स्वतःच्याच मरणाचं आख्यान: 'महानिर्वाण'
मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन समजल्या जाणाऱ्या काही नाटकांपैकी एक असे 'महानिर्वाण' हे नाटक नव्या पिढीतील हरहुन्नरी आणि नव्या दमाच्या अशा कलाकारांच्या 'नाटक कंपनी या संस्थेने पुनर्जीवित केले आहे. नुकतेच म्हणजे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी श्रीराम लागू-रंगअवकाश या सभागृहात ह्या पुनर्जीवित नाटकाच्या ५० व्या प्रयोगाला हजार राहण्याचे भाग्य मला मिळाले. हे नाटक मी पहिल्यांदाच पहिले. गेली अनेक वर्षे ह्या नाटकाविषयी खूप ऐकले, वाचले होते. नाटक बघण्याची खूप उत्सुकता होती. मुळात हे नाटक खूप जुने म्हणजे तब्बल ५० वर्षांपूर्वी रंगभूमीवर आले होते. या अभिजात नाटकाचा प्रयोग ५० वर्षांपूर्वी म्हणजे २२ नोव्हेंबर १९७४ रोजी 'थिएटर अकॅडमी' ह्या नाट्यसंस्थेने पुण्यातील सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिरात सादर केला होता. त्या वेळी या नाटकातील सर्वच कलाकार मंडळी पंचविशीतील ऐन तारुण्यात होती. आता त्या पूर्वीच्या कलाकारांच्या संचामधील बरीचशी कलाकार मंडळी काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे म्हणा किंवा इतरही काही कारणांनी या नाटकाचे प्रयोग होत नव्हते. मात्र गेली काही वर्षे 'नाटक कंपनी' ह्या नाट्यसंस्थेतील काही उत्साही कलाकार हे नाटक जसे च्या तसे सादर करत प्रेक्षकांची वाहवा मिळावीत आहेत. केवळ 'सध्याच्या तिसऱ्या पिढीतील तरुण कलाकार' हे या नाटकाचे वेगळेपण सोडता बाकी सर्व नाटक पूर्वीच्याच पद्धतीने सादर होतंय.
अनेक वर्षांनी पुनर्जीवित झालेल्या या नाटकाचा आज ५० वा म्हणजेच सुवर्णमहोत्सवी प्रयोग होता. साहजिकच आजच्या प्रयोगाला प्रेक्षकांची तुडुंब गर्दी झालेली होती. आजचा हा प्रयोग अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होता. सुरवातीला ६ ते ७:३० वाजेपर्यंत नाटकाच्या मूळ संचातील जुन्या दिग्गज कलाकारांशी गप्पा आणि त्यापुढे नाटक कंपनीच्या कलाकारांनी सादर केलेलं 'महानिर्वाण' हे नाटक!
या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात 'पर्ण पेठे' यांनी या नव्या-जुन्या कलाकारांशी मारलेल्या गप्पा ऐकणे म्हणजे एक विलक्षण अनुभव होता. एका बाजूला या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक सतीश आळेकर, चंद्रकांत काळे, श्रीराम रानडे, पुरंदरे, समर नखाते अशी दिग्गज मंडळी होती, तर दुसऱ्या बाजूला नवीन संचातील कलाकार बसले होते. 'पर्ण पेठे' यांनी सर्वच कलाकारांना आपल्या खुमासदार शैलीतल्या प्रश्नांनी बोलते केले. जुने दिग्गज कलाकार महानिर्वाण नाटकाबद्दल, नाटकाच्या निर्मिती बद्दल भरभरून बोलताना अतिशय भावुक होत होते. नाटकाच्या आठवणी सांगताना सतीश आळेकर म्हणाले "सत्तरीच्या दशकात हे नाटक केले तेंव्हा आम्ही सगळेच पंचविशीतील तरुण असल्यामुळे 'जुने ते सर्व नाकारून काहीतरी नवीन करायला पाहिजे' अशी उर्मी आम्हा सगळ्यांच्या मध्ये होती. ' जुन्या परंपरांची थट्टा उडवायची' या तारुण्यातल्या नैसर्गिक भावनेमुळे कदाचित ही कलाकृती निर्माण झाली. एका नाटककाराला त्याच्याच हयातीत नाटकाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष पाहता यावे या पेक्षा भाग्य ते कोणते? या नाटकाच्या सुरवाती पासून काम केलेले अनेक कलाकार जसे संगीतकार आनंद मोदक, रमेश मेढेकर, सुरेश बसले, नंदू पोळ, श्रीकांत गद्रे, शाम बोन्डे असे आमचे सहकारी आज आमच्यात नाहीत याचे दुःख आहे. या सर्वांची आज खूप आठवण येतीये".
