वेळात विमान ठराविक उंचीवर जाऊन स्थिरावते. दोनीही पायलट्स विमानाचे नियंत्रण स्वयंचलित यंत्रणेवर टाकून थोडेसे आरामात बसतात. एअरहोस्टेस प्रवाशांना पाणी देण्यासाठी पुढे होतात. एक एअरहोस्टेस पायलट्स ना पाणी देण्यासाठी कॉकपीटचा दरवाजा उघडून कॉकपीट मध्ये येते. आणि अचानक तिच्या पाठोपाठ अचानक 'अल्लाहू अकबर' असे ओरडत दोन प्रवासी (उशिरा आलेले तेच ते प्रवासी) कॉकपीट मध्ये शिरतात. अचानक एकच गोंधळ उडतो. कॅप्टन मायकल आणि टोबायस यांच्यावर हे अतिरेकी धारदार चाकूने हल्ला करतात. त्यांच्यात झटापट होते. झटापट कसली चक्क मारामारी होते. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे काहीसे बेसावध असलेले आणि गोंधळलेले पायलट्स बरेचसे जखमी होतात. त्यातही कॅप्टन मायकल खूपच गंभीर जखमी होतो. टोबायस मात्र त्याच्यावर हल्ला करणाऱ्या अतिरेक्याला कॉकपीट बाहेर ढकलून कॉकपीटचे दार आतून कसेबसे बंद करून घेतो. ह्या झटापटीत टोबायस ला देखील हाताला मोठी जखम होते. कॉकपीटचे दार आतून बंद करून टोबायस मायकलच्या मदतीसाठी धावतो. हातात सापडलेल्या फायर सिलेंडरने डोक्यात मारून तो दुसऱ्या अतिरेक्याला बेशुद्ध करतो, आणि मायकलला वाचवतो.

 

कॉकपीट मध्ये प्रवेश करणारी एअरहोस्टेस 

स्वतः जखमी झालेला टोबायस पुन्हा विमानावर कसेबसे नियंत्रण मिळवतो. वाटेतच असलेल्या जवळच्या 'हॅनोव्हर' शहराच्या विमानतळशी संपर्क करून तो विमानात उद्भवलेल्या परिस्थितीची कल्पना देतो. अचानक उद्भवलेल्या या आणीबाणी मुळे फ्लाईट ७५०० या विमानाला हॅनोव्हर च्या विमानतळावर उतरण्याची परवानगी मिळते. टोबायस ही आनंदाची बातमी कॅप्टन मायकल ला सांगण्या साठी त्याच्याकडे वळतो तेंव्हा मायकल बेशुद्धावस्थेत गेलेला आहे असे त्याच्या लक्षात येते. मायकलच्या छातीवर दाब देत टोबायस त्याला प्रथमोपचाराने जिवंत ठेवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण व्यर्थ... मायकल मरण पावलेला असतो. त्याच वेळी कॉकपीटच्या दरवाज्यावर बाहेर असलेला अतिरेकी धडका देत कॉकपीटचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या सहकार्याच्या मायकलच्या मृत्यूमुळे टोबायस मुळापासून हादरून जातो. निराश होतो. आता कॉकपिटमध्ये बेशुद्धावस्थेतला आणि बांधून ठेवलेला एक अतिरेकी, मृत्युमुखी पडलेला सहकारी मायकल आणि जखमी, असहाय्य अवस्थेतला एकाकी टोबायस शिल्लक राहिलेला असतो. कॉकपीटच्या दरवाज्यावरील बाहेरून बसणाऱ्या धडकांचा आवाज वाढतच असतो...

 

 कॉकपीटच्या दरवाज्यावर बाहेर असलेला अतिरेकी

इथून पुढे सुरु होतं एक थरारक नाट्य... अतिशय शांत डोक्याने एकटा टोबायस परिस्थिती हाताळतो. कॉकपीटच्या बाहेर असलेल्या भडक माथ्याच्या तरुण अतिरेक्याबरोबर शांतपणे संवाद साधत राहतो. एका प्रसंगी या तरुण अतिरेक्याला तो कॉकपीटमध्ये येऊ देतो. पण हा माथेफिरू तरुण अतिरेकी टोबायसच्या जीवावर उठतो. पण संयमाने, धीराने, शांतपणे परिस्थिती हाताळत या अतिरेक्याशी सामना करतो.  पुढे टोबायसचे आणि अतिरेक्यांचे काय होते? विमान आणि विमानतले प्रवासी वाचतात का? इतक्या उंचीवर हे नाट्य घडत असताना पुढे नेमकं काय काय घडतं हे प्रेक्षक म्हणून पडद्यावर पाहताना आणि ह्या थरारनाट्याचा अनुभव घेताना आपण बसल्याजागी अक्षरशः थिजून जातो.  

