Thursday, 22 August 2024

'द गोरखपूर हॉस्पिटल ट्रॅजेडी'

 

' गोरखपूर हॉस्पिटल ट्रॅजेडी'

                                                       मला आवडलेलं पुस्तक.

डॉकफील खान

 नुकतेच ' गोरखपूर हॉस्पिटल ट्रॅजेडी' हे डॉ. कफील खान यांनी लिहिलेले आणि राजेंद्र साठे यांनी अनुवादित केलेलं पुस्तक माझ्या वाचनात आलं. सत्यघटनेवर आधारित असलेला हे पुस्तक वाचल्यावर मी अंतर्बाह्य हादरून गेलो. उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे १० ते १३ ऑगस्ट २०१७ या दुर्दैवी दिवसात 'बाबा राघवदास मेडिकल कॉलेज' मधील सरकारी इस्पितळात ऑक्सिजन च्या पुरवठ्या अभावी ६३ बालकांचा मृत्यू झाला, आणि एकच हाहाकार उडाला. या दुर्घटनेची पोलीस यंत्रणांकडून चौकशी होऊन या पुस्तकाचे लेखक डॉ. कफील खान यांना दोषी ठरवले गेले. या नंतर ते अटकसत्र, दीर्घ न्यायालयीन प्रक्रिया, तुरुंगवास, जामिनासाठीचा लढा, राजकारण, सोशल मीडियावर नाचक्की वगैरे जीवघेण्या फरपटीत अडकतात. या त्यांच्या जीवघेण्या फरपटीच्या प्रवासाची डॉ. कफील यांनी लिहिलेली कहाणी म्हणजे हे अंगावर शहारे आणणारं पुस्तक.

 

बाबा राघवदास मेडिकल कॉलेज

या हॉस्पिटलच्या लहान मुलांच्या वॉर्डात अनेक नवजात, तान्ही बालके उपचार घेत होती. काही बालकांना या निष्ठुर जगात येऊन काही तासच उलटले होते. दहा तारखेच्या मध्यरात्री डॉ. कफील यांना त्यांच्या फोनवर एक मेसेज मिळाला.. 'इस्पितळातील ऑक्सिजन चे सर्व सिलेंडर्स संपले असून अतिदक्षता विभागातील ऑक्सिजन पुरवठा ठप्प झाला आहे.' ऑक्सिजनविना बालरुग्ण विभागातल्या मुलांचे आता काय होईल? या कल्पनेने काळजीत पडलेल्या डॉ. कफील यांनी ताबडतोप इस्पितळात धाव घेतली. इस्पितळातील द्रवरूप ऑक्सिजन पूर्णपणे संपला होता. राखीव ठेवलेले पन्नास सिलेंडर्स देखील जवळपास संपले होते. त्यामुळे बालरुग्ण दगावू लागले होते. त्यावेळी कामावर असलेले शिकाऊ डॉक्टर्स गडबडून गेले होते. घर ते इस्पितळ हे सुमारे १० किमी. चे अंतर पार करत असताना डॉ कफील खान सतत वरिष्ठांना फोन करत होते. परिस्थितीची कल्पना देत होते. पण दुर्दैवाने सर्वांनी हे प्रकरण फारसे गांभीर्याने घेतले नाही. सर्वजण ही जबाबदारी टाळत राहिले. वास्तविक ऑक्सिजन सिलेंडर्स च्या ऑर्डर्स, त्याचे पेमेंट, सिलेंडर्सचे स्टॉक रेकॉर्ड वगैरे गोष्टीसाठी स्वतंत्र कर्मचारी होते. ही जबाबदारी डॉ. कफील खान यांची नव्हती. वरिष्ठांच्या थंड प्रतिसादामुळे 'आता आपल्यालाच काहीतरी करावे लागेल' असे डॉ. कफील यांना कळून चुकले होते. इस्पितळाच्या आवारात शिरताना गेट पासूनच लहान मुलांच्या आयांचा आक्रोश आणि शिव्याशाप ऐकू येऊ लागले. जड पावले टाकत डॉ. कफील गोंधळाच्या दिशेने जाऊ लागले. कल्पनाही करता येणार नाही अशा दुःखद प्रसंगांना आता त्यांना सामोरं जायचं होतं.