पूर्वीच्या महानिर्वाण मधील भाऊरावांची प्रमुख भूमिका करणारे 'श्री चंद्रकांत काळे' आपल्या त्या काळातल्या आठवणी सांगताना सत्तर च्या दशकात रमून गेले. ते म्हणाले " 'घाशीराम' कोतवाल या त्या काळात गाजलेल्या नाटकाद्वारे माझी ओळख नाट्यरसिकांना झाली होतीच. स्वरातून संवाद फेकीचे कसब मला त्याच नाटकातून शिकायला मिळाले होते. याच अनुभवाच्या पार्श्वभूमीमुळे मला 'महानिर्वाण' ची दारे खुली झाली. कीर्तनी अंगाने संवाद म्हणताना माझ्यात अंगभूत असलेले गाणे माझ्या खूप उपयोगी आले. कीर्तन, अभंग गात गात भाऊरावांच्या मरणाचे आख्यान मी सादर करीत असे". 'इरसाल चाळकरी' हा या नाटकांमधील महत्वाचा भाग. या चाळकऱ्यांपैकी त्याकाळी एका चाळकऱ्यांचे काम करणारे नट श्रीराम रानडे यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या. "नाटकाच्या तालमी दरम्यान आम्ही खूप धमाल करायचो. सर्वच चाळकरी टवाळखोरीत वाकबगार असल्याने नाटकातील चाळकऱ्यांचे
प्रवेश अफलातून होत असंत." असे श्रीराम रानडे यांनी सांगितले. समर नखाते यांनी नाटकातील प्रकाश योजना आणि नाटकातील त्याचे महत्व या बद्दल गप्पा मारल्या. पर्ण पेठे यांनी जुन्या कलाकारांबरोबर नवीन संचातील कलाकारांनाही बोलते केले. या सर्व जुन्या-नव्या कलाकारांचे अनुभव, विचार, त्यांचे भरभरून बोलणे ऐकताना आम्ही प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन गेलो होतो.
थोडं नाटकाविषयी:
नाटकाला सुरवात होते तीच मुळी भाऊरावांच्या मृत्यूने! भाऊरावांचा झोपेतच मृत्यू झालेला असतो. मात्र मृत भाऊरावांचा आत्मा आपल्याशी म्हणजे प्रेक्षकांशी संवाद साधू शकत असतो. भाऊरावांची पत्नी 'रमा' अतीव दुखणे वैधव्याला सामोरी जाण्याची तयारी करते. भाऊरावांच्या चाळीतल्या इरसाल शेजाऱ्यांना (चाळकरी) भाऊंच्या मृत्यूची बातमी समजताच ते उत्साहाने प्रेताच्या स्मशानापर्यंतच्या अंतिम यात्रेची जोरात तयारी करू लागतात. गावाबाहेर असलेल्या नवीन स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी मध्ये प्रेताचे दहन करायचे ठरते. पण भाऊराव स्वतःचे प्रेत विद्युत दाहिनीत जाळण्यास नकार देतात. त्याना जुन्या स्मशानात जुन्या पद्धतीने सरणावर जळायचे असते. भाऊरावांच्या परगावी गेलेला मुलगा नाना येईपर्यंत भाऊंचे प्रेत स्मशानात नेण्याचे थांबवले जाते. बराच उशीर होतो. तोपर्यंत चाळकरी कंटाळून जातात. भाऊंच्या प्रेताला दुर्गंधी येऊ लागते. यथावकाश भाऊंचा मुलगा नाना परगावावरून परत येतो आणि पुढील नाट्य सुरु होते.
भाऊंचा आत्मा नाना बरोबर संवाद सुरु करतो. ते नानाला सांगतात की 'माझ्या प्रेताला जुन्या स्मशानात सरणावरच जाळावे'. इकडे नाना इतका वेळ प्रेताला तसेच का ठेवले म्हणून वैतागलेला असतो. तो वडिलांच्या प्रेताच्या जळीतकर्मातून मुक्त होण्यासाठी अधीर झालेला असतो. तो कुठल्याच अर्थाने वडिलांच्या मृत्यूनं भावनाविवश वगैरे झालेला नसतो. इरसाल चाळकरी देखील प्रेताला जाळण्यासाठी आणि उर्वरित कर्मकांडे उरकून टाकण्याच्या मनस्थितीत असतात. भाऊरावांच्या पत्नीच्या 'रमा' च्या भावविश्वात आता भाऊंच्या जागी प्रेताला खांदा देणाऱ्यातील 'डावीकडून तिसरा' आलाय. त्यामुळे भाऊंच्या आत्म्यालाही धक्का बसतो. 'रमा' लाजत लाजत भाऊंच्या तेराव्याला या 'डावीकडून तिसऱ्या'ला आवर्जून आमंत्रण देण्याची नानाला आठवण करून देते. भाऊंना खांदा देणाऱ्यातला हा 'डावीकडून तिसरा कोण? प्रेताला डोक्याकडून खांदा देणारा की पायाकडून खांदा देणारा तिसरा?' या गोंधळात नाना पडतो. अशा अनेक गुंतागुंतीची मजेशीर वेडीवाकडी वळणे घेत नाटक पुढे सरकते. भाऊरावांच्या झालेला मृत्यू इथंपासून ते त्यांना सरणावर जाळले जाईपर्यंतचा विडंबनाच्या मिश्किल अंगाने होणार अद्भुत प्रवास म्हणजे हे नाटक!