 

कॅप्टन 'मायकल' (कार्लो किड्सलिंगर

वास्तविक ह्या चित्रपटाच्या कथेत तसं फार काही वेगळं नाही. अशा प्रकारची कथा आजपर्यंत अनेक चित्रपट निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी हाताळलेली आहे. माझ्या कॉलेज च्या काळात म्हणजे ८० च्या दशकात 'एअरपोर्ट ७५', 'एअरपोर्ट ७७', 'एअरपोर्ट ८०' नावाचे काही चित्रपट देखील आले होते. या एअरपोर्ट मालिकेतील चित्रपटांमध्ये देखील विमानाचे अपघात, हायजॅकिंग वगैरे विषय हाताळले गेले होते. अतिरेक्यांनी हायजॅक केलेलं विमान आणि त्यातील थरार हे प्रेक्षकांना तसं नवीन देखील नाही. पण ह्या चित्रपटाचे महत्वाचे वैशिष्ठ्य असं की हा संपूर्ण दीड तासांची चित्रपट कथा घडते ती फक्त विमानाच्या कॉकपिटमध्ये ! संपूर्ण चित्रपटात कॅमेरा एकदाही कॉकपीटच्या बाहेर जात नाही. अशा प्रकारे एकाच छोट्या जागेत कॅमेरे लावून चित्रीकरण करत कथा रंगवणे हे खूपच अवघड असते. एका छोट्या कॉकपीटच्या जागेत घडणारं थरारक नाट्य दीड तास रंगवताना लेखक दिग्दर्शक 'पॅट्रिक व्होलरॉथ' याच्या प्रतिभेचा कस लागतो. प्रमुख पायलट टोबाय एलिस ची भूमिका साकारणारा 'जोसेफ गॉर्डन' हा अभिनेता कमाल अभिनय करतो. अतिरेक्यांबरोबर प्रसंगी दोन हात करताना, त्यांच्याशी वाटाघाटी करताना, ओलीसांना मारू नका असं कळवळून सांगताना, पॅनिक होता अवघड परिस्थिती संयमाने वागणारा 'जोसेफ गार्डन' आपल्या आफाट अभिनयाचं दर्शन घडवतोहा चित्रपट बघताना मला आल्फ्रेड हिचकॉकचा 'रिअर विंडो', रेयॉन रेनॉल्ड्स चा 'बरीड', राजकुमार रावचा 'ट्रॅप्ड', टॉम हार्डीचा 'लॉकी', 'ऑल इज लॉस्ट', 'पॅनिक रूम' अशा काही वैशिठ्यपूर्ण, हटके चित्रपटांची आठवण झाली. ('ऑल इज लॉस्ट' ह्या संपूर्ण चित्रपटात समुद्रातील एका भरकटलेलया छोट्या बोटीचे आणि त्यातील एका वयोवृद्ध नावाड्याचे फार अद्भुत चित्रीकरण आहे. हा चित्रपट देखील चित्रपट रसिकांनी बघायलाच हवा. ह्या चित्रपटाचे देखील रसग्रहण कधीतरी लिहायचं माझ्या मनात आहे.) अशा एकाच छोट्या लोकेशन वर चित्रीत होणाऱ्या चित्रपटात अभिनय करणाऱ्या अभिनेत्यांचे कौशल्य पणाला लागते. एक दीड तासांचे नाट्य एका छोट्या जागेत चित्रित करताना अनेक बारकावे दाखवावे लागतात. कॅमेरामन, दिग्दर्शक यांच्या कौशल्यामुळे चित्रपट रंजक तर होतोच, पण हटके देखील होतो.

 

ओलीसांना मारू नका असं कळवळून सांगताना 'टोबायस एलिस' 

७५०० हा त्याच्या नावापासूनच वेगळा हटके असलेला जर्मन चित्रपट सर्वांगांनी परिपूर्ण आहे असे म्हणता येणार नाही. या चित्रपटात काही दोष, काही कमतरता आहेतच. तथापि 'जोसेफ गॉर्डन' याच्या जबरदस्त अभिनयासाठी, लेखक दिग्दर्शक 'पॅट्रिक व्होलरॉथ' याच्या या चित्रपटाच्या हटके हाताळणी साठी हा चित्रपट बघायलाच हवा. हा चित्रपट बघताना आपण जणू विमानाच्या कॉकपीट मधील एका कोपऱ्यात बसून हा हायजॅकिंग चा थरार अनुभवतो आहोत असे वाटते.

चित्रपट नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल...

 

हा चित्रपट प्राईम व्हिडीओ वर उपलब्ध आहे.

 

राजीव जतकर.

१५ ऑगस्ट २०२४.   

 

 

 


No comments:

Post a Comment