 


बीआरडी मेडिकल कॉलेजमधील इस्पितळात बालरोग विभागातील सर्व वॉर्ड्समध्ये एकूण २१६ खाता होत्या. पण विनामूल्य उपचार देणारं आणि सुसज्ज असं हे इस्पितळ आसपासच्या सुमारे २०० चौरस किलोमीटरच्या परिसरातील एकमेव इस्पितळ असल्याने इथे बहुतेक वेळा किमान चारशे बालरुग्ण भरती झालेले असंत. त्यात ही दुर्दैवी घटना पावसाळ्यात घडल्यामुळे मेंदूज्वराच्या साथीने इथे बालरुग्णांची एकच दाटी झाली होती. त्यामुळे डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी सर्वच जण प्रचंड तणावाखाली येऊन गोंधळलेले, भेदरलेले होते. इस्पितळात पोहोचताक्षणी डॉ. कफील यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन त्यावर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न सुरु केला. पण ऑक्सिजन नसल्याने परिस्थिती वेगाने बिघडू लागली होती. जी मुलं व्हेंटिलेटरवर होती त्यांना ऑक्सिजन मिळाल्यामुळे ती काळीनिळी पडू लागली. मग ह्या मुलांना अंबु बॅग (आर्टिफिशियल मॅन्युअल ब्रिदींग युनिट) चा वापर सुरु करण्यात आला. वीज बंद पडली असल्यास, किंवा श्वासोच्छ्वास नीट करू शकणाऱ्या रुग्णांना हवेतील ऑक्सिजन घेण्यासाठी हातानं चालवायचं हे उपकरण म्हणजे अंबु बॅग. बहुतेक वेळी रुग्णवाहिकेत किंवा तातडीच्या प्रसंगी हा पर्याय वापरला जातो. मात्र ह्या अंबु बॅगच्या वापरासाठी प्रशिक्षित डॉक्टर्स, नर्सेस आवश्यक असतात. असे पुरेसे डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग कर्मचारी कुठून आणायचे? हा एक प्रश्न होताच. 

 


एकीकडे ह्या लहानग्यांना मृत्यूच्या दाढेतून वाचवण्याचा जीव तोडून प्रयत्न करताना, दुसरीकडे डॉ. कफील ऑक्सिजनचे सिलेंडर्स मिळवायचा प्रयत्न करीत होते. ऑक्सिजन मिळवण्यासाठी त्यांनी अक्षरशः एकहाती संघर्ष केला. प्रसंगी ऑक्सिजन पुरवठादार कंपन्यांचे पैसे स्वतःच्या खिशातून दिले. पण दुर्दैवाने त्यांच्या ह्या प्रयत्नांना फारच मर्यादित यश मिळाले. परिणामी दहा ऑगस्ट पुढील ५४ तासात, म्हणजे १३ ऑगस्ट पर्यंत तब्बल ६३ लहान मुलांचा आणि १८ प्रौढ व्यक्तींचा मृत्यू झाला. या भयंकर घटनेनंतर रुग्णालयाचे प्राचार्य आर. के. मिश्रा यांना तातडीने निष्काळजीपणाच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले. डॉ. कफील खान यांचे मात्र सर्व स्तरातून कौतुक होत होते. डॉ. कफील हे रुग्णांच्या पालकवर्गात, डॉक्टर्स, इस्पितळाचे कर्मचारी वर्ग यांच्यात हिरो ठरले होते.

 


पुढे मीडिया, पत्रकार, सरकारी यंत्रणा, पोलीस तपास यंत्रणा या घटनेच्या तपासात कार्यरत झाल्या. मीडियावर या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले. ऑक्सिजन च्या तुटवड्याच्या कारणांचा जेंव्हा प्रश्न सरकारला विचारला जाऊलागला, तेंव्हा राजकारणी सक्रिय झाले. कारण तोपर्यंत ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे सरकार कडून पेमेंट थकल्यामुळे ऑक्सिजन चा पुरवठा थांबला होता हे एव्हाना सर्वांना कळून चुकले होते. मग सरकारी यंत्रणा कोणीतरी बळीचा बकरा शोधू लागले. गोरखपूरच्या या घटनेचं राजकारणही खूप झालं. सप्टेंबर रोजी डॉ. कफील खान यांना अटक होऊन त्यांची गोरखपूर च्या तुरुंगात रवानगी करण्यात आली. कायद्याच्या कचाट्यात आणि न्यायालयीन दुष्टचक्रात डॉ कफील पुरते अडकले. सुरवातीला आजारी मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे, ऑक्सिजन सिलेंडर्स मिळवण्यासाठी जीव तोडून आहोरात्र झटणारे डॉ. कफील हे हिरो ठरलेले डॉ. कफील नंतर मीडिया, पत्रकार, पोलीस तपास यंत्रणा, सरकारी यंत्रणा, राजकारणी यांनी त्यांना हैराण करून सोडले. खरं तर अशा संवेदनशील घटनांचे राजकारण होऊ नये. पण आपलं सगळं जगणंच राजकारणाने व्यापून टाकलं गेलंय. सरकारी तपास यंत्रणांनी या दुर्दैवी घटनेला वेगळेच वळण लावले. ऑक्सिजन चा पुरवठा बंद झाल्यामुळे बालकांचे मृत्यू झाले ही वस्तुस्थिती असताना उत्तरप्रदेश सरकारने ही वस्तुस्थिती लपवून ठेवली. ऑक्सिजन सिलेंडर्सचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांबरोबर सरकारी इस्पितळाचा जो करार केला जातो त्यानुसार जास्तीतजास्त १० लाखांपर्यन्तचे बिल थकावता येते. तोपर्यंत ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना ऑक्सिजन पुरावावाच लागतो, तो बंद करता येत नाही. मात्र या इस्पितळाचे तब्बल ६८ लाख रुपयांचे बिल थकले होते. स्वाभाविकपणे या पुरवठादाराने ऑक्सिजनचा पुरवठा थांबवला होता. त्यापूर्वी या पुरवठादार कंपनीने इस्पितळाच्या वरिष्ठांना कळवले देखील होते. त्यामुळे पुढे जे व्हायचे ते दुर्दैवाने झालेच ! एकीकडे बालकांचे मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे झाल्याचे कारण सरकार फटाळून लावत असताना दुसरीकडे दगावलेल्या मुलांचे पालक, इस्पितळातले डॉक्टर्स, कर्मचारी ऑक्सिजन संपल्यामुळेच मुलांचे प्राण गेले असं मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर सांगत होती.