ह्या प्रवासादरम्यान मृत्यू नंतरच्या धार्मिक कर्मकांडावर उपहासात्मक भाष्य केले जाते.
हे प्रायोगिक नाटक सत्तरच्या दशकात लिहिलं गेलंय हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याकाळी मृत्यूसारख्या गंभीर विषयावर विडंबन करून लिहिणे आणि सादर करणे हे खूपच धाडसाचे होते. ह्या नाटकाचे सादरीकरण देखील खूप वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. नाटकाच्या संवादादरम्यान किर्तनातल्या साक्या, दिंड्या यांचा वापर फार कुशलतेने केला गेला आहे. अर्थात ह्या नाटकाचे मूळ संगीतकार कै. आनंद मोडक (आनंद मोडक हे देखील या नाट्यनिर्मितीच्या दरम्यान तेवीस चोवीस वर्षांचे होते) यांचा यात सिंहाचा वाटा आहे. या नाटकातील 'बांधा रे बांधा ताटी बांधा - ताणून बांधा रे होईल वांधा', 'भाऊरावांच्या तेरावा - बासमतीचा भात हवा', 'उदे ग 'रमे' उदे', अशी चाळकऱ्यांची समूह गाणी या विडंबनयात्रेत धमाल आणतात. नाटक कंपनीने पुनर्जीवित केलेल्या नाटकात नव्या उमेदीची तरुण मंडळी नाटकाच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता धमाल उडवतात. नचिकेत देवस्थळी (भाऊराव), सिद्धार्थ महाशब्दे (भाऊंचा मुलगा: नाना), सायली फाटक (भाऊरावांनी पत्नी: रमा) यांनी प्रायोगिक नाटकाचा पोत समजून आपापल्या भूमिका समरसून वठलेल्या आहेत. या नाटकातल्या चाळकऱ्यांची कामे बघताना पूर्वीच्या नाटकात काय धमाल उडत असेल त्याची कल्पना येते. महानिर्वाण हे नाटक समाजातील मानसिकतेचे दर्शन घडवते. हे नाटक समाजाला आरसा दाखवते. रडणारे नातेवाईक, मृत व्यक्तीच्या मुलाची किंवा कुणाची तरी वाट बघणे, नको तिथे नाक खुपसून न मागता सल्ला देणारे नातेवाईक आणि शेजारीपाजारी यांच्यासाठी दुसऱ्याचा मृत्यू हा एक नाईलाजाने करायचा केवळ एक उपचार असतो. ह्या सर्व प्रसंगांच्या कडे विनोदी अंगाने पाहत आणि कीर्तन, गोंधळ, भजन, अभंग या महाराष्ट्रातील लोककलेचा वापर करीत हे नाटक सादर केलं जातं. नवीन संचातील कलाकारांनी सादर केलेलं हे पन्नास वर्षांपूर्वीचं नाटक पाहताना हे नाटक कालातीत आहे हे जाणवतं आणि आजच्या काळातही तितकाच कालसुसंगत वाटतं.
ह्या प्रायोगिक नाटकाचे प्रयोग कदाचित व्यावसायिक नाटकाप्रमाणे प्रत्येक आठवड्याला होणार नाहीत, पण जेंव्हा केंव्हा ते होतील तेंव्हा आजच्या पिढीने ते बघायला हवे. लेखक सतीश आळेकर म्हणतात त्याप्रमाणे "या नाटक निर्मितीच्या काळात जन्मालाही न आलेल्या नव्या संचातील कलाकारांना हे नाटक पुन्हा करावेसे वाटते, ह्याचा अर्थ ते अजूनही ताजे आहे"...
राजीव जतकर.
६ डिसेंबर २०२४.