 

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन आरोग्यमंत्री यांनी या प्रकरणाला वेगळेच वळण देऊन असंवेदनशीलतेचा कहर केला. 'एव्हड्या मोठ्या देशात अशा घटना घडताच असतात' असं म्हणत त्यांनी आपल्या निर्ढावलेपणाचं दर्शनच घडवलं. सत्तेची नशा चढल्यावर राजकारणी (मग ते कोणत्याही पक्षाचे असोत) आपली सारासार विचारबुद्धी खुंटीला टांगून ठेवतात. मग कुणाला तरी बळीचा बकरा बनवला जातो. डॉ कफील खान यांना या घटनेत बळीचा बकरा बनवलं गेलं. दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेनंतर आणि त्या दरम्यान सात महिने तुरुंगवास भोगल्यानंतर २०१९ च्या उत्तरार्धात शेवटी न्यायालयाने डॉ. कफील खान याना निर्दोष मुक्त केलं.

 




हे पुस्तक म्हणजे 'उन्मत्त सत्ता एखाद्या प्रामाणिक कर्तव्यदक्ष व्यक्तीला एकाकी पडून संपवू शकते' याच विदारक वर्णन आहे. डॉ. कफील यांनी हे पुस्तक अतिशय तळमळीने आणि मनापासून लिहिलंय. त्यांच्या लिखाणात त्यांनी अनेक पुरावे देखील सादर केलेले आहेत. केवळ भारतीय राज्यघटना, कायदा आणि चांगुलपणा यावर श्रद्धा ठेवून डॉ. कफील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हा सर्व लढा दिला. या पुस्तकाचे लेखक डॉ. कफील खान हे धर्मानं मुस्लिम असणं हे देखील त्यांच्या भयंकर अनुभवाला कारणीभूत होतं किंवा असावं. (असं वाटावं हे सध्याच्या सामाजिक परिस्थितीत सहज शक्य आहे) तथापि हे पुस्तक लिहिताना लेखक 'मी मुस्लिम असल्यामुळे मला हे सर्व भोगावं लागलं, किंवा त्यामुळे माझ्यावर अन्याय झाला' असा कुठेही कांगावा करत नाहीत. न्यायालयीन लढाई लढताना ते समाजकार्यात मग्न राहतात. आपली वैद्यकीय सेवा गरजूंना पुरवत राहतात.

 


या मूळ इंग्रजी भाषेत लिहिलेल्या पुस्तकाचा मराठीत अनुवाद श्री. राजेंद्र साठे यांनी अतिशय सुरेख केलाय. त्यांच्या मनोगतात शेवटी राजेंद्र साठे म्हणतात...

"काविळीच्या गावठी उपायांमध्ये रुग्णाच्या मनगटावर तापलेल्या सळईचा चटका देतात. तो कातडी सोलवटून टाकणारा अनुभव असतो. डॉ. कफील खान यांचं हे आत्मकथन मनाला असंच चटका देतं. अंधभक्तीमुळे पिवळं झालेल्यांच्या काविळीवर सध्याच्या परिस्थितीत ज्याला जे सुचतील ते उपाय चालू आहेत. ह्या पुस्तकाच्या रूपाने हा ही एक उपाय करून पाहायला हरकत नाही. प्रभावी ठरेल असं वाटतं."

 

सदसत विवेक बुद्धी जागृत करणारं ' गोरखपूर हॉस्पिटल ट्रॅजेडी' हे पुस्तक प्रत्येक सजग भारतीय नागरिकाने वाचायला हवं.

 

राजीव जतकर.

२१ ऑगस्ट २०२४.